Monthly Archives: June 2020

शर्यत

एक मुलगा होता. अत्यंत जोरात पळायचा. उत्तम धावपटू होता. शर्यतीत भाग घ्यायची तीव्र इच्छा होती. त्याचे आजोबा होते. त्यांनाही नातवाचे कौतुक होते.


दुसऱ्या गावात पळण्याची शर्यत होती. मुलाने त्या शर्यतीत भाग घेतला. गावातल्या मुलांबरोबर तो गेला.आजोबानाही राहवले नाही. नातवाची शर्यत पाहायला तेही त्या गावात पोचले.


नातवाच्या बरोबर दोघे स्पर्धक होते. शर्यत सुरु झाली. नातू आणि एक मुलगा चांगल्या वेगाने पळत होते. तिसरा मागे पडू लागला. हे दोघे अटीतटीने पळत होते. लोक श्वास रोखून पाहात होते. कोण जिंकेल ह्याची उत्सुकता वाढत होती. आजोबा शांत होते. नातवाने शर्यत जिंकली. लोकांनी मोठ्या आनंदाने आरोळ्या ठोकून शिट्या टाळ्या वाजवून मुलाचे कौतुक केले. मुलाची मान ताठ झाली. स्वत:च्या पराक्रमाने त्याची छाती फुगली.आजोबा शांत होते. त्यांनी नातवाच्या डोक्यावरून हात फिरवून कौतुक केले.

दुसरी शर्यत जाहीर झाली. ह्या खेपेला दोन नव्या दमाची ताजीतवानी मुले नातवाबरोबर शर्यत खेळायला उतरली. नातू पहिल्या विजयाने अधिकच जोमात आला होता. शर्यत सुरू झाली. दोन्ही नवे धावपटू जोशात होते. त्यांनी नातवाला मागे टाकायला सुरुवात केली. आजोबा पाहात होते. नातू आता इरेला पेटला. सगळे कौशल्य शक्ति पणाला लावून धावू लागला. तिघे जातिवंत धावपटू एकाच रेषेत बरोबरीने पळू लागले. अंतिम रेषा जवळ येऊ लागली. नातवाने मान खाली घालत जोरदार मुसंडी मारून अंतिम रेषा लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात ओलांडली. किती वेळ टाळ्या शिट्या वाजत राहिल्या होत्या! नातू धापा टाकत होता. जग जिंकल्याच्या ताठ्यात उभा होता. आजोबांच्या जवळ येऊन उभा राहिला. आजोबांनी शाबासकी दिल्यासारखा त्याच्या पाठीवर हात थापटला.

नातू ‘इजा बिजा आणि आता तिजा’ जिंकण्याच्या इर्षेने,“पुन्हा एक शर्यत होऊ द्या !” म्हणून ओरडू लागला. आजोबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवित त्याला शांत करीत ते पुढे गेले. ह्या खेपेला आजोबांनी पुढाकार घेऊन एक अशक्त, दुबळी म्हातारी व एका आंधळ्याला शर्यतीत उतरवले. नातू थोड्या घुश्शातच म्हणाला,”आजोबा! ह्यांच्याशी मी, मी,ह्यांच्याशी शर्यत खेळू?” आजोबांनी एकाच शब्दात त्याला सांगितले,” खे-ळ.”

शर्यत सुरू झाली. मुलगा जरा घुश्शातच होता. त्याच्या वेगाने धावत सुटला. अंतिम रेषा पार केली. शर्यत जिंकली. दोन्ही हात वर करून ओरडत नाचू लागला.लोक गप्प होते. ना टाळ्या ना शिट्या ऐकू येत होत्या. मैदान शांत होते. अशक्त दुबळी म्हातारी मोजून एक दोन पावलेच पुढे आली होती. आंधळा जागीच उभा होता. नातवाचा चेहरा पडला होता.आजोबाजवळ आला. ,” मी शर्यत जिंकली पण लोक आनंदाने ओरडले नाहीत की टाळ्या वाजवून कौतुक केले नाही!” आजोबा शांत होते. ते नातवाला घेऊन पुन्हा शर्यतीच्या प्रारंभ रेषेकडे गेले. त्यांनी नातवाला त्या दोघा स्पर्धकाकडे तोंड करून उभे केले. काहीही न बोलता आजोबा हळू हळू आपल्या जागी गेले. नातू सुरुवातीच्या रेघेवर उभा राहिला.

शर्यत सुरु झाल्याचा इशारा झाला.सुरुवातीला सवयीने नातू पळणारच होता. एक दोन पावले त्याने तशी जोरात पुढे टाकलीही. पण लगेच तो दुबळ्या म्हातारीच्या व आंधळ्या माणसाच्या मध्ये जाऊन उभा राहिला.त्याने त्या दोघांचे हात धरले. तो त्यांच्या बरोबरीने चालू लागला. तिघेही चालू लागले. हलकेच एक दोन टाळ्या वाजल्या. मग तिघांच्या पावलांच्या ठेक्यावर त्या वाजू लागल्या. तिघांनीही हात धरून अंतिम रेषा ओलांडल्यावर कौतुकाच्या टाळ्यांचा पाऊस पडू लागला. लोक आनंदाने नाचू लागले.

“आजोबा,कुणासाठी टाळ्या वाजवताहेत लोक? कुणी जिंकली शर्यत? “ नातू विचारत होता. “ बाळा, लोक शर्यतीला टाळ्या वाजवताहेत.” आजोबा शांपणे म्हणाले. “बाळ तू जोरदार धावतोस. शर्यती जिंकतोस. पण फक्त शर्यत जिंकण्यालाच महत्व नाही. शर्यत कशी पळतोस ते महत्वाचे आहे. आयुष्यात शर्यत जिंकणे हेच एक सर्वस्व नाही. ह्या शर्यतीत दीन दुबळ्यांना आधार देत पळणे हीच जिंकण्याहून मोलाची गोष्ट आहे.”

(इंटरनेट वरील एका लहानशा इंग्रजी बोधकथेवरून ही विस्तारित कथा केली.)

पारले-जी

माझ्या कमावत्या काळात सगळ्यांत जास्त संबंध दोनच गोष्टींशी आला. एसटीची तांबडी बस आणि ग्लुकोजची बिस्किटे. नुसती ग्लुकोजची म्हटले तरी ती पारलेचीच हे सर्वांना माहित आहे. कारण ग्लुकोजची बिस्किटे म्हणजेच पारले व पारले म्हटलेकी ग्लुकोजची बिस्किटे ही समीकरणे लोकांच्या डोक्यांतच नव्हे तर मनांतही ठसली आहेत. ग्लुकोजची बिस्किटे जगात पारलेशिवाय कुणालाही करता येत नाहीत ह्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. संपूर्ण देशात ह्या एकाच गोष्टीवर मतभेद नाहीत.


१९५६ सालची गोष्ट असेल. दादर किंवा चर्चगेटहून मालाडला यायला निघालो की पेंगुळलेल्या डोळ्यांना जाग यावी किंवा मुंबईचा वास नाहीसा होऊन खऱ्या अर्थाने मधुर चवीचा वास येऊ लागला की डब्यातली सर्व गर्दीही ताजीतवानी व्हायची. पारले स्टेशन आले ह्याची खात्री पटायची. विलेपारलेच्या पूर्वेला राहणारे प्रवासीही घरी जाताना पारलेच्या ग्लुकोज बिस्किटाच्या फॅक्टरी कडे आत्मीयतेने पाहात, दिवसभराचे श्रम विसरून,ताज्या ताज्या ग्लुकोज बिस्किटांचा मधुर चवीचा वास पोट भरून घरी न्यायचे.आम्ही पुढे जाणारेही तो चविष्ट सुगंध एकदोन स्टेशने जाईपर्यंत साठवत असू.पार्ले बिस्किटांची ही प्रत्यक्ष ओळख अशी झाली.


फिरतीची नोकरी. जिल्ह्याच्या गावी आणि,तालुक्या तालुक्यातूनच नव्हे तर लहान मोठ्या गावांनाही जावे लागे. एसटीतून उतरल्यावर लगेच लहान मोठ्या थांब्यावरच्या कॅंटीन उर्फ काहीही म्हणता येईल अशा हाॅटेलात जायचे. गरम वडे किंवा भजी तळून परातीत पडत असत. शेजारी पातेल्यात तेलात वाफवलेल्या अख्ख्या मिरच्या असत. मालक किंवा पोऱ्या वर्तमानपत्राच्या कागदात एक पासून चार चार वडे किंवा भजी आणि मिरच्यांचे तुळशीपत्र टाकून पटापट गिऱ्हाईकी करत असायचे. गरमागरम भज्या वड्यांचा मोह टाळता येत नसे. तो खाल्ला की गरम व मसालेदार वड्यांनी हुळहुळलेल्या जिभेचे आणखी लाड करण्यासाठी एक हाप किंवा कट किंवा तसले प्रकार नसलेल्या गाडीवर एक चहा आणि पारले जी चा दोन रुपयाचा पुडा घेऊन त्या केवळ पोटभरू नव्हे तर कुरकुरीत व खुसखुशीत गोड बिस्किटांची मजा लुटायला सुरवात करायची!


भले पारले जी पोटभरू असतील. पण त्याहीपेक्षा आणखी काहीतरी नक्कीच होती. चविष्ट गोड असायची. दोन खाऊन कुणालाच समाधान होत नसे. तो लहानसा पुडा चहाबरोबर कधी संपला ते ग्लुकोज बिस्किटांच्या तल्लीनतेत समजत नसे.


मला पारले-जीची ओळख व्हायला पंचावन्न -छपन्न साल का उजाडावे लागले? त्या आधी बिस्किटे खाणे हे सर्रास नव्हते. बरे मिळत होती ती हंट्ले पामरची मोठी चौकोनी तळहाताएव्हढी. पापुद्रे असायचे पण मुंबईच्या बेकरीतील खाऱ्या बिस्किटांसारखे अंगावर पडायचे नाहीत. फक्त जाणीव होत असे खातांना. पण साहेबी थाटाची, चहा बरोबर तुकडा तोंडात मोडून खायची. त्यामुळे ती उच्चभ्रू वर्गासाठीच असावीत असा गैरसमज होता. पण खरे कारण म्हणजे ‘पाव बटेर’ पुढे बिस्किटांची गरजही भासत नसे. बरे बेकरीत तयार होणारी नानकटाई लोकांच्या आवडीची होती.

बेकरीची गोल, चौकोनी बिस्किटेही खपत होती. पण तीही रोज कोणी आणत नसे. शिवाय बिस्किटे हा मधल्या वेळच्या खाण्याचा किंवा येता जाता तोंडात टाकायचा रोजचा पदार्थ झाला नव्हता. बिस्किटे चहाबरोबरच खायची अशी पद्धत होती. खाण्याचे पदार्थ म्हणजे शेव,भजी, चिवडा, भाजलेले किंवा खारे दाणे, फुटाणे आणि डाळे चुरमुर. हे ब्लाॅक बस्टर होते.


डाळे चुरमुऱ्यांचीही गंमत आहे. आगरकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला हे प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या बरोबरीचे व नंतरची मोठी झालेली माणसेही रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करत होतो हे लिहू लागले. रस्त्यावरच्या दिव्याप्रमाणे माधुकरी मागून शिक्षण केले हा गरीबीतून कसे वर आलो सांगण्याचा प्रघात होऊ लागला. पण सर्वांना, गरीबांना तर होताच होता, गरीबी सांगण्यासाठी ‘“ कित्येक दिवस तर नुसत्या डाळंचुरमुऱ्यांवर काढले” असे म्हणणे प्रचलित होते. सांगायची गोष्ट अशी की डाळे चुरमुरेही सर्वप्रिय होते. येव्हढ्या गर्दीत बिस्किटांचा सहज प्रवेश होणे सोपे नव्हते.


खाल्लीच बिस्किटे तर लोक बेकरीत मिळणारी खात असत. त्यातही मध्यंतरी आणखी एक पद्धत प्रचलित झाली होती. आपण बेकरीला रवा पीठ तूप साखर द्यायची व बेकरी तुम्हाला बिस्किटे बनवून देत.त्यासाठी ते करणावळही अर्थातच घेत. तरीही ही बिस्किटे स्वस्त पडत. ह्याचे कारण ती भरपूर वाटत. गरम बिस्किटांचा आपलाच पत्र्याचा डबा घरी घेऊन जाताना फार उत्साह असे. आणि ‘ इऽऽऽतकीऽऽऽ बिस्किटे’ खायला मिळाणार ह्या आनंदाचा बोनसही मिळे!
त्या व नंतरचा काही काळ साठे बिस्किट कं.जोरात होती. त्यांची श्र्युजबेरी बिस्किटे प्रसिद्ध होती. पण पारले बिस्किट कंपनी आली आणि चित्र बदलले. स्वातंत्र्य मिळाले होते. त्या अगोदरच पारले कं.सुरु झाली होती. पण इंग्लिश कंपन्यांपुढे अजून तिचा जम बसत नव्हता. पण विक्रीची जोरदार मोहिम, विक्रेत्यांचे जाळे वाढवत नेणे आणि जाहिरातींचा मारा व स्वस्त किंमत ह्यामुळे नंतर नंतर पारलेने जम बसवला.


पारलेला प्रतिस्पर्धी पुष्कळ निर्माण झाले. त्यातला सर्वात मोठा म्हणजे ब्रिटानिया. त्यांनी पारले ग्लुकोजला तोड म्हणून टायगर ब्रॅन्ड आणला पण पारले जी पुढे त्या वाघाची शेळी झाली. स्पर्धेला तोंड देताना पारलेने व्यापारी क्लृप्त्याही वापरल्या. महागाईतही कमी किंमत कायम ठेवण्यासाठी पुड्यांतील बिस्किटांचे वजन कमी करणे,बिस्किटांचा आकार लहान करणे हे केलेच. त्यामुळे आजही दोन रुपये,पाच व दहा रुपयांची पाकीटे मिळतात. परवडतात. पूर्वी पारलेच्या बिस्किटांचा आयताकारी चौकोन मोठा होता. आता बराच लहान केला आहे.तरीही आजही ग्लुकोज म्हणजे पारले-जी च ! काही असो पारलेजी! तुम्ही लोकांसाठी आहात , लोकांचेच राहा.


पारलेने,पाकीटबंद बिस्किटे ही उच्चवर्गीयांसाठीच असतात ही कल्पना लोकांच्या मनातून काढून टाकली! कोणीही बिस्किट खाऊ शकतो हे पारलेने दाखवले.. त्यामुळे कमी किंमतीची लहान पाकीटे पारलेनेच आणली. दोन रुपयाचे पारले-जीचे बिस्किटांचे पाकीट गरीबही घेऊ लागला. चहा बरोबर बिस्किट खाऊ लागला! ‘चहा साखर पोहे ’ या बरोबरच पारले-जी चा पुडाही किराण्याच्या यादीत येऊन बसला. तर ‘धेले की चायपत्ती धेले की शक्कर’बरोबरच गोरगरीब मजूरही पारले-जी का पाकेट’ मागू लागले. दुकान किराण्याचे,दूध पाव अंड्यांचे असो,की पानपट्टीचे, जनरल स्टोअर किंवा स्टेशनरीचे असो पारले ग्लुकोजची बिस्कीटे तिथे दिसतीलच.तसेच हाॅटेल उडप्याचे असो की कुणाचे, कॅन्टीन,हातगाडी,टपरी काहीही असो जिथे चहा तिथे पारले-जी असलेच पाहिजे.


पॅकींगवर कंपनीने ग्लुको लिहिले असले तरी सगळेजण बिस्किटाला ग्लुकोजच म्हणतात! सर्व देशात प्रचंड प्रमाणात आवडीने खाल्ला जाणारा एकच पदार्थ आहे पारले-जी. मग भले अमूल आपले’ दूध इंडिया पिता है’म्हणो की ‘इंडियाज टेस्ट’ असे स्वत:चे वर्णन करो; देशातल्या जनतेची एकमेव पसंती पारले- जी ची ग्लुकोज बिस्किटे! गरीबालाही श्रीमंती देणारी ही बिस्किटे आहेत.


चहाचा दोस्त आणि भुकेला आधार असे डबल डेकर पारले ग्लुकोज बिस्किट आहे. म्हणूनच मी तीस चौतीस वर्षाच्या नोकरीच्या काळात एसटीतून उतरलो की चहा आणि पारलेचा एक पुडा संपवायचो. एक पुडा कामाच्या बॅगेत टाकायचो. दिवस मस्त जायचा. अपवाद फक्त उन्हाळ्याचा. उन्हाळ्यात ,”लोकहो विचार करा चहापेक्षा रस बरा” ह्या सुभाषिताचे मी एकनिष्ठेने पालन करायचो. तरीही पारलेची ग्लुकोज सोडली नाहीत. ती नुसती खाण्यातही मजा आहे!


आजही मुले माझ्यासाठी, बाजारातून येताना आठवणीने पारले- जी ग्लुकोज बिस्किटे आणतात. ह्या पेक्षा दुसरा आनंद कोणता असेल!

संत कान्होपात्रा

पंढरपुरपासून मंगळवेढा १४-१५ मैलावर आहे. म्हणजे जवळच आहे. आपल्याला मंगळवेढे, दुष्काळात उपासमारीने गांजलेल्यांसाठी बादशहाचे धान्याचे गोदाम ज्यानी स्वत:च्या जबाबदारीवर खुले केले; अनेकांचे प्राण वाचवले त्या भक्त दामाजीमुळे माहित आहे. दामाजीचे मंगळवेढे अशी त्याची ओळख झाली.

त्याच मंगळवेढ्यात श्यामा नावाची सुंदर वेश्या राहात होती.तिला एक मुलगी होती. ती आपल्या आईपेक्षाच नव्हे तर अप्सरेपेक्षाही लावण्यवती होती. तिचे नाव कान्होपात्रा होते.

व्यवसायासाठी श्यामाने आपल्या ह्या सौदर्यखनी कान्होपात्रेला गाणे आणि नाचणे दोन्ही कला शिकवल्या. नृत्यकलेत आणि गायनातही ती चांगली तयार झाली. सौदर्यवती असली तरी समाजात गणिकेला काही स्थान नव्हते.

पण श्यामाला मात्र आपली मुलगी राजवाड्यात राहण्याच्याच योग्यतेची आहे असे वाटायचे. राजाची राणी होणे कान्होपात्रेला अशक्य नाही ह्याची तिला खात्री होती. तिला राजदरबारी घेऊन जाण्याचे तिने ठरवले. कान्होपात्रेला ती म्हणाली, “ अगं लाखात देखणी अशी तू माझी लेक आहेस. तुला राजाची राणी करण्यासाठी आपण राजदरबारात जाणार आहोत. तयारी कर.” त्यावर कान्होपात्रा म्हणाली, “ आई, माझ्याहून राजबिंडा आणि तितकाच गुणवान असणाऱ्या पुरुषालाच मी वरेन. पण मला तर माझ्या योग्यतेचा तसा पुरुष कोणी दिसत नाही.” थोडक्यात कान्होपात्रेने आईच्या विचारांना विरोध केला.

काही दिवस गेले. एके दिवशी कान्होपात्रेच्या घरावरून वारकऱ्यांची दिंडी, आपली निशाणे पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या तालावर, विठ्ठलाचे भजन करीत चालले होते. तीही त्या तालावर ठेका धरून डोलत होती.तिने वारकऱ्यांना विचारले, “ तुम्ही कुठे निधाले आहात? इतक्या आनंदाने आणि तल्लीन होऊन कुणाचे भजन करताहात?”

“ माय! पुंडलिकाच्या भेटी जो पंढरीला आला, आणि इथलाच
झाला त्या सावळ्या सुंदर, राजीव मनोहर अशा रूपसुंदर वैकुंठीचा राणा त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी चाललो आहोत!”
वारकरी कान्होपात्रेला सांगत होते. त्यांनी केलेल्या विठ्ठ्लाचे रूपगुणांचे वर्णन ऐकून कान्होपात्रेने त्यांना काहीशा संकोचानेच विचारले,” अहो,तुम्ही वर्णन केलेला हृषिकेषी माझ्यासारखीचा अंगिकार करेल का?” हे ऐकल्यावर वारकी तिला मोठ्या उत्साहाने सांगू लागले,” का नाही? कंसाची कुरूप विरूप दासी कुब्जेला ज्याने आपले म्हटले तो तुझ्यासारख्या शालीन आणि उत्सुक सुंदरीला दूर का लोटेल? आमचा विठोबा तुझाही अंगिकार निश्चित करेल ! तू कसलीही शंका मनी आणू नकोस. तू एकदा का त्याला पाहिलेस की तू स्वत:ला विसरून जाशील. तू त्याचीच होशील !”

वारकऱ्यांचे हे विश्वासाचे बोलणे ऐकल्यावर कान्होपात्रा घरात गेली. आईला म्हणाली,” आई! आई! मी पंढरपुराला जाते.”
हिने हे काय खूळ काढले आता? अशा विचारात श्यामा पडली. कान्होपात्रेला ती समजावून सांगू लागली.पण कान्होपात्रा आता कुणाचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. केव्हा एकदा पंढरपूरला पोचते आणि पांडुरंगाला पाहते असे तिला झाले.

कान्होपात्रा धावत पळत निघाली. दिंडी गाठली. आणि रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।। म्हणत आणि वारकऱ्यांच्या पाठोपाठ ते म्हणत असलेले अभंग भजने आपल्या गोड आवाजात म्हणू लागली.तिचा गोड आवाज ऐकल्यावर एकाने आपली वीणाच तिच्या हातात दिली !

वारकऱ्य्ंबरोबर कान्होपात्रा पंढरीला आली. विठठ्लाच्या देवळाकडे निघाली.महाद्वारापशी आल्याबरोबर हरिपांडुरंगाला लोटांगण घातले.राऊळात गेल्यावर तिला जे विठोबाचे दर्शन झाले तेव्हा ती स्वत:ला पूर्णपणे विसरली.तिच्यात काय बदल झाला ते तिला समजले नाही. पण ती पंढरपुरातच राहिली.

कान्होपात्रा रोज पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर महाद्वारापाशी कीर्तन करू लागली.दिवस असे जात असताना एका दुर्बिद्धीने बेदरच्या बागशाहाला कान्होपात्रेच्या अप्रतिम लावण्याचे मीठ मसाला घालून वर्णन केले. बादशहाने दूत पाठवून तिला घेऊन यायला सांगितले.

बादशहाचे शिपाई पंढरपुरात आले तेव्हा कान्होपात्रा कीर्तन करत होती. तिच्या सौदर्याला आता भक्तीचा उजाळा आला होता.बादशहाचे शिपाई तिला पाहिल्यावर आपण कशासाठी आलो हे विसरून कान्होपात्रेकडे पाहातच राहिले.नंतर भानावर येऊन तिला जोरात म्हणाले,” बादशहाने तुला बोलावले आहे.चल आमच्या बरोबर. कान्होपात्रा घाबरली.शिराई तिला पुढे म्हणाले,” निमुटपणे चल नाहीतर तुला जबरदस्तीने न्यावे लागेल.” ती दरडावणी ऐकल्यावर कान्होपात्रेला तिच्या विठोबाशिवाय कुणाची आठवण येणार? ती शिपायांना काकुळतीने म्हणाली,” थोडा वेळ थांबा. मी माझ्या विठ्ठ्लाचे दर्शन घेऊन येते.” कान्होपात्रा तडक राऊळात गेली आणि विठोबाच्या चरणी डोके टेकवून त्याचा धावा करू लागली.भक्त दुसरे काय करू ऱ्शकणार?

“पांडुरंगा, तू चोखा मेळ्याचे रक्षण केलेस मग माझे रक्षण तू का करत नाहीस? एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून तू गोपींचे गोपाळांचे, गायी वासरांचे संपूर्ण गावाचे प्रलयकारी पावसापासून रक्षण केलेस आणि मला का तू मोकलतो आहेस? विठ्ठ्ला, माझ्या मायबापा! अरे मी तुला एकदा वरले, तुझी झाले आणि आता मला दुसऱ्या कुणी हात लावला तर कुणाला कमीपणा येईल? विठ्ठला तुलाच कमीपणा येईल. बादशहाने मला पळवून नेले तर सर्व साधुसंत तर तुला हसतीलच पण सामान्यांचा तुझ्यावरच निश्वास उडेल. ती धावा करू लागली. “नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे।। तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी। धाव हे जननी विठाबाई।। पांडुरंगा, माी सर्व आशा,वासना कधीच सोडल्या आहेत. आता तरी “घेई कान्होपात्रेस हृदयात” ही कान्होपात्रेची तळमळून केलेली विनवणी फळाला आली. कान्होपात्रेचे चैतन्य हरपले. विठ्ठलाच्या पायावर ठेवलेले डोके तिने वर उचललेच नाही. विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला !

देवळातल्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर त्यांनी लगेच देवळाच्या आवारात दक्षिणदारी कान्होपात्रेला घाईगडबडीने पुरले.आणि काय चमत्कार! लगेच तिथे तरटीचे झाड उगवले.

बाहेर बादशहाचे शिपाई कान्होपात्रेची वाट पाहात ताटकळले.त्यांनी पुजाऱ्यांना आवाज दिला. भेदरलेले पुजारी धावत आले.त्यांनी शिपायांना कान्होपात्रा गेली. आम्ही तिचे प्रेत पुरले. लगेच तिथे झाडही उगवले!” हे ऐकल्यावर शिपाई संतापाने ओरडले, “ हरामजादों ! तुम्हीच तिला लपवून ठेवले. आणि मेली काय, लगोलग पुरली काय आणि वर झाड उगवले म्हणता? सरासर झूट.” असे म्हणत त्यांनी पुजाऱ्यांना पकडून बादशहाकडे निघाले. तेव्हढ्यात एक पुजारी सटकला. देवळाकडे जाऊ लागला. त्याच्या मागे शिपाई धावले.कुठे पळतोस म्हणत त्याच्या पाठीवर दोन कोरडे ओढले. पुजारी म्हणाला,” बादशहासाठी प्रसाद आणायला चाललो होतो” हे ऐकल्यावर शिपाई ओरडले,” तू भी अंदर जाके मर जायेगा! आणि तिथेच बाभळीचे झाड उगवले म्हणून तुझेच हे ऱ्भाईबंद सांगतील.” पण शेवटी गयावया करून तो पुजारी आत गेला. नारळ बुक्का फुले घेऊन आला.

पुजाऱ्यांना राजापुढे उभे केले.पुजाऱ्यानी आदबीने बादशहापुढे प्रसाद ठेवला. शिपायांनी घडलेली हकीकत सांगितली. ती ऐकून बादशहा जास्तच भडकला. “ काय भाकडकथा सांगताय तुम्ही. कान्होपात्रा अशी कोण आहे? एक नाचीज् तवायफ! आणि तुम्ही सांगता तुमच्या देवाच्या पायावर डोके ठेवले और मर गयी?” वर तरटीका पेड भी आया बोलता?” असे म्हणत त्याने प्रसादाचा नारळ हातात घेतला. त्याला त्यावर कुरळ्या केसांची एक सुंदर बट दिसली. “ये क्या है? किसका इतना हसीन बाल है?” म्हणूनओरडला; पण शेवटच्या तीन चार शब्दांवर त्याचा आवाज हळू झाला होता. पुजारी गडबडले. काय सांगायचे सुचेना. कान्होपात्रेचा तर नसेल? असला तरी सांगायचे कसे? शेवटी विठोबाच त्यांच्या कामी आला. ते चाचरत म्हणू लागले,” खा-खाविंद! वो वो तो आमच्या पांडुरंगाची बट है !” शाहा संतापला.” अरे अकलमंदो! दगडी देवाला कुठले आले केस? क्या बकवाज करते हो?!” पुजारी पुन्हा तेच सांगू लागल्यावर बादशहाने फर्मान सोडले.ताबडतोब पंढरपुरला जायचे. केसाच्या बटेची शहानिशा करायची. पुजाऱ्यांच्या पोटात गोळाच उठला.पण करतात काय!

बादशहाचा लवाजमा निघाला.दोरखंड बाधलेले पुजारी भीतीने थरथर कापत चालले होते. जस जसे पंढरपुर जवळ आले तशी पुजाऱ्यांनी विठ्ठलाची जास्तच आळवणी विनवणी सुरू केली.देऊळ आले.पुजाऱ्यांचे प्राण कंठाशी आले होते. राजा सभामंडपातून थेट मूर्तीपाशी गेला.आता काय होईल ह्या भीतीने पुजारी मटकन खालीच बसले.

राजाने ती सावळी सुंदर हसरी मुर्ती पाहिली.विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकुट प्रकाशाने झळाळू लागला. त्यातूनच विठ्ठलाच्या केसांचा रूळत असलेला संभार दिसू लागला! पांडुरंगाचे दर्शन इतके विलोभनीय आणि मोहक होते की बादशहाच्या तोंडून,” या खुदा! कमाल है! बहोत खूब! बहोत खूब! “ असे खुषीत येऊन बादशहा म्हणाल्यावर पुजारीही विस्फारलेल्या डोळ्यांनी पंढरीनाथमहाराजांकडे पाहू लागले. त्यांचा विश्वास बसेना.डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.

बादशहाने कान्होपात्रेचे तरटीचे झाड पाहिले.ते पाहिल्यावर कान्होपात्रेची योग्यता त्याच्या लक्षात आली. त्याच बरोबर त्याने प्रत्यक्ष जे पाहिले त्यामुळे त्याला मोठे समाधान आणि आनंदही झाला होता.

अतिशय सुंदर असली तरी कान्होपात्रा समाजातील खालच्या थरातली होती.सौदर्य हाच तिचा मानसन्मान होता.प्रतिष्ठा राहू द्या पण समाजात तसे काही स्थान नव्हते.सौदर्य हीच काय ती तिची प्रतिष्ठा होती! अशी ही सामान्य थरातली कान्होपात्रा अनन्यभक्तीमुळे विठ्ठलमय झाली होती. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात तसे तिच्या ‘ध्यानी मनी पांडुरंग होता तर ‘हरि दिसे जनी वनी’ अशी तिची अवस्था होती.

कान्होपात्रेच्या आईला तिची कान्होपात्रा राजाची राणी व्हावी अशी इच्छा होती. पण आमची सामान्य, साधी कान्होपात्रा वारकरी हरिभक्तांची सम्राज्ञी झाली. संत कान्होपात्रा झाली!

पंढरपुरच्या विठोबाच्या देवळाच्या परिसरात आजही तिथे तरटीचे झाड आहे.प्रत्यक्ष विठ्ठलाच्या सान्निध्यात, देवळाच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकाच संताची समाधी आहे— ती आहे संत कान्होपात्रेची !

अप्रूप

आमचे पहिले घर टेकड्यांमध्ये होते. अनेक घरे टेकड्यांवर होती. काही खोलगट भागात होती. टेकड्या झाडावृक्षांनी नटलेल्या तसेच खोलगट भागही वृक्षराजींने भरलेला असायचा. त्यामुळे घरांची संख्या कमी होती असे नाही. किंवा घरे लहान किंवा आलिशान महाल होते असेही नव्हते. सर्व प्रकारची घरे होती. कौलारू होती. उतरत्या साध्या पत्र्यांची होती. सिमेंटची होती. तांबड्या विटाची होती. पांढरी होती. पिवळी होती. निळसर होती. विटकरी होती. काचेच्या खिडक्यांची होती. लाकडी दरवाजांची होती. काही अतिशय देखणी होती. बरीचशी चारचौघींसारखी होती. काही दहा जणांत उठून दिसणारी होती. तर काही दोन-चार असामान्यही होती. पण सगळी झाडां झुडपांचे अभ्रे घातलेली असल्यामुळे हे टेकड्यांवरचे,टेकड्यांमधले गाव दिवसाही पाहात राहावे असे होते. त्यातच निरनिराळ्या ऋतुत फुलणारी विविध फुले अनेक रंग भरून टाकीत! रंगीत फुले गावची शोभा दुप्पट करत!
रात्री तर गाव घराघरांतल्या लहान मोठ्या दिव्यांनी, त्यांच्या सौम्य ,भडक, मंद प्रकाशांच्या मिश्रणाने स्वर्गीय सौदर्याने खुलत जायचे! काही रात्री तर गावाच्या ह्या सौदर्यापुढे आपण फिके पडू ह्या भीतीने चंद्र -चांदण्या,तारे ढगांच्या आड लपून राहत!


गॅलरीत उभे राहिले की ‘आकाशात फुले धरेवरि फुले’ त्याप्रमाणे आकाशात चंद्र तारे नक्षत्रे व समोर, खाली, सभोवतालीही,तारे, नक्षत्रे ह्यांचा खच पडलेला दिसे! आकाशातून दुधासारखे चांदणे खाली येऊन टेकड्यांवरच्या गावातील निळसर दुधाळ प्रकाशात सहज मिसळून पसरत असे. हात नुसते पुढे केले की चंद्राच्या गालावरून हळुवारपणे सहज फिरवता येत असे. तर मूठभर चांदण्यांची फुले गोळा करून ओंजळ भरून जात असे! आपल्या प्रेयसीला ओळी ओळीतून चंद्र आणून देणारे, येता जाता तारे-नक्षत्रे तोडून तिच्या केसांत घालणारे जगातले सर्व कवि इथेच राहात असावेत. किंवा एकदा तरी इथे राहून गेले असावेत! इतके अप्रूप असे आमचे गाव होते.

आज पंधरा वर्षांनी पुन्हा त्याच गावात राहायला आलो.थोडे काही बदल झाले असणारच. पण गाव आजही बरेचसे पूर्वीप्रमाणेच होते. मोठ्या उत्सुकतेने मी रात्री गॅलरीत गेलो. सगळीकडे नजर फिरवत पाहिले. आनंद झाला. पण मन पहिल्यासारखे उचंबळून आले नाही. काही वर्षे रोज पाहिले असल्याने, मधली वर्षे ह्या गावाच्या फार दुर राहात नसल्यामुळेही सवय झालेली असावी. सवय, संवेदना बोथट करते. त्याहीपेक्षा सवय, उत्कटता घालवते ह्याचे जास्त वाईट वाटते!


हे लघुनिबंधाचे गाव राहू द्या. ह्या पंधरा वर्षांपूर्वीच्या गावापेक्षा साठ पासष्ठ वर्षांपूर्वीच्या गावात जाऊ या.

नव्या पेठेतल्या दुकानांच्या, व्यवसाय आणि लोकांच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर मोकळे मोकळे वाटते. नविन वस्ती सुरु झाली हे सांगणाऱ्या उंबरठ्यावर आपण येतो. थोडा त्रिकोणि थोड्या अर्धवर्तुळाकाराच्या चौकांत आपण येतो. आणि समोरचा बंगला पाहून हे हाॅटेल असेल असे वाटतही नाही. बरीच वर्षे ह्या हाॅटेलच्या नावानेच हा चौक ओळखला जात असे. लकीचा चौक किंवा लकी चौक!

लकी रेस्टाॅरंट अर्धगोलाकार होते. गोलाकार सुंदर खांबांनी जास्तच उठून दिसे. आत गेले की समोर चार पायऱ्या चढल्यावर डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंच्या दोन दोन खांबांमध्ये लहानसे चौकोनी टेबल व समोरासमोर दोन खुर्च्या. इथे बसायला मिळाले की आगगाडीत,बसमध्ये खिडकीची जागा मिळाल्याचा आनंद होई.रस्त्यावरची गंमत पाहात बसायला ही फार सोयीची टेबले होती. मघाशी चारपायऱ्या चढून आल्याचा उल्लेख केला. तिथल्या दोन गोलाकार खांबांवर मधुमालती होत्या. आमच्या गावात मधुमालती बरीच प्रिय होती. वेल व तिची फुले!
ह्या व्हरांड्याच्या समोरची गोलाकार जागा,जाई जुईच्या वेलांच्या मांडवांनी बहरलेली असायची. त्यांचेही आपोआप चौकोन होऊन त्याखाली तिथेही गिऱ्हाईके बसत. ती जागा ‘प्रिमियम’च म्हणायची. कारण जवळच्या वेलींनी केलेल्या कुंपणातून रस्त्यावरचे दृश्य दिसायचे; शिवाय खाजगीपणही सांभाळले जायचे.


चार पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मालकांच्या गल्ल्याचे टेबल. मालकांचे नाव भानप. भानप अगदी जाडजूड नव्हते पण बऱ्यापैकी लठ्ठ होते. आखूड बाह्यांचा शर्ट घातलेला. काळ्या पांढऱ्या केसांचे राखाडी मिश्रण. त्यांचा सकाळी भांग पाडलेला असणार. पण दुपारपर्यंत हात फिरवून त्याच्या खुणा राहिलेल्या दिसत. ओठ जाडसर. सिगरेट प्याल्याने काळसर पडलेले. ते कधी कुणाशी गप्पा मारतांना दिसले नाहीत. मालक नेहमीच्या गिऱ्हाईकांशी सुद्धा ‘कसे काय’इतकेच बोलत. कारण बहुतेक सर्व गिऱ्हाईके नेहमीचीच. न कळत त्यांच्या बसण्याच्या जागाही ठरलेल्या.व्हऱ्हांड्याच्या दोन्ही बाजूच्या कोपऱ्यात एक एक फॅमिली रूम होती. पासष्ट वर्षांपूर्वी हाॅटेलातली फॅमिली रूम वर्दळीची नव्हती. काॅलेजमधली मुले मुलीही ते धाडस करत नसत. असा माझा समज आहे.


वऱ्हांड्यातील खांबांमधील टेबलांचे आकर्षण असण्याचे कारण म्हणजे रस्त्यावरच्या वर्दळीची गंमत पाहात चहाचे घुटके घ्यावे ह्यासारखे सुखकारी काही नव्हते. सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढायला बंदी नव्हती. पण जी पोरे लवकर सिगरेट प्यायला लागायची ती टोळक्याने जाईच्या मांडवाखाली बसून पीत. व्हरांड्यातील खांबामधल्या एका टेबलावर ठराविक खुर्चीवर आमच्या मावशीचे सासरे बसलेले असत. चहाचा कप समोर आणि करंगळी व तिसऱ्या बोटामध्ये विडी किंवा कधी सिगरेट धरून ते दमदार झुरके घेत बराच वेळ बसलेले असत. रोज. भानपही इतके नियमितपणे त्यांच्याच लकीत येत नसतील. अण्णा बसलेले असले की आम्हाला लकीत जाता येत नसे. कारण लगेच “हा हाॅटेलात जातो!” ही बातमी वाऱ्यासारखी पसरणार व तो शिक्का कायमचा बसणार ही भीती! अर्थात काही दिवसांनी ही भीती मोडली तरी पण मावशीचे सासरे नसताना जाणेच आम्ही पसंत करत असू.

त्या वेळी बटाटे, फ्लाॅवर, मटार ह्या भाज्या मोठ्या विशेष असत. भाज्यांमधल्या ह्या खाशा स्वाऱ्या होत्या! काॅलीफ्लाॅवर व मटार थंडीच्या दिवसांतच मिळायचा. बटाटे त्या मानाने बरेच वेळा मिळत. पण बटाट्याची भाजी ही सणासुदीला व्हायची. विश्वास बसणार नाही पण लकीमध्ये बटाटा-भाजी हा वेगळा, स्वतंत्र पदार्थ होता! स्पेशल डिश म्हणा ना!


लकीने आमच्या दृष्टीने क्रांतीच केली होती. लकीची बटाट्याची भाजी केवळ बटाटा अप्रूप होता म्हणून नव्हे तर चवीनेही अप्रूप होती. मी लकीच्या मधल्या हाॅलमध्ये गोल टेबलाच्या खुर्चीवर बसून ती मागवत असे. किंचित लिंबू पिळलेले, एक दोन कढीलिंबाची पाने सहजरीत्या कुठेतरी तिरपी पडलेली. कोथिंबिरीची पाने त्यांना लाजून आणखीनच आकसून काही फोडींना बिलगून बसलेली, अंगावर एखादा दागिना हवा म्हणून एक दोन मोहरीचे मणि बटाट्यांच्या फोडींना नटवत.केशरी पिवळ्या तेलाचा ओघळ प्लेटचा एखादा कोन, भाजी ‘अधिक ती देखणी’ करायचा. साखरेचे एक दोन कण मधूनच चमकायचे. लकीतली बटाट्याची भाजी शब्दश: चवी चवीने खाण्यासारखी असायची.भाजी संपत येई तसे शेवटचे दोन घास घोळवून घोळवून खायचो! आता पुन्हा कधी खायला मिळेल ह्याची शाश्वती नसल्यासारखी ते दोन घास खात असे. नंतर कळले की मीच नाही तर जे जे लकीची बटाट्याची भाजी मागवत ते ह्याच भरल्या गळ्याने,भावनाविवश होऊन खात असत. प्रत्येक वेळी!


एकमेव ‘लकीचे’ वैशिष्ठ्य नसेल पण तिथे चकल्याही मिळत. कांड्या झालेल्या असत. पण चहा बरोबर ब्रेड बटर खाणाऱ्यांसारखेच चहा आणि लकीची खुसखुशीत चकली खाणारे त्याहून जास्त असत. तशाच शंकरपाळ्याही. घरच्या शंकरपाळ्यांच्या आकारात नसतील पण हल्ली बरेच वेळा घट्ट चौकोन मिळतात तशा नव्हत्या. चौकोन होते पण डालडाने घट्ट झालेले नसत.


घरीही सणासुदीला श्रीखंड,बासुंदी, पाकातल्या पुऱ्यांचा बेत असला की बटाट्याची भाजी व्हायचीच. तीही लकीच्याच नजाकतीची किंवा त्याहून जास्त चविष्ट असेल. मुख्य पक्वान्ना इतक्याच आदबीने व मानाने बटाट्याची भाजी वाढली जायची. तितक्याच आत्मीयतेने पुरी दुमडून ती खाल्लीही जायची. लगेच श्रीखंडाचा घास किंवा बासुंदीत बुडलेल्या पुरीचा घास. बटाट्याच्या भाजीचे अप्रुप इतके की लहान मुलगाही तिला नको म्हणत नसे की पानात टाकत नसे.


लकी चौक, सुभाष चौक म्हणून ओळखला जाऊ लागला. बटाट्याची भाजी बारमाही झाली. सणासुदीचा वेगळेपणा तिला राहिला नाही. तिने दुसरी रूपेही घेतली. ती सार्वत्रिक झाली. चवीचेही वेगळेपण विसरून गेली. आजही सणवार होतात. सवयीने बटाट्याची भाजी त्या दिवशीही होते. सुंदर होत असेल पण दिसत नाही. चविष्टही असेल पण तशी ती जाणवत नाही. अप्रूपतेची उतरती भाजणी म्हणायचे!

आजही बटाट्याची भाजी आहे. पण लकी नाही. बटाट्याची भाजी दैनिक झाली. सवयीची झाली. अप्रूपता राहिली नाही.


अर्थशास्त्रातल्या घटत्या उपयोगितेचा किंवा उपभोक्ततेचा नियम आमच्या टेकडीवरच्या दाट वृक्षराजीत लपलेल्या, रात्री आकाशातून तारे चांदण्या ओंजळी भरभरून घ्याव्यात इतके ‘नभ खाली उतरु आले’ अशा स्वप्नवत गावाची अप्रूपता घटली तर बटाट्याच्या भाजीचीही अप्रुपता आळणी व्हावी ह्यात काय नवल!
हाच आयुष्यातील Law of Diminishing Joy असावा!