Category Archives: Commentary

‘पेढे’ गावच्या आठवणी

WhatsApp वर जलदीने दूध नासवून केलेल्या धारवाडी पेढ्यांचे फोटो टाकले होते. पेढ्यांसाठी इतके चांगले आणि भरपूर दूध नासवणे आणि त्याचे पनीर किंवा पेढे करणे हे मला खटकते.

नासवून ते इतके देशस्थी रंगाचे पेढे करण्यापेक्षा दूध आटवून आटवून आटवून घट्ट करून खरपूस बदामी रंगावर आणले तरी ते धारवाडी इतकेच किंवा फार तर दावणगिरे मुंगळहट्टी सारखेच खमंग व चविष्ट होतील! बडोद्याचे दुलीचंदचे पेढे चवीला हुबेहुब धारवाडी मिश्राच्या पेढ्यासारखेच असतात. पण थोड्या उजळ रंगामुळे उजळमाथ्याने परातीत विराजमान असतात. दूध नासले तर मी कलाकंद करत असतो.शतावधानी असल्याने आठवड्यातून चार दिवस मला उत्तम कलाकंद खायला मिळायचा. उरलेले तीन दिवस दूध उतू जायचे; त्यामुळे मला रोज दिवसातून तीन चार वेळा दूध आणायला तीस पायऱ्या चढ-उतार करून जावे लागे. कुणी माझ्याकडे केव्हाही आले तरी दूध असेच. फक्त नासलेले किंवा उतू गेलेले! हा अगदी परवा परवा २३ जुलै१९१८ पर्यंतच्या भूतकाळातीलच इतिहास आहे. अखेर आपल्याकडे कुठल्याही इतिहासाची परंपरा गौरवशालीच असते तशी माझ्या कलाकंदाचीही आहे !

कालच भंडाऱ्याच्या शंभर वर्षाची परंपरा असलेला “राणी” पेढ्याचा व्हिडिओ पाहिला.त्यात पाककृती अशी नाही. इतकेच काय शब्दही एखादाच आहे.पण ते राणी पेढे कसे करतात तेव्हढे दिसले.

पेढ्यांचेही किती प्रकार ! औरंगाबादचे अप्पा हलवाईचे पेढे. हे गोळ्यांसारखे आता करत असतील पण पूर्वी ते द्रोणात मोठ्या चमच्याने लावून देत असत. चवीला बरेचसे सोलापूरच्या स्वस्तिकच्या कुंद्यासारखे खमंग. छानच. त्याच पद्धतीचे पण पेढ्याच्या रुपातले कुंथलगिरीचे पेढे. तेही तितकेच स्वादिष्ट,मस्त. अगदी five starबसेसही तिथे थांबतील मग आमच्या सर्वांसाठी असलेल्या सर्वमान्य तांबड्या येष्टी का नाही थांबणार ? कुंथलगिरी खवा व पेढ्यांचेच गाव आहे असे वाटण्या इतकी तिथे खव्या पेढ्यांची दुकाने व विक्रेते आहेत!

पूर्वी सोलापूरला बदामी पेढा मिळत असे. तो चांगला साधारण तळहाता एव्हढा मोठा असे. आकार बदामाचा, त्यात असली तर बदामाची एखादी पातळशी पाकळी. वयाचीच चव त्यात भरपूर असली तरी तो पिवळ्या रंगाचा पेढा चवीला उत्तम असे. पण तो लवकरच लुप्त झाला. बालपणासारख्या सर्व चांगल्या गोष्टी अल्पकाळच असतात. सध्या राजकोटी पेढा पुण्याला मिळतो. त्यालाच काका हलवाई जम्बो पेढा म्हणतात. मलई पेढा आहेच. सर्वांना मथुरा कंस किंवा कृष्णामुळे माहित नसते पण तिच्या पेढ्यांमुळेच जास्त ती जास्त माहित आहे. कुठे मथुरा आणि कुठे सोलापूर! पण सोलापुरचे सगळे पेरूवाले आपले पेरू “लै गोड! आल्ल्ये मथुरेचे प्येढ्ये” ऐेSय मथुर्रेच्चे पेढ्ये ” म्हणतच पिवळे जर्द पेरू विकत. लोकही ते मथुरेचे पेढे म्हणूनच खात!

मलई पेढ्यांची देशी आवृत्ती म्हणजे सध्या ज्याला दुधाचे पेढे म्हणतात ते.पण दुधाचे पेढे आमच्या जळगावचे भावे करीत. ते उत्तम असत. भावे,मी जिथे राहात असे त्याच्या तळमजल्यावर होते. दुधाचा व्यवसाय होता त्यांचा. सोलापूरला घरी जाताना मी बरेच वेळा ते नेत असे. त्यांचे नाव बाळ असले तरी आडनाव भावे असल्यामुळे आधी आॅर्डर नोंदवल्याशिवाय (तोंडी सांगितले तरी चालेल ही मोठी सवलत होती) मिळत नसत. सर्व काही आटोपशीर असल्यामुळे जास्तीत जास्त अर्धा किलोचीच आॅर्डर ते घेत. तीही फक्त एकाच गिऱ्हाईकाची! पण पेढे मात्र भरपूर खावेसे वाटण्या इतके उत्तम असत.

काही चांगल्या पेढ्यांत सोलापूरच्या दूध पंढरीचे आणि कऱ्हाडच्या सहकारी डेअरीच्या पेढ्यांचाही समावेश करावा लागेल.
कऱ्हाडवरून साताऱ्याच्या कंदी पेढ्यांची आठवण झाली. कंदी ही पेढे बनविण्याची पद्धत आहे की ते बनवणाऱ्या साताऱ्याच्या मूळ हलवायांचे नाव आहे हे सांगता येत नाही इतके कंदी नाव साताऱ्ऱ्याच्या पेढ्याशी निगडित आहे. त्याचा पोत स्वााद वेगळाच व अप्रतिम असतो. किंचित कडक वा टणक पण आतून मऊ, कळत न कळत लागणारी जर्राशी आंबूस चव. इंग्रजीत जसे hint of… म्हणतात तशी.कंदी साताऱ्याचे पण आमची आणि त्यांची ओळख आबासाहेबांनीलहानपणी करून दिली; ते एम. दिगंबरच्या (नव्यापेठेतील) स्टोअर्स मधून हे कंदी पेढे आणत. नेहमी मिळत नसत. बहुधा एम दिगंबर साताऱ्याला त्यांच्या नातेवाईकांकडे जात असतील तेव्हा परतताना, त्यांच्यासाठी दिलेलेच हे विकत असतील!!

कुंथलगिरी गावासारख्याच दोन लहान गावांचाही नावे त्यांच्या प्रसिद्ध पेढ्यांसाठी घेतली जात त्यांचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ती दोन्ही गावे लहान रेल्वे स्टेशनची आहेत. दोन्ही विरुद्ध दिशेला. एक म्हणजे जवळचे मोहोळ आणि दुसरे तडवळ. मोहोळ माहितच आहे. तडवळ हे पूर्वीच्या एमएसएमवरील म्हणजे सध्याच्या दक्षिण रेल्वेवरील लहानसे स्टेशन.सोलापूर विजापूर मार्गावर आहे. पण आम्हाला ते आमच्या आईच्या रामूमामांच्या मंगरूळ गावामुळे तडवळ स्टेशन माहित आहे. दोन्ही स्टेशनवर गाड्या थांबल्या,अर्थात पॅसेंजर गाड्याच, की बहुतेक प्रवासी,डब्याला आग लागलीय की काय वाटावे अशा तातडीने पटापट उतरून (बहुतेक अग्रवालचेच हे स्टाॅल असावेत) चहाच्या स्टाॅलकडे पेढ्यांसाठी पळत सुटत! अशी घाई नंतर पुढे कर्जत स्टेशन आले की लोक दिवाडकरांच्या बटाटे वड्यासाठी पळत सुटत तेव्हा पाहिली. दोन्ही स्टेशनचे पेढे चांगलेच असत. काही स्टेशनावर गाड्या इंजिनमध्ये पाणी घेण्यासाठी थांबायच्या तशा मोहोळ आणि तडवळला पेढ्यांसाठी थांबत. गाडी किती वेळ थांबते इथे असे कुणी विचारले तर सर्वांचे पेढे घेऊन होईपर्यंत हेच उत्तर गार्डकडूनही मिळे!

कंदी पेढ्यांशिवाय पेढे प्रकरण पूर्ण होत नाही तसेच नाशिकचे प्रख्यात हलवाई पांडे यांचे पेढे खाल्याशिवाय लेख पूर्ण होणे शक्य नाही.

खरे सांगायचे तर प्रत्येक गावात चांगले पेढे मिळत असतातच. व तिथे ते प्रसिद्धही असतात. येव्हढेच कशाला जत्रेतल्या कापडाच्या छपराखालचे किंवा आठवडी बाजारातले अॅल्युमिनियमच्या परातीत रचून ठेवलेले आणि धुळीची किंचित पावडर लागलेले पेढेही ,”बाबा पेढा घ्ये की” म्हणणाऱ्या लेकराकडे दुर्लक्ष करून तेलकट दोरी गळ्यात बांधलेल्याबाटलीत ‘अदपाव त्येल’ , लाल मिर्च्या आणि मोठ्या फडक्यात किलो दोन किलो ज्वारी बांधून झाल्यावर परतताना त्या कापडी टपरीपाशी थांबून पोरासाठी दोन प्येढ्ये आणि पै-पैशाची गुडीशेव बांधून घरी नेणाऱ्या वाडी वस्तीतल्या रोजगार हमीच्या कामगारांसाठी,तो धुळीचा हलकासा मेक अप केलेला पेढाही तितकाच प्रसिद्ध आणि गोड असतो!

चार दिवस गॅदरिंगचे – २

रेडवुड सिटी

आमच्या शाळेच्य गॅदरिंगच्या जेवणाचे व अल्पोपहाराचे वर्णन करताना गॅदरिंगचे आणखी एक वैशिष्ट्य ध्यानीं आले. गॅदरिंगला शाळा आम्हाला सिनेमा दाखवत असे. कुठे मैदानात किंवा शाळेच्या सभागृहात, त्या १६मिमि पडद्यावर नाही. चांगल्या सिनेमा-थेटरात दाखवत असे! भागवतमध्ये असला तर चित्र मंदिर,कलाआणि छाया ह्या त्यांच्या तिन्ही टाॅकीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी तो पहायला मिळे. (त्यांचे उमा चित्र मंदिर बांधून झाले नव्हते.) प्रभात मध्ये असला तर मात्र दोन खेळ करावे लागत. ही झाली रुक्ष आकडेवारीसारखी माहिती. खरी गंमत होती ती आमची गर्दी पाहण्याची आणि वाहत्या वाऱ्यासारख्या एकामागून एक ऐकू येणाऱ्या गप्पांच्या त्याबरोबरच्या हसण्याच्या अनेक तऱ्हांच्या,आरोळ्या,व एकमेकांना पाहिल्यावर मारलेल्या असली हाकांच्या लहरी कानांवर झेलण्याची ! पाखरांच्या शाळेतही एव्हढा उल्हास असणारी व आनंद देणारी कलकल निनादत नसेल.

भागवत थिएटरचे आवार त्यामानाने मोठे. ते तर फुलून जायचेच पण कला व चित्रमंदिराच्या मधल्या बागेजवळची बेताची मोकळी जागाही रिकामी राहात नसे. तीच गोष्ट प्रभातची. प्रभातची लाॅबी आणि समोरची आयताकार प्रशस्त मोकळी जागा मुलांनी तुडुंब भरून जाई. दाटीवाटी-खेटाखेटी,रेटारेटीचे कुणाला काही वाटत नसे. तरी गप्पात रंगलेल्याला धक्का लागला तर एखादाच कुणी,”अब्ये लई ताकद आली का बे?” ए सुकड्या,दिसत नाही का तुला?”त्यावर हा सुक्कड लगेच,” दिसायचं काय त्यात बे? तू कुणाला नाही दिसणार बे ढब्ब्या !” हा संवादऐकल्यावर भोवतालची सात आठ पोरं मोठ्यांदा हसली की इतरही काही कारण नसता मोठ्यांदा हसायची की लगेच सगळी गर्दी हसत सुटायची ! पण तोपर्यंत “सुक्कड हाॅकीस्टिक ”आणि “तो फुटबाॅल”हसत खेळायलाही लागलेले असत!

आत गेल्यावर मग जागा धरून ठेवलेली पोरे दोस्तांच्या नावाने हाकारा सुरू करत.सिनेमा सुरू झाला तरच शांतता होईल ह्या भरवशावर मास्तर सिनेमा सुरु कारायला सांगत. ही शांतता काही वेळ प्रस्थापित होत असे. पण गाजलेले गाणे सुरु झाले की कुठून तरी ,” अरे जाधव मस्त म्हणतो हे गाणं.” असा आवाज आला की जाधव आणखी आग्रहाची वाट न पाहता लगेच सुरु करायचा म्हणायला. लगेच दुसऱ्या वर्गांचा अभिमान उसळून यायचा की एकदम चार पाच जाधव ते गाणं म्हणू लागायचे . बाकीची आम्ही ‘वगैरे” पोरं ठेका धरायला होतोच की! तीन मिनटाचे गाणे सहा मिनिटांची LPव्हायची! गंभीर किंवा करूण ‘सीन’ आला की वरच्या मजल्यावरील एखादा प्रोजेक्टरच्या झोतात, हातांनी बोटांनी’पक्षी उडतोय, हरिण,किंवा मासासळसळसतोय’ ‘ हा खेळ सावल्यांचा’ करत असे.शिक्षकांनी पाठीत रट्टा घातला की हा खेळ बंद व्हायचा.

सिनेमा काही जणांनी अगोदर पाहिला असला तर पुढचे डायलाॅग अगोदरच ऐकायला लागायचे! गाणे आले की कुणी जाधव-देशपांडे-इनामदार असे बरेच सवाई रफी,फर्माईशीची वाट न पाहता गाणे म्हणायलाही लागत. तर “चूल आणि मूल” असला तर अगोदरच सर्वतोमुखी झालेले दामुअण्णा मालवणकरांचे “अगं माया आवर,आवर” आले की प्रोजेक्टरच्या प्रकाश-झोतात तेच वाक्य ‘माया’च्या जागी निरनिराळे पाठभेद घालून भिरभिरत विहरत असत!

एरव्ही चार मुलांसमोर, घाबरून धड नीट न बोलणारेही सिनेमाच्या अंधारात मात्र आपापले विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम साजरे करीत ! सिनेमा संपल्या नंतरही मजा पुढे चालूच असे.सिनेमातले संवाद म्हणताहेत, तर कुणी गाण्यांच्या ओळी गुणगुणताहेत;,बरेच जण हसत खिदळत गप्पाटप्पा करत घोळक्या टोळक्यांनी,कुणाच्या खांद्यावर हात टाकून, काही एकमेकांना ढकलत चालले आहेत; काही जवळच्या घरी ठेवलेल्या सायकली आणून टांग मारत “जातो बे” म्हणत निघालेही असतात! अशा तऱ्हेने रमत गमत सगळे घरी परतायचो आम्ही.

गॅदरिंगचा सिनेमा ही सर्वांनाच एका शुद्ध,निर्भेळआनंदाची आणि करमणुकीची मेजवानी असे.

गॅदरिंगच्या अल्पोपहारासारखा सिनेमाही अल्पकालीनच ठरला. फार तर दोन तीन वर्षेच टिकला. पण कधीच flop झाला नाही; तो hit च ठरला!

वर्षभराच्या साठवणी!

आजकाल कोणी वर्षभरासाठीच्या कोणत्याच वस्तु करीत नाहीत. एप्रिल लागणार म्हणले की वर्षाचा गहू भरण्यासाठी मोंढ्यात जाऊन गव्हाच्या राशींच्या टेकड्यांमघून वाट काढत, मी ढिगाऱ्यात हात घालून गहू पारखण्याचा अभिनय करायचो.कुणाला समजतय की हा बन्सी, हा सरबती, हा बुटका तो जोड गहू ! व्यापारी सांगतील ती नावे मीही घोकायचो. आज त्यांची नावे सिहोर, लोकवन, गुजरात लोकवन अशी झाली आहेत. तांदळालाही एचएमटी,इंद्रायणी, सुरती कोलम, बासमती नावाने ओळखतात. आंबेमोहोर,सोन्याची तार,जिरेसाळ ही नावे फारशी घेतली जात नाहीत. नाशकात अजून कमोद, काळा कमोद मिळतही असेल.किंवा अकोल्यालाही काली मूंछ तांदूळ मिळत असेल.

तुरीची डाळ घ्यायची तर बार्शीचीच व तीही हरिण छाप अशी ख्याती होती. आता तिची जागा प्रेसिडेंट,प्रेसिडेंट गोल्डने घेतली आहे.

परपंचाच्या प्रगतीप्रमाणे गव्हाची एक पोते, दोन पोती होत होत गेली- ही शंभर किलोची असत- , तांदळाची पन्नास किलोची! ते दिवस सर्व काही देशस्थी प्रमाणाचे होते! ती पोती हातगाडीवर टाकून तो हमाल मोंढ्यापासून ढकलत ओढत घरी आणायचा. बरं, अंतर काही थोडे थोडके नसायचे. मी स्कूटरवर बसून काही अंतर त्याच्या बरोबर पुढे-मागे करत यायचो.पण असं किती वेळ करणार मी तरी ? त्याला पुन्हा पत्ता देऊन पुढे घरी यायचो. तो म्हणण्यापेक्षा, ती पोती घरी येईपर्यंत आमची मध्यम वर्गीय बत्तीस-चौतीस इंची छाती सारखी धडधडत असायची. पाठीवर ती वजनदार पोती पेलून, दोन जिने चढत चढत घामेघुम झालेला तो हातगाडीवाला घरात आणून व्यवस्थित ठेवायचा, तेव्हा हुश्श वाटायचे.

त्या अगोदर मार्चमध्ये तुरीची डाळ घेऊन झालेली असे. तांदुळ नेहमी जुनाच घ्यायचा असे काही संकेतही पाळले जात होते.

उन्हाळ्यातच तांबड्या मिरच्या येत.अहो,त्या तांबड्याचेही किती छटा आणि प्रकार! बरं मिरची ती मिरची असे म्हणून चालत नसे. आपले अडाणीपण दाखवणेच झाले की ते. काही चपट्या, काही भरल्या अंगाच्या, जाड पण तुकतुकीत; लालसर पण जास्त काळपटच, काही शेलाट्या अंगाच्या, काही पिवळट काटकुळ्या, काही आताच सुरकुतलेल्या पण जहाल, काही बांधेसूद, कोणी ‘लाSSल बावटेS की’, नुसते जवळून काय,दुरून पाहिले तरी ठसका आणणारी, तशाच काही छद्मी आणि कावेबाजपणे हसणाऱ्या केशरी मिरच्या तर काही जवळही येऊ न देणाऱ्या, त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनीच पहावे लागत असे. मिरच्याच्या लाल प्रदेशातून हिंडताना मी मी करणारेसुद्धा नाक डोळे पुसत मध्येच शिंकत खोकत फिरायचे. प्रत्येकाचे हातरुमाल मोंढ्याच्या किंवा मार्केटच्या बाहेर पडेपर्यंत- हृदय पिळवटणारे “बाळा जो जो रे,”स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी,”चिमणी पाखरं”,माहेरची साडी”हे सिनेमे पाहून आल्यासारखे- भिजून चिंब झालेले! बरे येव्हढे “शोककारी दु:खकारी” होऊन पाच किलोचे पोते घेऊन घरी आल्यावर, “अहो नुसत्या लाल म्हणजे काही मिरच्या होत नाहीत.

त्या तिखट पाहिजेत. ह्या कसल्या ! मिळमिळीत तांबड्या भेंड्या आहेत.” मग त्या तसल्या किंवा ह्या तशा आणायच्या” हे ऐकायला लागायचे. आम्ही काय! संत चोखोबाच्या “ काय भुललासी वरलीया रंगा”जातीचे. त्यामुळे दिसली लाल,आणली मड्डम ! अशा मिरच्या आणणार! ती तिखट, झणझणीत, पातळ सालीची, व्यवस्थित भरलेली, अगदी छय्यम छय्यम नको, किंचित कुरळ्या,काहीशी बाकदार, नख न लावता देठ तटकन तुटणारी, अबबSS इतके छत्तीस गुण जमणारी कुठून आणणार? “आणली तीच तिखट मानून घ्या” म्हणत नाक डोळे पुसत,मुसमुसत आणि जोरदार शिंक देत निघून जायचो.

जसे वर्षाचे धान्य, डाळी भरणे, तिखट, मीठ करणे , शिकेकई कुटणे, करणे गेले तसे ते टिकवण्यासाठी कडुलिंबाचा पाला,बोरिक पावडर, पाऱ्याच्या गोळ्या ह्या गोष्टीही दिसेनाशा झाल्या. अलिबाबाचे चाळीस चोर आरामात बसतील अशी ती पिपेही बंद पडलेल्या थेटरमधील रिकाम्या खुर्च्या प्रमाणे, रिकामी पडून आहेत. त्या पिपांवर रंगीत चादरीच्या घड्या पसरुन त्यावर वळकट्या, उशा, पांघरूणे ठेवलीत!

हे सर्व का लिहिले तर एकाने व्हाॅट्सअपवर स्वैपाकघरातील काही गोष्टींसाठी सूचनांची भली मोठी यादी पाठवली होती. त्यातील, “ वर्षाचे तिखट टिकवण्यासाठी ते बरणीत/ डब्यात भरण्यापुर्वी तळाशी हिंगाची पावडर टाका” ही युक्ति वाचल्यावर हा लेखन ‘प्रपंच’ केला.
असोSS, आक्छीSS !!

सायकलचे दिवस

Redwood City

सॅनफ्रान्सिस्को,रेडवुड सिटीमध्ये काही वर्षांपासून share the bike उपक्रम सुरु झाला. ठराविक रक्कम दिली की दिवसभर, अर्धा दिवस अथवा काही तास सायकल वापरायची. आताच समजले की पुण्यातही ही योजना सुरु झालीय.
फॅशनच्या बाबतीत -कपड्याची किंवा दागिन्यांची किंवा सदऱ्याच्या काॅलरची असो- पुन्हा त्याच जुन्या फॅशन नव्याने येतात असे म्हटले जाते. ते खरेही आहे. त्याची आठवण share the bike ऐकल्यावर झाली. मी शाळा काॅलेजात असतानाच नव्हे तर नोकरीच्या काळातही ही योजना होती.त्यावेळी योजना, उपक्रम , नाविन्यपूर्ण कल्पना किंवा ‘किती कल्पक असतात लोक ‘असले भारदस्त किंवा गौरवाचे शब्द नव्हते ह्यासाठी. साध्या बाळबोध,स्पष्ट शब्दांत, ‘ भाड्याच्या सायकली मिळण्याचे दुकान’ म्हणत. दुकानदार,”चौंडे सायकल मार्ट’ किंवा ” गोन्यल बंधू सायकल मार्ट” नाव लावून धंदा करत. चौंडेअण्णांच्या सायकली नव्या कोऱ्या दिसत. सायकलीचे भाडे दोन आणे तास किंवा स्पर्धेत एक आणा तास असे. क्वचित कोणी दिवसाचे भाडे ठरवून सायकल नेत. जितके तास तितक्या तासाचे ऱ्भाडे द्यायचे. सरळ व्यवहार.

हां, गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या आणि नसतातही! असत्या तर रामराज्याची कुणाला आठवण तरी झाली असती का? आम्हाला पहिला झटका बसायचा तो दहा पंधरा मिनिटे जास्त झाली तरी किमान अर्ध्या तासाचे भाडे भरावे लागे. ” पण मालक मी पावणे तीन वाजता नेली होती. तुमच्या दशरथला विचारा!” त्यावेळी दशरथ नेमका पंप घेऊन बाहेर कुणाच्या तरी सायकलीत हवा भरायला पळायचा! दशरथच तो, मालकापुढे तो धैर्यधर थोडाच होणार ! मग मुकाटपणे पैसे भरायचे पण ते देताना “मी तर ३:५०लाच सायकल आणली” असे पुटपुटलो तर “घड्याळ हाये का तुझ्याकडं?दुकानातल्या घडाळ्याकडे पाहात मालक विचारणार! “नाही. पण तुमचं घड्याळ पुढं आहे.” मालक म्हणणार, “अब्ये सायकल नेताना ह्येच होतं की.” चला जाऊ दे असे मनात म्हणत घाम पुसत बाहेर पडायचो.

नंतर त्या दुकानात न जाता रस्यासमोरच्या साळुंखेच्या दुकानातून घ्यायची. निघताना आठवण ठेवून,” किती वाजले?” विचारून घ्यायची. हापिंग करत चार चाकं पुढे गेल्यावर समजायचे की अरे मागच्या चाकात हवाच नाही! दुकानात जाऊन सांगितले हवा नाही म्हणून. ” पंम्च्यर केला काय तू, आं?” दोन नोकरांकडे बघून मालक तेच त्यांनाही पुन्हा सांगणार. एक नोकर लगेच म्हणणार “अरे! मी तर आताच पंप मारून ठेवलो की!” दुसरा नोकर लगेच ,” आणि हा बाद्दर हंपिंग करत करत मस्त गेला होता की!” मी गोरामोरा होऊन,”अहो मी इथुनच परत आलो की. हापिंग करत करत काय मी बाळ्याच्या ओढ्याला गेलोतो का? बाळ्याच्या ओढ्याला आमच्या गावचे स्मशान आहे! मग कुरकरत म्हंम्हद का ज्यालिंदर हवा भरून द्यायचे. सायकल परत द्यायला आलो.

सायकलचा प्रत्येक पार्ट तपासून त्यांनी ती घेतली. आणि नोकर मालकाकडे पाहून म्हणाला,” मालक पुढचा ब्र्येक नाही. माझ्या पोटात गोळा आला. दोन आणे तासाचे आणि दोन आणे ब्रेकच्या रबराचे. “चार आणे झाले.” मालकाने जाहीर केले. कुठले चार आणे देणार मी. तासाच्या वर होऊ नये म्हणून सगळ्या चढांवर जीव खाऊन खाऊन पायडल मारत मारत घामेघुम होऊन आलो होतो. टाॅलस्टाॅयच्या निघण्याच्या ठिकाणी सूर्य मावळायच्या आत पोचले पाहिजे म्हणून जणू रक्त ओकत पळत येणाऱ्या, शेतकऱ्याप्रमाणे मीही एक तास व्हायच्या आत धापा टातक आलो होतो. मालकाला म्हणालो,” मी ब्रेक कुठेही लावला नाही. पुढचा तर नाहीच नाही. तो तर कुणी लावतच नाही.” ” नाही, मीच तो पाडला हिथं दुकानात बसून.”मालक तिरके बोलत होता.बरीच बौद्धिक चर्चा आणि परिसंवाद व्हायचे. “लहान हायेस म्हणून सोडला. पण पुना न्येताना सगळी सायकल तपासून न्येत जा, काय?” हे ऐकून घरी यावे लागे.
त्यानंतर पुन्हा दुकान बदलायचे. आता गोन्यल कडून घ्यायची.

सायकली जुन्या असायच्या पण ही सर्व माणसे राजा आदमी वाटायची. शिवाय एक गोन्यल आमच्या भावाच्या वर्गात होता. तरीही किती वाजता घेतली, ब्रेक ची सगळी रबरं आहेत ना, सायकलची साखळी आहे ना पाहून घेतले. चाकं दिसत होती म्हणून ती पाहिली नाहीत! दोन्ही पायडलची एकेक रबर नव्हते. पण पायडल होती. जाऊ दे,असू दे म्हणत हापिंग करत सायकल वर टांग मारून निघालो. आज लांब जायचे होते. तरी पण अर्ध्या तासात परतायचेच ह्या निश्चयाने I can do, I can doघोकत निघालो. काय झाले कुणास ठाऊक. पायडल छान फिरू लागले पण सायकल पुढे जाईना. सायकलची साखळी घसरली होती. “अर्धा तास, अर्धा तास” स्वत:लाच बजावत साखळी बसवायला लागलो. पण मला काय जमते. पुढच्या चक्रावर बसवली की मागच्या लहान चक्रावरून घसरायची. दोन तीन वेळा प्रयत्नांती परमेश्वर म्हणत प्रयत्न करत राहिलो.पण ते फक्त प्रयत्नच झाले. माझ्याच बरोबरीच्या एका पोराने माझी खटपट पाहिली. काय केलं कुणास ठाऊक त्याने. पण दोन्ही चक्रांवर हात ठेवून बोटे सफाईदार फिरवून चेन बसवली. फार आनंद झाला. तरी पण तो आनंद त्याने फार काळ टिकू दिला नाही.” चेन बशिवता न्हाही येत; सायकल चालवतो म्हणे.” असे म्हणत माझी किडा-मुंगी करत तो माझ्यातली हवा काढून गेला.

मी निघालो. अर्धा तास, अर्धा तास असे बजावत चालवत होतो सायकल. थोड्याच वेळात एक चाक फुसफुसू लागले. पुन्हा धसका. पंक्चर नक्की. घाम पुसायचेही सुचत नव्हते. तशीच ढकलत रस्त्यावर,एका खोक्यावर पंक्चरवरील औषधोपचाराची सर्व औषधे नीट ठेवून, शेजारी मळकट पाणी भरलेली पाटी असलेला साधारणत: माझ्याच वयाचा छोटा शिलेदार होता. त्याला काय झाले ते सांगितले. त्याने चाक वगैरे काही न काढता फक्त हवा भरतात ते नाकाडे आट्या फिरवुन काढले. लाल रबराची लहानशी गुंडाळी पाहिली. ती गेल्याचे सांगितले. पंक्चर नाही ? पंक्चर नाही? ह्या आनंदात बेहोश होऊन, दोन तीन वेळा हेच विचारून त्याला सतावल्यावर तो म्हणाला, “ते माहित नाही. ही व्हालटूब गेलीय.” त्याने ती बसवली. हवा भरली. मी निघणार तेव्हा म्हणाला, “थोडं थांब.” त्याने दोन तीन ठिकाणी कान लावून हात वरून फिरवून हवा भरतात त्या नाकाड्यावर थुंकी लावून पाहिले. आणि मला जायला परवानगी दिली. एक आणा घेतला त्याने पण मला नामोहरम केले नाही.

पुन्हा दात ओठ खात सायकल दामटत निघालो. दुकानात आल्यावर इकडे न पाहता घड्याळाकडे पाहिले. आता माझी हवा पूर्ण गेली ! दोन आणे होते.एक आणा दुरुस्तीला गेला. अर्धा तासच काय त्याहून पंधरा वीस मिनिटे जास्तच झाली होती. पण गोन्यल बंधू दिलदार होते. मी एक आणा दिल्यावर,” हरकत नाही म्हणाले;पुढे बघू “.

सायकल दुरुस्तीचीही अशी लहान-मोठी, टपऱ्या, रस्त्यावर केवळ एक पंप घेऊन हवाभरून देणारी मुलेही असत. तर लहानसहान दुरुस्त्या पंक्चर काढून देणारी,खोक्यासह बसलेलीही मुले असत. त्यामुळे रस्त्यावर सायकल बिघडली तरी चिंता नसे. बरे दुरुस्त्या करणारे सर्व वयाचे होते. पण त्यातही दहाबारा वर्षांपासूनची मुलेही बरीच असत. दुरुस्ती म्हणजे पंक्चर काढणे, हीच जास्त असे. त्यामुळे ” पंम्चर काढून मिळेल” ही पाटी सगळीकडे दिसत असे.

पंक्चर काढताना पाहणे हा एक कार्यक्रमच असायचा आमच्यासाठी. पण आता माझ्यावरच बेतल्यामुळे धसका होता. एक जाडसर पाना, टायर आणि चाकाच्या खाचेत घालून दुसरीकडे कानशीसारखे पसरट हत्यार घालून आलटून पालटून ती हलवत, टायर चाका पासून थोडे सैल करून दोन्ही हातांनी आतली ट्यूब बाहेर यायची.ती निघाली की आमच्या चेहऱ्यावर अरे व्वा! असे भाव दिसायचे. मग तो मुलगा संपूर्ण टायरच्या आतून डाॅक्टर इतक्याच काळजीने हाताची बोटे फिरवायचा. चुक, तारेचा तुकडा,खडा वगैरे नाही ह्याची खात्री झाली की मग तो ट्यूबकडे वळायचा. दुसऱ्या घराण्याचा कलावंत ही क्रिया पंक्चर वगैरे काढून पुन्हा ट्यूब आत बसवण्यापूर्वी करायचा. पण हात की सफाई तशीच ! आता मुख्य कारवाईची सुरवात. प्रथम ट्यूब मध्ये हवा भरायची. की लगेच ती ट्यूब थोडीशी हवेत फिरवल्यासारऱ्खी करत पाण्याच्या पाटीत दोन्ही हातानी तिचा प्रत्येक भाग दाबत दाबत पाहत जायची.

आम्ही त्यावेळे पासून जे मान पुढे करून त्या पाटीमध्ये पाहायचो की अर्जुनानेही मस्त्यवेध करताना इतक्या एकाग्रतेने, पाण्यात दिसणाऱ्या फिरत्या माशाकडे पाहिले नसेल!
आणि पंक्चर सापडले की तो आम्हाला ती ट्यूब पु्न्हा पुन्हा दाबून त्या ट्यूबमधून वेगाने येणारे बुडबुडे दाखवायचा. लगेच तिथे मास्तरांप्रमाणे कार्बनच्या पेन्सिलीने सुरेख जांभळा गोल करायचा. पण तो कसबी कारागिर तिथेच थांबत नसे. सर्व ट्यूब त्या पाण्यात पोहल्याशिवाय आणि दुसरे पंक्चर नाही समजल्यावर तो निराशेने पाणी झटकायचा. आम्ही मात्र एकच पंक्चर म्हणत सुटकेचा निश्वास सोडायचो.ह्यानंतर तो cosmetic शल्यचिकित्सक व्हायचा. कानस काढून त्या गोलावर घासायला लागायचा.जोर अति नाही की वरवरचा नाही. ती ट्यूब पुरेशी खरखरीत झाली की ते छिद्र पुरेसे झाकले जाईल येव्हढा रबराचा तुकडा कापायला लागायचा.

ही कलाकारी पाहण्यासारखी असते. काही पंक्चरवाले- सर्जन चौकोनी कापतात तर काही गोल.पण तो चौकोनही अगदी काटकोन चौकोन नसायचा. त्याच्या चारी कोपऱ्यांना तो इतक्या सहजतेने गोलाई द्यायचा. कात्री एकदाही न थांबवता! सिनेमाच्या पडद्यासारखा दिसणारा तो तुकडा पाहात राहावा. आणखी दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याची कात्री. काय तिची धार असेल. ना मध्ये तिचे अडखळणे की दबकत बिचकत जाणे. हा कारागिर ती फिरवतोय का ती कात्री त्याचा हात धरून फिरवतेय समजत नसे! तसाच गोलाकार कापताना, तो तुकडा पहिल्याच प्रयत्नात गोल व्हायचा.पाहातच राहत असू आम्ही. तो तुकडा त्या ट्युबवर चिकटवणे म्हणजे पोस्टाचे तिकीट चिकटवण्याइतके गद्य काम नव्हते. बरेचसे पारदर्शक असणारे ते द्रव तो बोटाने त्या रबराच्या त्वचेला लावायचा. आणि त्यावर फुंकर घालून त्या छिद्रावर पटकन चिकटावयाचा. एकदा दोनदा बोटाने दाबायचा. पण ते grafting इकडे तिकडे सरकू न देता! अजून शस्त्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता cosmetic सर्जनचे काम संपले. आता orthopedic सर्जनची भूमिका तो वठवायचा.

वईसाचे ते हॅंडल एका फिरकीत तो वर न्यायचा; मधल्या ऐरणीवर तो त्या ट्युबचा भाग ठेवून वईसाच्या हॅंडलला अशी शैलीदार गिरकी द्यायचा की वईसाने त्या ट्युबला आपल्या तावडीत कधी घट्ट धरून ठेवले ते तिलाही समजायचे नाही. लगेच दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या सायकलकडे वळायचा. पुन्हा तो मोठा पाना व लोखंडी पट्टी आत बाहेर करत त्या टायरचे आतडे तो मोकळे करायचा. तोपर्यंत आमच्या ट्युबची सौदर्यशस्त्रक्रिया संपलेली असे. पुन्हा ट्युबचे आतडे जागी जायचे. हवा भरण्यासाठी दुसऱ्या कुणाला सांगितलेले असायचे.

हवा भरणारा कसरतपटू असे. साधा पंप तो काय आणि हवा भरणे असे किती तांत्रिक असते! पण नाही, हा त्यात आपले अभिनय कौशल्य, नृत्यकलेची ओझरती झलकही दाखवायचा. पंप मोठा. हा त्या पंपापेक्षा थोडा जाड!

पंपाच्या पायावर आपला पाय दाबून हा त्या पंपाचे हॅंडल धरून पंप पुढे मागे हलवत एक पाय मागे थोडा उंचावून दट्या दाबायचा. त्यावेळी मान खाली करून पुन्हा पटकन वर झटकवत, पदट्ट्यावर रेलून, तो वरचे हॅंडलसह पंप मागे पुढे करत दट्ट्या दाबणार. पाय मागे किंचित लंगडी घातल्या सारखा करत पुढे झुकणार आणि मागे येताना म्हंमद असेल तर केसाला झटका देणार; ज्यालिंदर असेल तर मान इकडे तिकडे फिरवत हसणार. पण हे दहा बारा वेळा इतके शिस्तीत चालायचे की पहात राहावे. मग आमच्यापैकी कुणीतरी मी मारु का पंप म्हटल्यावर हां म्हणायची ती पोरे. आम्हाला काय जमते त्यांचे भरतनाट्यम! ते नाट्य तर नाहीच पण पंपाचा तो दट्ट्याही खाली जायला दहा मिनिटे लागायची! थांबत थांबत तो खाली नेत असू. पंपातली हवाही हलायची नाही! ती मुले हसायची. ही विद्या तरी त्यांचीच,असे त्यांना वाटत असावे.

सायकली म्हणजे त्यावेळचे सर्वांचे वाहन होते. रिक्षा अजून आल्या नव्हत्या. बसचेही काही खरे नव्हते. बराच काळ त्या नव्हत्याही. त्यामुळे सायकल भूषण होते. ही सायकली भाड्याने देणारी दुकाने होती म्हणून अनेकांची मोठी सोय होती. लहान पोरांसाठीही एखाद्या दुकानात कमी उंचीच्या एक दोन सायकली दिसत.

नविन सायकल घ्यायची ठरले तर घरात कितीतरी अगोदर दिवस-रात्र चर्चा,वादविवाद,चिडाचिड, चालत असे. कुठल्या कंपनीची घ्यायची ह्यावर दोन तीन दिवस गुऱ्हाळ चालायचे. पण सायकल काही एक दोन वर्षे यायची नाही. तरी तिच्या गप्पा मात्र चवीने व्हायच्या!

रॅले, फिलिप्स आणि त्यानंतर हर्क्युलिस. तीन ब्रॅंड जोरात होते. रॅले नंबर एक. त्यातही तिच्यातील हिरव्या रंगाची सर्वांची आवडती. पण त्या फारशा मिळत नव्हत्या लवकर. बरं नुसती सायकल घेऊन चालायची नाही. त्याला दिवा पाहिजे. कायद्याने रात्री दिवा लावणे भागच होते. लहान कंदिलासारखे दिवे बहुतेकांचे असत. कायद्यापुरता प्रकाश पडे. पुढच्या चाकाच्या मर्डगार्डवर मिणमिणता पडला तरी “लै पावरफुल्ल” म्हणायला लागायचे. त्यानंतर आली चौकोनी लहान डब्याची बॅटरी. हॅंडलच्या खालच्या बाजूला हुकासारखी पट्टी असते त्यात ती अडकवायची. त्याचा उजेड बरा पडायचा. पण बॅटरी संपत आली तरी लोक वापरायचे. सिगरेटचे ऱ्थोटूक किंवा उदबत्तीचा विस्तव जास्त प्रकाशमान असेल. पण पोलिसाला दाखवायला पुरेसा वाटे. “आता बॅटरीचाच मसाला आणायला चाललोय” इतके सांगून सटकायला तो निखारा कामाला यायचा. काही खमके पोलिस मात्र,” अब्ये कुणाला ववाळाला निघाला तू ह्ये अगरबत्ती घ्येवूनआं? कानफटात हानल्यावर मग लाईटी चमकेल तुझा.” म्हणत पावती पुस्तक काढायचा.लगेच आमची खरी तत पप,तत पप ची भाषा सुरु व्हायची.

मागच्या चाकापाशी लावलेला डायनामो आणि पुढचा हेडलाईट ही खरी शान असायची. आणि त्यातही हिरवी रॅले! मग काय! हायस्कूल काॅलेजात तो सायकलवाला सगळ्याजणींचा स्वप्नातील राजकुमारच असायचा. सायकलची निगा राखणारे शौकिनही होते.त्यांची ती ‘जीवाची सखी’च असे. तिला रोज पिवळ्या मऊ फडक्याने(च) पुसायची. पण किती! चाकातली प्रत्येक तार चमचम करीपर्यंत. डोळे दिपून अपघात व्हायचे! इतकेच काय मागचे लोंबते रबरही साबणाने धुवून टाॅवेलने पुसून ठेवायचे. दर रविवारी,पिटपिट आवाज करणाऱ्या डबीच्या नळीतून तेल पाजायचे. त्या जागांची तांत्रिक नावे घेऊन गप्पा मारायच्या. “पायडल, हॅंडवेल सीट बिरेक” येव्हढा शब्दसंग्रह असला की सायकल चालवता येत असे. विशेष म्हणजे हेच शब्द वापरणारे सायकल चालवण्यात तरबेज होते.

दोन्ही हात सोडून भर गर्दीत शिटी वाजवत सायकल दडपून नेणे, किंवा मधल्या दांडीवरून ‘हॅंडवेलवर’ पाय टाकून आरामात उतारावरून जाणे,एकाच वेळी तिघांना घेऊन जाणे असले कसरतीचे प्रयोग हीच मंडळी करत. बाकी आम्ही फक्त सायकल या विषयावर दिवसभर बोलू शकत असू. फार हुषार असेल तर सायकलीत कुत्रे कशाला म्हणतात असा रहस्यमय प्रश्न विचारून कुणी तोंडी परीक्षा घ्यायचा. आम्ही त्याला हड् हड् करत टाळत असू. पण सीटला ‘सॅडल’ किंवा मध्येच ‘हब’ वापरून इंप्रेशन मारणारेही असत! बरे दिवा असूनही तेव्हढा रुबाब येत नसे.तो डायनॅमोचाच हवा. साखळीला गार्डची खोळ पाहिजे. तिही फक्त एका झाकणासारखी असली तरी लक्ष देत नसत मुले. पूर्ण दोन्ही बाजूनी चमकदार, चकचकीत, आणि चेनला पूर्ण झाकणाऱ्या,तिला कुलवंत घराण्यातली करणारे गार्ड असले की लोक सायकलकडे जरा दबून आदराने पाहायचे.

आता डोळ्यापुढे ती कायम नवी दिसणारी हिरवी रॅले, खटका दाबला की मागच्या टायरला डायनॅमो चिकटून चाक फिरले की मोठा लांब झोत टाकणारा मोटरच्या हेडलाईटसारखा दिवा, ते अंगभरूनआणि डोईवरून चेनने पदर घेतलेले शाही गार्ड, मागच्या चाकावर बसवलेले कॅरिअर, चिखल उडू नये म्हणून लावलेले मागच्या बाजूचे रबराचे झुलते पदक, टेल लॅम्प च्या तांबड्या चकतीचा कुंकवाचा टिळा लावलेले मागचे बाकदार मडगार्डआणि इतरांच्या घंटीपेक्षा वेगळाच आवाज काढणारी घंटी, सायकल उभी करायची तीही शैलीदार पद्धतीनेच आणि त्यासाठी तिला एक मुडपुन ठेवता येईल असा पाय जोडलेला; बेफिकिरपणे पण सहज,दिला न दिला,अशा झटक्याने तो खाली आणून त्यावर, पुढचे चाक मान वेळावून पाहते अशी ठेवलेली सायकल असल्यावर जगाचे राज्यही त्यापुढे तुच्छ असायचे.पण अशी सकलगुणमंडित,सालंकृत सायकल पहायला मिळण्यासाठी सुद्धा कुंडलीत योग लागत. दैवयोगाने आम्हाला शाळेत व काॅलेजात मोजून तशा दोन तीन दिसायच्या. बाकी बहुसंख्य सायकली चारचौघी सारख्याच; घंटी सोडून सगळे पार्टस् वाजणाऱ्याच !

माझा मित्र बंडूने चौडेअण्णांच्या दुकानातून नवी कोरी सायकल घेतली. तेव्हा त्याचे हॅंडल एकदम नव्या पद्धतीचे. त्याच्या दोन्ही मुठी मधल्या दांड्यापेक्षा वर आणि बाकदार होत्या. बसणाऱ्या स्वाराच्या दोन्ही हातांची महिरपी सारखी नक्षी व्हायची. रुबाबदार दिसायचा! सर्व मुले,सायकल नवीन आणि हॅंडल त्याहूनही नवीन म्हणून आणि सायकलवर बसलेला बंडूही स्टायलिश दिसायचा;त्यामुळे दोघांकडेही टकमक पाहायचे. प्रत्येक जण त्याला ‘एक चक्कर मारु दे रे’ म्हणत विनवणी करायचे. बंडूने सगळ्यांना ती फिरवायला दिलीही. नव्या सायकलमुळे एक दोन दिवस बंडूकडेच सगळ्यांची वर्दळ असायची!

गावात अजून मोटारी दिसत नव्हत्या. संपूर्ण गावात चार पाच असतील. त्याही सारख्या फिरत नसत. म्युनसिपालिटीचे दोन चार ट्रक असतील. पण त्या काही मोटारी नव्हेत. ते सायकलचे दिवस होते. त्याही अति झाल्या नव्हत्या. तसे म्हणायचे तर दोनच प्रकारचे लोक.चालणारे आणि सायकलवाले. नोकरीत असतानाही मी सायकल भाड्याने घेउन काम करीत असे. जळगावला आमच्या घराजवळ असलेल्या नाईकांच्या दुकानातून सायकल घेत असे. मी त्यांच्याच गल्लीतला आणि टाय बूट वगैरे घातलेला त्यामुळे नाईक बंधू मला नवी सायकल देत. ती देण्याअगोदर चांगली स्वच्छ पुसून, हवापाणी तपासून देत. आणि खरंच तशी कसलीही कुकरकु न करणारी सायकल चालवताना एक निराळेच सुख उपभोगतोय असे वाटत होते. कधीतरी माझ्यातला शाळकरी जागा व्हायचा. नाईकांना विचारायचा, “हिरवी सायकल नाही ठेवत तुम्ही?” त्या सज्जन भावांनी, ” नाही; पण आणणार आहोत आम्ही,” असे सांगितले. महिना दीड महिना उलटून गेल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितले. दहा पंधरा मिनिटांनी त्यांच्यातील एकजण,एक डौलदार वळण घेत हिरव्या सायकलवरून आला.पुन्हा एकदा फडक्याने पुसत ती मला दिली. त्या तरूण मुलांचा एव्हढा चांगुलपणा पाहून मन खरेच भरून आले होते त्या दिवशी.

चाळीसगावलासुद्धा मी सायकलवरून काम करत असे. स्टेशनच्या समोरच सायकलींची दुकाने होती. तो सिंधीही चांगली सायकल काढून द्यायचा. बामणोदहून भालोदला जायला त्या दिवसांत फार एसटी नव्हत्या. पण त्याबदली सायकलीचे दुकान होते. विशेष म्हणजे त्याकाळचे सायकलींचे ते u-Haul किंवा Enterprise, Herstz होते. बामणोद ची सायकल भालोदला देता येत होती! चार पाच मैल अंतर होते. तो दुकानदारही मला त्यातली बरी सायकल काढून द्यायचा. म्हणजे दोन्ही मडगार्ड थडथड करण्या ऐवजी एकच मडगार्ड आवाज करायचे. तसाच एक तरी ब्रेक लागत असे. रस्ता बरा होता. पण पावसाळ्यात उखडला जायचा. त्यामुळे घोड्यावर बसून चालल्यासारखे वाटायचे. मध्ये मध्ये सीटवर न बसता उंच होऊन चालवावी लागे. परतताना भालोदहून पन्हा सायकल घ्यायची आणि बामणोदला परत करायची. किती सोय होती!

आजही अनेक गावात त्यांची त्यांची चौडे सायकल मार्ट, गोन्यल बंधू,नाईक सायकल्स, इंडिया सायकल डेपो सारखी लोकोपयोगी दुकाने आहेत.

ते सायकलचे दिवस होते. दोनच प्रकारचे लोक होते. चालणारे आणि सायकलवाले.सायकलवाल्यांमधीलही बहुसंख्यांसाठी, Share the bike चे मूळ रूप “सायकली भाड्याने मिळतील” ही दुकाने केव्हढी सोय होती!

सुखाच्या शोधात

रेडवुड सिटी

किती हा पसारा! कसा झाला,कुणी केला समजत नाही.शिस्त म्हणून काही नाहीच कुणाला. असे मी किती वेळा स्वत:शी म्हणालो असेन सांगता येणार नाही. हिंमत धरून कधीआवरायला घेतला पसारा की जसा आवरावा तसा तो वाढतोच आहे हे पाहिल्यावर प्रथम दुसऱ्यावर, मग स्वत:वर चिडचिड सुरू! लक्षात येऊ लागते, अरे हा मीच जमा केलेला पसाराआहे. आवरू आवरू म्हणत डोंगर झाल्यावर नाईलाज म्हणून सुरवात होते.

प्रत्येक वस्तु पाहत,ती लावून ठेवताना ‘हे केव्हा घेतले?’ ‘अरे इथे पडले होते का? किती हुडकत होतो!’ ‘आणि ह्या वह्या सापडल्या की! इथे सांदीत कुणी टाकल्या इकडे? किंमत नाहीमाझ्या लिखाणाची.’ मग ते वाचत बसतो. एक फोटो हाताला लागतो. खाडकन जागा होतो! कुणाचा हा? माझाच? बरं झाले ह्या अडगळीत होता.पोरांनी पाहिला तर हसून हसून मलावेडे केले असते. लपवून ठेवू का फाडून टाकू ? हे हॅम्लेटचे स्वगत पंधरा मिनिटे म्हणत बसतो. त्यामुळे निश्चित काहीच ठरवता येत नाही. तो फोटो मी तिथेच आणखी खोल खालीखुपसून ठेवतो. दुसरे काही एखादे टाकायचे म्हणून बाजूला भिरकावतो. पुन्हा आणखी दुसरे काही सापडले की ते अगोदर टाकलेले लागेल त्यासाठी म्हणत पुन्हा आणून ठेवतो. हळूहळू टाकून द्यायचा ढिगारा पुन्हा कमी होऊ लागतो. आणि इकडे पसाऱ्याचा ढीग वाढत जातो! पुन्हा चिडचिड! पुन्हा लक्षात येते की ह्यातला जास्त पसारा माझाच आहे. मग तो नीटलावायला परत सुरवात. एखादे पुस्तक पाहिले की अरे हे आपल्याकडे आहे?! असे म्हणत स्वत:च्या आणि त्या पुस्तकाच्या कौतुकातच वेळ घालवतो.होते काय तर पसारा आवरणेआणखी काही दिवस पुढे ढकलले जाते!

हे सर्व डोक्यात आणि डोळ्यासमोर येण्याचे कारण म्हणजे मी Paula Poundstone चे The Totally Unscientific Study ofThe Search for Human Happiness( घ्या, थोडेपाणी प्या; नाव वाचून झाले ना?) हे पुस्तक वाचत होतो. त्यातले To Get Organized for Happiness Experiment हे प्रकरण वाचत होतो. वाचताना हसत होतोच. कारणआपल्या प्रत्येकाचे ते प्रकरण आहे!

लेखिका गेली तीस वर्षे एकपात्री विनोदी कार्यक्रम करत आहे. NPR रेडिओवर काही वर्षे Wait, Wait… Don’t Tell Me ह्या लोकप्रिय कार्यक्रमात मुख्य भाग सांभाळत आहे. तिलातीन मुले, आणि तिची १६ मांजरे आणि३ कुत्री आहेत! तिला एकदा विचारले ,” की तुमच्याकडे सोळा मांजरे कशी झाली?” ती म्हणाली, ” अगोदर पंधरा होतीच,आणखी एकआणल्यावर सोळा झाली!”

हल्लीची लहान मुलेच नाही तर तिची कुत्र्यांची पिलेही किती पटकन शिकतात ते सांगताना, “आम्ही नुकतेच एक पिलू आणले. काही दिवसातच तो बरेच शब्द शिकला. त्यालासमजूही लागले.” खाली”, “बस”, ” चल आता”, “थांब”…., “मायक्रोसाॅफ्ट वर्ड्स” !!…

गेली काही वर्षे,  माणसाने आनंदी कसे राहावे, आनंद कसा मिळवावा, आपल्यापाशीच आहे तो कसा शोधावा, ‘साध्या गोष्टीतही आनंद किती आढळे’, ह्यातून ‘आनंद मिळवा सुखीआयुष्य जगा,’अशी एक ना दोन भाराभर पुस्तके, शिवाय जगभरचे मानसशास्त्रज्ञ आनंद,सुख यावर संशोधन करत आहेतच. त्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध होत असतात. अनेक विद्यापीठात’सुखाच्या शोधाचे’ अभ्यासक्रम चालू झाले आहेत.त्यासाठी परिक्षा नाहीत. चर्चा, परिसंवाद, व्याख्याने अनेक गोष्टींचा त्यात समावेश असतो. इतके झाल्यावर विनोदी लेखक,कलावंत  हा विषय सोडतील का?

आनंद, पाऱ्यासारखी निसटतीच नाही तर,वाफेसारखी लगेच उडून जाणारी भावना आहे. आनंद मिळतो. पण फार काळ राहात नाही. आईन्स्टाईनने दिलेले काळाच्या सापेक्षतेचेउदाहरण समर्पक आणि बरोबर असले तरी आनंद टिकाऊ नाही हे खरे. तसा तो असता तर तुकाराम महाराज,” सुख पाहता जवा एव्हढे” म्हणाले असते का? आणि  “शंभर धागेसुखाचेच” झाले असते की!

पाॅला पाॅऊंडस्टोनही म्हणते की दीर्घकाळ टिकाऊ सुख कुणाला मिळाल्याचे कानावर आले नाही.पुढचा षटकार ठोकताना म्हणते,” टिकाऊ सुखानंदासाठी viagraचा शोध अजूनकसा नाही लावला कुणी !” पण पुढची दोन वाक्ये वाचल्यावर लेखिकेचे मन समजू लागते.”मी खरीच सुखी झाले तर मला गाडी ठेवण्याची जागा मिळायला किती वेळ लागलाअसता कोण जाणे!” आणि म्हणते,  “आता मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की गाडी लांsब दूर ठेवून चालतच जावे असे वाटते.”

तिने आपला आनंद कोणकोणत्या गोष्टीतून मिळवण्यासाठी किती प्रयोग केले त्याचे प्रकरणवार, खुमासदार वर्णन विनोदी शैलीत लिहिले आहे. शास्त्रीय प्रयोगाप्रमाणेच तिनेप्रकरणांची सुरवातही उद्देश, मध्ये-मध्ये निरीक्षण १, २ असे नोंदवत ती अखेर निष्कर्ष सांगते.ती निरीक्षणे आणि निष्कर्ष वाचण्यासारखी आहेत. काही तर वचने वाटावीत अशीवैचारिक तर काही हृदयस्पर्शी आहेत. सुख मोजण्याचे तिने तिचे मापही शोधले आहे. त्याला ती hepम्हणते. चमचाभर, चिमूटभर किंवा एक लिटर,किलो काहीही समजा. अखेरआपण आपले सुख कसे मोजतो त्यावर अवलंबून आहे.

“आपण ज्यांना ओळखत नसतो इतकेच काय जे आपल्यासारखे दिसत नसतात, आपल्यासारखे राहात नसतात त्यांच्या सुखाशी,आनंदाशी आपला आनंद अतिशय निगडीत असतोअसे सत्य लिहून जाते.मुलांच्या सहवासात राहून आनंद मिळवण्यात्या प्रयोगात ती आणि मुले ठरवतात की एक संपू्र्ण दिवस-२४ तास-आपण सगळ्यांनी मिळून सिनेमा पाहायचे.ठरले. मग एक दोन सिनेमा झाल्यावर एक मुलगा, हा पाहू या म्हणतो त्यावर  बहिण हा नको तो बघू या म्हणते.  दुसरी बहिण लगेच तिसराच सुचवते. हे अधून मधून चालतच होते.पण लेखिकेने हा पाहू या म्हटले की मात्र तिघेही एकासुरात कडाडून विरोध करायचे. हेही बरेच वेळा होते. ह्यावर लिहिताना पाॅला पाउंडस्टोन निरीक्षण लिहिते:- “आईबापांना जेआवडते ते आपल्याला आवडत नाहीच, त्याची कधी मजा घ्यायचीच नाही हे मुलांनी किती कायमचे ठामपणे ठरवले असते!”  पण त्यानंतर,तीच पाॅला, आपण इतकी वर्षे ज्यामुलांना रोज दोनमैल तर कुणाला पाच मैलावरच्या शाळेत सोडायचो, पुन्हा निरनिराळ्या वेळी जाऊन त्यांना घरी आणायचो, ती मुले शिकण्यासाठी दूर गेल्यावर, “मला चांगलास्वैपाक करता येत नाही.पण घरात मुले नसली की स्वैपाक करण्यातही काही अर्थ उरत नाही” ही सर्व आयांची खंत  पाॅलाही व्यक्त करते.

लेखिका काही वेळा अशी शब्दयोजना करते की ती वाक्ये जास्तच चटकदार लागतात. दरवर्षी आपल्या मुलाचे प्रगती-पुस्तक पाहताना, जबरदस्त फी उकळणाऱ्या खाजगीशाळेविषयी ती,it’s an “Expensive Disappointment ” म्हणते. तसेच ती सकारात्मक वृत्तीतून आनंद मिळतो हे ऐकल्यावर तो प्रयोग करण्यापूर्वी ,”Although negativity is my “native language….” असा शब्दप्रयोग करते!

घरातला पसारा आवरणे, तो पुन्हा नीट शिस्तीने व्यवस्थित लावणे ह्यामधून आनंद मिळवण्याच्या प्रयोगात तिची तीन चार दिवस चाललेली धडपड आणि दमछाक आणि त्याप्रयोगाचा बोजवारा उडाल्यावर  शेवटी तिची मुले तिला ऐकवतात, “आई, तू अगदी त्यांच्या नावाची अंगाई गात बसलीस तरी ही मांजरं त्यांच्या नावांच्या आद्याक्षराप्रमाणे रांगेतझोपणार ना-ही-त.”! हे ऐकल्यावरच ह्या प्रयोगाच्या अखेर तिने असा निष्कर्ष काढला असावा:- EXPERIMENTAL ERROR!

Get Over Here and Help for Happiness Experiment प्रकरण सुरवातीला जितके विनोदी आहे तितकेच ते नंतर हृदयस्पर्शी होत जाते. लेखिका लोकांसाठी काही करावे याउद्देशाने आपले platelets दान करण्यासाठी, म्हाताऱ्यांसाठी असलेल्या काळजीवाहू संस्थेत जाते. हा तिचा पहिलाच अनुभव असतो. तिथल्या परिचारिकांचा विक्षिप्तपणा वर्णनकेल्यावर तिला अर्ज भरायला देतात. त्यातल्या काही प्रश्नांनी ती चक्रावून जाते. एक प्रश्नात, काही देशांची नावे दिली होती आणि या देशात तुम्ही कधी संभोग केला होता काअसेविचारले होते! बाई तीन ताड उडालीच! अर्ज भरून झाला. प्लॅटलेटसही दिले. काही महिन्यांनी बोलावले. पुन्हा अर्ज भरणे, पुन्हा तोच प्रश्न पण देश निराळे! तिसऱ्यांदा ती गेली. पुन्हाअर्ज भरणे आणि पुन्हा तो प्रश्न पण ह्या खेपेला निराळ्याच देशांची नावे! ती म्हणते “१२७ देशात माझा शरीरसंबंध नाही झाला ही माहिती मला आताच मिळाली! किती हायसंवाटले!”  पण जेव्हा “तुमच्या platelets मुळे पेशंट बरा झाला, त्याबद्दल आमची संस्था आणि पेशंट,तिची मुले नातेवाईक आभारी आहेत.” हे पत्र वाचल्यावर तिला झालेला आनंदपाहून आपल्यालाही बरे वाटते. त्याच संस्थेत ती काही महिने त्या म्हाताऱ्या लोकांसाठी स्ययंसेविका म्हणून काम करते. त्यांच्याशी ती फुगा हवेत उडता ठेवायचा खेळ खेळते. त्यांनाती लहानपणीची गाणी म्हणायला लावते. विस्मरणाचा आजार झालेल्या पेशंटलाही ती बालगीते आठवतात! लहानपणी तरुणपणी ऐकलेली,आवडलेली गाणी, कविताडिमेन्शियाच्या रुग्णालाही आठवतात हे गीत संगीताचे अदभुत वैशिष्ठ्य म्हणावे लागेल! “Home On The Range” हे गाणे झाल्यावर कधीही न बोलणारी फिलीस हळूकुजबुजत्या आवाजात म्हणाली. “I am from the range.” (युटाहची) आणि बाळपणीच्या काही आठवणी सांगू लागली. ‘मौलिक निरीक्षण’ समोर लेखिका लिहिते,” फिलीसशीजो संवाद झाला त्याचा कमीत कमी तीन हेप्स आनंद झाला! ”

पुस्तक वाचताना थंडीतील सकाळच्या उबदार उन्हात, किंवा उन्हाळ्याच्या दिवसात वाऱ्याची हलकीशी झुळुक झेलत समुद्राच्या किंवा नदीच्या काठी आपण फिरत आहोत असेवाटते. मंगला गोडबोले यांचे झुळुक किंवा पद्मजा फाटक यांचे गर्भश्रीमंतीचे झाड, या पुस्तकांची आठवण होते. हे पुस्तक वाचताना मलाही ‘काही heps आनंद झाला! ‘

विज्ञानात संशोधन करताना किती वर्षे संशोधन चालले होते; प्रयोगासाठी गिनिपिग्स किंवा इतर प्राण्यांचा वापर केला नाही असे जाहीर केलेले असते. तसेच लेखिकेने इथे गमतीनेलिहिले आहे की संशोधनात एकाही डाॅल्फिनचा वापर केला नाही! डाॅल्फिन सगळ्या माशांत आनंदी आहे हे लक्षात घ्यायचे.

योगायोग पहा,येव्हढ्यात लक्षात आले होते की तिने प्रस्तावनेत किंवा शेवटी “माझा कार्यक्रम तिकडे आहे तिथे जरूर या” असे गमतीने लिहिले आहे. तर आज वर्तमानपत्रात, ३१डिसेंबरला सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये पाॅला पाउंडस्टोनचा एकपात्री कार्यक्रम आहे हे आताच वाचले !

‘रुचिरा’ आणि ज्युडिथ जोन्स

‘रुचिरा’ पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून अनेक घरातील स्वयंपाक जास्त चांगले होऊ लागले. निदान नवविवाहितांच्या घरात तरी. तसेच दुपारच्या खाण्याच्या वेळी नवनविन पदार्थ होऊ लागले. हे तिशी-पस्तीशीच्या गृहिणींच्या घरीही घडू लागले. दिवाळीत आपल्या घरातले फराळाचे पदार्थही पुरुषमंडळी कसलाही विनोद न करता खाऊ लागले. चकल्या कुरकुरीत होऊ लागल्या, अनारशांची दामटी न होता तेही खुसखुशीत झाले. कोणताही लाडू फोडायला हातोडी किंवा बत्त्याची गरज पडेनाशी झालीं.

‘रुचिरा’मुळे घरातली वाटी हे ‘प्रमाण’ झाले. किती घेऊ या प्रश्नाला, ” घ्या मुठभर किंवा थोडे कमी” किंवा,”अहो थोडीशी चिमूटभर” याऐवजी ” २वाट्या कणिक आणि एक वाटी डाळीचे पीठ असे प्रमाणबद्ध उत्तर मिळू लागले. रुचिराचा खपही प्रचंड होऊ लागला. त्यामुळे अशा प्रकारची अनेक पुस्तके बाजारात आली. आजही येतच आहेत. अशा पुस्तकांची प्रचंड बाजारपेठ आहे. ती ओळखण्याचे श्रेय रुचिराचे पहिले प्रकाशक किर्लोस्करांना जाते!


रुचिराची अशी अचानक आठवण कशी झाली? ज्युडिथ जोन्स या पुस्तकांच्या संपादिकेवरून ही आठवण झाली. जुडिथ जोन्स ही प्रख्यात संपादक होती. होती असेच म्हटले पाहिजे. परवाच तिचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले.

प्रख्यात प्रकाशक Alfred Knopf या प्रकाशन संथेत थोडी थोडकी नाही चांगली ५० वर्षे संपादक म्हणून काम करून ती निवृत्त झाली. सुरवातीला ती Dobuldayह्या तितक्याच तोलामोलाच्या प्रकाशनात काम करत होती. तिच्या कारकिर्दीतील पहिला मानाचा तुरा म्हणजे The Diary of Anne Frank चे प्रकाशन. अनेक नाकारल्या गेलेल्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात पडलेले हे पुस्तक तिने वाचले;आणि आपल्या कंपनीला ते प्रसिद्ध करण्यास भाग पाडले. पुढचा इतिहास आणि ह्या पुस्तकांच्या आवृत्त्त्या निघाल्या, निघताहेत हे सर्वांना माहित आहे . ज्युडिथ जोन्समुळे हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळाले!


पुस्तकांचे संपादक म्हणजे पडद्यामागील कलाकार. सिनेमातील नट नटी माहित असतात. फार तर दिग्दर्शक. पण तेही बिमल राॅय. व्ही शांताराम, राज कपूर, हृषिकेश मुखर्जी, भालजी पेंढारकर, अनंत माने,राजा परांजपे असे नामवंत माहित असतात. पण सिनेमाचे संपादक/ संकलक? फारसे माहित नसतात.


व्ही. एन. मयेकर, वामन भोसले, अरविंद कोकाटे, माधव शिंदे महेश मांजरेकर आणि वर उल्लेख केलेले सर्व दिग्दर्शक हे नामवंत Editor आहेत. तसेच काही मासिके वर्तमानपत्रांचे संपादक. केवळ त्यांच्या नावांनी मासिके आणि वर्तमानपत्रे चालत! अशी यादी लांबत जाईल. ह्यांच्यावर स्वतंत्र लेख लिहिण्याच्या ते योग्यतेचे होते व तसे काही आजही आहेत. मराठी पु्स्तक प्रकाशकांकडे संपादक असतात की नाही मला कल्पना नाही. पण इंग्रजी व इतर पाश्चात्य देशात प्रकाशन संस्थांत संपादक असतातच. प्रख्यात लेखक प्रस्तावनेत आपल्या संपादकांचा मोठ्या गौरवाने उल्लेख करतात.


ज्युडिथ जोन्सने अनेक नामवंत लेखकांबरोबर सातत्याने काम केले आहे. John Updike, Anne Taylor ही त्यापैकी काही नावे.


बरं मग ह्यात ‘रुचिरा’ कुठे बसते? ज्युडिथ जोन्समुळे. कोण कुठली, कुणाला माहित नसलेल्या Julia Child चे पाककलेवरचे पुस्तक प्रसिद्ध झाले ते Judith Jonesमुळे! प्रचंड खप झाला. आणि ती प्रसिद्धिच्या झोतात आली! त्यानंतर अनेकांची अशी पुस्तके आली. प्रख्यात Chef बल्लवाचार्यही लिहू लागले. TV वर खाद्यपदार्थ आणि त्तत्सम गोष्टींचे कार्यक्रमच नाही तर स्वतंत्र वाहिन्या सुरु झाल्या! प्रचंड आर्थिक उलाढाल या क्षेत्रात होऊ लागली. ह्याला अप्रत्यक्षरीत्या ज्युडिथ जोन्स ही कारणीभूत झाली असे म्हणावे लागेल. ती स्वत: पाककलेत प्रविण होती.तिनेही अशी काही प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत.


६०च्या दशकात ज्युलिया चाईल्ड आणि ज्युडिथ जोन्स यांच्यावर सिनेमा निघाला. ज्युलियाच्या पुस्तकाचा खप पुन्हा वाढला. लोकांना ज्युडिथही माहित झाली.

संपादकाला साहित्यिक अभिरुचि, चोखंदळ दृष्टी आणि उत्तम काय आहे हे ओळखण्याची नजर हवी. थोडक्यात तो रत्नपारखी हवा. ज्युडिथ तशी होती.

असे म्हणतात की अध्यात्मात खरा गुरु भेटणे अवघड आहे. तसेच मी म्हणेन की लेखकाला रत्नपारखी संपादक- प्रकाशक मिळणेही तितकेच अवघड आहे.

माझेच उदाहरण बघा ना!

विसर न झाला

‘अंडरटेकरची मुलगी ‘ केट मेफिल्डने आपल्या पुस्तकात ज्यांचा ‘विसर न झाला’ अशा काही जणांविषयी स्मरणलेख लिहिले आहेत. त्यापैकी काही आपण वाचू या.

” एका पाठोपाठ एक त्या बायका आमच्या ‘त्या घराच्या’ चॅपेलमध्ये येत. त्या आल्या की लव्हेंडरचा सुगंध सगळीकडे पसरे. काळ्या हॅट घातलेल्या काळ्या मैना खुर्च्यांवर विराजमान होत. त्यांच्या पोषाखाच्या कडा, बाह्यांच्या कडा, कॉलर्स काळ्या फितींनी सजवलेले असत. काही जणींचे चेहरे सुरकुतलेले असले तरी पावडर लावलेले असत. फिकट का होईना बहुतेक जणींचे ओठ लिप्स्टिकने रंगलेले असत. विधवा झाल्या म्हणून काय,अखेर त्याही स्त्रियाच होत्या.
ह्या स्त्रियांपासून थोड्या अंतरावर मिसेस फॉक्सवुड उभी असते. त्या सर्वांना ती ओळखत असते. पण ती अजून त्यांच्यातली झाली नव्हती.

मी फॉक्सवुडबाईला चांगली ओळखत होते. का ओळखणार नाही? चांगले एक वर्षभर रविवारच्या शाळेत ती आम्हाला शिकवायला होती. माझ्या आयुष्यातले ते सर्वात मोठे लांबलचक वर्ष होते ते. आता मला वाटते, त्या वर्षात तीनशे पासष्ट महिने असावेत ! फॉक्सवुड देवाशी मोठ्या आवाजात बोलत असे. तिची प्रार्थना ऐकण्यापेक्षा पाहण्यासारखी असे ! ऐकण्याऱ्या कुणालाही ‘त्या सम तीच’ वाटणारी अशी असे.

प्रथम दोन्ही हात वर करून डोके थोडे मागे नेऊन ती आपले डोळे उघडायची. प्रार्थनेला सुरवात करायची तसे तिचे डोळे मोठे रुंदावत, इतके मोठे मोठे होत जायचे की जणू काही चर्चच्या छतातून फॉक्सवुडबाईला आरपार स्वर्ग दिसू लागलाय ! बाई मोठ्या आवाजात थँक्यू देवा थँक्यू प्रभो थँक्यू म्हणायला लागायची तशी बाईंची मान मागे मागे अकॉर्डियन वाद्याप्रमाणे लांब लांब होत जायची! कोणत्याही नाठाळ घोड्याला गुडघे टेकवायला लावेल अशी आमच्या बाईंची प्रेक्षणीय आणि ठणठणीत प्रार्थना असे!

रविवारच्या शाळेत वर्षभर दर रविवारी मला तिची ही प्रार्थना पहायला आणि ऐकायला मिळत असे.
फॉक्सवुड जोडपे काटकसरीने राहात असे. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांची कशाच्या बाबतीत कसलीही कुरकुर नसे की तक्रार नसे. दोघांचा साठ वर्षांचा संसार असाच चालू होता. मिसेस फॉक्सवुड रविवारच्या शाळेत तिच्या त्या नामांकित प्रार्थनेत नेहमी देवापाशी तिच्या नवऱ्याला, “अक्बर्टवर देवा तुझी कृपा असू दे” अशी विनवणी करीत असे. बाईंची लांबलचक्, न संपणारी प्रार्थना चालू असे आणि इकडे माझे देवापाशी इतकेच मागणे असे की “देवा मिसेस फॉक्सवुडची प्रार्थना कधी थांबेल? मला भूक लागली आहे, झोप येतेय रे, आणि जोराची शू ही लागलीय देवा!”
मिसेस फॉक्सवुड अशी ठणठ्णीत प्रार्थनेची तर मि. फॉक्सवुड शांत शांत गप्प. चेहरा सुरुकतलेला, आकसलेला. नेहमी अंग चोरून असल्यासारखा त्याचा बांधा होता. चेहऱ्याप्रमाणे कपडेही चुरगळलेले.

यथावकाश मि. अल्बर्ट फॉक्सवुड वारला. आणि त्याचा मृतदेह माझ्या वडिलांनी नीटनेटका करून दर्शनासाठी आमच्या चॅपेल मध्ये ठेवला. पण रीतीप्रमाणे इतर बाहेरचे लोक येण्या अगोदर बराच वेळ आधी घरच्या लोकांसाठी राखून ठेवलेला असतो.

मिसेस फॉक्सवुड आल्या. त्यांना घेऊन माझे वडील चॅपलमध्ये आले. थोडा वेळ बाईंच्या बाजूला उभे राहिले आणि लगेच बाहेर आले. त्यावेळी मी तिथेच जवळ कुठे होते वाटते. वर जाण्यासाठी मी निघाले तर किंचित उघड्या दरवाजातून मला बाई दिसल्या. त्यांची माझ्याकडे पाठ होती. आजपर्यंत चर्चमध्ये जातानाचे त्यांचे पोषाख मला माहित होते. पण आजचा पोषाख काळा होता. मला वाईत वाटले. साठ वर्षे ज्याच्या बरोबर काढली तो आज सोडून गेला. साठ वर्षांचा साथीदार आज आपल्या बरोबर नाही. किती दु:ख झाले असेल बाईंना. हेच विचार माझ्या मनात चालू होते. मी वरच्या मजल्यावर जायला निघाले. इतक्यात फॉक्सवुडबाईंनी आपले हात वर आकाशाकडे नेल्याचे पाहिले. बाईची प्रार्थना सुरू होणार हे माझ्या लक्षात आले. मला राहवेना. मी तिथेच थांबले. त्यांची ती खास प्रार्थना ऐकायला मिळणार म्हणून मी थांबले.

“हे परमप्रिय प्रभो ! देवा ! थँक्यू, देवा, थँक्यू प्रभो अखेर आज तू ह्या मरतुकड्याला जमिनीत गाडलेस !थँक्यू थँक्यू देवा !”

फॉक्सवुडबाईंची मी ऐकलेली ही सगळ्यात लहान प्रार्थना !

[Based on a story from the book: The Undertaker’s Daughter]

शेवटचा दिस

मृत्यु, मरण , मृतदेह, प्रेत, मढे, हे शब्द आपल्या रोजच्या बोलण्यात कधीही नसतात. इतकेच काय त्याचे विचारही आपल्या मनात नसतात. ‘मेला, मेले’ हे शब्दही आपण वापरायचे कटाक्षाने टाळतो. ‘गेले’ असे त्याचे सौम्य रूप करून म्हणतो.
ज्यांचा ह्या गोष्टीशी आणि त्या संबधातील वस्तु, विधी, संस्कार करण्याशी रोज संबंध येत असेल त्यांच्या घरी कसे वातावरण असेल हा विचारही आपल्या मनात येत नाही. ज्यांची ती उपजीविकाच आहे त्यांचे रोजचे आयुष्य कसे असेल?

तर, परवाच मी ‘द अंडरटेकर्स डॉटर्’ हे केट मेफिल्डने लिहिलेले तिच्या आठवणींचे पुस्तक वाचले. विषय वरती दोन परिच्छेद लिहिले त्या संबंधीच आहे. अंत्यसंस्कार करणाऱ्या वडिलांची ही मुलगी. वडलांचे ‘मेफिल्ड & सन फ्युनरल होम’ हे व्यवसायाचे नाव.

त्यांचे घर दोन मजली. जिथे असला व्यवसाय असतो त्याच ठिकाणी घरचे लोक राहात नसतात. पण हे सगळे कुटुंब मात्र त्याच इमारतीत राहत असे. ज्युबिली नावाच्या लहानशा गावातील अंत्यसंस्कार करणाऱ्या(च्या) घरात जन्मलेली ही लेखिका. एक भाऊ आणि ह्या तीन बहिणी. आई कडक शिस्तीची. आईसमोर शांत गप्प गप्प असणारे वडील्, सुस्वभावी आणि खेळकर स्वभावाचे उमदे गृहस्थ. सर्वाना केव्हाही मदत करायला तत्पर असणारे. गावात एक प्रतिस्पर्धी असूनही आपल्या स्वभावाने त्यांनी सावकाशपणे चांगला जम बसवला होता. गाव फार मोठे नाही आणि फार लहानही नाही. त्यामुळे गावातील सगळेजण एकमेकांना ओळखत. गावातील प्रत्येक घराला हिच्या वडलांची केव्हा ना केव्हा मदत घ्यावी लागणारच असे; त्यामुळे तिथले सर्वजण अणि काही बडी धेंडे, सगळ्यांशी वडलांची ओळख होती ह्यात आश्चर्य नव्हते.

उपजीविकाच ती म्हटल्यावर , घरात मृत्यु, मृतदेह, त्याचे शोकग्रस्त नातेवाईक हे वातावरण सतत असायचे.
‘ वुइ’व गॉट अ बॉडी’, ‘प्रेत येणार आहे’ असे आई म्हणाली की आई वडिलांचे बोलणेही हळू आवाजात होई. सर्व मुलांची रवानगी वरच्या मजल्यावरील खोल्यात होई. लहान लेखिकेला तर त्या देहावरचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत किंवा कधी तो दफन होईपर्यंत खाली येण्यास बंदी असे.

घरात शाळेच्या, मित्रमैत्रिणींच्या गप्पा सोडल्या तर एरव्ही ‘ह्याचीच’ बोलणी. कोण केव्हा जाईल हे कधी सांगता येते का? लेखिकेच्या आई वडलांना गावात कोण किती गंभीर आजारी आहे, कोण किती अत्यवस्थ आहे, कोण किती दिवसांचा, तासांचा सोबती आहे ह्याची नेमकी माहिती असे. आणि त्यांच्या बोलण्यातही हेच असायचे. जेवतानाही मधून मधून हाच विषय असायचा. सर्वच माणसांचा शेवट मृत्युतच होणार. पण ती म्हणते,” आमच्या रोजच्या आयुष्यात जेवतानाही ‘मृत्यु’ मध्ये यायचाच. आई विचारायची,” मि. शूमेकर आपल्यालाच मिळणार होता. त्या अल्फ्रेड डेबो(ह्यांचा प्रतिस्पर्धी) कडे कसा काय नेल्ं त्याला ?” “हो ना! शूमेकरकडे इतकी माणसं येणार म्हणून आपण त्यांच्या घरी खुर्च्याही नेऊन दिल्या होत्या!” “जाऊ दे. दुसरा कुणीतरी येइलच की आपल्याकडे.”

ह्यांच्या घरात प्रत्येक खोलीत फोन होता. आई बाबा, खाली काम करणारे दोघे चौघे कोणीही कुठेही असले तरी फोन पटकन घेता यायचा. फोन उचलला नाही, उचलायला वेळ लागला म्हणून ‘बॉडी’ आपल्या कडून जायला नको !
फोन खणखणला की, सगळे घर एकदम गप्प व्हायचे. वडील अशा वेळी त्यांच्या ‘अंडरटेकरच्या’ आवाजात बोलायचे. आई बाबांच्या आवाजावरून आमचे तर्क बांधले जायचे. आई हळूच हलक्या स्वरात “इझ इट जेम्स्?” विचारायची. वडिलांच्या एका हो किंवा नाही या शब्दावरून, मान हलवण्यावरून घरातील पुढ्च्या गप्पाटप्पा, हसणे, आमची वादावादी हे सर्व अवलंबून असायचे.!

बाबा कधी कधी खोटेच गंभीर होत. ते लवकर काहीच सांगत नसत. काही वेळाने “तसे काही नाही” समजल्यावर आई चिडल्यासारखे दाखवायची. आम्ही भावंडे पुन्हा आमच्या गमती जमतीत रमायचो. अशा वातावरणात, घरात काही समारंभ, पार्टी करायची असली, इतकेच काय नेहमीचे सणवार करायचे असले तरी गावातल्या घराघरातील, दवाखान्यात असलेल्या “आजाऱ्यांचा” आणि ‘कोण? केव्हा?’ त्याचा अंदाज घेऊन कार्यक्रम ठरवावे लागत. दिवस किंवा वेळ केव्हा आणि कसा आनंदात घालवायचा ह्याचीही तारीख आणि मुहुर्त ठरवूनच घराला अणि भावंडांना आनंदित व्हावे लागायचे !

आईचा ब्रिजचा ग्रूप होता. त्या बायकांचे पोषाखापासून ते खाण्याचे पदार्थ त्यावेळी किती पटापट संपत, बशा पुन्हा पुन्हा भरून ठेवाव्या लागत, तसेच प्रत्येकीच्या स्वभावाचे बोलण्याचे बारकाईने खुसखुशीत वर्णन केले आहे. सगळीकडे होतात तशा ह्या बायकाही इतरांची म्हणजे हजर नसलेल्यांची उणी दुणी किती चतुराईने काढतात; इतक्याजणी येणार म्हटले की खाण्यापिण्याच्या तयारीची, स्वयंपाक घरातली गडबड लगबग, घरातला पसारा आवरण्याची तारांबळ, ‘तसला फोन’ येतो की काय ह्या धसक्याची टांगती तलवार, अशा कार्यक्रमावर (अगोदर कितीही खात्री करून घेतली असली तरी) सतत लटकलेली असायचीच.

पत्ते खेळणाऱ्यांपैकी एक बाई शाळा मास्तरीण होती. ती बाई कुणाच्याही एखाद्या साध्या वाक्यातून, शब्दावरून लगेच इतिहासातील घटना, भूगोलातल्या घडामोडी, शब्दाची व्युत्पत्ती असे काही मध्येच सांगत बसायची. असले काही तरी रूक्ष रटाळ सांगून, हलक्या फुलक्या मजेशीर गप्पांना ती बाई ‘सामान्य ज्ञानाची परीक्षा’ करून टाकायची. गप्पांचा खळखळता ओघ अडवला जायचाच पण तो खेळकरपणा परत यायलाही वेळ लागायचा.

लेखिकेच्या ‘त्या घरात’ अंत्यसंस्कारच्या वेळी पियानो वाजवायला टॉटी नावाची तरूण मुलगी यायची. ठरलेल्या वेळेपेक्षाही ही उशीरा यायची. तिची वाट बघत, मृतदेह, त्याची नातेवाईक मित्र मंडळी आणि आमचा स्टाफ ताटकळत बसलेला असे. पण टॉटी मात्र यायची ती हसत हसत आणि प्रत्येकाकडे हसून पाहात हाय हॅलो म्हणत पियानोवर बसायची!

एके दिवशी’ तसला विधीचा’ कार्यक्रम संपल्यावर पियानोवर मला एक माळ पडलेली दिसली. टॉटीला मी ती पाहू का म्हटले, नेहमीप्रमाणे हसून ,”हो, पाहा ना घे” म्हणत तिने ती मला दिली. माळेवर मी बोटे फिरवत मी तिला परत दिली. मला ती माळ आवडली होती. बस इतकेच. टॉटी गेल्यावर आई रागवून म्हणाली, “पुन्हा तिच्या माळेला हात तर लाव म्हणजे तुला मी दुसरा दिवस उजाडेपर्यंत बडवून काढीन.” मी घाबरले. तरी मी आईला विचारलेच, “माळ हातात घेऊन पाहिली तर त्यात एव्हढे काय झाले?” पण ते आईला कसे पटणार? नंतर माझ्या लक्षात आले. हां, त्या माळीला एक क्रॉस होता. पण असे लहान मोठे असंख्य क्रॉस ज्युबिलीत होते. अनेकांच्या गळ्यातही दिसत. पण नंतर समजले की आईचा राग ती माळ जपाची होती आणि त्याहूनही गंभीर अपराध म्हणजे टॉटी कॅथॉलिक होती. आमच्या सदर्नर गावात कुणी कॅथॉलिक असे नव्हतेच. अरे देवा! हे असे आहे होय! मला तिचा क्रॉस फक्त क्रॉस वाटला होता. माझे त्याकडे लक्षही नव्हते. मला कसे माहित असणार की क्रॉसही कॅथलिक, प्रॉटेस्टंट असतो ते!

प्रार्थनेसाठी आणि देहाच्या दर्शनासाठी घराच्या आवारात एक चॅपेल होते. ब्रदर व्हिन्सेन्ट प्रार्थनेसाठी यायचा. टॉटीने पियानोवर एक दोन भक्तिगीते म्हटली की हा बोलायला सुरुवात करायचा. समोरच्या शवपेटीत मृतदेह, आजुबाजूला दु:खित नातेवाईक्, आणि इतर लोक. हा ब्रदर व्हिन्सेन्ट पाद्री प्रार्थना म्हणायला सुरू करायचा. त्यात देवाचे आभार मानून झाले की देवाच्या आशिर्वादाला सुरुवात व्हायची. आशीर्वाद त्या मृताच्या गोठ्यातील गाईगुरांपासून किंवा तो दुकानदार असला तर दुकानातील वस्तूंना मग त्या माणसाच्या पाळीव प्राण्यांना आशीर्वाद देऊन व्हायचे. त्यानंतर घरातील सर्वांना असे करत करत ही आशीर्वादांची शेपटी सारखी लांबत त्याच्या ट्रॅक्टरलाही किंवा मोटारीलाही ही आशीर्वादाची खैरात मिळायची; देव दयाळू असतो, अखेर ब्रदर व्हिन्सेन्ट सर्वात शेवटी देवाची कृपा मृतव्यक्तीवर करायचा ! हे झाले की त्याचे प्रवचन सुरू व्हायचे. प्रवचनाचे पहिले वाक्य संपण्याच्या आतच टॉटी पियानोची पायपट्टी दाबून भैरवीचे हाइम्न म्हणायला सुरवात करायची ! जमलेली मंडळी टॉटीकडे हळूच हसून पाहात नजरेनेच तिचे आभार मानायचे. शक्य असते तर मृतदेहानेही तेच केले असते.

पुस्तकाचा निम्मा भाग मृतांच्या संदर्भातून सजीव झाला आहे. पण गाव, त्यातील काही व्यक्तींचे, आपले वडील, भाऊ, बहिणी शाळा अशा जीवनाशी संबंधित अनेक गोष्टीमुळे पुस्तक केवळ अंत्येष्टीचे राहात नाही. लेखिका हायस्कूलमध्ये गेल्यापासून फ्युनरल होम मधील फ्युनरल अस्तंगतच झाल्यासारखे आहे.
लेखिकेने आपल्या वडिलांविषयी आणि भावाविषयी उत्कटतेने लिहिले आहे. तिने आपल्या लहानपणीच्या डोळ्यांमधून पाहिलेल्या आठवणी खरोखर वाचनीय आहेत. शेवटपर्यंत तिच्या आठवणीत असलेल्या काहीजणांचे तिने लिहिलेले स्मरण लेख वाचनीय आहेत.

वाचक, पुस्तकाचे ‘अंडरटेकर्स डॉटर’ हे नाव वाचल्यावर किंवा ‘मेफिल्ड & सन फ्युनरल होम ‘ हे पहिल्याच पानावरील शब्द पहिल्यावर दबकत, पावलांचा आवाजही न करता ह्या घरात प्रवेश करतो. पण लेखिका आपल्याला इतके गंभीर होण्याचे काही कारण नाही हे तिच्या सरळ आणि खेळकर शैलीने पहिल्याच पानात सांगते .
पुस्तक, मन हेलावणाऱ्या, हृदयाला भिडणाऱ्या प्रसंगातून, शब्दांतून , एका निराळ्या आणि रोजच्या व्यवहारात ज्याचा उल्लेखही होत नाही असा व्यवसाय करणाऱ्या घराचे, त्यातल्या तुमच्या आमच्या सारख्या माणसांचे , त्यांच्या रोजच्या आयुष्याचे हृदयंगम वर्णन करणारे आहे. तरीही अर्ध्या पाऊण भागानंतर पुस्तक लांबले आहे असे वाटते. जोपर्यंत तिच्या बाळपणीच्या आठवणी आहेत तोपर्यंत ह्या ‘फ्युनरल होम मधून वाचक लवकर बाहेर येत नाही. आणि ज्युबिली गावातला मुक्कामही थोडा वाढवावा म्हणतो.

मृतदेहाबरोबर त्याच्यासाठी घरची माणसे घड्याळ अंगठी, गळ्यातल्या माळा अशा वस्तू ठेवत असतात. मृताबरोबर त्याही अखेर जमिनीत पुरल्याच जातात. पण ” मोस्टली, व्हॉट द डेड टेक विथ देम आर देअर सिक्रेट्स.” हे अंडरटेकरच्या मुलीशिवाय दुसरे कोण म्हणू शकेल?

उपसंहार

विलक्षण अनुभवाच्या ह्या गोष्टी आहेत यात शंका नाही. ह्या अनुभवांना योगायोग म्हणायचे की चमत्कार हा एका निराळ्या चर्चेचा विषय होईल. अनुभवांची विविधता आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांच्यातील विविधता,त्यामुळेही हे अनुभव वाचावेसे वाटतात. काही गोष्टी योगायोग वाटतात हे खरे. पण काही घटनांची उकल नेहमीच्या तर्क बुद्धीच्या आधारे करणे शक्य होत नाही.

पहिली भेट, पहिले प्रेम, ह्या गोष्टी विसरता येणे अशक्य आहे असे म्हटले जाते.निदान सत्तरीतला आयर्व्हिंग तरी विसरला नव्हता. आपल्या प्रिय हेन्रिएटाच्या ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ अशी तीव्र आस एकाकी आयर्व्हिंगला लागली होती.हेन्रिएटा त्याची पहिली प्रेयसी.त्याच्या पहिल्या प्रेमाची आणि आयर्व्हिंगची एका स्त्रीच्या तीव्र सदिच्छेमुळे, अखेर भेट होते.त्याचे उत्कट प्रेम सफळ होते. शेवट हृदयंगमरीत्या गोड होतो. योगायोग घडून येण्यासही इथे एका स्त्रीची तीव्र सदिच्छाच कारणीभूत ठरली.

‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही’ किंवा ‘चमत्कार तिथे नमस्कार’ असे आपण बरेच वेळा म्हणतो. पण रब्बाय शपिराच्या बाबतीत नमस्कारामुळेच चमत्कार घडला. रोजच्या अत्यंत मनापासून केलेल्या,”गुड मॉर्निंग्,हर्र म्युलर्” मुळेच त्याचे प्राण वाचले.

‘कुणाच्या खांद्यावर….” असे आपल्याला डेव्हिड ब्रॉडीविषयी वाटले तरी त्याच्या निरपेक्ष धडपडीमुळेच,”रावाचा रंक झालेल्या” निर्धन, आणि निराधार सॅम्युअल विंस्टाईनला, स्वाभिमानाने, प्रतिष्ठा राखून,आपल्या स्वत:च्या जागेत अखेरचा विसावा घेता आला!. ह्या घटनेला योगायोग म्हणायचा का चमत्कार?

‘अचानक धनलाभ’, ‘अकल्पित संपत्तीयोग’ असे आपण बरेच वेळा वर्तमानपत्रातील भविष्यात वाचतो. पण टॉम स्टोनहिलला त्या अपरात्री अंत्यविधीच्या शौचालयात जावे लागते आणि त्याच्या म्हशीचाही मावसभाऊ लागत नसलेल्या कुणा स्टॅन्ले मॅरोची सर्व संपत्ती टॉमला कायदेशीररीत्या मिळते. लॉटरी लागण्यासाठीसुद्धा एखादे तिकिट घ्यावे लागते! इथे एक पैसाही कुणाला खर्चावा लागला नाही! ही केवळ अचंबित,थक्क करणारी घटना असे म्हणायचे का? ती तशी आहे हे नक्की. पण हे असे कसे घडले? कसे घडते? खरेच झाले असेल का? असे प्रश्न आपल्याला पडतातच.

त्या मागचा कार्यकारणभाव उलगडत नाही. कादंबरीच्या हस्तलिखिताची प्रत चोराच्या हातून नेमकी लेखकाच्याच अंगणात पडावी ह्यामध्ये योगायोगाचा भाग आहे असे वाटते.पण हा योगायोग घडून आला ह्याचा आनंद लेखका इतकाच आपल्यालाही होतो.

एकमेकांची काहीही ओळखदेख नसताना, दोन आंधळ्या व्यक्ती कोणत्या शक्तीने सहज चौक ओलांडतात? तारुण्यसुलभ भावनांच्या मधुर आवेगानेच त्यांनी तो ओलांडला असावा! गमतीचा भाग असा की दोघांनाही आपला सखासोबती डोळस आहे असे वाटत असते! तारुण्याच्या भरतीची लाट अशी असते!

१८३८ साली लिहिलेल्या कादंबरीतील “टायटन” आणि १९१२ साली तयार केलेल्या तुलनेने आधुनिक “टायटॅनिक” बोटींचे त्यांच्या निर्मितीतीतील साम्य आणि दोन्ही बोटींचा तितकाच एक सारखा दुर्दैवी शेवट पाहून ह्याला काय म्ह्णायचे ते समजत नाही. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणायची का चमत्कार?

तयार कपड्यांच्या मोठ्या कारखानदाराची उधारी, एक सज्जन आणि सचोटीने व्यापार करणारा व्यापारी,त्याचा धंदा बुडाला, काही वर्षे उलटून गेली तरी जवळचा अखेरचा दागिना देऊन ती चुकती करतो. त्या सोन्याच्या कड्याची किंमत नेमकी ८७२४ डॉलर्स कारखानदाराला मिळते! व्यापारी आणि सचोटी ह्या दोन गोष्टी सहसा एकत्र आढळत नाहीत असा अनेकांचा अनुभव असतो. पण अपवाद हे असतातच. असे सचोटीचे व्यापारी असतात हे तितकेच खरे आहे. आपल्याही माहितीचे असे काही व्यापारी असतात.

ह्या गोष्टीवरून मला माझ्या धाकट्या भावाने फार पूर्वी संगितलेली, ह.भ.प.ल.रा. पांगारकरांच्या आयुष्यात घडलेली अशाच तर्‍हेची घटना आठवली. त्यांनी आपल्या “चरित्रचंद्र” ह्या आत्मचरित्रात ही लिहिली आहे.

ल.रा. पांगारकर आधुनिक शिक्षण घेतलेले आणि श्रद्धावान गृहस्थ. लेखक, आणि ‘मुमुक्षु’मासिकाचे संस्थापक आणि संपादक. व्यवहारात आर्थिक चढ उतार येतच असतात. काही काळ त्यांची ओढग्रस्त स्थिती झाली होती. घराचे भाडेही ते देऊ शकत नव्हते. घरमालक रोज तगादा लावायचा. एके दिवशी तर जागा सोडून जा असे म्हणाला होता. पांगारकरांसारख्या सज्जनाला आपण घरमालकाचे पैसे देऊ शकत नाही ह्याचे वाईट वाटत होते. कुठुनही पैसे येण्याची शक्यता नव्हती. असेच एका रणरणत्या दुपारी ते घरी बसले होते. दुपारची उन्हाची वेळ होती. काळजी चिंता तर पोखरतच होती. तिचा दाह तो निराळाच. तेव्हढ्यात एक गृहस्थ आला. पांगारकारांना नमस्कार करून म्हणाला,” आपल्या मासिकाची विक्री आणि काही वर्गणीदारांची बाकी आणली आहे ती मोजून घ्या” पांगारकरांना तसे काही आठवत नव्हते. पण वेळ भर उन्हाची म्हणून पांगारकर अगोदर त्या माणसासाठी पाणी आणण्यासाठी घरात गेले. पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आले तर तो माणूस पैसे व्यवस्थित ठेवून निघून गेला होता. पांगारकर बुचकळ्यात पडले. बाहेर येऊन पाहिले. पण तो माणूस दिसला नाही. काय कारू शकणार ते? त्यांनी पैसे मोजले. ते नेमके ३७ रुपये आणि काही आणे भरले. थकलेल्या घरभाड्याची नेमकी रक्कम!

ह्या गोष्टींना ‘योगायोगांच्या’, ‘बोला फुलांची गाठ’ ‘अच्ंबित करणाऱ्या अकल्पित घटना’ किंवा ‘विलक्षण अनुभव’ म्हणा, काहीही नाव द्या. त्या कशाही असोत पण एक खरे की मित्रमंडळीत गप्पाष्टके रंगवायला ह्या “अनुभवाच्या”गोष्टी, किस्से विविधता आणतील.गप्पांची खुमारी वाढवतील ह्यात शंका नाही. आपल्यालाही असे काही अनुभव आले असतात. तेही आठवतील.

काय म्हणावे हे कळत नाही अशा घटना आहेत ह्या. अखेर कार्ल युंग म्हणतो ते बरोबर आहे असे वाटते. ‘शक्याशक्यतेच्या पलीकडेही’ काहीतरी असलेल्या ह्या घटना आहेत एव्हढेच आपण म्हणू शकतो.
हे अनुभव ” स्मॉल मिरॅकल्स ” ह्या लहानशा पुस्तकातील आहेत. लेखक (किंवा लेखिका असतील) दोघेही ज्यू असल्यामुळे ज्यू लोकांचे अनुभव यामध्ये जास्त आहेत्.

ह्या विलक्षण, पण “सुरस, आणि चमत्कारिक” गोष्टी वाचून मला आनंद झाला तसा तुम्हालाही होवो असे म्हणून “उपसंहाराचे” चार शब्द , आपणा सर्वांची नेहमीची प्रतिक्रिया व्यक्त करून संपवतो:
“जगात काय, केव्हा, कुठे आणि कसे घडेल हे सांगता येत नाही.”

उपोदघात

आपल्या रोजच्या व्यवहारात, अगदी घरातल्या घरातही काही वेळेस अशा घटना घडतात, असे प्रसंग येतात की आपल्याला नवल वाटते. “अरेच्या! मी आताच तुम्हाला फोन करणार इतक्यात तुमचा आला!” ” या या , आम्ही तुमचीच आठवण काढत होतो बघा. हो ना गं? आणि तुम्ही आलात व्वा !” असे किरकोळ परचित्त ज्ञानाचे प्रसंग तर सगळ्यांच्या रोजच्या अनुभवाचे आहेत.

बरेच वेळा माणसाला, कसलीही कल्पना नसताना असे अनुभव येतात की त्यावर विचार करुनही त्याचा उलगडा होत नाही . त्याला आपण योगायोग म्हणून पुढे जातो. पण अशा घटना कधी इतक्या अदभुत आश्चर्यकारक, विश्वास न बसाव्या अशा असतात. त्याला कोणी चमत्कारही म्ह्णतात . पण सध्याच्या काळात ‘चमत्कार’, दैव, ‘भवितव्य घडविणारा’ ‘प्राक्तन’ अशा शब्दांना मागणी नाही. कर्तृत्वान, कर्तबगार माणसांना त्या शब्दांचा आधार घ्यावा लागत नव्हता आणि नाही हेही खरे वाटते.

बहुतेक प्रसंगी ‘योगायोग हा शब्द मात्र बरेच वेळा ऐकायला येतो. कारण त्यातही काही गोष्टी एकाच वेळी अवचितपणे घडून येतात. पण काही विस्मयकारक गोष्टी जेव्हा आकस्मिक, अचानक घडतात तेव्हा माणूस अवाक होतो.
त्यावेही हा केवळ योगायोग म्हणायचा की चमत्कार म्हणायचा? ज्याचे त्याने हे ठरवावयाचे. अशा घटना परमेश्वरच, नामानिराळा राहून घडवून आणतो असे मानणारेही बरेच आहेत. लेखिका डोरिस लेझिंगचेही हेच म्हणणे आहे.

कार्ल युंग हा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होउन गेला. फ्राईड आणि कार्ल युंग दोघे समकालीन. त्याच्याकडे बरीच वर्षे अनेकजण त्यांना आलेले अविश्वसनीय, योगायोग, विस्मयजनक ह्या सदरात मोडणारे अनुभव सांगत. त्यांच्यासाठी त्याने आपली बरीच वर्षे दिली. त्या अनुभवांचा शास्त्रीय अभ्यास केला, आणि अशा अनुभवांचे नामाभिधान त्याने सिंक्रोनिसिटी या शब्दात केले. याचा अर्थ “मीनिंगफुल कोइन्सिडन्सेस ऑफ टू ऑर मोअर इव्हेंट्स व्हेअर समथिंग आदर दॅन द प्रॉबेबॅलिटी ऑफ चान्स इज इन्व्हॉवल्ड्”

आपण योगायोग, नशीब,आणि इंग्रजीतील लक, चान्स्, कोइंसिडन्सेस अशा शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल अशा घटना, अनुभव वाचणार आहोत. ह्या घटनांना काय म्हणायचे ते आपण स्वत:च ठरवायचे आहे. हे अनुभव बऱ्याच ज्यू लोकांचे आहेत. तसेच इतरही काही विक्रेते, गृहिणी,सामान्याजनांचे, लेखक, कादंबरीचेही आहेत.

पण त्या अगोदर एका डॉक्टराचा अनुभव वाचू या आणि यथाक्रमे पुढचे नंतर वाचू:

डॉक्टर बर्नाइ साइगेल, एक बालरोगतज्ञ आणि शस्त्रक्रिया तज्ञ सांगतात,”माझ्या आयुष्यात एक घटना नेहमी कायमची होत असते. मी कुठेही गेलो तरी मला एक पेनी सापडतेच! रस्त्यावर्, दुकानात, उपहारगृहात इतकेच काय एखाद्या हॉटेलात नुकत्याच स्वcच केलेल्या खोलीत गेलो तरी तिथेही मला पेनी सापडणारच. मला ती केव्हाही हुडकावी लागत नाही; मी आणि पेनी इतके अविभाज्य घटक आहोत.

आमच्या मिरॅकलला मांजराला खेळगडी असावा असे आम्हाला वाटत होते. आमच्या शेजाऱ्याच्या मांजरीला काही पिल्ले झाली. त्यांच्याकडून आम्ही एक पिल्लू आणले. पण त्याचे आणि आमच्या मांजराचे काही पटले नाही. काही दिवसांनी आम्ही त्यांना ते परत करायला गेलो. दुसरे आहे का म्हणून विचारले. ते म्हणाले एकच आहे. बघितले. फारसे काही गोजिरे वगैरे नव्हते. पण कोणीतरी खेळायला मिळाले आमच्या मिरॅकलला हे समाधान होते. पिल्लू घेऊन जाताना त्यांनी त्याचे काही नाव ठेवले आहे का असे विचारले असता, ते म्हणाले,” हो, त्याचे नाव आम्ही ‘पेनी’ ठेवलेय!”