Category Archives: Commentary

वाटेवरचे दिवे

आदित्य आणि यश  मला  कधी  कधी  पुस्तक-खुणा  देत  असत.  त्यानंतर सोनियाही देऊ लागली. तिच्या अशा पट्टया विविध तऱ्हेनी सजवलेल्या असत. रंग, मखमल, चमकी वापरून सोनिया त्या करीत असे. दुकानातही, पुस्तकांबरोबर अशा पुस्तक खुणेच्या पट्टया देतात. बहुधा त्यावर  पुस्तके, वाचन वाचनाची महत्ता पटविणारी   थोरा  -मोठ्यांची वचने  असतात .  विनोदातून गर्भित, सूचक इशारा देणारीही काही असत. कथा-कादंबऱ्या -चरित्रांवरून अनेक चित्रपट निघतात . त्या संदर्भातील पुस्तक-खुणेची ही  पट्टी मिस्कीलपणे मला बजावत होती,”Don’t judge a book by its movie .”

परमेश्वराच्या निर्मिती सामर्थ्याचे वर्णन करणारे , शब्दाचा गौरव करणारे बायबलमधील ” In the beginning was the Word, and the word was with with God , and the Word was God .”  हे बायबलमधील वचन आपल्याला माहित आहे. एक पुस्तक-खुणेची पट्टी, त्याच श्रेणीत शोभणारा शब्द सांगत होती – READ.  सृष्टी निर्मितीतील पहिला शब्द ‘आवाज’च होता. तो पहिला हुंकार पहिल्या माणसाने ऐकल्यावर, तो त्याचाही असेल, तो उच्चारल्यावर, तो भयचकित आश्चर्यचकित आणि तितकाच आनंदितही झाला असेल! त्या पुस्तक-खुणेच्या पट्टीवरील ठळक अक्षरातील READ  वाचल्यावरही वाचकाला तसेच वाटले असणार.  READ-वाच-  ह्या एका शब्दापासून स्फूर्ती घेऊन माणसाने केव्हढी प्रचंड प्रगती केली आहे!

READ  हा आदेशात्मक शब्द वाचल्यावर मला मुहम्मद पैगंबराच्या आयुष्यातली त्या प्रसंगाची आठवण झाली . मुहंम्मद पैगंबर एकदा स्वस्थ, स्वस्थचित्त बसला असता त्याच्या मनावकाशातून  त्याला धीर गंभीर आवाजात “म्हण” अशी आज्ञा झाली . हा काय प्रकार आहे हे त्याला प्रथम समजेना . तो पहिल्यांदा भ्याला; नंतर चकित झाला . “हं , म्हण”, “कर सुरवात” असे पुन्हा त्याला ऐकू आले. प्रथम तो अडखळत , चाचरत म्हणू लागला . मग हळू हळू, त्याच्या न कळत तो नीट  म्हणत  गेला .  तो जे म्हणत होता तेच आजचे कुराण  होय !     पुस्तक-खुणेच्या पट्टीवरील READ  हा शब्दही आपल्याला त्याच तोलामोलाची अपौरुषेय आज्ञा आहे !

ह्या पट्ट्यांवरून मला शाळा-कॉलेजात असताना  (कधीतरी)  अभ्यास करताना आपणही पुस्तकात खुणा करत होतो याची आठवण झाली. अनुक्रमणिकेत काही धड्यांवर, काही पानांवर काही ना  काही खुणा करत असे. काही ओळी कंसात तर काही चौकोनी कंसांच्या कोंदणात बसवत असे. तर कधी एखाद्या परीचछेदाशेजारी उभी रेघ काढून बाजूला IMP  लिहून ठेवित असे. कधी एक दोन ओळीखाली रेघा मारायच्या. परीक्षेच्या अखेरच्या क्षणी तयारीच्या वेळी ह्या खुणा उपयोगी पडत.  ह्या खुणा अभ्यासाच्या वाटेवरील दिवेच होते .

पुस्तक-खुणेच्या ह्या पट्टया (bookmarks) , पुस्तकात केलेल्या ह्या उणाखुणांवरून ती. अण्णांच्या अनेक पुस्तकांतील, विशेषत: दोन ग्रंथराज, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत ह्यांची आठवण झाली . हजारो ओव्यांचे  हे ग्रंथ म्हणजे मराठीचे ऐश्वर्य आहे . ही  दोन्ही पुस्तके वाचताना , अण्णांनी खुणा केलेल्या , ओव्यांखाली  ओढलेल्या कडक-सरळ, सुंदर रेघा, समासात त्यांनी दिलेले संदर्भ, शब्दार्थ हे सर्व माझ्यासाठी वाचन किती सहज सोपे करीत होत्या ! अडखळणे नाही की वाट चुकणे नाही ! एखादे प्रसंगी अण्णा  ज्ञानेश्वरीतील त्यांना आवडलेल्या ‘मन हे मीच करी’ किंवा ‘ह्या हृदयीचे त्या हृदयी  घातले ‘ ह्या ओव्यांविषयी सांगत. किंवा ‘ God is Imagination ‘  ह्या विवेकानंदांच्या  वचनाचा  गूढार्थ स्पष्ट करण्याच्या ओघात ते एकनाथांच्या भागवतावरील भावार्थ टीकेतील  ‘ मन हेच सुखदु:खाचे कारण ।’ ‘मनकल्पित संसार जाण । मन कल्पिले जन्म मरण ।’ अशा काही ओव्या सांगून त्याचे विवरण करीत. एखादे वेळी अनन्यता. मनाची एकाग्रता किती पराकोटीची असावी ह्या संबंधातील एकनाथ महाराजांनी दिलेला दृष्टान्त  ‘परदेशी गेला बहुतकाळ  भर्ता । त्याचे पत्र सादर ऐके कांता । तैशिया अति एकाग्रता । भिक्षुगीता ऐकावी ।।’ ही  भिक्षुगीतेचे महत्व पटविणारी ओवीही ऐकवीत .

त्यावेळी आम्हाला अण्णा  असे जे काही सांगत ते डोक्यावरून जात असे . त्यांचे सांगणे उत्तम असे पण आमच्या डोक्यात काही ते शिरत नसे. मनापासून फारसे लक्षही नसे. कारण हा विषय समजण्याचे  त्यात रस असण्याचे, घेण्याचे आमचे वयच नव्हते .

मन लावून, रस घेऊन ऐकले नसले तरी अण्णा सांगत त्यातील काही शब्दकण कर्णरन्ध्रातल्या कर्मतंतूनी अडवून ठेवले असावेत . मेंदूतील आठवणींच्या कप्प्यात ते कुठेतरी पहुडले असले पाहिजेत .आज ज्ञानेश्वरी  किंवा एकादश स्कंधातील ओव्या वाचताक्षणी अण्णा  जे सांगत ते त्यांचे सुंदर भाष्य होते ; त्यांचे ते सांगणे म्हणजे त्यांचे ते एक एक  निरूपणच होते; व्याख्याने होती ह्याची तीव्रतेने जाणीव होते . मी ग्रंथ बंद करतो. डोळे  मिटून घेतो . स्वस्थचित्त होण्याचा प्रयत्न करतो. पण गळा दाटून यायचा तो येतोच .

तर पुस्तकातील अशा खुणा म्हणजे माझ्यासाठी वाटेवरचे दिवे होतात. आकाशातील तारे होतात. आणि माझ्या वाचनाची लहानशी वाटचाल राजमार्गावरून होऊ लागते .

साहित्यिक सम्राट

रोमन साम्राज्याच्या सम्राटांची , त्यांचे पराक्रम , त्यांची
प्रेम-प्रकरणे किंवा त्यांचा विक्षिप्तपणा इतकीच ओळख आपल्याला ज्युलियस,
ऑगस्टस , निरो किंवा क्लोडियस या सीझर राजांची आहे.

शेक्स्पिअर पासून ते अलीकडच्या अल्बर्ट कामू या आधुनिक नाटककारापार्यंत
अनेक नाटककारांनी रोमन सम्राटांवर नाटके लिहिली.

साहित्याचे विषय हे राजे झाले पण खुद्द ह्यांच्यापैकी बरीच सीझर मंडळी
साहित्यिक होती याची आपल्याला फारशी माहिती नाही.
अनेक वर्षे , पिढ्यान पिढ्या, पाश्चिमात्य विद्यार्थ्यांना लाटिनची ओळख
रोमन सम्राट ज्युलियस सीझरची आणि त्याच्या Conquest of Gaul या
पुस्तकापासूनच व्हायची!

ज्युलियस सीझरची (इ.स. पूर्व १०० ते इ.स पूर्व ४४ ) एवढ्यावरच लेखक
म्हणून ओळख संपत नाही. त्याने नाटके लिहिली आणि कविताही केल्या. आपल्या
रोम आणि स्पेनच्या चोवीस दिवसांच्या सफरीची The Journey या दीर्घ काव्यात
वर्णने केली . पण हा काव्य खंड हरवला ! आल्पस पर्वत ओलांडून केलेल्या
प्रवासाचेही ज्युलियस सीझरने काव्यातच वर्णन केले आहे . ज्युलियस
सीझरच्या भाषाशैलीची त्याच्या समकालीन लेखकांनीही वाखाणणी केली आहे.

सिसेरोने तर (सिसेरो हा इ.स.पूर्व १०६ ते इ.स. पूर्व ४३ या काळातला रोमन
तत्वज्ञानी , उत्तम वक्ता, कायदेपंडित आणि घटनाकार होऊन गेला.)सीझरच्या
शब्दसंपत्तीची आणि एकूणच त्याच्या राजेशाही भाषाशैलीची उदात्त या शब्दात
गौरव केला आहे . ज्युलियस सीझरनंतर झालेल्या ऑगस्टस सीझरच्या काळात (इ.स.
पूर्व ६३-इ.स.पूर्व १४ ) साहित्य वांग्मयाला चांगलाच बहर आला होता.

ऑगस्टसच्या दरबारी वर्जिल , होरेस आणि ऑविद सारखे चतुरस्त्र साहित्यिक
होते . ऑगस्टसला साहित्याची उत्तम जाण होती . वरील सर्व साहित्यिकांनी
आपापापल्या ग्रंथातून ऑगस्टसची स्तुतीच केलेई आहे. अशा प्रतिभावान
साहित्यिकांच्या प्रभावळीत. ऑगस्टस सीझरने आपले लिखाण फाडून नष्ट केले
किंवा आपले सीसिली काव्य हरवले याची खंतही बाळगली नाही यात नवल काय? पण
ह्या सम्राटाने १३ खंडात लिहिलेले आपले आत्मचरित्र आणि आपल्या
कार्याविषयी लिहिलेला ग्रंथ टिकून राहिला. पण त्याचे उत्तम म्हणून गणले
जाणारे Encouragement to Study of Philosophy हे मात्र काळाच्या ओघात
नाहीसे झाले!

टायबेरियस सीझर नंतर केलीग्युला या टोपण नावानेच जास्त माहित असलेला सीझर
झाला (इ.स. पू १२-इ.स. पू ४१ ) ह्याला साहित्याची काही फारशी जाण
नव्हती पण इतर विद्वान, साहित्यिक यांच्याविषयी अत्यंत कोती मते आणि
वृत्ती होती. त्याने Atellan या विनोदी लेखक-कलावंताचे नुसते लिखाणच
नव्हे तर त्या विनोदी लेखकालाही जाळून टाकले ! इतकी (च) त्याची “ज्वलंत
साहित्य सेवा !”

ह्या केलीग्युला नंतर त्याचा काका क्लोडियस हा गादीवर आला. ह्याचीही एक
वेगळीच तऱ्हा ! तिला स्वतंत्र वृत्ती म्हणायचे का नाही ते आपण ठरवायचे .
क्लोडियस सीझरच्या मनात लाटिन भाषेत नवीन मुळाक्षरांची भर घालण्याचे मनात
आले. त्याने तीन नवीन वर्णाक्षरांची भर घातली . आपल्या सम्राटाने संशोधन
करून काढलेली मुळाक्षरे म्हटल्यावर राजा बोले दळ हाले या न्यायाने
राजपत्रात आणि सरकारी खात्यात वापरायला सुरवात झाली . तुघलकी हुकमाने
संपूर्ण राजधानी हलवली गेली तसाच हा प्रकार. पण Claudius मेल्यानंतर
त्याची हीं तीन मुळाक्षरेही त्याच्याबरोबरच गेली!

पण ह्या क्लोडियस सीझरचे लिखाण फार प्रचंड होते . ह्यामध्येही त्याचा
स्वतंत्र बाणा दिसून येतो . त्याने Etruscan ह्या इतिहासाचे वीस खंड आणि
Carthaginian इतिहासाचे आठ खंड आपल्या लाटिन भाषेत न लिहिता ग्रीक भाषेत
लिहिले!

त्याने आणखी लिहिलेल्या पुस्तकांची गर्दी इतकी अफाट झाली म्हणता की
अलेक्स्झांड्रिया लायब्ररीची इमारत वाढवावी लागली . Claudiyan नावाची
नवीन इमारत मूळ इमारतीला जोडून बांधावी लागली!

रोमन सम्राट नीरो तर त्याच्या स्वत:विषयीच्या अवास्तव कल्पना, विक्षिप्त
आणि विचित्र वागणूक यामुळे कुप्रसिद्ध झाला. त्याचे क्लोडियस पॉलियो वरील
जहरी टीकेने भरलेले The One Eyed Man हे पुस्तक नीरोबरोबरच नष्ट झाले.

आपल्याकडेही काळाच्या प्रवाहात साहित्यिक राजे महाराजे होऊन गेले.
काहींचा भविष्य पुराणासारख्या इतर पुराणांत उल्लेख आढळतो . काहींच्या
बाबतीत तो राजा होता की कवी? किंवा एकाच नावाचे दोन असू शकतील असे वाद
आढळतात ; उदा . भर्तृहरीच्या बाबतीत असे वाद झाले. पण तो राजाही होता
आणि कवीही होता असेच आता मानले जाते .पण जे राजे निर्विवाद लेखक आणि
राजेहि होते त्यापैकी दोन ठळक नावे समोर येतात ती म्हणजे राजा शूद्रक आणि
राजा हर्षवर्धन!

राजा शुद्रकाचा काळ इ.स. पूर्वी २ रे शतक ते इ.सनाचे ५वे शतक यामधील
असावा असे समजले जाते . शुद्रकाचे सर्वांना माहित असलेले सदाबहार नाटक
‘म्रुच्छकटिक ‘ . चारुदत्त आणि वसंतसेना यांचे प्रेम आणि त्यातील वेगळाच
असा खलनायक शकार , आणि नाटकातील नाट्यमय घटना यांना कोण विसरेल? नाटककार
देवल यांनी याचे मराठीत सुरेख नाट्यपूर्ण रुपांतर केले आहे .

इ.स. ते ६४७ मध्ये नर्मदेच्या उत्तरेकडील बहुतेक सर्व भूप्रदेश ज्याच्या
ताब्यात होता तो पराक्रमी तितकाच सुसंस्कृत , रसिक, साहित्यिक राजा
हर्षवर्धन ! याने रत्नावली आणि प्रियदर्शी अशी दोन सुखान्त नाटके
लिहिली. ह्याच्या दरबारी त्याकाळचे प्रख्यात तत्वज्ञानी, कवी ,नाटककार
होते. हर्षचरितम लिहिणारा आणि ‘कादंबरी’ लिहिणारा कवि बाण उर्फ बाणभट्ट
हा त्याच्या दरबारी कवि होता.

इ.स. १६व्या शतकाच्या आगे-मागे बरेच जगन्नाथ पंडित होउन गेले. त्यापैकी
एक जगन्नाथ पंडित राजा होता. तो साहित्यिक होता की नाही याचा उल्लेख
आदळत नाही. पण तो कुशाग्र बुद्धीचा गणिती होता.त्याने भूमितीवर ग्रंथ
लिहिला आहे .

सीझरच्या सम्राटांची साहित्यिक संपदा पाहिल्यावर आपल्या तंजावरच्या
मराठी राजे सरफोजी भोसले या राजांच्या मराठी नाटकांची, संस्कृत
साहित्याची आठवण होते . या भोसले घराण्यातील राजांनी यक्षगान पद्धतीत
सुधारणा करून लिहिलेली स्वतंत्र अशी बावीस मराठी नाटके तसेच त्यांचे इतर
वांग्मयही आजही तंजावर येथे शाबूत आहे , उपलब्ध आहे . राजा शुद्रकाची
नाटके , भर्तृहरीच्या शतकत्रयीतील नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक हे
तीनीही काव्ये आजही आपल्याला वाचायला मिळतात. तुलनेने ही सर्व पुस्तके
रोमन काळाच्या मानाने अलीकडची आहेत हे खरे . पण तरीही ती फार जुन्या
काळातील आहेत हे नि:संशय. ह्या बाबतीत आपण आतापर्यंत तरी भाग्यवान आहोत
हे काय कमी समाधान आहे?

ऱोमन सम्राट ज्युलियस, ऑगस्टस आणि क्लॉडियस सीझर हे साहित्यिक होते .
ज्युलियस सीझर तर शैलीदार लेखक म्हणून नावाजला गेला . पण दुर्दैव असे की
त्यांची ही सर्व ग्रंथ संपत्ती त्यांच्या रोमन साम्राज्या बरोबरच लयास
गेली!

कालाय तस्मै नम: ।

महाकादंबरीचे बारसेही बारा वेळा तेरा काळ!

नाशिक रोडला असताना शनिवार रविवारी देवळाली कॅम्पला जात असे. बहुतेक वेळा हडपसरकर बरोबर असायचाच. एखादे वेळेस एम. जी. कुक असायचे. कुक म्हणजे कुलकर्णी. कॅम्पमध्ये भटकणे, मग अडल्फी किंवा कॅथी मध्ये इंग्रजी सिनेमा पाहणे. हॉटेलात जाणे. असा कार्यक्रम असे.

देवळाली कॅम्प मध्येच Brothers Karamazov पाहिल्याचे आठवते. त्या वर्षा -दोन वर्षात चर्चेत असलेला युल ब्रायनर त्यात होता. सिनेमा डोस्टोयव्ह्स्कीच्या त्याच नावाच्या अतिशय प्रख्यात कादंबरीवर होता. त्यामुळे कथा जबरदस्त प्रभावी असणार ह्यात शंकाच नव्हती. त्या आधी काही वर्षांपूर्वीच डोस्टोयव्हस्कीच्या The Idiot , Crime and Punishment या कादंबऱ्याही मी वाचल्या होत्या.

डोस्टोयव्हस्किच्या कादंबऱ्या, कथा वाचताना मध्येच पुस्तक मिटून शांत बसावे असे वाटे. पुस्तक संपवल्यावरही असेच व्हायचे. काही न बोलता थोडा वेळ शांत बसून, असे का व्हावे , असे व्हायला नको होते असे विचार येउन एखादा दुसरा प्रसंग, घटना पुन्हा समोर यायचे. मन खिन्न व्हायचे. काही दिवस ते पुस्तक डोक्यात सतत घोळत असे. ब्रदर्स कारामाझोव सिनेमा पाहून बाहेर आल्यावरही थोडा वेळ आमचे असेच झाले. आम्ही गप्पच होतो. हॉटेलात आल्यावर मग हळू हळू सिनेमाविषयी बोलणे सुरु झाले. गप्पाही झाल्या. केवळ रशियातीलच नव्हे, पाश्चात्य युरोपीय देशातच नव्हे, जगातील वाचकावर डोस्टोयव्हस्कीचा मोठा प्रभाव आहे . आणि त्यामुळेच जगातील थोर लेखकांत डोस्टोयव्हस्कीची गणना होते.

साहित्यिक, कादंबरीकार, डोस्टोयव्हस्कीच्या संकल्पित महाकादंबरीची वेळोवेळी रूपे बदलली पण प्रत्यक्षात ती कधी जन्मालाच आली नाही; ती एका अप्रतिम कादंबरीत मात्र विलीन होत गेली. परंतु त्या अखेरच्या अप्रतिम कादंबरीचा डोस्टोयव्हस्कीने योजलेला दुसरा भागही प्रकट झाला नाही. ही सर्व हकीकत ऐकण्यापूर्वी डोस्टोय्व्हयवस्कीच्या जीवनाची, झारच्या सत्तेखाली असलेल्या रशियात होऊ पाहणाऱ्या स्थित्यंतराची थोडीशी माहिती होणे आवश्यक आहे.

डोस्टोयव्हस्कीचा जन्म इ.स. १८२१ साली रशियात झाला . तिथेच तो लहानाचा मोठा झाला . रशिया आणि रशियन माणसातूनच, त्यांच्याविषयी त्याने आपली लघुकथा कादंबऱ्या लिहिल्या . तो कादंबरीकार म्हणूनच जास्त ओळखला जातो . पण त्याच्या साहित्याने जागतिक वाङ्गमयावर आपला कायमचा ठसा उमटवला आहे. डोस्टोयव्हस्कीचे वडील गरीबांसाठी असलेल्या एका मोठ्या रुग्णालयात काम करत. रुग्णालयाच्या आवारातच ते कुटुंब रहात असे. ह्या रुग्णालयात अनेक रोग-व्याधींनी, आजारांनी गांजलेले रुग्ण असत. ह्यात विशेष काही नाही . पण तिथेच वेड्यांसाठीही सोय होती. वेडे झालेले रोगीही तिथेच असत.त्यामध्येच एक अनाथालयही होते. आणि हे सर्व कमी म्हणून की काय त्या आवारातच दफनभूमीही होती! अशा ‘आरोग्यपूर्ण’ वातावरणातच आपले आई- वडील, बहिण भावांसह डोस्टोयव्हस्की वाढला. राजपुत्र सिद्धार्थाच्या थेट विरुद्ध परिस्थितीत फेडोर डोस्टोयवस्की वाढला!

वयाच्या नवव्या वर्षी त्याला अपस्माराचा- Epilepsy- त्रास सुरु झाला. पुढे डोस्टोयव्हस्की सायबेरियात हद्दपारीची शिक्षा भोगत होता त्यावेळीही त्याला ह्या आजाराचाही थोडा त्रास भोगावा लागला. अपस्माराच्या अनुभवाचा उपयोग त्यानंतर त्याने आपल्या साहित्यातही केला आहे.

सोळाव्या वर्षी डोस्टोयव्हस्की आपल्या भावाबरोबर लष्कराच्या इंजिनीअरिंग विद्यालयात गेला. तेथून बाहेर पडल्यावर तो काही काळ सैन्यात सेकंड लेफ़्टनंट पदावर होता. ह्यानंतर तो लिहू लागला. पश्चिम युरोपातील क्रांतीचे वैचारिक पडसाद रशियातील बुद्धिवंतांमध्ये पडत होते. अशा नवविचारांच्या लोकांमध्ये डोस्टोयव्हस्कीची उठ बस होऊ लागली आणि त्याच वेळी त्याची Poor Folks ही कादंबरी प्रसिद्ध झाली.

रशियन साहित्य जगात ह्या कादंबरीने खळबळ उडवून दिली . त्या काळचा प्रख्यात समीक्षक बेलीन्स्कीलाही ही कादंबरी आवडली. त्याने अनुकूल अभिप्राय लिहिला. बेलीन्स्कीने चांगले म्हटल्यावर रशियात तो लेखक एकदम नावाजला जाई इतके महत्व बेलीन्स्कीच्या मताला त्यावेळी होते. डोस्टोयव्हस्की प्रकाशझोतात आला तेव्हा तो बेलीन्स्कीच्या जहाल विचारांचा समर्थक होता . १८४९ साली झारच्या राजसत्तेने डोस्टोयव्हस्कीला गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा ठोठावली. त्याला गोळीबाराच्या पथकासमोर उभे करण्यात आले. पण अचानक चक्रे फिरली. डोस्टोय्व्हस्कीला त्याऐवजी चार वर्षे सायबेरियात हद्दपार केले आणि परत आल्यावर चार वर्षे सैन्यात नोकरी करण्याची सक्तीही झाली.

सायबेरियात हकालपट्टी म्हणजे दुसरे मरणच. पण डोस्टोय्व्हस्की त्यातून धडपणे बाहेर आला. सायबेरियातील काळात त्याच्या विचारांत फार बदल झाला. मुळात त्याचा धर्माकडे असलेला कल पुन्हा तिकडे वळला. पूर्वीच्या विचारांचा प्रभाव हळू हळू वाढला.

इतके सगळे घडूनही डोस्टोयव्हस्की हा हाडाचा, प्रतिभावंत लेखकच राहिला. त्याच्या कादंबऱ्या आणि इतर लेखन वाचले की प्रकर्षाने जाणवते ते त्याचे मनुष्य स्वभावाचे , माणसाचे , आजूबाजूच्या परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण . माणसाच्या मनातील गुंतागुंतीच्या विचारांचे त्या त्या व्यक्तिरेखेनुसार विश्लेषण, त्याच्या कादंबरीच्या पात्रांमध्ये, मग ती धार्मिक असो की गुन्हेगारी वृत्तीची, ईश्वरवादी किंवा निरीश्वरवादी, अराजकी किंवा विवेकी त्यांच्या मुळाशी काही आदर्श, श्रद्धा तत्वनिष्ठा, काही ठाम विचार होते. त्याच्या सायबेरियाच्या काळापूर्वीच्या आणि त्या नंतरच्या मतांतराचा एकत्रित प्रतिभाविलास त्याच्या गाजलेल्या कादंबऱ्यात आढळतो. त्याच्या मूळ स्वाभाविक विचारांमुळे, मते बदलली, विचार बदलले तरी तो खरा लेखक असल्यामुळेच Crime and Punishment ,The Idiot , The gambler, The Brothers Karamazov सारख्या चिरकाल कीर्ति मिळवणाऱ्या कादंबऱ्या लिहू शकला.

डोस्टोयव्हस्कीने आणि त्याच्या भावाने Time नावाचे मासिक काढले. त्यात त्याने सायबेरियातील अनुभवावरील कादंबरी प्रकरणाश: प्रसिद्ध केली . हे सरकारने बंद केले. त्यानंतर दोघांनी Epoch मासिक चालू केले . थोड्याच दिवसात डोस्टोय्व्हस्कीचा भाऊ मरण पावला. पैशाचा तुटवडा होताच त्यातच पैशांची आघाडी सांभाळणारा भाऊ गेला. त्याच्या बायको मुलांची जबाबदारी डोस्टोयव्हस्कीवर आली. कसलाही विधिनिषेध नसलेल्या प्रकाशकाच्या कर्जात आणि त्याने बांधून घेतलेल्या कराराच्या तावडीत डोस्तोयव्हस्की सापडला . कर्ज फेडून प्रकाशकाच्या हातून आपल्या पूर्वीच्या आणि भविष्यातीलही लेखनाचे ‘सर्व हक्क स्वाधीन’ Copy Right सोडवून घ्यायचे होते!

सेक्रेटरीला दररोज तोंडी सांगून डोस्टोयव्हस्कीने आपली The Gambler ही कादंबरी लिहून संपवली. प्रकाशकाला देऊन टाकली . ह्या सेक्रेटरीशीच त्याने लग्न केले. पैसा जमवून युरोपात जाण्याचे ठरवले. पैसे जमवण्यासाठी त्याने The Drunkard कादंबरी लिहिली . क्रमश: प्रसिद्ध करण्यासाठी त्याने त्या काळचे तीन हजार रुबल्स मागितले. पण कोणी दिले नाहीत. पण डोस्टोयव्हस्की कसला मागे हटतो? Drunkards मधले मार्मडोव्ह हे मुख्य पात्र थोडाफार बदल करून तो लिहित असलेल्या Crime and Punishment कादंबरीत समाविष्ट केले.

डोस्टोयव्हस्की आपल्या बायकोबरोबर युरोपात आला. ह्या देशातून त्या देशात भ्रमंती करत होता. तिथे त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हतीच . त्यातच त्याला जुगाराचे व्यसन लागले. जुगार खेळण्यात त्याचा वेळ जाऊ लागला. अशा परिस्थितीतही त्याच्या डोक्यात एक महाकादंबरी घोळत होती. १८६८ मध्ये त्या काळात कादंबरीचे नाव Atheism असे ठरविले होते. “एका चाळीस वर्षाच्या सनदी नोकरच देवावरचा विश्वास उडतो. अनेक धर्मोपदेशक , भिक्षु, तरुणांच्या , युरोपियन रशियन कट्टर धर्मनिष्ठांच्या सहवासात तो राहतो . पण त्याचा देवाधर्माचा तिटकारा कायम राहतो . पण पोलिश जेझुइटांच्या सहवासात मात्र त्याच्यात अमुलाग्र बदल होतो. धर्मावरची आणि येशुवरची श्रद्धा आणि रशियावरचे त्याचे प्रेम पुन्हा दृढ होते.” असा आराखडाही तयार होतो.

Atheism हि महा कादंबरी त्याच्या हातून कधीच लिहून झाली नाही. आपण डोस्टोयव्हस्कीच्या संकल्पित कादंबरीला मुकलो . पण ह्या महाकादन्बरीतील काही कल्पना, घटना The Devils मध्ये आढळतात. महाकादंबरी लिहिली गेली नाही पण या कादंबरीचे नाव मात्र वेळोवेळी बदलत गेले. पुन्हा तिचे बारसे होऊन ती आता The Life of A Great Sinner झाली . ही तीन किंवा पाच कादंबरीका अशा स्वरुपात लिहायची तो ठरवतो. पण ह्या नवीन नावाने येणाऱ्या कादंबरीचेही अनेक वेळा बारसे होऊन तिला विष्णुसहस्त्र नामासारखी अनेक नावे मिळाली. उदा. The Forties , A Russian Candidate , A Book of Christ , वगैरे. इतक्या वेळा महाबारशी होऊनही ती कादंबरी लिहिली गेली नाही . पण ह्या संकल्पित कादंबरीकांचा बऱ्याच प्रमाणात The Brothers Karamazov ह्या कादंबरीतील समावेश झाला आहे. म्हणूनच ती इतकी गाजली असावी! ह्यातील संत वृत्तीचा भाऊ Alyosha मठात राहत असतो. डोस्टोयव्हस्की ह्या कादंबरीचाही दुसरा भाग लिहिणार होता . तसे त्याने तिच्या प्रस्तावनेत म्हटलेही आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे दुसरा भागच जास्त महत्वाचा. पण दुर्दैवने हा महत्वाचा दुसरा भागही त्याच्या हातून पूर्ण होऊ शकला नाही!

डोस्टोय्व्हस्की एकदा म्हणाला होता की “दुसऱ्या भागात हा संत-स्वभावाचा Alyosha मठ सोडून जाईल. अराजकवादी बनेल. आणि हाच सत्प्रवृत्त Alyosha झारची हत्या करेल. डोस्टोयव्हस्की २८ जानेवारी १८८१ रोजी वारला. आणि योगायोग म्हणायचा की डोस्टोयव्हस्कीचे भाकित म्हणायचे ! १८८१च्या फेब्रुवारीत झार दुसरा अलेक्स्झांडर याची कुणा
मारेकऱ्याने हत्या केली !

अनेक उत्कृष्ट कादंबऱ्या लिहून दिगंत कीर्ती मिळवलेल्या डोस्टोयव्हस्कीला, थोर विचारवंत लेखक, इतकेच काय तत्वज्ञानीही मानणारे अनेक होते.पण तो श्रेष्ठ कादंबरीकार म्हणूनच जगभराच्या वाचकांत ओळखला जातो. प्रख्यात रशियन लेखक पुश्किन. तत्वज्ञानी, साहित्यिक नित्श्झे आणि जेन पॉल सार्त्र यांच्यावरही डोस्टोय्वहस्कीच मोठा प्रभाव आहे. नोबेल पारितोषिक विजेता अर्नेस्ट हेमिंग्वेही त्याचा मोठा चाहता होता. त्याची स्तुती करणाऱ्यांबरोबर त्याच्यावर टीका करणारेही होते.

डोस्टोयव्हस्की आणि लिओ Tolstoy हे रशियाचे कीर्तिमान लेखक. Tolstoyने डोस्टोयव्हस्कीच्य Crime and Punishment विषयी फार ‘ओह हो! वा!’ असे उद्गार कधी काढले नाहीत. उलट तो एकदा म्हणाला होता, ‘मी त्याची Crime and Punishment वाचायला घेतली पण पहिल्या चार पाच पानातच तिचा शेवट समजला.” पण ते दोघेही एकमेकांना खूप मानत असत. डोस्टोयव्हस्की वारल्याचे जेव्हा टोल्स्टोयला समजले तेव्हा तो रडला!

कै. पुस्तके: आवृत्त्यांची कहाणी

इब्न हशिम इ.स. ८३३ मध्ये बगदाद येथे वारला. तो व्याकरणकार आणि विद्वान होता. त्याच्यापुढे एक मोठे जिकिरीचे काम आले. साठ वर्षांपूर्वी एक थोर विद्वान इब्न इश्क़्ने लिहिलेल्या प्रेषित मुहम्मद पैगंबराचे सिरत रसूल अल्लाह या चरित्राची शुद्ध प्रत तयार करण्याचे ऐतिहासिक महत्वाचे काम त्याला पूर्ण करायचे होते. .

इब्न हशिमनॆ हे काम मनापासून केले. पण दुर्दैवाने, त्याने, इब्न इश्क़्ने लिहिलेल्या ‘सिरत रसूल अल्लाहची” -या चरित्राची- मूळ प्रत मात्र नष्ट करून टाकली !

मुहम्मद पैगंबर हा क्वुरैश जमातीचा . तो व्यवसायाने व्यापारी होता. मुहम्मद एकदा मक्केच्या बाहेर निवांत जागी शांतपणे डोळे मिटून बसला होता. असा ध्यानस्थ बसला असताना देवदूत जिब्राऐल त्याला दिसला. डोळे उघडून पाहतो तेव्हा त्याला सगळीकडे जिब्राऐलच दिसत होता . आकाशापासून जमिनीपर्यंत सर्वत्र एक जिब्राआईलच भरून राहिला होता.

“म्हण, म्हणायला सुरवात कर.” जिब्राऐलने मुहम्मदाला आदेश दिला. पहिल्यांदा चाचरत, अडखळत मुहम्मदाने म्हणायला सुरुवात केली. नंतर मात्र तो नीट, सरळ म्हणत राहिला. आणि तो म्हणतच राहिला. अशा तऱ्हेने मुह्म्मदाने संपूर्ण कुराण रचले!

जेव्हा मुह्म्मदाला सगळीकडे जिथे पाहावे तिथे जिब्राऐल दिसत होता आणि, “म्हण, सुरू कर पठण” हे त्याचे शब्द ऐकू आले आणि हळू हळू पठण करत मुहम्मदाकडून संपूर्ण कुराण रचून झाले त्यावेळी प्रेषित मुहम्मद इतका घाबरला होता की आपण जीव द्यावा असे त्याला वाटत होते; असे इतिहासकार अल ताबरीने नमूद केले आहे.

पुढील वीस वर्षे मुहम्मद पैगंबर कुराणातील सुरा आणि आयता लोकांना सांगत होता. कुराणाची शिकवण देत होता . कुरण सांगताना मुहम्मद पैगंबर निराळ्याच अवस्थेत जात असे. परमेश्वरानेच-अल्लाहनेच- आपल्याकडून कुरण रचून घेतले ही मुह्म्मदाची खात्री अधिकाधिक दृढ होत चालली.

व्यापाराच्या निमित्ताने क्वुरैश /क्वुरायिश (आपल्याकडे कुरेशी/क्वुरेशी आहेत ते हेच क्वुरायीश असावेत) लोकांचा ज्यू आणि ख्रिश्चन लोकांशी संबंध यायचा. त्या लोकांना हे क्वुरैश ‘पुस्तकी’, ‘पुस्तकी धर्माचे’ म्हणत. त्याला कारण टेस्टमेंट आणि बायबल हे ग्रंथ. हे ‘पुस्तकी’ लोक क्वुरैशीना आपल्या धर्माच्या देवानी कसे चमत्कार केले ते वर्णन करून सांगत.

आपल्याकडे का असे चमत्कार नाहीत, आपल्यातले कोणी का चमत्कार करत नाहीत असा प्रश्न क्वुरैशिना पडे. आणि ते मुहम्मद पैगम्बराला तसे विचारतही.
“तुला का चमत्कार करता येत नाहीत?” असे त्याला विचारल्यावर मुहम्मद म्हणे,” आपले कुराण हाच एक मोठा चमत्कार आहे. ह्यापेक्षा दुसरा काय चमत्कार असू शकतो? कुराणाप्रमाणे वागा. मग चमत्कारच चमत्कार होतील. चमत्कारांना महत्व देऊ नका, ” असे तो उत्तर देई.

मुहम्मद पैगम्बारामुळे कुराण हा पवित्र ग्रंथ मुसलमानांना मिळाला. त्यामधूनच त्यांना एकच देव आहे,देव एकच तो म्हणजे अल्लाह,याची खात्री पटली.

क्वुरैश जमातीतील मुहम्मद आणि त्याच्यामुळे मुस्लिम धर्म स्थापन झाला आणि त्याचा विस्तारही झाला. पण त्याचीही एक पूर्वपिठीका आहे. ज्यू आणि ख्रिश्चनांना
आपला देव अब्राहमचा मुलगा आयझाक /इस्साक मार्फतच मिळाला. ऐझाकमुळे ज्यू आणि त्यातून पुढे ख्रिश्चन हे धर्म स्थापन झाले.
पण अब्राहमला आयझाक /इसाक शिवाय एक थोरला मुलगा होता. त्याचे नाव इस्माईल. हा अनौरस पुत्र. इस्माईल आणि त्याची इजिप्शियन आई हगार Hagar ह्या दोघांनाही अब्राहमची राणी सेरा Sara हिने देशाबाहेर घालवून दिले होते. त्यावेळी देवाने त्यांना वर दिला. “आयझाक/इस्साक प्रमाणेच इस्माईलसुद्धा एक मोठा देश वसवेल व त्याचीही प्रजा खूप वाढेल.”

कुराणातही क्वुरायिश जमात ही इब्राहिमी वंशाची जमात असाच उल्लेख आढळतो.
जस जसा मुहम्मद पैगंबराने स्थापन केलेला एकेश्वरी धर्म फोफावू लागला तसे अनेक लोक कुराणातील वचने,अध्यायचे अध्याय तोंडपाठ करू लागले. म्हणू लागले. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यात अनेक पाठभेद होण्याची शक्यता वाढली.

मुहम्मद पैगंबराच्या निर्याणानंतर झालेल्या पहिल्या दोन खलिफांनी–हे दोघेही पैगंबराचे सासरेच-अबू बक्र आणि उमर– सर्वांच्या तोंडी असलेले, अनेक पाठभेद झालेले कुरण एकत्र लिहून काढले. त्यानंतर आलेल्या तिसऱ्या खलीफाने काही पाठभेद वगळून काही शुद्ध करून एक प्रमाणित प्रत तयार केली. पण इथेही जुने पाठभेद कायम असलेले,पहिल्या दोन खलिफांनी एकत्र केलेले कुराण ह्या तिसऱ्या खलिफाने उतत्तेमान याने नष्ट केले!

ह्याच वेळी,प्रेषित मुह्म्मदाविषयी, त्याच्या संबंधीच्या अनेक प्रसंग, आख्यायिका, सगळीकडे प्रचलित हॊत्या. एक थोर विद्वान मुहम्मद इब्न इश्क़ने (इ. स. ७०४-इ.स. ७६७) ह्या सर्व आख्यायिका, घटना यांचे तपशीलवार संशोधन केले. त्यानंतर, मुहम्मद पैगंबराची निरुपणे, वचने आणि त्याच्या जीवनाशी निगडित असलेले प्रसंग घटना या सर्वांची नोंद असलेला संग्रह(इस्नाद) तयार केला.

इब्न इश्क़्च्या इस्नादमधील सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या मुह्म्मदाच्या, कुराणातील मूळ शिकवणीशी विसंगत नाहीत ना हे अभ्यायासाचे काम साथ वर्षानंतर इब्न हश्मीकडे आले होते. शिरत रसूल अल्लाहच्या संपादनाचे हश्मने मनावर घेतले होते . मुस्लिम परंपरेने मान्य क लेल्या वचनांची, प्रसंगांची त्याने भरही घातली. आणि इब्न इश्क़ ह्या विद्वानाने लिहिलेला मुहम्मद पैगंबराचा सिरत रसूल अल्लाह हा चरित्र ग्रंथ प्रमा
णित झाला. पण, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे
त्याने इब्न इश्क़्ने लिहिलेली मूळ प्रत नाहीशी करून टाकली!

सिरत रसूल अल्लाह हे मुहम्मद पैगंबराचे चरित्र. त्याला देवत्वाच्या जवळ नेउन ठेवणारे असले तरी त्यामध्ये त्याचे माणूसपण कायम ठेवले आहे. त्याला देव बनविले नाही. ह्या चरित्रातील पैगंबर आपल्यासारखा हसतो, गप्पा-गोष्टी करतो. रागावतो, चिडतो आणि घाबरतोही. तो आपल्यासारखीच दु:खे सहन करतो. अडचणी सोसतो. आणि संकटांना तोंड देतो. तसाच तो दयाळूही आहे. त्यालाही मुले आवडतात.

एकदा एका माणसाच्या हातून काही अपराध होतो. तो अपराधी गरीब होता. त्याला पैगंबरापुढे आणले. पैगंबराने त्याला,”तू गरीबांना दान दे. दान धर्म कर.” असे सांगितले. तो गरीब अपराधी म्हणाला,” माझ्याजवळ काही नाही तर मी दुसऱ्यांना काय देणार?”
मुहम्मद पैगंबराने त्याला ओंजळ भरून खजूर दिला आणि म्हणाला, “हा घे खजूर. तुझ्यापेक्षा गरीब असलेल्या कुणाला तरी हा दे.’ ह्यावर तो अपराधी म्हणाला,” अल्लाह रहेम करे. सरकार! हुजूर ! माझ्यापेक्षा कुणीही गरीब नाही!”

मुहम्मद पैगंबराला खूप हसू आले. हसता हसताच तो म्हणाला,”प्रायश्चित्त म्हणून तूच हा खजूर खाऊन टाक, जा.”

कै. पुस्तके: महाकाव्याचे महाभारत

अरबांनी पर्शिया जिंकून घेतल्यावर अहमद -अद -दक़िकीने (इ.स. ७३२-७७६) आपले झोराष्ट्रीयन(पारशी धर्माचे ) नाव बदलून अबू मन्सूर मुहम्मद असे मुसलमानी नाव घेतले. तरीही परंपरेने तो झोराष्ट्रीयनच-झरतुष्ट्रीच – राहिला असे मानले जाते.

आनंद आणि सुखासाठी फक्त “डाळिंबी ओठ, बासरीचे मधुर सूर आणि झरतुष्ट्रावरची श्रद्धा” अकेवळ ह्या गोष्टीच आवश्यक आहेत असे अहमद-अद -दक़िक़ी म्हणत असे. चारशे वर्षानंतर झालेल्या उमर खय्यामच्या साधारणत: याच अर्थाची रुबाया सर्वांना माहीत आहे.

अहमद-अद -दक़िक़ी हा बगदादचा राजकवी होता. सर्वोत्कृष्टचा समानार्थी म्हणजे अहमद -अद -दक़िक़ी इतकी त्याची ख्याती होती. त्याची स्तुती करणे म्हणजे “ह्झरला खजूर पाठवण्यासारखे आहे ” असे अनेक विद्वान समीक्षक म्हणतात. ह्या वरून “To bring Coal to New Castle” हा इंग्रजी वाक्प्रचार आपल्याला आठवला. तर नवल नाही.

इतके यश, नावलौकिक मिळूनसुद्धा त्याच्या डोक्यात यशाचे वारे शिरले नव्हते. तो म्हणायचा, “माझे सर्व आयुष्य धीराचे, धीर धरण्यातच गेले. ह्याचे सुंदर रसाळ फळ उपभोगण्यासाठी मला पुढचे आयुष्य मिळावे.” जणू काही “धीर धरी रे धीरापोटी असती मोठी फळे गोमटी ” या काव्य वचनाचे त्याने पालन केले!

त्याच्या गझला आणि चतुष्पदीमुळे तो लोकप्रिय होता. राजाने त्याला महाकाव्य रचण्यास सांगितले. अद्द्कीने ते लिहायला घेतले. हजार एक ओळी लिहूनही झाल्या. पण … इराणचा हा नामवंत कवि महाकवि होण्यापूर्वीच अहमद अद्दकीला त्याच्या तुर्की नोकराने सुऱ्याने भोसकून ठार मारले! वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी हा नामवंत कवि जग सोडून गेला!!

त्याचा समकालीन कवि रुदाकीच्या कूलीला आणि दिमना ह्या काव्याप्रमाणेच अहमद अद्द्कीच्या हजार काव्यपंक्तीसुद्धा काळाच्या उदरात गडप झाल्या असत्या. पण तरुण कवि फिरदौसीमुळे (इ,स. ९४०-१०२०) त्या भावी पिढ्यांना मिळाल्या.

अहमद -अद्दक़िक़ीच्या अपूर्ण महाकाव्यातील हजार काव्यपंक्तीत इराणचे राजे गुस्तास्प (गुश्ताफ) पासून अरजास्प (अरजाफ) पर्यंतच्या राजांच्या गोष्टी आहेत. पण त्यातही त्याने त्याच्या अंतर्यामी असलेल्या झरतुष्ट्राचे कार्य आणि थोरवी गुंफली आहे.

फिरदौसीने अद्द्कीचे हे काव्य घरी आणले त्याच रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात, अद्द्की एका रम्य उद्यानात, हातात मदिरेचा प्याला घेऊन बसला होता. त्याने फिरदौसीला,” इराणच्या इतिहासाचे हे महाकाव्य पुढे लिहायला घे. त्यामध्ये माझ्या (अद्द्कीकीच्या ) काव्यपंक्तींचाही समावेश करायला त्याने परवानगी दिली. त्यामुळे माझे (अद्द्कीचे) नावही राहील” असे म्हणता म्हणता ते स्वप्न संपले.

फिरदौसीने आपले महाकाव्य लिहायला सुरुवात केली. त्या महाकाव्याचे महाभारतही ऐकण्यासारखे आहे.
फिरदौसीला हे महाकाव्य पूर्ण करायला थोडी थोडकी नाहीत तर पुरे पूर पस्तीस वर्षे लागली! तेच हे फिरदौसीचे सर्वज्ञात ‘शाह -ए-नामा ‘ ! पण दु:खाची, वाईट वाटण्यासारखी बाब अशी की अहमद-अद -दक़िक़ीला त्याने फारसा मोठेपणा दिला नाही की त्याच्याविषयी आदरही दाखवला नाही. उलट तो अद्द्क़िक़ीच्य हजार काव्य-पंक्तीतील बारीक सारीक दोषच दाखवत होता. इराणच्या इतिहासाचे त्याने वास्तव दाखवले नाही असे म्हणू लागला. पण जेव्हा त्याची ही शेरेबाजी अजूनही हयात असलेल्या राजपुरुषांच्या दिशेनेही होऊ लागली तेव्हा फिरदौसीला भयंकर परिणामांची जाणीव होऊ लागली!

सुलतान महमद गझनवीने फिरदौसीला आपण प्रत्येक कडव्याला एक सोन्याची मोहर देऊ असे सांगितले होते. पण फिरदौसीचे हे साठ हजार कडव्यांचे महाकाव्य पूर्ण झाले तेव्हा तेव्हा महमद गझनवीला एका कडव्याला एक सोन्याची मोहर कबूल केली ही आपण मोठी चूक केली असे वाटले. अविचाराने उतावळेपणाने निर्णय घेतला असेच त्याला वाटले असणार. त्याने सोन्याच्या नाण्याऐवजी साठ हजार चांदीच्या मोहरा फिरदौसीला दिल्या. फिरदौसी आतून संतापला. निराश होऊन आणि रागारागाने, तो ती नाणी घेऊन निघाला. वाटेत जे त्याला कोणी भेटले त्या पहिल्या दोघांना त्याने त्या चांदीच्या मोहरा देऊन टाकल्या. त्यापैकी एक होता हमामखान्यातला नोकर आणि दुसरा सरबत विकणारा होता !

फिरदौसीचे हे कृत्य समजल्यावर अपमानित झालेला सुलतान गझनवी संतापाने खवळला. फिरदौसीला हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार मारण्याची शिक्षा त्याने ठोठावली!

फिरदौसी घाबरून जो पळाला तो शेजारच्या हेरत राज्यात आला. तिथला राजा शहरीयार बिन शेरविनला त्याने आपले हे काव्य अर्पण केले. पण ते देताना त्यात महमद गझनवी वर टीका टवाळी करणारी शंभर ओळींची कविताही प्रास्तविक म्हणून घातली. शहरीयारने, ती वाचल्यावर, हे म्हणजे आपल्यावर बलाढ्य पर्शियाच्या सुलतानाचा हल्ला ओढवून घेणेच आहे.अशी त्याची खात्री झाली. भीतिही वाटली. त्याने कडव्याला एक हजार दिरहान या हिशोबाने फिरदौसीकडे ती मोठी रक्कम पाठवली. आणि इकडे शेरविनने सुलतान महमद गझनवीची निंदा करणारी फिरदौसीची ती कविता नष्ट करून टाकली.!

इतकी प्रचंड रक्कम फिरदौसीच्या नशिबी नव्हती असेच म्हणावे लागेल. रक्कम घेऊन येणाऱ्या जासूदाला फिरदौसी भेटण्याऐवजी फिरदौसीची अंत्ययात्राच पहावी लागली!

‘शाह-ए-नामा ‘ हे इराणचे महाकाव्य म्हणून गणले जाते. “आमच्या राष्ट्राचा इतिहास आणि आमची भाषा या शाह-ए-नामाने जतन करून ठेवली आहे,” असे प्रख्यात मिर्झा अहमद अली फिरंघीने म्हटले आहे. “शाह -ए-नाम्यामुळे आमचा महाकवी अहमद अद्द्कीचे नावही कायम तेवत ठेवले आहे. अहमद अद्दिकी जिवंत असता तर त्याने फिरदौसीलाही मागे टाकले असते. आज तो आपल्याला फिरदौसीच्या सुबक आणि नक्षीदार कोंदणात शोभून दिसतो आहे.

कैलासवासी पुस्तके

स्टुअर्ट केली लहान असताना एका नातेवाईकाने त्याला Mr. Men या पुस्तकांच्या मालिकेतील एक पुस्तक दिले. ते वाचून झाल्यावर त्याने त्या मालिकेतील सर्व पुस्तके घेऊन वाचली . Mr. Menचा संपूर्ण संच त्याने जमवला . त्या पाठोपाठ Dr. Whoचा संपूर्ण संच त्याने जमवला . आणि थोडा मोठा झाल्यावर अगाथा ख्रिस्तीची सर्व पुस्तके घेऊन त्याने ती वाचली . जमाही केली . ज्याचे एक पुस्तक वाचले त्या प्रत्येक लेखकाची सर्व पुस्तके आपल्याकडे पाहिजेत याचे त्याला जणू वेडच लागले!

स्टुअर्टच्या चौदाव्या वर्षी त्याच्या वडीलांनी त्याला Complete Works of Shakespeare आणि Selections of Wordsworth हे दोन संच आणून दिले. त्यानंतर त्याने पैसे साठवून ग्रीक साहित्याची पुस्तके घेण्यास सुरुवात केली . एकदा तो अरिस्टोफन Aristophanचे नाटक वाचत होता. त्याच्या प्रस्तावनेतील एका वाक्यापाशी तो थांबला . “हे नाटक जेव्हा प्रसिध्द झाले त्यावेळेस त्या काळचा दुसरा प्रख्यात नाटककार अगथोन Agathon हा एकेचाळीस वर्षांचा होता . त्याने लिहिलेली नाटके, लेख व्याख्याने यापैकी आज काहीही अस्तित्वात नाही!”

हे वाचणारा स्टुअर्ट केली केवळ पंधरा वर्षांचा होता ! तेव्हापासून त्याने आपण वाचलेल्या पुस्तकांच्या यादीबरोबरच ‘नष्ट, नाहीशी झालेली पुस्तके ‘ अशीही एक यादी करण्यास सुरुवात केली . दु:खाची गोष्ट अशी की कैलासवासी पुस्तकांची यादीच मोठी होत गेली !

हे ग्रीक वाङ्गमयाच्या बाबतीतच नाही, सर्व भाषेतील साहित्याच्या बाबतीत घडले आहे . शेकस्पिअरपासून ते अलीकडच्या एझरा पाउंड पर्यंत सगळ्यांच्या लिखाणातून काही न काही साहित्यसृष्टीने गमावले आहे .

बरेचसे वांग्मय लेखकाने स्वत:च जाळून टाकले किंवा नष्ट केले . एकोणिसाव्या शतकातील कवी जेरार्ड हॉपकिन्सने आपल्या सुरुवातीच्या सर्व कविता जाळून टाकल्या . कारण ? त्याचे चित्त देवाकडे, अध्यात्मात लागले होते. नामवंत लेखक जेम्स जॉयसने आपले Stephan Heroचे हस्तलिखित आणि Portrait of the Artistचे पहिले लिखाण सरळ जाळून टाकले . रशियन लेखक मिखाईल बाख्तिनला सायबेरियात हद्दपार केले होते . तेथे त्याने प्रख्यात रशियन कादंबरीकार डोस्तोयव्हस्कीवर स्वत: केलेल्या लिखाणाच्या कागदांत तंबाखू भरून त्या सिगारेटी ओढून थंडीची हुडहुडी कमी केली . त्या अगोदर त्याने बायबलची पाने जाळून केलेल्या सिगारेटी ओढून थंडीवर मात केली होती !

सॉक्रेटिस तुरुंगात आपल्या मृत्युची वाट बघत असताना त्याने इसापच्या कथांचे काव्यात रुपांतर केले. पण त्याने त्याही नष्ट केल्या . त्या काव्यातले आपल्यासाठी काहीही राहिले नाही .

Aristotleचा दुसरा खंड नाहीसा झाला . ज्याला आपण पहिला खंड म्हणतो तोही Aristotleच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या टीपणांवर आधारित आहे .

अगदी अलीकडे १९६२ साली घडलेली ही दुर्घटना . जॉन काल्डर हा बडा प्रकाशक . अचानक त्याला आपल्या कार्यालयाची जागा सोडावी लागली . घाईघाईने सामान हलविण्याच्या गडबडीत अनेक लेखकांची हस्तलिखिते सगळी त्या जुन्या इमारतीतच राहिली . आणि त्या मालकाने ती इमारत जमीनदोस्त केली . किती एक हस्तलिखितांचे त्यात दफन झाले त्याची कल्पना करवत नाही .

अनेक साहित्यकृती लेखकांच्या मृत्युमुळे अर्धवटच राहिल्या . त्या कधीही पुऱ्या होऊ शकल्या नाहीत .

सर फिलिप सिडनीने Arcadia एकदा लिहिले पण त्याला ते पूर्ण झाले असे वाटत नव्हते . त्याला अजून त्यात भर घालायची होती . पण Zutphenच्या रणांगणावर गोळी लागून तो मेला . पूर्वीचे गाजलेले लेखक आर . एल. स्टीव्हन्सनचे Weir of Hermiston , विल्यम Thackerayचे Denis Duval आहेत त्या स्वरूपातही उच्च दर्जाचे साहित्य आहे .

काही लेखकांच्या संकल्पित पुस्तकांच्या योजना कधीच पूर्ण झाल्या नाहीत . प्लेटो आणि अरिस्टोटल यांच्या विचारात तत्वज्ञानात साम्य होते असे तत्वज्ञ बोथियसचे म्हणणे होते. पण त्यासंबंधीचा ग्रंथ त्याच्या हातून कधीच लिहून झाला नाही . तो हे कधीच सिद्ध करू शकला नाही .

नाटककार शेरेडन सगळ्यांना सांगत असे, “मी School for Scandalचा पुढचा भाग Affectation लिहिणार आहे .” पण त्याच्या हातूनही ते कधी लिहून झाले नाही .

नोव्हालीसाचा ज्ञानकोश , त्याची अनुक्रमणिका हिच सूचि म्हणूनही वापरता येईल अशी करावी का नको या द्वंद्वातच अडकून त्याचा तो ज्ञानकोश जन्माला आलाच नाही .

पुस्तके उदंड झाली, गवतासारखी वाढली असे काही वेळा वाटते . पण असलेल्या पुस्तकांपेक्षा काळाच्या उदरात गडप झालेली पुस्तकांची संख्या अफाट आहे . असंख्य पुस्तके नष्ट झाली. काही हरवली ती पुन्हा कधी सापडलीच नाहीत . आपल्या इथेही पानशेत सारख्या आणि मुंबईत तिथे नदी आहे हेसुद्धा लोक विसरून गेले होते , त्या मिठी नदीला मोठा पूर आला होता तेव्हा मुंबईतील किती पुस्तके वाहून गेली असतील!

याला एक अपवाद आहे, तो सांगण्यासारखा आहे .

भास हा संस्कृत नाटककार . त्याच्याविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे . त्याच्या काळाची निश्चिती नाही . ख्रिस्त पूर्व २ रे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक असावा असे मानले जाते . पण भास हा कालिदासाचा पूर्वकालीन आहे हे निश्चित .

कालिदासाच्या फार पूर्वीपासून भासाची श्रेष्ठ नाटककार म्हणून ख्याती होती . पण १३व्या -१४व्या शतकानंतर काय झाले ते कोणासही ज्ञात नाही . भासाची नाटकेच नव्हे त्याचे नावही लुप्त झाले . त्याची नाटके , भासाचे नावही कुठे आढळत नाही . भास आपल्या १३ नाटकांसह नाहीसा झाला!

आपले नशीब थोर म्हणून ७०० वर्षांनी १९१२ साली त्रिवेंद्रम येथील जुन्या पोथ्यांच्या संग्रहात विश्वस्तांना — म. म. गणपतीशास्त्री यांना भासाची नाटके सापडली! नाटककार भास हा ‘भास’ न राहाता सत्य ठरला . रसिक मोठे भाग्यवान . आज आपल्याला आवडणारी भासाची ‘स्वप्नवासवदत्त ‘ आणि ‘प्रतिमा’ ही दोन सुंदर नाटके वाचायला मिळतात .

कित्येक पुस्तके आगगाडीत विसरली हरवली चोरीला गेली . कित्येक आगीत जळून खाक झाली . प्राचीन काळातील ग्रंथालये जशी तक्षशीला नालंदा येथील तर अलेक्झांड्रीयाची जेत्यांनी नष्ट केली किंवा काळात नाहीशी झाली . कोणत्याही कारणाने असो, अशी नष्ट झालेली मूळ स्वरूप बदलून नव्या अवतारात आलेल्या , केवळ संकल्पातच राहिलेल्या अशा काही पुस्तकांची त्यांच्या लेखकांसह आपण, शक्य झाल्यास, ओळख करून घेऊ या.

आश्चर्य वाटेल पण त्या लेखकांत रोमन सम्राट ज्युलिअस सिझरही आहे !

कवितेचे दिवस!

ड्ब्लू. आय. मर्विन हे दोन वेळा पुलित्झर पारितोषिक मिळालेले आणि पोएट लॉरिएट असे गौरविलेले कवि आहेत. त्यांचे आज ऍटलॅंटा येथे काव्य वाचन आहे. मेर्विन यांचे सांगणे असते की कविता ही नुसती वाचायची नसते तर ती मोठ्याने म्हणायची, वाचायची असते. रॉबर्ट एबर्ट ह्या चित्रपट समीक्षकाचे एक म्हणणे प्रसिद्ध आहे. तो म्हणतो,”चित्रपट चांगला की वाईट, अप्रतिम की सामान्य हे ठरविताना आपली बुद्धी गोंधळून जाईल, विचार करूनही ते जमणार नाही पण आपल्या मनाला जे एकदम भिडते, वाटते ते आपल्याला खोटे पाडणार नाही.”
मर्व्हिन याना ते तंतोतंत पटते आणि ते म्हणतात,” कवितेच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. कविता ऐकताना मनाला जे वाटते, भिडते ती कवितेला दाद असते. मग तुम्हाला ती किती समजली कवितेत काय आशय आहे, कविला काय म्हणायचे आहे ह्या सर्व नंतरच्या गोष्टी. विचार करता करता हळू हळू कविता समजते.

“माझ्यासारख्याच्या बाबतीत कवितेचेच्या दिवसांचे सरासरी आयुष्य साधारणत: माध्यमिक शाळेपर्यंत. फार झाले तर महाविद्यालयाच्या एक दोन वर्षापर्यंत.पुढे कविता बाजूला पडते. म्हणजे आता मला कविता केव्हा समजणार!

… आता आता पर्यंत आपण सगळे कविता ’म्हणत’ असू. चालीवर म्हणत असू. त्या तशा म्हटल्यामुळे आवडत असत. बा.भ.बोरकरांची तेथे कर माझे जुळती, किंवा यशवंतांची संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी तसेच नारायण सुर्व्यांच्या कविता, सुरेश भटांच्या, विंदा करंदिकरांच्या मुक्तछंदातील कविता मोठ्याने म्हटल्यावर जास्त आवडतात.

कविता समजणे, तिचे आकलन ह्यासंबंधी मला काही सांगता येणे फार कठीण आहे. कविता मोठ्याने म्हणताना ती जास्त आवडते हे निर्विवाद. किंवा आवडलेली कविता म्हणताना जास्त आवडते असे म्हणू या.. त्यासाठी जास्त मागे जायला नको. परत आपल्या शाळेच्या दिवसात गेले की हे न सांगता पटेल. बघा ते दिवस. प्रत्येक इयत्तेतल्या आपण घरी म्हटलेल्या, शाळेत ४०-४५ पोरांबरोबर म्हटलेल्या, पोरांच्या आवाजात बुडून गेलेला तो मास्तरांचा आवाज… इंग्रजी कवितांपाशी थोडे अडखळतोय, पण तीही मोठ्याने म्हणायला लागल्यावर जास्त आवडायची…

मराठी शाळेत, शाळा सुटण्याच्या अगोदर पाढे, कविता म्हणायला वर्गात सुरवात व्हायची. आमच्या वर्गात पाढे म्हणताना सगळ्यांचे आवाज इतके हळू व्हायचे,बराच वेळ आवंढे गिळल्याचाच काय ते आवाज ऐकू येत. पाढे येणाऱ्या पाच-सहा पोरांचा काय तो आवाज. अशांना सगळेजण “लै आखडू हाय बे” असे म्हणत. पण ’पाखरांची शाळा भरे पिंपळावरती’ किंवा’धरू नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे’ ह्या कविता सुरू झाल्या की पोरांना चेव येत असे. आवाज चढत चढत पुढे फक्त कवितेचा आरडा ओरडा व्हायचा! फुलपाखरे कधीच उडून गेलेली असत, पाखरेही आमच्या गोंगाटाला घाबरून घरट्यात लपून बसलेली असत!

घरातही कवितेची आवर्तने चालूच असत. सुरवातीला ’देवा तुझे किती.., ’चंद्र पहा उगवे मनोहर’ अशा कविता. पुढे मग ’रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा..”, त्याही नंतर, ह्या मागे पडून ’तेथे कर माझे जुळती’ माधव ज्युलियन यांची वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हा का पडे’ म्हणण्यात असत. यशवंतांची ’आई’ तर घरोघरी म्हटली जायची. शाळेतल्या धड्यांबाहेरच्या कविताही आम्ही म्हणत असू. पूर्ण जरी नाही तरी एखादे दुसरे कडवे म्हटले जात असे. यशवंतांचीच ’संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी’ वंदन तुज मायभूमी हे अखेरचे’ माधव ज्युलियनांची ’ऐकव तव मधुबोल कोकिळे’ इत्यादी आम्हा सगळ्या भावंडांना येत असत.शाळेच्या पुस्तकातील इंग्रजी कविताही ठेक्यात लयीत म्हटल्या जात. ’मिलर ऑफ द डी’ ’वुई आर सेव्हन’ होम दे ब्रॉट द वॉरियर डेड’ ’चार्ज ऑफ द लाइट ब्रिगेड’ ह्या वर्ड्स्वर्थ. टेनिसन यांच्या कविता किंवा त्यातील दोन चार ओळी ठेक्यात म्हणत असू. पुन्हा एकदा सांगायचे की कविता मोठायाने म्हटल्य़ा तरी समजत असत की नाही हे सांगता येणार नाही. पण त्या सगळ्या कविता आवडायच्या हे मात्र खरे. आजही त्या आवडतात.आम्हाला कविता हीच गाणी होती!

कवितेच्या दिवसांत ’आई म्हणोनी कोणी’ ’राजहंस माझा निजला’किंवा ’ने मजसी ने..’ अशा कविता घरोघरी म्हणल्या जात. तसेच तेव्हाच्या म्हणजे कुंकू. गोपाळकॄष्ण,रामराज्य, रामशास्त्री आणि त्या नंतरच्या काळातीलही ८० सालापर्यंत च्या काळातील– आणि आजच्याही काळातील काही सिनेमातील– ग. दि. माडगूळकर, शांताबाइ शेळके. ना.धों. महानोर यांची सिनेमातील गाणीही खरे तर सुंदर कविताच होत्या. मघाशी वर लिहिलेल्या सिनेमातील गाणीही कवितेसारखीच म्हटली जात. ’रामराज्य’ सिनेमातली गाणी कविवर्य राजा बढे(गर्जा महाराष्ट्र माझा’-यांचेच आहे) यांची होतीअसे आठवते. त्यातील गाणी-कविता-पहा. संस्कॄत प्रचुर जोडाक्षरांनी युक्त पण किती गेय!

“सुजन हो परिसा रामकथा। जानकीजीवन विरहव्यथा। किंवा  “सुवर्णरथ दिव्य तो रविचा सप्त-अश्व गतिमान। युगे युगे गातील राघवा तुझेच मंगल नाम। त्यानंतर चाल बदलून म्हणजे आवाज चढवून- हे पोरांना आवाज चढवायचे फार आवडायचे–सीते सीते विमलचरिते कोमले चारुशीले!

पहा, बरेचसे संस्कॄत आणि जोडाक्षरेही आहेत. पण मराठी दुसरी तिसरीतील माझा धाकटा भाऊ आणि माझ्या सारखी मुले ती म्हणत असत. बरीचशी चालीला धरून! आमची आजी आणि मावश्या तर उत्तम अभिनेत्री होत्या. रामराज्यातली ही गाणी आम्ही दोघे म्हणत असताना त्या मन लावून ऐकत असल्याचा शिवाय चेहऱ्यावर कौतुकाचा भाव एकवटल्याचा उत्तम अभिनय करीत! सहनशीलतेचे दुसरे नाव अभिनय!

या नंतर कुसुमाग्रजांची “गर्जा जय जयकार क्रांतीचा” ही कविता तर घराघरातून गर्जत, दुमदुमत असे. बरं एकेकाचे आवाज म्हणजे एकदम ’अर्जंट! जंक्शन, खडार्डम स्टाप’! इंग्रजांनी ही कविता आमच्या आवाजात ऐकल्यामुळेच ते हिंदुस्थान सोडून गेले!

कवितेचा वावर आमच्या घरी बराच असे.आमची एक बहिण तर इंग्रजी कविताही मराठी कवितांच्या चालीवर म्हणत असे. तिला कविता आवडत असत. एकदा वळवाच्या पावसाची सर येऊन गेल्यावर तिने आईला हाक मारली. आई,”काय गं” म्हणत आली तर ही आईला,”पाऊस खुळा किती पाऊस खुळा’ ओळी म्हणून दाखवायला लागली. आई,’पाऊस खुळा का तू वेडी ’ अशा नजरेने पहात निघून गेली!

बालकवि तर सगळ्यांचेच होते! त्यांची आनंदी आनंद गडे आणि त्याही पेक्षा श्रावणमासी हर्ष मानसी या कवितेमुळे सगळीकडेच आनंदाची हिरवळ दाटत असे.”येई भाई येथ पाही” या कविते बरोबरच “भिंत खचली कलथून खांब गेला” ही कविता थोरला भाऊ म्हणत असे. रागात असला किंवा त्याला कुणी काही बोलले असेल तर तो “भिं-त ख-च-ली म्हणताना खचली हा शब्द रेटा देत देत रेटत म्हणत असे. मग समजायचे की काहीतरी बिनसले आहे. बहिण, लक्ष्मीबाई टिळकांची’मी तुझी मावशी तुला न्यावया आले ही सुंदर कविता म्हणायची. कवितेच्या अखेरीस मावशी आपल्याला माहेरी घेऊन जायला आली आहे. नेणार आहे हे कळल्यावर त्या बाळीला जेव्हढा आनंद व्हायचा तेव्हढाच ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्यालाही होई.

बालकवींच्या श्रावण मासी कवितेनंतर पुढे गेलो तेव्हा ’पाय टाकूनि जळात बसला..’ ही कविताही आवडू लागली. तो पाण्याचा खोल डोह, डोहाच्या काठावरचे उंबराचे मोठे झाड, पुढे सरकत सरकत पाण्यात कधी शिरल्या ते न कळणाऱ्या त्याच्या मोठ्या जाड मुळ्या आणि त्या डोहावर पडलेली औदुंबराची गडद सावली. अशा त्या जळात पाय सोडून बसलेल्या कवितेचे चित्र डोळ्यांसमोर येई. आणि का कसे ते माहित नाही पण किंचित उदास, गंभीर वाटायचे. कविता आवडायचीच पण मर्विनने म्हटल्याप्रमाणे हळू हळू समजेल केव्हातरी. म्हणजे केव्हा ते अजून कळले नाही.

रायगडाला जाग येते मध्ये सगळ्यांना आवडेल असे एक दॄश्य आहे. संभाजी आपला धाकटा भाऊ बाळराजे राजाराम याला पाठीवर घेऊन खेळवत येतो. मराठी स्वराज्याचे दोन राजपुत्र, एखाद्या चार चौघांसारख्या भावंडासारखेच खेळतात ह्यापेक्षा प्रेक्षकांना आनंद देणारे ह्रुद्य द्रुश्य कोणते असेल? असेच एक दॄश्य रामराज्य सिनेमात आहे. दोन लहान , आश्रमवासी बहिण-भाऊ चाललेली, भाऊ बहिणीला थोडे भरभर चाल असे म्हणतोय, म्हणत असतानाच,”उचल पाऊले आश्रम हरिणी जायचे गं दुरी।हरिणी जायचे । ती उंच ऊंच गोपुरे ती भव्य राजमंदिरे । पुरे! पुरे! पुरे जाहल्या आठवणी त्या, जायचे..” हे गाणेही म्हणतोय. सुंदर! काव्य साधे, सुंदर. अशी गाणीही आम्हाला कविताच होत्या.

मघाशी मी शाळेच्या पुस्तकातील इंग्रजी कविताही म्हणत असूअसे म्हणालो. त्यातील “इन्टू द व्हॅली ऑफ डेथ रोड सिक्स हंड्रेड” ही तर आम्हीही जणू घोड्यावर बसून तलवारी परजत समोर दिसेल त्या शत्रुला कापत चाललोय अशा टक डक, टक डक थाटात म्हणत असू.ह्या पेक्षा एकदम निराळीच “होम दे ब्रॉट द वॉर्यर डेड” ही कविता. वाचताना समजली असे वाटायचे. पण नुसता शब्दार्थ. वर्गात म्हणताना मध्येच सरही म्हणायला लागायचे. युद्धात पडलेल्या नवऱ्याचे शव घरात आणल्यावर बराच वेळ ती बाई रडत नसते, बोलत नसते. सुन्न होऊन भकास चेहऱ्याने कुठेतरी पहात बसलेली. हे चिन्ह बरे नाही हे एका अनुभवी पुरुषाच्या की बाइच्या लक्षात येते. मग तिच्या लहान मुलाला तिच्या जवळ आणून देते. त्याला पाहिल्यावर ती बाई क्षणात पुन्हा आई होते. आणि रडायला लागते. कविता म्हणता म्हणता समजली असे वाटायला लागले.

वरील कवितेतल्या अनुभवी माणसाच्या समयसूचकतेतूनच मला भासाच्या ’प्रतिमा नाटकातील एक प्रवेश आठवतो. तोही अशाच समयसूचकतेचे उदाहरण आहे.

राम वनवासात गेल्याच्या दु:खाने हाय खाऊन दशरथ राजा मरण पावला. भरताला बोलावून घेतले. पण राजा दशरथ गेल्याची दु:खदायक बातमी भरताला एकदम सांगायची कशी? मंत्री सुमंत, भरताला राजवाड्यात नेण्यापूर्वी एका स्थळी नेतो. तिथे असलेल्या सुर्यकुळातील इष्वाकू राजाच्या प्रतिमेपासून, राजा दिलीप वगैरे राजांच्या प्रतिमा दाखवत, प्रत्येकाची थोरवी सांगत सांगत सहजगत्या दशराथाचा पराक्रम, वचन पाळण्याची नीति सांगत दशरथाच्या प्रतिमेशी येतो तोच भरत,”काय? माझे तात? माझे वडीलही…?महाराज दशरथही गेले? असे मोठ्या दु:खाने , नंतर व्याकुळतेने, शांत होत होत आपल्या आईला भेटायला त्वरेने जातो असा प्रसंग रंगवला आहे.

आमच्या घरातील कवितेने बहरलेले आमचे दिवस संपत आले होते.एकदा माझी कर्जत दहिवलीची भाच्चे मंडळी लहानपणी सुटीत आली असतात्यांनी, बालकवींप्रमाणेच रंगीत शब्दांनी काढलेले चित्रच अशी बा.भ. बोरकरांची, ” निळ्या खाडीच्या काठाला..” ही कविता म्हणून दाखवली; तेव्हा मोठा आनंद झाला.मला एकदम माझे वडील मोठ्याने वाचून दाखवत असलेली ’डोंगराच्या आड माझ्या जन्मदेचे गाव आहे। तेथ या वेड्या मनाची ही कधीची धाव आहे’ ही प्रा.वर्‍हाड्पांडे यांची कविता आठवली.त्यामुळे आमचे कवितेचे दिवस अजून चालूच आहेत की काय असा भास झाला.

पुढे थोद्याच काळात आम्हा भावंडांच्या मुलांचे कवितेचे सुगीचे दिवस आले. घरात’गवत फुला रे गवत फुला’, उठ मुला, उठ मुला बघ हा..’ ’टप टप पडती अंगावरती..’ ’उठा उठा चिऊताई’, सदैव सैनिका पुढेच जायचे’ आणि ’निळ्या खाडीच्या काठाला’ अशा कविता ऐकू येऊ लागल्या. तेव्हा पुनर्प्रत्ययाचा, कवितांचा पुन्हा आनंदी आनंद दरवळला! मुलांनाही कविता गाणीच होती.

काळ पुढे सरकतच असतो. आता मुलांच्या घरातही त्यांची मुलं, मुली ’वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला’ चंद्र हा सुंदर चांदण्या सुंदर’ अशा कविता म्हणु लागले. दोन्ही नातवांनी ’उठ मुला उठ मुला..’ पासून “फुलपाथरु” ’चांदोबा चांदोबा इथपर्यंत कविता म्हणत, मध्ये थोडे भाष्य करत “कवितेचा दिवस” गाजवला. ’चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या’ होऊन, कवितेच्या पाखरांची शाळा रेड्वूडच्या झाडांवर भरू लागली. आमच्याप्रमाणेच मुलांनाही त्यांची मुले कवितेच्या सुवर्णकाळाची आठवण करून देऊ लागली.

कविवर्य मर्विन यांच्यामुळे आमचा कवितेच्या सुगीचा काळ आठवला. कवितेचे कवडसे पकडण्याच्या खेळात रमलो; आणि ’कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?’ असे मनाशी गुणगुणत बसलो!

रद्दी वाचन… पुढे चालू!

“यांचं रद्दी वाचन अजून चालूच आहे वाटतं!” असे वरील शीर्षक वाचल्यावर बरेच जणांना असा प्रश्न पडल्यास नवल नाही.

“हे कुठल्या दुकानातून किराणा आणतात कुणास ठाऊक?” “आता कुठे वर्तमानपत्राच्या कागदातून किराणावाला पुडे बांधून देतॊ?” ह्या शंका मात्र बरोबर आहेत. आमच्या गावात ह्या रद्दीच्या कागदातूनच सुंदर पुडे बांधून देत. आता ते पुडे गेले. प्लास्टिकच्या पिशव्या आल्या. त्याही सोयीस्कर. सर्वांनाच सोयीस्कर असल्यामुळे अजून टिकून आहेत. तराजूही गेले.वजन-मापांबरोबर तराजूही बदलले. याचा अणि रद्दी वाचनाचा काय संबंध? असा सुज्ञ वाचकांना प्रश्न पडला असेल तर चूक नाही.

मराठीमित्राच्या एका वाचकाने टॉक्सिसिटी, टॉक्सिन यांना मराठी शब्द काय असे विचारले होते. मला महित असलेले शब्द सांगितले पण त्याचे समधान झाले नाही. मग श्याम, नंदू यांच्याशी चर्चा करून– हा शब्द फार मोठा झाला-त्यांना विचारले . दोघांनी ’विषारीपणा’ हा शब्द सांगितला. आणि तोच बरोबरही आहे. मधे बरेच दिवस गेले. माझ्या डोक्यातून तो प्रश्न आणि त्या वाचकाचे मी सांगितलेल्या शब्दांना “हे आम्हाला माहित आहेत,अणि विष म्हटले की साप, विंचू यांचे विष असे समोर येते. पण टॉक्सिसिटी/ टॉक्सिन यांना मराठीत एका शब्दात/किंवा दोन शब्दात तसा अर्थ होईल असे शब्द सांगा” हे काही माझ्या डोक्यातून जात नव्हते.

दोन तीन दिवसांनी, सर्पदंश, विंचू चावल्यावर कोणते आयुर्वेदिक उपचार करावेत यासंबंधी एक लेख वचण्यात आला. लेख नामंकित वैद्यांचा होता. त्यात ओघात ’शरीरातील सप्तधातूंमध्ये असलेली विषाक्तता…’ आणि पुढे ’शरीराने स्वत:च तयार केलेले विष…. याला आयुर्वेदात “आम” असे म्हणतात’ असे उल्लेख आले. ते वाचल्यावर आर्किमिडिजला जेव्हढा आनंद झाला असेल तेव्ह्ढाच आनंद मलाही झाला!

टॉक्सिसिटी आणि टॉक्सिनला मराठीत प्रतिशब्द सापडले! हे शब्द आम्ही त्या वाचकाला ताबडतोब कळविले. माझ्या इतकाच त्यालाही आनंद होईल असे मला वाटत होते. प्रश्न विचारताना आणि नंतर पुन्हा लिहिताना चार चार पाच पाच ओळींची पत्रे लिहिणाऱ्या त्या वाचकाने हे दोन नेमके योग्य शब्द मिळाल्यावर फक्त एका शब्दाचे उत्तर पाठवले. हरकत नाही. उत्तर आले हेही नसे थोडके! मला सांगायला आनंद वाटतो की हे मला माझ्या रद्दी-वाचनातूनच मिळाले! इथे अमेरिकेत कुठले मराठी वर्तमानपत्र? पुण्याहून आणलेल्या इस्त्रीच्या कपड्यात असलेल्या एका वर्तमानपत्राच्या चतकोरात हा मजकूर होता! बोला आता.
रद्दी वाचनीय असते का नाही हा प्रश्न निराळा पण मी आणि माझ्यासारखे बरेचजण ती वाचतात हे मात्र खरे.

रद्दी वाचन

रेडवूड सिटी

गेल्या काही वर्षांपासून आपल्या महाराष्ट्राच्या लोकराज्य मासिकाचे स्वरूप खूपच बदलले आहे. मध्यंतरी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यावर चांगले आणि वाचनीय अंक काढले होते. आताही जून-जुलै२०११ मध्ये फारच सुंदर आणि संग्रही ठेवावा असा वाचनावर, ’वाचन: एक अमृतानुभव’ या नावाचा अंक प्रसिध्द केला.

नामांकित लेखक, समीक्षक, संपादक, कादंबरीकार, कवी यांचे लेख तर आहेतच आणि प्रख्यात प्रकाशक यांचे त्यांच्या काही गाजलेल्या पुस्त्कांविषयीचे लेखही आहेत.त्याशिवाय अनेक नामवंतांनी त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची यादीही दिली आहे. १९८६ साली महाराष्ट्र टाईम्सने  मराठी साहित्यातील लेणी म्हणून सुमारे १५० उत्कृष्ट पुस्तकांची यादी केली होती तीही यात आहे. मराठीच्या अभ्यासकांना, संशोधकांन उपयोगी पडतील अशा शंभर एक  अशा महत्वाच्या ग्रंथांची नावेही आहेत. एकूणच अंक मोलाचा आहे. हा अंकच पुढे संदर्भासाठी वापरला जाईल!

हे सर्व लेख,अनेक मोठ्या लोकांच्या आवडीच्या आणि महाराष्ट्र टाईम्सची ती १५० पुस्तकांची यादी वगैरे वाचताना, आनंद तर वाटत होताच पण यातील बरीच पुस्तके आपण पूर्वीच वाचली आहेत, माहितीची आहेत याचा माझा मलाच आनंद झाला.

बरेच वेळा अनेक मोठी माणसे “मला ह्यांच्यामुळे, “त्यांनी एक पुस्तक वाचायला दिले, “एक पुस्तकाचे दुकान होते”  वगैरे वगैरे आपल्या वाचन संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा, स्फूर्तिस्थाने सांगतात. अनेक शिक्षणतज्ञ, बाल मानसशास्त्रज्ञ म्हणतात घरात मुलांना दिसतील अशा जागी पुस्तके मासिके वगैरे ठेवावीत म्हणजे लहानपणापासून अक्षर ओळख होते. वाचनाची गोडी लागते.हे सगळे अनुभवसिध्द बोल. यांचे मोल मोठेच आहे.

मला(म्हणजे आम्हा भावंडांना) वाचनाची केव्हा आणि कशी गोडी लागली हे सांगता येणार नाही. वाचनातून काय मिळाले, मिळते हे सुध्दा नेमक्या आणि योग्य शब्दांत सांगता येणार नाही. निदान मला तरी. महिन्याचा किराणा, बाजार आणला की पुडे, पुड्या सोडताना, सोडून झाल्यावर, इकडे आई वस्तू डब्यात भरते आहे आणि अण्णा ते वर्तमानपत्राचे एकेक कागद घेऊन वाचत बसलेले.. त्यात टाईम्स सारख्या इंग्रजी वर्तमानपत्राचे कागद असायचे. मराठी वर्तमानपत्रांचेही असत. बातम्या तर शिळ्या झालेल्या मग वाचत काय असत? नंतर पुढे समजले की त्यात लेख काही अग्रलेख, वगैरे फार शिळा न होणारा मजकुरही असतो. आबासाहेबांकडेही हिच तऱ्हा! तेही असेच ती पाने वाचण्यात तल्लीन! घरी रोज एखादे वर्तमानपत्र येत असेच. पण महिन्यातून एकदा होणाऱ्या या वाचन सोह्ळ्याची न्यारीच मजा. पुढे मीही, जोपर्यंत दुकानदार कागदाच्या  पुड्यातून वस्तू देत असत तो पर्यंत, असेच ती रद्दीची पाने, तुकडे घेऊन वाचत असे! शाळा कॉलेजात असताना सिनेमाच्या जाहिराती, परीक्षणे, चुकुन माकून रविवारचे एखादे पान मिळाले तर मग पुस्तक परिक्षण, एखादा लेख असे वाचायला मिळे. पण हे सर्व अर्धवटच असायचे. पुडे बांधणारा टरकन पाहिजे तेवढा कागद फाडणार! तो जर वाचणारा असता तर त्याची नोकरी कधीच गेली असती.

दहावी-अकरावी पर्यंत शाळेची मराठीची पुस्तके वाचणे हासुध्दा एक मोठा आनंद असे. त्या आनंदात आणखी भर म्हणजे माईच्या शाळेत निराळे पुस्तक असायचे.(आचार्य) अत्रे-कानेटकर(कवि गिरीश) यांचे अरूण-वाचन असे त्यांना.आणि आमच्या शाळेत काही वर्षे उदय वाचन आणि मंगल वाचन असायचे. आमचीही पुस्तके चांगली असायची पण अरूण-वाचनला तोड नाही. तीच गोष्ट इंग्रजीच्या पुस्तकांची. सेवासदनला ग्लिनींग्ज फ़्रॉम इंग्लिश लिटरेचरचे भाग बरेच आधीपासून होते. आम्हाला ते नववी का दहावीपासून आले.

घरात कोणत्याही कपाटात पुस्तके असायचीच. त्यांत गुळगुळीत कागदावर छापलेली अगदी जुनी पाठ्यपुस्तके असायची.(बहुतेक नवयुग-वाचनमालेची असावीत) पण सुंदर धडे, कविता त्यात असायच्या. गोष्टीच वाटायच्या इतके मनोरंजक धडे. जुन्या प्रख्यात मासिकांचे सुटे अंक, एकेका वर्षाचे  बांधलेले काही गठ्ठेही पडलेले असत. यशवंत, मासिक मनोरंजन सारखी मासिके म्हणजे उत्तम दर्जाची मासिके कशी असवीत यांचा आदर्श. त्यात वि.स. खांडेकरांच्या गोष्टी, य.गो जोशींच्या कथा, यशवंत, माधव ज्युलियन, यांच्या कविता, आपल्या अणांच्या कथा, कविताही होत्या.मासिक मनोरंजन madhye पहिल्या पानावर कविता चापून येणे हा मोठा सन्मान समाजाला जात असे. आपल्या अण्णांच्या कविता बरेच  वेळा  पहिल्या पानावर छापून आल्या होत्या.  आबासाहेबांकडे रत्नाकर, अभिरुचि यासारख्या दर्जेदार मासिकांचे काही वर्षांचे अंक, त्यातच वाचलेले वसंत शांताराम देसाई यांचे बालगंधर्वांवरचे अप्रतिम लेख वाचल्याचे आठवते.याचेच पुढे पुस्तक झाले. आबासाहेब, किर्लोस्कर, स्त्री हे अंकही नियमित घेत असत काही काळ. तेही वाचत असू आम्ही.

अण्णांच्या कपाटात तर आम्हा सर्वांना आवडणारा रुपेरी खजिनाच होता. पण तो बराच काळ आम्हाला सापडत नव्हता. पण योग्य वेळीच मिळाला असे वाटते आता. त्याकाळी मराठी सिनेमे उत्कृष्ट असत. कथाकारांची कवींची नावं ऐकलीत तरी छाती दडपून जाईल! आचार्य अत्रे, वि.स. खांडेकर, विश्राम बेडेकर,चिं.वि.जोशी, ना.ह. आपटे, राजा बढे, स.अ. शुक्ल,वि.वि. बोकील असे लोक चित्रपट कथा-गाणी लिहित.यापैकी शिवराम वाशिकर हे साहित्यिक लेखक म्हणून फारसे माहित नव्हते पण चित्रपटांमुळे ते लोकांना माहित असावेत. त्यांचे संवाद फार प्रभावी असत.. या बऱ्याच सिनेमांची पुस्तके आमच्याकडे होती. ती वाचणे ही एक मोठी मेजवानीच असे. ब्रम्हचारी, ब्रँडीची बाटली, सिनेमे वाचताना हसून हसून पोट दुखे. पोट दुखायचे नाही तरी चिं.वि. जोशींचा “सरकारी पाहुणे”मधील दामुअण्णा मालवणकरांचे  आणि विष्णुपंत जोग या जोडगोळीचे संवाद वाचताना भरपूर हसायचो.इतरही अनेक उत्तम सिनेमांची पुस्तके होती. यादी फार लांबेल म्हणून थांबतो. दु:खाची गोष्ट म्हणजे नंतर पुढे कधीही ह्यातील एकही पुस्तक सापडले नाही! फार वाईट वाटते. आजही त्या सिनेमांची ती पुस्तके वाचताना तितकाच आनंद आजच्या पिढीलाही झाला असता. दुर्मिळ,अगदी दुर्मिळ पुस्तके आम्ही गमावली.

हॉलमधल्या कपाटात एक अद्भुत पुस्तक होते. हिरव्या कापडी बांधणीचे चांगले जाडजूड होते. त्यात प्रकरणे नव्हती, अध्याय नव्हते, धडे नव्हते,खंड नव्हते तर स्तबक होते! प्रकरणासाठी म्हणा किंवा भागासठी असे नाव पूर्वी कधी वाचले नव्हते. हे नव्हते ते नव्हते असे मी म्हटले खरे, पण ह्या पुस्तकात काय नव्हते असा प्रश्न पडावा असे ते अपूर्व पुस्तक होते. यात सिंदबादच्या सातच काय सातशे सफरी होत्या, अरेबियन नाईट्स हजारो असतील, हॅरी पॉटर ची जादू म्हणजे नुसते पुळक पाणी वाटावे, तर ट्रॅन्स्फॉर्मर्स, अवतार(इंग्रजी), आणि असले इतर सिनेमे म्हणजे या पुस्तकातील गोष्टींची नक्कल वाटावी इतके गुंग करणरे ते पुस्तक होते. त्याचे नाव “कथा-कल्पतरु!” पुराणातील कथाच होत्या. देव-दानवातील भांडणे, वगैरे नेहमीच्या अशा गोष्टी होत्याच पण देवा देवातील भांडणे, ऋषी-मुनीतील स्पर्धा, इतके अवतार, मल्टि-स्टार सिनेमात नसतील इतकी हजारो पात्रे, लढाया, अस्त्र-मंत्र-तंत्र,शाप-उ:शाप, व्रते-उपासना त्यांची फळे-परिणाम,त्याग-भोग सर्व सर्व होते. मी आणि शामने तर देव वाटून घेतले होते. या पुस्तकाने आमच्या सारख्या साध्या मध्यम वर्गाच्या मुलांचे बाळपण दैवी केले! समुद्रमंथनातून चौदाच रत्ने निघाली पण कथा कल्पतरु मध्ये अशी असंख्य रत्ने होती! आता ते पुस्तक कुठे मिळत नाही. पुस्तकाचे बाईंडिंग खिळखिळे झाले होतेच तरीही पुस्तक बरीच वर्षे होते. पण नंतर ते कधी सापडले नाही!

घरीच असणाऱ्या आणखी पुस्तकापैकी दत्तो अप्पाजी तुळजापुरकरांचे माझे रामायण, लक्ष्मीबाई टिळकांचे स्मृती-चित्रे,  कोल्हट्करांचे सुदाम्याचे पोहे, राम गणेश गडकरी यांचे  बाळकराम आणि त्यांची इतर सर्व नाटके. सुदाम्याचे पोहे, बाळकराम  आणि चि. वि. जोशी आणि आचार्य अत्रे यांनी आम्हाला नेहमी हसत ठेवले! गडकऱ्यांच्या नाटकांतील धारदार, पल्लेदर वाक्ये थक्क करून सोडत, मोठ्याने म्हणून पाठ करण्याचा प्रयत्न करत असू.(नंदूने शाळेच्या गदारिंग मध्ये राजसंन्यास मधील संभाजीचे  स्वगत “मुंग्यांनी मेरुपर्वत तर गिळला नाही ना ” म्हणून दाखवले होते) तर त्यांचे विनोदी संवाद हसवून हसवून मुरकंडी वळवत. देवलांच्या शारदेचे संवाद हृदयाला पीळ पाडीत तर त्यांचा फाल्गुनराव आणि भादव्या हसवून सोडीत. तीच गोष्ट आचार्य अत्रे यांच्या नाटकांची. आजही आपल्याला पु.लंची, सखाराम गटणे, अंतू बर्वा, रावसाहेब जसे आठवतात तसेच गडकऱ्यांची सिन्धू, तळीराम, गोकूळ, आचार्य अत्रे यांचा औदुंबर, बगाराम,चि.वि. जोशींचे चिमणराव, गुंड्याभाऊ वगैरे आठवतात. अशी अजरामर नाटके आम्हाला घरी वाचायला केव्हाही मिळत!श्रेष्ठ नट चिंतामणराव कोल्हटकरांचे बहुरूपी हे आत्मचरित्र आणि गोविंदराव टेंबे-प्रख्यात हार्मोनियम   वादक आणि संगीत दिग्दर्शक यांचीही  आत्मचरित्रे  सुंदर, वाचनीय होती.

आबासाहेब शाळेतून आमच्यासाठी ना.धों. तामण्ह्करांचे गोट्या, मुलींसाठी चिंगी अशी पुस्तके आणत. आमच्याकडे वि. वि. बोकीलांच्या दोन उत्तम कादंबऱ्या होत्या. द्वंद्व आणि बेबी. या लेखकाचे नावही आजच्या पिढीला माहित असणे शक्य नाही. गोट्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी बोकीलांचा वसंत होता. हा सुध्दा अनेकांचा दोस्त होता. त्यातच खानोलकरांच्या चंदूची भर पडली. हे सगळे मस्त खेळगडी होते.  शालापत्रक, खेळगडी, देवगिरिकरांचे चित्रमय-जगत ही मासिकेही चांगली असत. आबासाहेबांकडे लोकमान्या टिळकांच्या आठवणी हे अतिशय वाचनीय, आणि मोठे पुस्तक होते. लेखक-संकलक बापट(आद्याक्षरे आठवत नाहीत) असावेत. टिळकांचे निराळे चरित्र वाचण्याची त्यामुळे गरज भासली नाही.

या सगळ्या यादीत ना.सी. फडके, वि.स. खांडेकर कसे नाहीत? हे ही होते. पण आम्हाला हे दोघे लेखक फारसे आवडत नसत. वि.स. खांडेकर तर अण्णांचे मित्र. त्यांची बरीच पुस्तके भेट म्हणून अण्णांना येत.खांडेकरांचे खलिल जिब्रानच्या शैलीने लिहिलेल्या लघुनिबंधासारखे लेखांचे पुस्तक मात्र छान होते. त्यांच्या आणि फडक्यांच्या दोन तीन कादंबऱ्या चांगल्या होत्या. पण खांडेकरांनी लिहिलेल्या काही सिनेमांच्या कथा आणि संवाद गाणी वगैरे  फार सुंदर होती.

कवितांचे काय? त्याही होत्या पुष्कळ. केशवसुत, माधव ज्युलियन-“मराठी असे आमुची मायबोली” यांचीच कविता-, यशवंत, गिरीश, तर होतेच पण त्या वेळचे बरेच आधुनिक कविही होते.कुसुमाग्रज, वि.म. कुलकर्णी, संत, कवि अनिल, बा.भ. बोरकर, आणखीहि काही होते. शाळेच्या पुस्तकातील कविता आणि इतर दुसऱ्या कविताही, अगदी इंग्रजी सुध्दा,-माई तर त्या मराठी कवितेच्या चालीवर म्हणत असे -, आम्ही म्हणतही असू.

इंग्रजी पुस्तकांचीही गर्दी  होतीच. आमच्या घरी आणि आबासाहेबांकडेही. आणि त्या पुस्तकंमुळे आम्हाला ऑक्स्फर्ड प्रेस, हार्पर-कोलिन्स, पेन्ग्विन,मॅक्मिलन अशा प्रकाशकांची नावेही माहित झाली. विल ड्युरांट,स्पेन्सर वगैरे तत्वज्ञांशी ओळख नव्हती, पण सॉमरसेट मोघॅम-चुकलो, मॉम, थोडा शेक्स्पिअर-म्हणजे त्याच्या नाट्कांच्या गॊष्टींची पुस्तके-,sheridan ची i नाटके, शॉ, पी.जी. वूडहाऊस. बॉस्वेल(डॉ. जॉन्सनचे चरित्र), ग्राहम ग्रीन, रॅटिगनचे विन्स्लो बॉय नाटक-अण्णांनी हे वाचा म्हणून सांगितलेल्या काही पुस्तकांपैकी एक-, मॉडर्न इंग्लिश प्रोज, एसेज, अशी आणखी बरीच पुस्तके आमच्या वाचनात असत. येशू खिस्तासंबंधी  असलेले एक पुस्तक अण्णा नेहमी उल्लेख करीत, ते म्हणजे इमिटेशन ऑफ ख्राइस्ट! पण ते वाचले नाही. पण आता ते वाचायचे ठरवले आहे. पण एका पुस्तकाविषयी मात्र सांगितलेच पाहिजे. ते म्हणजे “हिडन इयर्स ऑफ ख्राइस्ट”! इंग्रजी नाही, त्याचे मराठीतले भाषांतर, “प्रभूचे अपरिचित चरित्र!” फार छान पुस्तक आहे. जुन्या ख्रिस्ती मराठी पुस्तकासारखी कृत्रिम, बोजड मराठी भाषा यात अजिबात दिसणार नाही. सगळ्यांनी वाचावे असे हे पुस्तक आहे.  स्थानिक अमेरिकन मराठी मिशनने हे काम केले.त्यांच्या पध्दतीप्रमाणे त्यांनी लेखकाचे नाव छापले नाही. हे पुस्तकही आमच्याकडे आज नाही!

कॉलेजमधे गेल्यावर तर पु.ल., गो.नी. दांडेकर, ग.दि. आणि व्यंकटेश माडगुळकर, चि.त्र्यं.खानोलकर, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु.भा.भावे,वगैरे मान्यवर वाचनात आले होते. आचार्य अत्रे अजुनही जोरात होतेच….हे कधी संपणार असे तुम्हाला वाटण्या अगोदर थांबले पाहिजे. किती पुस्तके, त्यांच्या किती गोष्टी! त्या संपणार नाहीत.आम्ही सर्वजण केव्हा वाचू लागलो, काय काय वाचले,त्यावर किती गप्पा झाल्या, काय काय आणि किती सांगणार! तरी हे सर्व माझ्या कॉलेजच्या सुरवातीच्या दिवसापर्यंतचेच आहे! आणि काही याद्या, गोष्टी थोडक्यात आटोपल्या आहेत. ( अरे बाप रे! हे थोडक्यात? सविस्तर काय असेल!)

अण्णांनी पुस्तके वाचा असे कधीही सांगितले नाही. पुढे नंतर नंतर,”हे वाचा” असे सांगत पण त्याही पेक्षा त्यांनी किंवा आमच्यापैकी कोणी काही नवीन वाचले त्यावर कधी गप्पा व्हायच्या, त्यातूनच पुन्हा नवी नवी पुस्तके वाचली जायची. पुस्तके पुस्तकेच होती. त्यांचे ग्रंथ झाले नव्हते. वाचन म्हणजे वाचणेच होते. त्याची संस्कृती झाली नव्हती. वाचण्याचा आनंद होता.अमृतानुभव झाला नव्हता, असे ते दिवस होते. आम्हा सगळ्यांचे ते पुस्तकांचे दिवस होते. आमचे घरच पुस्तकांचे होते!

आज ते दिवसही नाहीत, ती पुस्तकेही नाहीत आणि आमचे ते घरही नाही!

दोन घडीचा डाव

गेली दोन तीन वर्षे व्टेंटी-२० क्रिकेटचा जल्लोष चालू आहे. क्रिकेट शौकीनांना रोज मेजवानी. थोड्या वेळात भरपूर मजा आणि करमणूकही! सिनेमा नाटकाला जाऊन यावे तसे लोक जातात. पूर्वी जसे सिनेमाच्या थेटरात हिरो घोड्यावरून/फटफटी/मोटारीतून भरधाव वेगाने हिरॉइनला सोडवायला निघाला की प्रेक्षक टाळ्या शिट्ट्या वाजवून थेटर डोक्यावर घेत; तसे आता सेहवाग, ख्रिस गेल, वॉर्नर, रायडू चौकारामागून चौकार,सिक्सर वर सिक्सर ठोकू लागले की सगळे स्टेडियम डोक्यावर घेतात.आणि त्यांचे एखादे दैवत पटकन बाद झाले की एकदम सगळीकडे सुतकी कळा पसरते.

क्रिकेटच्या ह्या नवीन प्रकारने एक टाईमपास मजा आणली आहे. तीन तासाच्या ह्या झटपट क्रिकेटची मोठ्या बेभरवशाची, क्षणभराच्या धुंदीची आणि बेहोष जल्लोषाची जादू संपली की खरे क्रिकेटभक्त सोडले तर तो सामना कुणाच्या फारसा लक्षात राहात असेल का याची शंकाच आहे. ह्या प्रकारात होत्याचे नव्हते कधी होईल याचा नेम नाही. ठोकाठोकी करून धावा काढणारा दुस्रऱ्याच चेंडूवर बाद! ज्याचे कधी नावही ऐकले नव्हते तो चांगल्या चांगल्या गोलंदाजाना पिटून काढतो तर तसाच एखादा नवखा, नाव नसलेला गोलंदाज क्रिकेटच्या महारथीची दांडी उडवतो. एखादा चिपळी मध्येच केव्हा तरी आपली बॅट वाजवतो, तर कोण श्रीवास्तव भराभर बळी घेतो! भरवशाचा म्हणून फलंदाजीला पाठवलेला युसुफ़ फुस्स होतो, तर क्रिकेटमधले देव-दैवते निष्प्रभ होऊन तंबूत परततात.आणि आता हा काय खेळणार असे लोक म्हणत असताना तोच संघाला वाचवतो. राजाचा रंक आणि रंकाचा राव कोण कधी होईल याचा नेम नाही.

नेम नाही वरून लक्षात आले. कुठला टोला कुठे जाईल ह्याचाही नेम क्रिकेटच्या ह्या प्रकारात नाही. आम्ही लहानपणी ज्याला अंधापत्ता म्हणून हिणवत असू तोच टोला आता सामना जिंकूनही देतो! लगेच लोक त्याला आणि स्टेडियमला डोक्यावर घेतात. बरेच वेळा बॅट इकडे फिरते तर चेंडू तिकडे जातो आणी क्षेत्ररक्षक थोडावेळ गोंधळून गोल फिरतो. पण संघाला धाव मिळते. प्रत्येक धाव आणि क्षण मोलाचा आहे. एका रात्रीत श्रीमंत व्हावे आणि सकाळी दिवाळे निघावे तसे सुरवातीची चार-पाच षटके भरभराटीची तर पुढच्या दोन-चार षटकात संघाचा खुर्दा उडालेला! म्हणूनच हा खेळ रोमांचक आणि रोमहर्षक झाला असावा.

पण व्टेंटी-व्टेंटीने बऱ्याच नव्या गोष्टी घडवून आणल्या हे मात्र खरे.ज्या खेळाडूना रणजी ट्रॉफीनंतर मोठ्या सामन्यात खेळायला मिळाले नसते त्यांना जगातील आणि आपल्या देशातील नामांकित खेळाडूंबरोबर खेळायला मिळते आणि आपली गुणवत्ता सिद्ध करता येते, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.पण खेळाबरोबर आणखीही गोष्टी आल्यामुळे पैशाची उलाढाल वाढली.आमच्या गावात सामन्यांच्या वेळी हौशी प्रेक्षक आपणच एखाद-दुसरे वाद्य वाजवत.काहीजण फटाके उडवत. आता फटाके, शोभेची दारू यांची आतषबाजी होते. आणि आयोजकच बॅंडवाले आणतात, गाणी लावणारे आण्तात. एकंदरीत मौज-मजा वाढलीय.क्रिकेटचा आणि पैशाचाही खेळ झालाय.

अलिकडे हा वीस-वीस षटकांचा खेळ सुरू झाल्यापासून आणि त्याही थोडे अगोदर उलटा शॉट-रिव्हर्स स्वीप- मारणे सुरू झाले. जावेद मियांदादने हा प्रकार सुरू केला असे हल्लीचे क्रिकेटप्रेमी,जाणकारही म्हणतात.पण आमच्या संभा पवारने हा शॉट सुरू केला. आम्ही सगळेजण त्यावेळी,”अबे संभा पवार डोक्यावरून, कधी तर विकेटकीपरच्या डोक्यावरून बॉंड्री मारतय रे. “फावड्यासारखी बॅट फिरवुन बॅटीच्या तळहातावरून शॉट. येकदम बॉंड्री बे!”

आता प्रत्येक संघात परदेशाचे दोन-तीन खेळाडू तरी असतात. ही प्रथा अलिकडचीच असे सगळ्यांना वाटते. तसे वाटणे साहजिक आहे. पण आमच्या गावात क्रिकेटचे मोठे जोरदार सामने होत. एके वर्षी क्रिकेटप्रेमी हाजी हाजरतखान यांनी एसवायसी साठी लाहोर, पंजाबचे नामांकित खेळाडू आणले होते. त्यापैकी अमीर इलाही तर हिंदुस्थानकडून टेस्ट खेळत असत. ते तसेच महम्मद गझाली हा प्रख्यात गोलंदाज त्यांनी आणला होता. तर नरसिंगगिरजी संघाने हिंदुस्थानकडून काही टॆस्ट खेळलेल्या चंदू गडकरी हा उत्तम फलंदाज आणि क्रिकेट महर्षी देवधरांचा मुलगा शरद देवधर यांना आणले होते. हे सगळे खेळाडू मोठे रुबाबदार होते. गझाली तर लाल गोरा, उंचापुरा. शरद देवधर तितका उंच नव्हता पण लालबुंद होता इतके आठवतेय. पण तो काही क्रिकेटर म्हणून कधीच फारसा माहित नव्हता.देवधरांचा मुलगा म्हणून आणले असावे. प्रेक्षकांची गर्दीही भरपूर. ढोल, बिगुल जोरात वाजायचे. टाळ्य़ा, आरडा ओरडा असायचाच. पण चीअर-लीडर्स नव्हत्या! तरीही गर्दी असायची!

काही वाहिन्यांनी आयपीएलच्या ह्या सामन्यांना महासंग्राम म्हटलय. संग्रामच नाही तर महासंग्राम कुठला.फार तर छोटीशी चकमक म्हणता येईल.

दोन घडीचा डाव हेच खरं. पहा आणि विसरा!