Monthly Archives: September 2014

Titan

जगात अनेक लेखकांच्या असंख्य कादंबऱ्या आहेत. अनेक भाषांतील किती कादंबऱ्या लिहिल्या असतील त्याची गणती नाही.पण इतक्या अगणित, नामवंत गाजलेल्या शतकानुशतके वाचल्या जाणाऱ्या आणि प्रसिद्ध कादंबऱ्या असतील. पण मॉर्गन रॉबर्टसनच्या १८३८ साली लिहिलेल्या कादंबरीचे एव्हढे काय महत्व असावे की ती फिलाडेल्फियाच्या सागरी जीवना संबंधी असलेल्या वस्तुसंग्रहात एका मोठ्या काचेच्या कपाटात ती जतन करून ठेवलेली असावी?

पिवळ्या पडलेल्या, बरीच पाने विस्कळीत, विरळ झालेली. काही पानांचे तुकडे पडलेले अशा जीर्ण अवस्थेतील ते पुस्तक आजही तुम्हाला तिथे दिसेल.

कादंबरी एका जहाजाच्या दुर्दैवी प्रवासाची आहे. ती अवाढव्य बोट बुडणे अशक्य आहे असा कंपनीचा दावा होता. तसे छातीठोकपणे जाहीरही केले होते. वेगही भरपूर होता.बोटीवर विविध सुखसोयींची रेलचेल होती.कादंबरीतील ही बोट १८३२च्या एप्रिलमध्ये पहिल्याच प्रवासाला निघाली. प्रवाशांमध्ये अमेरिका आणि इंग्लंड
मधील धनाढ्य लोक होते. ॲटलॅन्टिक महासागराच्या उत्तरेकडील भागातून ही पहिली सफर सुरू झाली; आणि एका हिमनगाला धडकून ती बुडाली. बोटीवर जीवरक्षक नावाही पुरेशा नव्हत्या. हजारो प्रवासी समुद्रात बुडाले. इतका प्रचंड गाजावाजा होउन निघालेली ‘कधीही न बुडणारी’बोट पहिल्याच प्रवासात बुडाली!

१८३८ साली लिहिलेल्या मॉर्गन रॉबर्टसनच्या कादंबरीचा हा थोडक्यात गोषवारा.

हीच गोष्ट,अशीच घटना कुठेतरी ऐकल्याचे आठवते ना? अगदी अशाच घटनेवर आधारलेला, पण सत्य घटनेवर प्रवासात बुडाली!आधारलेला, गाजलेला सिनेमा ‘टायटॅनिक’ आपण पाहिलेला आहे. तशीच घटना १८३२ साली प्रसिद्ध झालेल्या रॉबर्टसनच्या कादंबरीत आहे.

योगायोग म्ह्णावेत तरी ते किती असावेत! विश्वास बसणार नाही. नावात काय आहे म्हणणाऱ्यांनीही थक्क व्हावे अशी योगायोगांच्या गोष्टींची सुरवात नावापासूनच होते.

एप्रिल १८३८ साली लिहिलेल्या’रेक ऑफ टायटन’ कादंबरीतील कल्पित बोटीचे नाव ‘टायटन’ आणि १९१२ साली प्रवासाला निघालेल्या प्रत्यक्षातील बोटीचे नाव ‘टायटॅनिक’! कल्पित काद्ंबरीतील काल्पनिक ‘टायटनवर’ २२०० प्रवासी होते तर ‘टायटॅनिक’वर ३००० प्रवासी होते. वास्तवातील ‘टायटन’ आणि ‘टायटॅनिक दोन्ही बोटी ‘बुडणे शक्य नाही’ अशा कोटीतील बांधणीच्या. १९१२ साली तयार झालेल्या बोटीचीही अशीच ख्याती होती. कारण दोन्ही बोटीतील वेगवेगळे भाग पक्के पाणबंद होते.आत पाणी शिरू न शकणारे असेच होते.’टायटन’ची लांबी ८०० फूट तर ‘टायटॅनिक’ची साधारणत: ८८२.५ फूट होती.

कादंबरीतील ‘टायटन’ जेव्हा हिमनगाला धडकली तेव्हा लेखकाने तिचा वेग सागरी २५ सागरी मैल ठेवला होता.प्रत्यक्षातील ‘टायटॅनिक’जेव्हा हिमनगावर आदळली तेव्हा तिचा वेग २३ मैल होता. आपल्या कादंबरीत मॉर्गनने कल्पनेने तीन प्रॉपेलर्स बसवले अणि १९१२ साली इंजिनिअर्सनीही तीनच प्रॉपेलर्स बसवले. कादंबरीतल्या आणि खऱ्याखुऱ्या अशा दोन्ही बोटींवर बरेच प्रवासी श्रीमंत होते. पण शाही सुखसोयी केलेल्या ‘टायटन’वरील २२०७ प्रवाशांसाठी लेखक पुरेशा जीवरक्षक नावा ठेवायचे विसरला.त्याने केवळ २४ नावाच ठेवल्या.तर ७५ वर्षांनी गोदी कारखान्यात तयार झालेल्ल्या ‘टायटॅनिक’वरही इंजिनीअर्सनी ३००० प्रवाशांसाठी फक्त २० जीव रक्षक नावांचीच तरतूद केली!

अबब! योगायोगांची इतकी मोठी मालिका असू शकते? का ह्याला दुर्दैवी योगायोगांच्या एका पाठोपाठ येणाऱ्या लाटा म्हणाव्यात, समजत नाही. अशा घटनेला, तपशीलासह हुबेहुब तशाच असणाऱ्या,तसाच शेवट होणाऱ्या गोष्टीला चमत्कार म्ह्णण्याचा मोह झाला तर काय चुकले?

लाल कॅडीलॅक

गेरीची लालभडक कॅडिलॅक मोटार होती. मोठी होती. हेरीकडे ही एकच गाडी होती. कोणट्याही कामासाठी, कुठेही जायचे असेल तरी त्यालाकिन्वा त्याच्या कुटुंबाला ही एकुलती एक गाडी वापरावी लागे. आपल्या बायको मुलांना घेऊन ह्याच गाडीतून तो सहलीलाही जाई.

गेरी विक्रेता होता. इलेक्ट्रॉनिकच्या अनेक वस्तू तो विकत असे. गाडीच्या मागच्या जागेत त्यांचे नमुने ठेवायचा आणि फिरतीवर निघायचा. लहान मोठ्या दुकानांत जाऊन ऑर्डरी मिळविणे, हे त्याचे रोजचे काम.

१५ ऑगस्ट १९९४चा दिवस. दिवस नेहमीसारखा उगवला. गेरीच्या ताम्बड्या कॅडिलॅकची रथयात्रा सुरू झाली. आज ‘बॉब इलेक्ट्रॉनिक्स’पासून सुरवात करू या असे ठरवून तो निघाला. दुकानाच्या काचांतून त्याला बॉब दिसत होता. आपले काम पाच सात मिनिटात आटपेल ह्या खात्रीने कॅडिलॅकचे इंजिन चालू ठेवूनच तो दुकानात शिरला.”हाय बॉब! आज काय पाठवू?” असे म्हणतच आत आला. “आज तरी काही नकोय,गेरी,” बॉब दुकानात चौफेर नजर टाकत आणि कॉम्प्युटरमध्ये पाहून म्हणाला. “पण पुढच्या आठवड्यात नक्की ये, मोठी ऑर्डर काढून ठेवतो.” बराय थॅन्क यू बॉब्, मी नाकी येईन”, असे म्हणत बॉब मागे फिरला. बाहेर येऊन पाहतो तर…! गेरीची लालभडल कॅडिलॅक गायब!
बॉबशी गेरी फक्त दोन तीन मिनिटे बोलत थांबला असे,तेव्हढात आयती इंजिन चालू असलेली मोटार पसार करण्यास चोराला किती सोपे झाले असेल.

गेरी हादरलाच. पण त्याने पोलिसांना फोन केला. नंतर त्याने आपल्या दोस्ताला फोन लावला. “माईक, अरे माझी गाडी आताच, इथून चोरीला गेलीय!” गेरी फोनवर मोठ्याने ओरडतच बोलत होता. “अरे तू काय सांगतोस काय ?” माईकने विचारले. गेरीने पुन्हा त्याची गाडी चोरीला गेल्याचे सांगितले. आणि आपण कुठे आहोत तो पत्ताही दिला. “मी निघालोच्” म्ह्णाला. पोलिस आली त्यापाठोपाठ माईकही पोचला. पोलिसांना गेरीने सर्व काही सांगितले. पोलिसांनी आवश्यक ती माहिती लिहून घेतलीआणि “आम्ही तपासाला लागतो” इतके आश्वासन देऊन पोलिस गेले.

माईक गेरीला म्हणाला, हे बघ, चल. आता आपणही तुझी मोटार शोधूया.” पण गेरीला हा असे का म्ह्णतो ते समजेना. “अरे बाबा, चोर कुठल्या कुठे गेले असतील. गाडी लपवूनही ठेवली असेल. आणि शोधायचे तरी कुठे कुठे? बृकलीन काय लहान गाव आहे का?” हे ऐकल्यावर माईकचा उत्साहही कमी झाला. “तू म्ह्णतोस ते खरे आहे म्हणा. पण एक प्र्यण करू या. त्या अगोदर मला रिकल्स होम सेंटरमधून एक पक्कड आणि स्क्रूड्रायव्हर घ्यायचे आहेत. ते घेऊ आणि तुझी गाडी शोधू या. तुला दुकानात यायचे असेल तर ये नाहीतर गाडीतच थांब.” “चालेल.मी गाडीतच बसतो तू जाऊन ये.” गेरी तरी दुसरे काय करणार होता.

वीएस मिनिटांनी ते दोघे दुकानाच्या भल्या मोठ्या वाहन तळापाशी आले. सर्व रांगा जवळपास भरल्या होत्या. एका रिकाम्या जागेत त्यांनी गाडी लावली.गेरी गाडीतच बसून होता. माईक एकटाच आत गेला.

आज सकाळपासून आकाश ढगाळ होते. गेरी आधीच उदास होउन काळजीतच होता. त्यात अशा वातावरणाची भर. समोर मोटारींच्या रांगाच रांगा पसरलेल्या. त्यांच्याकडे पहात बसला होता. आपल्या गाडीच्या विचारात होता. काय करायचे आता, केव्हा सापडते कुणास ठाऊक. हेच विचार डोक्यात चालले होते.

इतक्यात काय झाले कोणास ठाऊक. पण ढगांनी भरलेल्या आभाळातून प्रकाशाची एक तिरिप अचानक यावी काय आणि एकाच मोटारीवर ती पडते काय! एकाच मोटारीवर ती स्थिरावली. गेरी बघतच राहिला. बसल्या जागेवरून, पुढे वाकून तो पाहू लागला. मोटारींनी व्यापलेल्या सहा सात रांगा भरलेल्या. आकाश अजूनही ‘नभ मेघांनी आक्रमिले’लेच होते. पण तो प्रकाशाचा भाला एकाच मोटारीवर खुपसल्यासारखा उभा होता. गेरी गाडी बाहेर येऊन पाहात पाहात त्या मोटारीपाशी गेला….

चोरीला गेलेली त्याची लालभडक, तांबडी लाल कॅडिलॅकच होती!

गेरीने पोलिसांना फोन केला. पोलिसही वेगाने आले. गेरीची उपजीविका असलेली कॅडिलॅक मिळाली.!

सुगीहारा

१९३९ सालची ही गोष्ट आहे. दुसरे महायुद्ध सुरू झाले होते . युरोपच्या इतिहासातील हा काळ म्हणजे एक काळेकुट्ट प्रकरण आहे.

ह्या काळात जपानच्या सरकारने केवळ ज्यू लोकांनाच नव्हे तर इतर कोणालाही सरकारच्या परवानगीशिवाय आपल्या कोणत्याही वकिलातीने व्हिसा देऊ नये असा हुकूम काढला होता.पण…

लिथ्वानिया येथील जपानी वकिलातीतील चिउने सुगीहारा एक अधिकारी. हा मात्र येईल त्या ज्यूला व्हिसा देत होता.नाझींच्या गॅस चेंबर,छळ छावण्या ह्यापासून कित्येक ज्यू लोकांना ह्या कनवाळू जपानी अधिकाऱ्याने वाचविले. दुसरे महायुद्ध संपल्यावर काही वर्षे माणुसकी जपणाऱ्या सुगीहाराचे नावही कुणासमोर आले नव्हते. मग त्याने केलेल्या कार्याची माहिती तरी कोणाला होणार? पण काळ स्थिरावल्यावर सुगीहाराने ज्यांचे प्राण वाचवले होते ते लोक आपण कसे वाचलो आणि कुणामुळे वाचलो हे वर्तमानपत्रे, रेडिओ अशा माध्यमातून सांगू लागले तेव्हा चिउने सुगीहाराचे नाव थोड्याच काळात सर्वतोमुखी झाले. अनेक पुस्तकांतून सुगीहाराचा उल्लेख ‘जपानी शिंडलर असा होवू लागला.

इझ्रायलच्या सरकारने, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांना आश्रय देऊन, इतर मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या सुगीहारासारख्या तारणहारांचे ऋण फेडण्याचे ठरवले. त्यापैकी अनेकांना, त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा गौरव म्हणून आयुष्यभर निवृत्ती मानधन दिले आहे. आणखी एका प्रतिकरूपाने इझ्रायलने कृतज्ञता व्यक्त केली. त्या तारणहारांच्या नावाने वृक्षारोपण केले आहे.

सुगीहाराच्या नावानेही वृक्षारोपण करण्याचे ठरवले. प्रथम त्याच्या नावे चेरीची झाडे लावण्याचे सरकारच्या मनात होते. पण चेरीपेक्षाही दीर्घायुषी वृक्षांची राई लावून करण्याचे योजले. त्यामुळे सुगीहाराचा योग्य प्रकारे सन्मान होईल ही त्यामागची भावना होती.सुगंधी देवदार==सेडर्= वृक्षाशिवाय दुसरे कोणते डोळ्यांसमोर येणार? शिवाय सेडर वृक्षाचे महत्व ज्यू धर्मात मोठे आहे. त्यांचे जे अगदी पहिले सिनेगॉग आहे तेथेही सेडर वृक्षच लावले होते. म्हणून सुगीहाराचा गौरव देवदार वृक्षांच्या मोठ्या राईने करण्याचे ठरले आणि तशी ती झाडीही लावली. ह्यापेक्षा दुसरा कोणता मोठा सन्मान असेल?

योगायोग पहा, ही सेडर वृक्षांची राई लावून झाल्यावर इझ्रायली अधिकाऱ्यांना समजले की जपानी भाषेत ‘सुगीहारा’म्हणजे सेडर वृक्षांची राई असाच होतो!

सुगीहारा’सेडर वृक्षांचे’ उपवन!

अब्राहम लिफर

अब्राहम लिफर इझ्रायल मधील असोदचा लोकप्रिय रब्बाय होता तो मोठा ज्ञानी होता. तो हयात असतानाची ही हकीकत आहे.

लिफरच्या सिनेगॉगमधील भक्तमंडळींपैकी एकाच्या मुलाचे लग्न बेल्जिअमच्या अँटवर्प येथील मुलीशी ठरले. इझ्रायलहून लिफर अँटवर्पला निघाले. ते स्वत: धरून एकूण नऊ पुरुष होत.

अँटवर्पपासून विमान तीनशे मैलांवर आले असता वैमानिकाने घोषणा केली की विमानातील इंधन संपत आले आहे. विमान तातडीने उतरावे लागत आहे. लहानशा विमानतळावर विमान उतरले. लफीरने कुठे एखाद्या निवांत जागी प्रार्थना करावयाचे ठरविले. विमानतळावर फक्त एकच कर्मचारी होता. त्याला,”आम्हाला प्रार्थना करायची आहे, एखादी खोली असेल तर उघडून देता का? “रबाय अब्राहमने विचारले.

रब्बय लिफरने साध्या इंग्रजीत चौकशी केली होती. पण समोरच्या माणूसाचा चेहरा विजेचा धक्का बसावा तसा झाला.स्वत:ला सावरत तो म्हणाला,” मी खोली देईन पण मला माझ्या वडिलांचे श्राद्ध करायचे आहे त्याचे ‘कड्डिश’ (मंत्र, प्रार्थना) म्हणू द्याल का”? “तू ज्यू आहेस का”? रबायही आश्चर्याने विचारत होते. मानेनेच हो म्हणत तो माणूस पुढे म्हणाला,”बेल्जियमच्या ह्या भागात कोणी ज्यू रहात असतील हे मला तरी ठाऊक नव्हते. रब्बाय इथे तुम्ही काय करताय”? तो माणूस आणखी पुढे विचारू लागला,”आणि तेही नेमके माझ्या वडिलांच्या श्राद्धाच्या तिथीलाच इथे कसे”?खोलीचे दार उघडून देता देता त्याने विचारले. तो कर्मचारी बोलतच राहिला,”तुमचा विश्वास बसणार नाही, तरी पण सांगतोच.मी सांगणार आहे ते शंभर टक्के खरे आहे.”

“माझे घरातल्या कुणाशीही पटत नव्हते. मी घर सोडून ह्या खेड्यात पळून आलो. आमच्या घरातील वातावरण , इतर सर्वजण अति धार्मिक सनातनी होते. मी धार्मिक वृत्तीचा नाही.. माझ्या गेलेलेल्या वडलांचे,बरीच वर्षे झाली. साधी (श्राद्धाची प्रार्थना,मंत्र) कड्डीशही कधी म्हणालो नाही.” “काल रात्री स्वप्नात माझे वडील आले. ते म्हणाले, “यांकेल, अरे उद्या माझ्या श्राद्धाची तिथी आहे. तू माझ्यासाठी कड्डीश म्हणावे अशी माझी इच्छा आहे.” “पण बाबा, कड्डीश म्हणायची तर ‘मिनयान’ (द्हा जण, गणस्ंख्या) पाहिजेत ते कुठून मिळणार? बाबा ह्या खेड्यात मी एकुलता एक ज्यू आहे.” “यांकेल, तू कड्डीश म्हणेन असे कबूल कर. मिनयानची व्यवस्था मी करतो”

“मी जागा झालो. स्व्प्न आठवले की मी थरथरायचो. पण नंतर विचार केला की हे सगळे अखेर स्वप्नच होते. नाहीतर इतक्या कोपऱ्यातल्या खेड्यात नऊ ज्यू कुठले येताहेत! आणि ते सुद्धा इथे आणि आजूबाजूला कोणी ज्यू रहात
नसताना ? स्वप्नावर कोणी विश्वास ठेवतो का? असा विचार करत मी कामावर आलो. “आणि तुम्ही, खुद्द रब्बाय आलात. तेही बरोबर ‘मिनयान’ घेऊनच”! तो एकच एक एकटा ज्यू कर्मचारी अवाक होउन रब्बायला भडभडा सांगत होता.

रब्बाय अब्राहम लिफर त्या माणसाला मायेने जवळ घेत शान्तपणे म्हणाले, “यांकल्, चल आपण सगळे कड्डीश म्ह्णूया.”

डेव्हिड ब्रॉडी

डेव्हिड ब्रॉडी महिन्यातून एकदा तरी मॉन्ट्रियलहून न्यूयॉर्कला आपल्या मोटारीतून जात असे . विमानाने जाणे त्याला परवडणारे नव्हते असे नाही. त्याचा व्यवसाय उत्तम चालला होता. विमान प्रवास त्याला सहज शक्य होता. पण त्याच्या एका मित्राचा विमान अपघातात मृत्यु झाल्यापासून तो विमान प्रवास टाळत होता.

गेली दहा वर्षे तो मॉन्ट्रियलपासून न्यूयॉर्कला आपल्या मोटारीनेच जात होता. त्यामुळे तो रस्ता त्याच्या ‘चाकाखाल’चा झाला होता. प्रवासाला निघण्यापूर्वी तो चार तास झोप काढत असे; त्यामुळे सात तासांचा प्रवास तो वाटेत कुठेही न थांबता, थेट करत असे.

१९९६च्या मे महिन्यात डेव्हिड ब्रॉडी रात्री मॉन्ट्रियलमधून निघाला. एक तास झाला नाही तोच डेव्हिडला कसे तरीच वाटू लागले. एकदम थकवा आला. अंग दुखायला लागले आणि त्याचे डोळे मिटायला लागले. आतापर्यंत एकदाही असे झाले नाही आणि आजच एकदम असे का व्हावे असे त्याला वाटू लागले. बरं, निघण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे चार पाच तास चांगली ताणूनही दिली होती. तरी असे का व्हावे? डेव्हिड विचार करू लागला. वाऱ्याने बरे वाटेल म्हणून त्याने खिडकीच्या काचा खाली घेतल्या. थरमॉस मधून गरम कॉफी प्याला. कशाचाही उपयोग झाला नाही. डोळ्यांवर झोप येतच होती.
हे काही ठीक नाही असे म्हणत त्याने बाहेर पडण्याच्या पहिल्याच वळणाने गाडी काढून एका पेट्रोल पंपाकडे नेली. पंपावरच्या माणसाला, त्याने “जवळपास एखादे हॉटेल, मोटेल आहे का?” विचारले. “हो आहेत की; माझ्याकडे फोन नंबरही आहेत. थांबा देतो” म्हणत ते त्याने दिले. एकाही ठिकाणी जागा नव्हती. सगळी भरलेली.

“आश्चर्य आहे,” पंपावरचा माणूस म्हणाला, “अजून प्रवाशांची वर्दळ सुरुही झाली नाही तरीही सगळी भरलेली!”
पंपवाल्या माणसाने पन्नास साठ मैलावर असलेल्या हॉटेलकडेही चौकशी केली. तिथेही नन्नाचाच पाढा. “हे पहा, मला खूप झोप येतेय. थकवाही आलाय. जवळ कुठे शाळा,कॉलेजचे वसतीगृह खोल्यांची सोय असललेले काही आहे का?” डेव्हिड ब्रॉडी अगतिकपणे विचारत होता. “नाही. इथे तसे काही नाही.”पंपवाला माणूस म्हणाला. “बरं वृद्धाश्रमासारखे काही आहे का?कशीबशी एक रात्र कढायची आहे. बघ बाबा.”डेव्हिड विनवणीच्या सुरात म्हणाला.

अरे हो! रस्ता ओलांडून पुढे गेलात की वृद्धाश्रमासारखी एक लहानशी जागा आहे. पॅट्रिक राइली मालक आहे. चांगला माणूस आहे. करेल तुमची काहीतरी सोय.” पंपवाला गप्पिष्ट होता. माणूस कसाही का असेना मला काय, झोपायला खाट मिळाली की झाले. असे पुटपुटत डेव्हिड त्याचे आभार मानत, मोटार हळू हळू चालवत, डोळ्यांवर झापड येत होतीच तरी निघाला. वृद्धाश्रमात आला. एका खोलीत डेव्हिडची झोपायची सोय झाली.

सकाळ झाली. रात्री झोप चांगली लागली होती. थकवाही गेला होता. डेव्हिड ताजातवाना झाला. त्याने पॅट्रिक राईलचे मनापासून आभार मानले. तो जायला निघाला. थोडे पुढे गेला असेल तर लगेच माघारी आला. राईलला म्ह्णाला,”तुम्ही माझी काल रात्री मोठी सोय केली. वृद्धाश्रमातल्या कुणासाठी माझ्या हातून थोडे काही झाले तर मला बरे वाटेल. माझा व्यापारधंदा असला तरी मी ज्यू रबायही आहे. इथे कुणी ज्यू राह्तात का?”

नवल वाटून पॅट्रिक म्हणाला,’काय सांगायच्ं! इथे एक ज्यू म्हातारा रहात होता. तुम्ही काल रात्री आलात साधारणत: त्याच वेळेस तो वारला बघा.” “मग त्याच्या अंत्यसंस्काराची काही व्यवस्था केली असेलच तुम्ही,”डेव्हिडने विचारले. “सॅम्युअल विंस्टाईन शंभरीचा होता.त्याचे सर्व नातेवाईक त्याच्या आधी वारले. त्याचा कोणीही वारस आता नाही. त्याच्याजवळ किंवा त्याच्या नावे एक फुटकी कवडीही नाही. इथे जवळपास ज्यू लोकांची दफनभूमीही नाही. आणि असेल तर ती शंभर मैल दूर असलेल्या अल्बानी येथे असावी. म्हणून आम्ही ठरवलेय की इथल्या आमच्या ख्रिस्ती दफनभूमीतच त्याचे दफन करावे. निराधार गरीबांसाठी आम्ही जागाही राखून ठेवल्या आहेत.”पॅट्रिक सगळे सविस्तर सांगत होता.
“तुमचा हा खरंच चांगुलपणा आहे. पण निराधार असो, तो ज्यू होता. त्याला आपल्या दफनभूमीतच अखेरचा विसावा घ्यावा असे वाटत असणार .मी आज माझी स्टेशन वॅगन घेऊन आलोय. नाहीतर नेहमी मी माझ्या लहान गाडीतून जात असतो. माझ्या गाडीत शवपेटी सहज मावेल. तुमची हरकत नसेल तर त्याचा देह मी अल्बानीला घेऊन जाईन. बघा.”

कागदपत्रे तयार झाल्यावर डेव्हिड शवपेटीसह बृकलीनच्या ज्यू लोकांच्या दफनविधी करणाऱ्या संस्थेत आला. पण,”अहो, काय करणार आम्ही? त्याचा दफनविधी धर्मादाय केला असता आम्ही. पण आमच्या भूमीत जागाच नाही. तुम्ही क्वीन्सला जाऊन पाहता का?” असे त्याला ऐकायला मिळाले. पण क्वीन्समध्येही अशाच अर्थाचे सांगण्यात आले. “अशी वेळ कुणा ज्यूवर येईल हे आमच्या ध्यानीही आले नाही. त्यामुळे तशी राखीव जागाही नाही. पण मी ऐकलंय की मॅनहॅटनच्या वॉशिंग्टन हाईटस येथे सोय आहे. तुम्ही तिथे प्रयत्न करा.”

डेव्हिड ब्रॉडी सॅम्युअल विंस्टाईनच्या शवपेटीसह वॉशिंग्टन हाईट्स येथे आला. फर्निच्यरवर,खिडक्यांवर धूळ साचलेल्या त्या ऑफिसमधल्या एका जरव्ख म्हाताऱ्या डायरेक्टरने,”हो, आमच्याकडे धर्मादाय निधी आहे. त्यातूनच आम्ही गरीबांचे अंत्यविधी करतो.” तो म्हातारा डेव्हिडला सांगू लागला,”पनास वर्षांपूर्वी एका उदार धनिक ज्यू गृहस्थाने निष्कांचन, निराधार निराश्रित ज्यू माणसावर अशी पाळी आली तर भली मोठी देणगी दिली. त्यातूनच आम्ही अनेक जागा अशा लोकांसाठी राखून ठेवल्या आहेत. तुम्ही आणलेल्या म्हाताऱ्यासाठी आम्ही सर्व ते करू ते त्या दनशूर माणसाच्या देणगीमुळेच.काही काळजी करू नका.” म्हातारा बोलायचे थांबवत नव्हता. डेव्हिड नुसते हं हं करत होता.किंचित थांबून म्हातारा म्ह्णाला “कागदोपत्री नोंदी करायच्या की झाले..” तो स्वत:लाच सांगत असल्यासारखे बोलत होता.

जरव्ख म्हातारा जाडजूड रजिस्टर काढून लिहू लागला.”मृत व्यक्तीचे नाव सांगा.” “सॅम्युअल विंस्टाईन ,”डेव्हिडने सांगितले.
“हं सॅम्यु…विंस्टा……कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय.” नाव लिहिता लिहिता म्हातारा स्वत:शीच पुटपुटला.नंतर दुसऱ्या कुणाला तरी हाक मारत डेव्हिडला म्हणाला,”रीतिनियमांप्रमाणे मला एकदा शव पाहिले पाहिजे.” इतके म्हणत तो डायरेक्टर पद सांभाळणारा म्हातारा डेव्हिडच्या स्टेशनवॅगनकडे गेला.

इतका वेळ न थांबता बोलणारा तो म्हातारा गृह्स्थ थोड्या वेळाने ऑफिसमध्ये आला, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहात होत्या. गळा दाटून आलेल्या आवाजात म्हणाला,” मित्रा डेव्हिड, सॅम्युअल विंस्टाईनला आम्ही आमच्या दफनभूमीत विश्रांतीसाठी केवळ जागा देणार नाही तर मोठी सन्मानाची जागा देणार आहोत. सर्व मान मराताबासह त्याचा अंत्यसंस्कार मोठ्या गौरवाने करणार, रबाय डेव्हिड, तुम्ही ज्याला बरोबर आणलेत तो सॅम्युअल विंस्टाईन म्हणजेच आमचा तो उदार धनिक देणगीदार सॲम्युअल विंस्टाईनच आहे. पूर्वी त्याने स्वत:साठी खरेदी केलेल्या जागेतच त्याचे अंत्यसंस्कार होतील. मित्रा तू फार त्रास सोसून सॅम्युअलला इथे आणलेस.पण तुझ्या धडपडीचे सार्थक झाले. त्यामुळेच सॅम्युअल विंस्टाईन त्याच्या निजधामी, स्वगृही आला.” म्हातारा डोळे पुसत मधूनच थांबत बोलत होता.