Category Archives: Stories

एकातून एक … ह्यातून ते … त्यातून हे …

बेलमॉंट

८ मार्च २०२३ – महिला दिन

गोपू लहान होता. त्याच्या आजोबांनी त्याच्यासाठी एक उबदार पांघरूण शिवून दिले. रंगीत कापडांचे दोन तीन थर लावून ते पांघरूण शिवले होते. ते गुडीगुप्प पांघरुण गोपुला इतके आवडायचे की झोपताना, जागा झाल्यावर , दूध पिताना ते सतत घेऊन असायचा.

गोपू थोडा मोठा झाला तरी ‘आजोबाच्या पांघरुणा’ शिवाय तो झोपत नसे. बरे , उठता बसताही ते त्याच्या बरोबर असायचेच.

इतके दिवस होऊन गेल्यावर ते पांघरुण फाटायला लागले. वरच्या कापडाचा रंग विटू लागला. आई म्हणाली, “ गोपाळा, अरे ते पांघरूण टाकून दे आता.” “ टाकायचे का? मी नाही टाकणार.हे आजोबाला दे. ते करतील पुन्हा चांगले.”

गोपुच्या आईने आजोबांना ते पांघरुण दिले. “ बघा काय करायचे ते “, असे सांगून घरी आली. आजोबांनी पांघरुण चारी बाजूंनी पाहिले. “ हंऽऽ, हॅां, अस्सं तर “ असे पुटपुटत ते पुढे म्हणाले की , “ अरे पुष्कळ आहे की हे करायला …. .” असे म्हणत त्यांनी कात्री घेतली .

आजोबांची कात्री कच कच करीत कापड कापू लागली. त्यांच्या मशिनची सुई खाली- वर-खाली जोरात चालू लागली. दुसरे दिवशी आजोबा गोपुच्या घरी आले. त्यांनी गोपुला ,” हा घालून बघ “ म्हटल्या बरोबर गोपु टणकन उडी मारत पळत आला. तो लांब कोट अंगात घालून आई पुढे उभा राहिला. “ बघ आजोबांनी पांघरुणातून कोट केला की नाही? “ इतके म्हणून कोट घालून तो बाहेर पळाला. सर्वांना दाखवत फिरत राहिला. जो तो विचारी,” काय गोप्या नविन कोट शिवला का?” “ हो माझ्या आजोबांनी शिवलाय. मस्त आहे ना?” उत्तराची वाट न पाहता गोपू पुढे सटकला देखील.

आता गोपूला त्या कोटाशिवाय काहीच सुचत नव्हते. दिवस रात्र, घरात आणि बाहेर, गोपु कोटाशिवाय दिसत नसे. शेजारची, जवळची गोपुची दोस्त कंपनी त्याला म्हणे , अरे गोपु मला घालून पाहू दे ना कोट. दे ना! एकदाच.” मग गोपु बबन्याला, मग बाज्याला, नंतर गज्याला, असं करीत सर्वांना आपला कोट घालायला देत असे.

कोटाचेही दिवस भरले असावेत. गोपुची आई म्हणाली, “ अरे गोपाळा, त्या कोटाची रया गेली की रे! टाकून दे तो आता.” लगेच गोपु म्हणाला, “ टाकायचा कशाला? आजोबा आहेत की. त्यातून ते- हे काहीतरी करून देतील मला.”

आई गोपुचा कोट घेऊन आजोबांकडे आली. त्यांच्या समोर कोट टाकीत म्हणाली, “ गोपुचा कोट. तुम्ही, गोपु आणि कोट! काय करायचे ते करा.” आजोबांनी कोट खाली वर, मागे पुढे फिरवून पाहिला. “ हंऽऽ , हॅां ऽ हॅूं ऽऽ अस्संऽऽऽ तर “ असे पुटपुटत, “ पुष्कळ आहे की ….हे करायला….” म्हणत

म्हणत त्यांनी कात्री घेतली. कात्री कच कच करीत गोल, तिरपी, आडवी,उभी होत कोट कापायला लागली. आजोबांच्या मशिनची सुई खाली-वर-खाली वेगाने जाऊ लागली. आणि आजोबांनी आपण शिवलेल्या कपड्याकडे पाहात त्याची घडी घालून गोपुकडे आले.

“ आजोबा, आजोबा काय आणले माझ्यासाठी” म्हणत गोपु धावत त्यांच्याजवळ गेला. आजोबांनी अर्ध्या बाह्या असलेले सुंदर जाकीट गोपुच्या अंगात घातले. गोपुराजे एकदम खूष होऊन आईला म्हणाले, “ बघ आई, कोट टाकून दे म्हणत होतीस ना? बघ कोटातून आजोबांनी काय काढले ते ! “

गोपु आता जाकीटमय झाला. बरेच दिवस सगळे त्याला जाकीटगोपुच म्हणत. बाज्या- गज्या, बबन्या- गहिनी , अरुण- मधुला , सगळ्या दोस्तांनाही थोडा वेळ का होईना जाकीट घातल्याचा आनंद लुटता आला.

दिवस गेले. जाकीट मळकट कळकट दिसू लागलेच पण फाटायलाही लागले. आईचे पुन्हा ते “टाकून दे रे बाबा आता ते जाकीट!” आणि गोपुचे, “ आजोबा करतील काही तरी ह्यातून” हे रोजचे पाढे म्हणून झाले.

पांघरूण कापडांच्या थरांनी बनविले होते तरी त्यातली बरीचशी कापडे विरून गेली होती. आजोबांनी जाकीटाला सगळ्या दिशांनी फिरवले. शिंप्याच्या पाटावर पसरून ठेवले. “ हंऽऽ , हॅांऽऽऽ , हॅूंऽऽ अस्संऽऽ तर “ असे पुटपुटत पुष्कळ झाले की इतके” म्हणत आजोबांची कात्री कच कच करीत कापड कापत गेली. त्यांच्या मशिनची सुई खाली-वर -खाली जोरात जाऊ लागली. थोड्या वेळाने तयार झालेली….

आजोबा गोपुला हाका मारीतच घरात शिरले. गोपुही ‘आजोबा आले’ म्हणत एकेक पायरी सोडून उड्या मारीत खाली आला. आजोबांनी, सुंदर कारागिरी केलेली झोकदार टोपी, गोपुच्या डोक्यावर चढवली. हातानी चाचपून ठाकठीक केली. गोपु हर्षभरीत होऊन आईकडे ओरडतच गेला, “आई बघ आजोबांनी जाकीटातून, जादूने टोपी केली माझ्यासाठी. बघ बघ ,” असे म्हणताना तो आपली मान, डोके रुबाबात इकडे तिकडे फिरवत होता. घरातून धूम ठोकत गोपू बाहेर पडला. रस्यावरचे, बाजूचे, घरातले सर्व गोपुकडे कौतुकाने पाहात राहिले. टोपी होतीच तशी देखणी.

पक्या-मक्या, बबन्या-गहिन्या, अरुण-मधु , बाज्या-गज्या सर्वांच्या डोक्यांवर गोपुची टोपी दिमाखात मिरवत राहीली.

टोपीच ती. तीही बरेच दिवसांनी भुरकट धुरकट झाली. तिची एक घडी फाटली, दुसरी उसवली गेली. आईचा ,” अरे आता तरी फेकून दे ना ती टोपी. तिचे चिरगुट झालंय की रे!” हा मंत्र सुरु झाला. त्यावर गोपुचा, “ आजोबा ह्या टोपीतून दुसरे काही एक करतील” हा खात्रीचा पाढा न चुकता गोपुने म्हटला.

आजोबांनी टोपी पाहिली. सुस्कारा टाकला. पण हंऽऽ, हॅांऽऽ हॅूऽऽ , अस्सं तऽऽर “, पुटपुटणे सुरु झाले. कात्री फिरू लागली. सुई खाली-वर-खाली झाली. आजोबांनी झालेली वस्तु समोर घरून पाहिली.

आजोबा गोपुच्या घरी आले. “गोऽपु ! अशी हाक दिली. हाकेसरशी गोपु आला. आजोबांनी मोठा हातरुमाल समोर धरला. गोपुने तो पटकन ,” हात रुमाऽऽल!” म्हणत घेतला. दोस्तांना दाखवायला पळत गेला. झेंड्यासारखा फडकावत चालला. प्रत्येक खेळगड्यांनीही तो वाऱ्यावर फडकवत नाचवला. गोपूने काळजीपूर्वक घडी घालून सदऱ्याच्या वरच्या खिशात ‘फॅशन ’ करीत ठेवला. आता रुमाल गोपुला सोडेना की गोपु रुमालाला. गोपूने हातरुमालाचे पॅरशूट केले. हवेत फुगून ते डोलत डोलत खाली येऊ लागले की सर्व पोरे टाळ्या वाजवायचे. गावातल्या नदीवर खेळायला गेले की वाळूतले रंगीत दगड तर कधी चिंचा, चिंचेचा चिगुर तर कधी बोरं रुमालात येऊ लागली. पण हातरुमाल तो हात रुमालच की!

बरेच दिवस होऊन गेले. आईचे ,” अरे माझ्या ल्येका गोपाळा! अरे तो रुमाल आहे का चिंघी? होय रे? टाकून दे तो बाबा!” हे नेहमीचे म्हणून झाले. त्यावर गोपूचे ठरलेले उत्तरही देऊन झाले. रुमाल घेऊन स्वतः गोपुच आजोबांकडे गेला.

आजोबांनी रुमालाकडे पाहिले. “ हंऽऽ, हॅांऽऽ हॅूऽऽ, अस्स्ंऽऽ तर ” पुटपुटणे झाले. आजोबा उठले. कपडा बेतताना, कापताना उरलेले रंगी बेरंगी कपड्यांच्या तुकड्यांनी भरलेली पिशवी काढली. गोपू हे सर्व टक लावून पाहात होता. आजोबांनी तुकडे एकत्र गोळा करून रुमालासहित एका रंगीत तुकड्याने झाकला. सुईने त्या गोळ्यावर भराभर टाके घातले . थोड्या वेळाने चेंडू तयार झाला. गोपुला तो देत ते म्हणाले, “ हा घे चेंडू! खेळ आता भरपूर!”

छाती पुढे काढून ऐटीत, आजोबांनी दिलेला चेंडू आईला दाखवित गोपु म्हणाला, “बघ बघ आई! हातरुमालातून आजोबांनी हा गोल गुबगुबीत चेंडू करून दिला! बघ! “

गज्या- बाज्या, अरुण -मधु, बबन्या-गहिनी, पक्या-मक्या रोज चेंडू खेळू लागले. दिवस जात होते. एके दिवशी खेळता खेळता चेंडू जवळच्या नदीत पडला. वाहात गेला. कुणाला तो काढता आला नाही.

हिरमुसली होऊन गोपू आणि त्याची दोस्त कंपनी घरी गेली. आजोबाही म्हणाले , “गोपाळा, आता काही करता येणे शक्य नाही रे ! ” गोपुला काही सुचेना. पण शाळा, अभ्यास, घर खेळ ह्यात तो कसे तरी मन रमवू लागला.

दिवस पुढे सरकत होते.चेंडू हरवला होताच. काही दिवसांनी गोपुचे आजोबाही गेले.

गोपू आता हायस्कुलात होता. एके दिवशी त्या विषयाचे सर आले नव्हते. दुसरे सर आले. त्यांनी मुलांना “तुम्हाला आठवती आणि आवडती ती गोष्ट “ लिहायला सांगितली.

वही उघडली, गोपू लिहित गेला, “ हंऽऽ , हॅूऽऽ, अस्सं तर … पुषकळ आहे की हे करायला…. “. एकामागून एक , एकातून एक .. लिहित गेला, लिहित गेला ….

… आणि हीच सुंदर गोष्ट त्याने आपल्यासाठी लिहिली की हो!

{ एका ज्यू लोककथेचा संदर्भ. मी मराठीत रुपांतरीत केली. )

रिकामा पाट

चक्रदेव मंगल कार्यालय आम्ही चालवायला घेतले. तेव्हा पासून पंगतीत इतर ताटांसारखेच तेही ताट वाढले जायचे. पंगतीत सगळे लोक जेवायला बसले तरी तो पाट रिकामा ठेवावा लागे. असे का करायचे आम्हाला माहित नव्हते. चक्रदेवांनी सांगितल्यामुळे तो एक पाट रिकामा ठेवत असू. थोडा वेळ वाट पाहून मगच वाढपी तूप वाढायला घेत.

काही महिने पंगतीत तो पाट रिकामाच राहिला होता. नेहमीप्रमाणे आजही पंगत बसली होती. एकाने मला रिकाम्या पाटाविषयी विचारले. “ कार्यालयाच्या मालकांनी ह्या कार्यालयातली ही पद्धत आहे व ती आम्हीही पाळावी असे सांगितल्यावरून आम्ही तो पाट रिकामा ठेवतो. पंगतीच्या एका टोकाला उभी राहून मी हे सांगत होते. ते ऐकून जवळच बसलेल्या एका विशीतल्या मुलाने मला त्या मागची हकीकत सांगितली…..

… तो सांगू लागला,” ही पद्धत आम्हीच सुरू केली. तुमच्या आधी आम्ही हे कार्यालय चालवत होतो. एकदा सर्व लोक जेवायला बसले असता, एक गृहस्थ आला व वडिलांना विचारू लागला ह्या पंगतीत जेवायला बसू का?” वडील म्हणाले, “तुम्ही जेवायला जरूर बसा. पण आता पंगत सुरु झालीय्. एकही पाट रिकामा नाही. नंतर आमच्या घरच्यांबरोबर व इथे काम करतात त्यांची पंगत असते. तुम्ही आमच्या बरोबर बसा.” तो माणूस थोड्या अजिजीने म्हणाला,” अहो अशा पंगतीत बसून जेवायची माझी खूप इच्छा आहे. बघा कुठे कोपऱ्यात पाट मांडता आला तर.” वडिलांनी सगळीकडे पाहिले पण जागा दिसेना. वडील आमच्या घरच्यांच्या बरोबर बसा असे त्याला पुन्हा सांगू लागले. पण तो माणूस काही न बोलता निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा कधी आला नाही. दिसला नाही. आम्हाला एक दीड वर्षांनी हे कार्यालय ….”

त्या मुलाचे बोलणे अर्धवट सोडून मी प्रवेदाराकडे पाहू लागले. नेहमीप्रमाणे वाट पाहून आजची पंगत सुरु झाली. थोड्याच वेळात एक पंचवीस- तिशीतला माणूस ह्यांना काही विचारु लागला. माझ्या मिस्टरांनी बोट दाखवून त्याला त्या रिकाम्या पाटावर बसायला सांगितले.

मला काय वाटले कुणास ठाऊक मी भाजी आमटी कोशिंबिरीचे पंचपात्र घेऊन पंगतीत आले. आज स्वत: आपल्या मालकीणबाई वाढताहेत पाहून आमचे वाढपी बुचकळ्यात पडले. त्यांना, मीच ह्यांना वाढणार आहे हे हळूच सांगितले. मी त्याला सगळे पदार्थ वाढायला सुरू केली. वाढताना माझ्या न कळत उत्स्फूर्ततेने मी त्याला वाढू लागले. “ सावकाश होऊ द्या. कसलीही घाई नाही.” “ कोशिंबीर कशी झालीय्?” “ ही भाजी आवडत नाही वाटते, मग ही बघा म्हणत दुसरी भाजी वाढे. जिलब्या प्रत्येक वेळी , “ अहो घ्या, संकोच करू नका. आमची जिलबी आवडेल तुम्हाला!” असे म्हणत एक जास्तच वाढे.

पंगतीचे जेवण आटोपले.सगळी मंडळी हात धुवायला जाऊ लागली. तो माणूस बसूनच होता. मग उठला, ते पाहून मी लगेच त्याला वाकून नमस्कार केला. ते पाहून तर त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले.तो मला म्हणत होता,” तुम्ही वाढत असताना मला सारखी आईची आठवण येत होती.” मी त्याची समजुत घातल्यासारखे सांगत होते, “अहो मीही तीन मुलामुलींची आई आहे. वाढतांना मलाही खूप बरे वाटत होते. पण आज अचानक तुम्ही कसे आलात?”

त्यावर तो गृहस्थ गहिवरून सांगू लागला, “आमच्या सोसायटीत काम करणारा माणूस मला नेहमी सांगे की लग्नाच्या अशा पंगतीत मला जेवायची खूप इच्छा होती. मी लग्नामुंजींच्या दिवसात कार्यालयांत जात असे. पण कुठे दाद लागली नाही. पाट रिकामा नाही म्हणून सांगायचे.नशिब म्हणत ती एक इच्छा सोडल्यास दिवस चांगले काढले.” काल पर्यंत तो मला त्याची ही इच्छा सांगत होता. काल सकाळी मी त्त्याची ही इच्छा पूर्ण करेन असा शब्द दिला. काल संध्याकाळीच तो वारला. आज मी इथे आलो. तुम्ही मला मायेने वाढले.”

हे ऐकल्यावर मी त्याला पुन्हा नमस्कार केला. हात धुवायला जाताना त्याने समाधानाने ढेकर दिली. ती तृप्तीची ढेकर आम्हाला आशीर्वाद होता.

मी मागे वळून पाहिले तर तो विशीतला तरूण बसूनच होता.मी जवळ गेले तर त्याचे डोळेही भरून आले होते. त्याला रडायला काय झाले असे हळूच विचारल्यावर तो कुठेतरी पाहात असल्यासारखा बोलू लागला,”त्यानंतर तो माणूस आला नाही की दिसला नाही. पाट मांडलेला, ताट वाढलेले तसेच राही. आमचे कंत्राट गेले. कारण आमचे कार्यालय तितके चालेना. दिवस वाईट आले. आई वडील अकाली थकले. मला कॅालेजात जाता आले नाही. एका छापखान्यात साधे काम लागले आहे. कसेतरी चालले आहे. डोळ्यांत का पाणी आले सांगता येत नाही. तुमच्या पंगतीतला पाट रिकामा राहिला नाही ह्याचा आनंद झाला की तुम्हाला त्या ‘अवचित अतिथीला’जेवायला घालता आले; आम्हाला ती संधी मिळाली नाही; ह्याचे वैषम्य म्हणून, का तुम्हाला बरकत येईल ह्याचा हेवा किंवा द्वेष वाटला, काही सांगता येत नाही. पदवी मिळाल्यावर मलाही आमच्या आई-वडीलांचा हा व्यवसाय करायचा होता. पण तसे जमेल असे वाटत नाही.” इतके झाल्यावर तो पुन्हा डोळे पुसत हात धुवायला गेला.

इकडे मी कोठीघरात गेले. परत आले. तो मुलगा दिसला. त्याला हाक मारली. “ हे बघ हे शकुनाचे पैसे घे. ह्याने तुला व्यवसाय सुरू करता येणार नाही हे माहित आहे. पण तुझी हिंमत टिंकून राहील. तुझ्या स्वप्नातील पंखातले हे लहानसे पिस आहे.” असे म्हणत त्याच्या हातात शंभराच्या चार पाच नोटा ठेवल्या. तो मुलगा पाहात राहिला. त्यानेही मला नमस्कार केला. द्यायचा तो आशिर्वाद मी दिला.

तो मुलगा म्हणाल्या प्रमाणे आमची बरकत होत गेली. खरं म्हणजे हे कार्यालय तसे गैरसोयीचे होते. का कुणास ठाऊक पण ते लग्ना मुंजीच्या दिवसात एकही दिवस रिकामे नसे. मालकांनाही त्यामुळे चांगले उत्पन्न होऊ लागले. त्यांनी कार्यलयाचे पूर्ण नूतनीकरण करायची योजना आखली. त्यामुळे आमचा एक मोसम रिकामा जाणार होता. पण आम्ही चक्रदेवांना विचारले की ,”नविन कार्यालयाचे काम आम्हाला मिळेल नां?” त्यावर ते म्हणाले, “अहो तुमच्यामुळेच हे मी करू शकतोय्. तुम्हाला मी कसा विसरेन?”…..

….. काळ पुढेच जात असतो. “आमचे आई वडील गेले. आमच्या सासूबाई गेल्या. पाटांच्या पंगतीही गेल्या. टेबल खुर्च्यांच्या पंगती झाल्या. आजही आम्ही एक खुर्ची रिकामी ठेवतो. कोणी अवचित पाहुणा येतो. सासरहून कधी आमच्या बहिणी त्या पाहुण्याला वाढायला येतात.” “ आम्ही दोधीही त्या रिकाम्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थाला किंवा बाईंना वाढतो.” मुले व सुना सांगत होत्या. स्वत:ला विसरून मी त्यांचे बोलणे ऐकत होतो.

वैद्य

एक बिगारी कामगार होता. परिस्थितीमुळे रोज काम मिळणे मुष्किल झाले. सरकारच्या रोजगार हमी योजनेचीही कामे हल्ली निघत नव्हती.काय करावे ह्या विचारात पडला.
गावातल्या वैद्याचे काम मात्र कमी होत नाही. त्याची रोजची कमाई जोरात आहे हे लक्षात आल्यावर त्याने वैद्यकी करायचे ठरवले.

घरातल्या बाहेरची खोली चुन्याने रंगवली. बऱ्यापैकी सतरंजी पसरली. स्वत:साठी घरातली उशीच टेकायला घेतली. पाच सहा लहान मोठ्या बाटल्या भोवती ठेवल्या. स्वत: डोक्याला पांढरा पटका बांधून कपाळाला गंध लावून व खांद्यावर उपरणे गुंडाळून बसू लागला. बाहेर पाटी लिहिली. “तब्येत दाखवा. शंभर रुपयात उपाय! गुण नाही आला तर दोनशे रुपये घेऊन जा!” हळू हळू एक दोघे येऊ लागले.

दोन चार दिवसांनी गावातल्या वैद्याने आपली प्रॅक्टिस खलास होऊ नये म्हणून वेळीच ह्याचे पितळ उघडे करायचे ठरवले. वेष बदलून रुग्ण म्हणून वैद्यराज बिगाऱी वैद्याकडे गेले.

खरा वैद्य बिगारी वैद्याला म्हणाला, ”वैद्यबुवा माझ्या तोंडाची जिभेची चवच गेली बघा..” बिगारी बुवा आपल्या जवळच्या बाटल्यांची उगीच जागा बदलत, घरात पाहात म्हणाला, “हरी ४१ नंबरची बाटली आण बाळ.” बाळ्या हऱ्याने बाटली बिगारी बुवाच्या हातात दिली. बुवांनी खऱ्या वैद्याला ‘आऽऽ’ करायला सांगितले. त्याच्या जिभेवर तीन थेंब टाकले. खरे वैद्यराज लगेच थूथू: करत ओरडून म्हणाले,” अरे हा तर कार्ल्याचा रस आहे!” बिगारी वैद्यबुवा म्हणाले,” बघा अचूक उपाय झाला की नाही? चव आली की नाही तुमच्या तोंडाला! शंभर रुपये द्या. खऱ्या वैद्यबुवाने तोंड वेडेवाकडे करत शंभर रुपये दिले.

दोन दिवसांनी पुन्हा वैद्यराज रुग्णाच्या वेषात आले आणि म्हणाले,” वैद्यबुवा माझी स्मरणशक्तीच गेली हो!” बुवानी घरात डोकावत हाक दिली,” हरीबाळा, ती एकेचाळीस नंबरची बाटली घेऊन ये बाबा.” हऱ्याने ती बाटली बुवांना दिली. ती बाटली पाहिल्यावर वैद्यराज जवळ जवळ किंचाळलेच, ४१ नंबरची बाटली? “बुवा ही बाटली तर कडू कारल्याच्या रसाची आहे!” ते ऐकून बुवा म्हणाले,” बघा तुमची स्मरणशक्ती तात्काळ जागी झाली. काढा शंभर रुपये.” वैद्यराजांनी नाईलाजाने शंभर रुपये काढून दिले.

आठ दहा दिवस होऊन गेले. बिगारी वैद्यबुवाकडची गर्दी वाढू लागली.

वैद्यराज आज त्या बोगस बिगाऱी वैद्याची चांगलीच फजिती करायची ह्या निश्चयाने गेले. हातात पंढरी काठी घेऊन निघाले. बिगारी वैद्यबुवाच्या घराशी आले. पायऱ्या चढतांना एकदोनदा त्यांचा तोल गेला. हातातली पांढरी काठी सावरत असताना पायरी चुकली.पडता पडता वाचले. बिगाऱ्याने हे पाहिल्यावर त्यांचा हात धरून त्यांना आत आणले. वैद्यराज बुवांला म्हणाले,” बुवा, गेल्या महिन्यापासून माझी दृष्टी फार कमी झालीय. दिसतच नाही म्हणालात तरी चालेल. उपाय करा काही तरी.”

वैद्यराजांची ही अवस्था ऐकून बिगारी बुवा हात जोडून म्हणाले,” ह्याच्यावर माझ्याकडे उपाय नाही. हे घ्या तुमचे दोनशे रुपये.” हे ऐकल्यावर वैद्यराजाला आत आनंदाच्या उकळ्याच फुटल्या. त्याने पैसे घेतले आणि म्हणाले, “बुवा पण हे दीडशे रुपयेच आहेत की!“ बिगारी वैद्यबुवा, वैद्यराजांच्या हातातील नोटा पटकन काढून घेत म्हणाले,” बघा तुमची दृष्टी आली की नाही परत? माझ्या फीचे शंभर रुपये द्या!”

वैद्यराज पांढरी काठी टाकून ताड ताड पावले टाकीत गेले.

[‘भांडी व्याली भांडी मेली’ ह्यासारखी ही पण एक जुनी ‘पिढीजात’ गोष्ट;माझ्या शब्दांत.]

चांगभले! सगळ्यांचेच चांगभले!

बेलमॅान्ट

एक तरुण मुलगा होता. तो अगदी पोरका होता. एका शेठजी कडे पडेल ते काम करायचा. काम संपल्यावर घरी जाताना शेठजी त्याला पीठ मीठ द्यायचा.

घरी आल्यावर तो मुलगा पिठाच्या चार भाकऱ्या करायचा. मीठा बरोबर किंवा कधी शेठजीनी चटणी दिली असेल तर चटणी बरोबर खायचा. दोन रात्री खायचा आणि उरलेल्या दोन, सकाळी कामाला जाताना खायचा. एकदा सकाळी जेवायला बसला तर दुरडीत एकच भाकरी! एक भाकरी काय झाली असा विचार करत त्याने जेवण संपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच प्रकार; एकच भाकऱी शिल्लक. हे रोज होऊ लागले तेव्हा एका रात्री झोपेचे सोंग घेउन पडून राहिला. एक मोठा गलेलठ्ठ उंदीर येऊन भाकरी घेऊन पळून गेला.

दुसऱ्या रात्री त्याने उंदराला भाकरी पळवतानाच पकडले. उंदराला म्हणाला,” अरे तू माझी भाकरी पळवतोस. रोज माझी भूक मारावी लागते. अगोदरच चार भाकऱ्या त्यातलीही तू एक पळवतोस! मी करू काय?” “ एऽ बघ , मी माझ्या नशिबाने खातोय. तुझं तू पाहा.” उंदीर असे म्हणाल्यावर तरूण मुलगा म्हणाला,” अरे कसले नशीब आणि फिशिब. मी गरीबीने व्यंगून गेलोय. काय करावे सुचत नाही.” असे म्हणून कपाळाला हात लावून उंदराकडे पाहू लागला. मुलाचे बोलणे ऐकून उंदीरही आपले डोळे मिचकावित म्हणाला, “ तुझ्या प्रश्नाचे उत्तर एकच माणूस देईल. तू गौतम बुद्धाला जाऊन भेट. तो सांगेल.”

तरूण मुलगा मालकाची रजा घेऊन निघाला. प्रवास लांबचा. मुलाच्या अडचणीत आणखी अडचणींची भर घालणारा तो प्रवास! एका रात्री त्याला जंगलातून जाताना दूरवर दिवा दिसला. त्या दिव्याच्या रोखाने निघाला. ते मोठे घर होते. मुलाने दार ठोठावले. एका बाईने दार उघडले. मुलाने त्या बाईला आजची रात्र इथे काढू का असे विचारल्यावर बाई हो म्हणाली. तिने मुलाला खायला दिले पाणी दिले. जेवण झाल्यावर तो कुठे चालला ते विचारले. तरुण मुलगा म्हणाला,” माझा प्रश्न विचारायला मी बुध्दांकडे निघालो आहे.” ते ऐकून बाई म्हणाली,” अरे माझाही एक प्रश्न आहे तोही विचार. माझी वीस वर्षाची मुलगी बोलत नाही. मुकी आहे. ती कधी बोलू लागेल ते विचार गौतम बुद्धाला.” मुलगा हो म्हणाला.

दुसरे दिवशी मुलाचा प्रवास सुरु झाला. जाता जाता वाटेत एक प्रचंड बर्फाने झाकलेला उंच पर्वत दिसला. आणि त्याला शिखरावर माणसासारखा एक ठिपका दिसला. तरूणाला प्रश्न पडला हा पर्वत ओलांडून कसा पार करायचा. शिखरावरच्या माणसाने त्याला पाहिले असावे. तो तिथूनच ओरडला,” मुला वर चढायला सुरुवात कर.” हे ऐकून चढावे की नाही असा विचार करत असतानाच तो माणूस पुन्हा म्हणाला, “ घाबरू नको. वर ये.” मुलगा पर्वत चढू लागला आणि एका क्षणात तो शिखरावर आला. मुलगा थक्क झाला. इतका थक्क झाला की आश्चर्याने तो बोट तोंडात घालायचेही विसरला. बोटात तोंड घालताना, दोन्ही कानात बोटे घालून तोंड आऽऽऽ करून त्या माणसाकडे पाहात राहिला. माणसाने विचारले,” अरे इकडे कुणी येत नाही. तू कसा आलास?” तरुण मुलगा म्हणाला, “ ते नंतर. आधी मी इथे एका क्षणात वर कसा आलो ते सांगा.” त्यावर तो माणूस आपल्या हातातली सुंदर छडी दाखवत म्हणाला,” अरे मला ही जादूची शक्ती मिळाली आहे. तू कुठे चाललास ?” त्यावर मुलगा म्हणाला, मी माझा प्रश्न विचारायला गौतम बुद्धाकडे निघालोय्.” ते ऐकल्यावर तो माणूस म्हणाला,” अरे मी इथे हजार वर्षे तप करत बसलो आहे. जादूच्या शक्तीशिवाय मला काही मिळाले नाही.मला स्वर्गात जायला केव्हा मिळेल ते बुद्धांना विचार.” तरूण हो म्हणाला. शिखरावरच्या माणसाने त्याला पर्वत पार करून दिला.

मुलगा निघाला. विचार करू लागला, माझा प्रश्न घेऊन निघालो आणि आता ह्या दोघांच्या प्रश्नांची आणखी भर पडली.चला. असे स्वत:शी म्हणत पुढचा प्रवास करू लागला. तर एक नवीनच संकट पुढे वाहात असताना दिसले. भल्या रुंद पात्राची महानदी समोरून वाहात होती. काय करावे. पोहता येत होते तरी आडा विहिरीतले पोहणे त्याचे. इतकी अफाट रुंदीची नदी पार करणे अशक्यच होते त्याला. अधेमध्येच गटांगळ्या खाऊन बुद्धाला न भेटताही चौघांचेही प्रश्न सुटले असते!

तेव्हढ्यात एक फार मोठे कासव पोहत येत असलेले दिसले. कासव जवळ आले. मुलगा म्हणाला,” कासवराव मला नदी पार करून देता का? “ “ का नाही? चल माझ्या पाठीवर बस. तरुण मुलगा कासवाच्या महाप्रचंड पाठीवर बसला. जाताना कासवाने मुलाला तो कुठे , कशासाठी चालला विचारले. मुलाने तो बुद्धाकडे स्वत:ची समस्या सोडवण्यासाठी चालल्याचे सांगितले. त्यावर कासव म्हणाले,” बाळा माझाही एक प्रश्न तथागतांना विचार.. मला डायनासोर व्हायचं आहे. मी काय करू?” मुलगा म्हणाला नक्की विचारेन. पण मनात म्हणत होता माझा एक म्हणता म्हणता आता चार प्रश्न झाले! चला.

तरूण मुलगा गौतमबुद्धांच्याकडे पोचला. पुष्कळ लोक होते. गौतम बुद्धाने प्रथमच सांगितले की प्रत्येकाला फक्त तीनच प्रश्न विचारता येतील!”
हे ऐकून मुलगा निराश झाला. विचारात पडला. त्याची पाळी येईपर्यंत तो मनाशी बोलत होता. फक्त तीनच प्रश्न विचारायचे. मला तर चार प्रश्न विचारायचे आहेत. तो तिघांचे प्रश्न घोळू लागला. तिघेही त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागले. कुणाचा प्रश्न बाजूला ठेवायचा हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडू लागला.
त्याने विचार केला मुलगी मुकी. त्यामुळे बाई व मुलगी वीस वर्षे त्या एकमेकींशी बोलू शकत नाहीत. तसेच तो जादूगार कित्येक वर्षे तप करतोय; आणि कासवदादा किती वर्षे पाण्यातच पोहतोय. माझा प्रश्न काय फक्त पोटापाण्याचा आहे. आज कोरडीसुकी का होईना पोटाला भाकरी मिळतेच आहे नां?

मुलाची पाळी आली. त्याने कासव डायनासोर केव्हा होईल ते विचारले. त्यावर बुद्ध म्हणाले,” त्याला म्हणावं ते पाठीवरचे अगडबंब कवच फेकून दे!” नंतर त्याने जादुगाराला स्वर्गात जायला केव्हा मिळेल हे विचारले. त्यावर बुद्ध म्हणाले,” त्याला अगोदर त्याच्या त्या शक्तीचा त्याग कर म्हणावे.” त्यानंतर मुलाने वीस वर्षे मुकी असलेली मुलगी केव्हा बोलेल हा प्रश्न विचारला. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, “ तिचे लग्न झाल्यावर ती बोलेल.”

मुलगा परत निघाला. कासवाने त्याला पाठीवर घेऊन पैलतीराला सोडताना विचारले,” विसरलास ना तू माझा प्रश्न विचारायला?” मुलगा म्हणाला,” मी तुला कसा विसरेन ? बुद्धाने तुला कवच काढून टाकायला सांगितले आहे!” हे ऐकताक्षणीच कासवाने सर्व शक्ती पणाला लावून आपले कवच तोडून फाडून टाकले. प्रचंड आवाज होत कासवाचा महाकाय डायनासोर झाले! ते होत असतानाच कवचातून रत्नामोत्यांचा वर्षाव झाला. पूर्वीचे कासव म्हणाले. “ तरूण मित्रा ही सर्व रत्ने मोती तुझी!”

मुलगा ती रत्नं मोती मिळाल्याने मालामाल झाला. प्रवास करत पर्वतापाशी आला. पर्वतावरच्या माणसाने वरूनच विचारले,” पोरा माझा प्रश्न विचारलास नां ? का गडबडीत विसरलास?” विचारला असलास तरच तुला वर घेईन.” हे ऐकल्यावर मुलगा हो म्हणाल्याबरोबर त्याच क्षणी तो शिखरावर आलाही! “ बुद्धांनी तू तुझ्या शक्तीचा जेव्हा त्याग करशील तेव्हाच तू स्वर्गात जाशील असे सांगितले आहे.” हे ऐकल्यावर तो जादूई शक्तीचा माणूस म्हणाला, “ आताच मी माझ्या शक्तीचा त्याग करतो.” तो पुढे म्हणाला,” हे मुला ही माझी शक्ती मी तुलाच देतो !” असे म्हणून त्याने जादूची सुंदर कांडी त्या मुलाला दिली. क्षणार्धात त्या तपस्व्यासाठी “उघडले स्वर्गाचे दार!”

रत्नं मोती आणि जादुची ती छडी घेऊन एका क्षणात तो तरुण त्या बाईंच्या घरी पोचला. बाईंनी बुद्धाने काय सांगितले असे विचारल्यावर मुलाने बुद्धाचा निरोप बाईंना सांगितला. ते ऐकून बाईला फार आनंद झाला. आपल्या वीस वर्षाच्या तरूण सुंदर मुलीला घेऊन आल्या. त्या म्हणाल्या,” अरे तुझ्यासारखा तरुण समोर असताना माझ्या मुलीसाठी दुसरा नवरा का शोधायचा?”

त्सा तरुण मुलाचे व मुक्या मुलीचे लग्न झाले. मुलीने आनंदाने ,” आई! आई! मला बोलता येऊ लागले”म्हणत आईला मिठी मारली.
कासवाची, तप करणाऱ्याची व मुक्या मुलीच्या आईची – तिघांच्याही मनातल्या इतक्या वर्षांच्या इच्छा पूर्ण होऊन त्यांच्या चिंता मिटल्या. प्रश्न सुटले. आणि त्या तरुण मुलाने गौतम बुद्धांना आपली चिंता प्रश्न न विचारता तोही धनवान शक्तिमान आणि चांगली बायको मिळाल्याने भाग्यवानही झाला.

एकाच्या भलेपणाने इतर सगळ्यांचेही चांगभले झाले.


आपण पंढरपूर, तुळजापूर किंवा कोल्हापूरला किंवा एखाद्या सत्पुरुषाच्या दर्शनाला जाणार हे कळल्यावर काहीजण “आमचाही नमस्कार सांगा” असे सांगतात. तिथे गेल्यावर कितीजण लक्षात ठेवून त्यांचे नावे नमस्कार करतात हे माहित नाही.

(युट्युबवरील एका व्हिडिओत काही जण गप्पा मारत असता त्यातील एकजण ही लहानशी गोष्ट सांगतो. त्यावरून अखेरच्या परिच्छेदाची भर घालून मी ही लिहिली.)

शर्यत

एक मुलगा होता. अत्यंत जोरात पळायचा. उत्तम धावपटू होता. शर्यतीत भाग घ्यायची तीव्र इच्छा होती. त्याचे आजोबा होते. त्यांनाही नातवाचे कौतुक होते.


दुसऱ्या गावात पळण्याची शर्यत होती. मुलाने त्या शर्यतीत भाग घेतला. गावातल्या मुलांबरोबर तो गेला.आजोबानाही राहवले नाही. नातवाची शर्यत पाहायला तेही त्या गावात पोचले.


नातवाच्या बरोबर दोघे स्पर्धक होते. शर्यत सुरु झाली. नातू आणि एक मुलगा चांगल्या वेगाने पळत होते. तिसरा मागे पडू लागला. हे दोघे अटीतटीने पळत होते. लोक श्वास रोखून पाहात होते. कोण जिंकेल ह्याची उत्सुकता वाढत होती. आजोबा शांत होते. नातवाने शर्यत जिंकली. लोकांनी मोठ्या आनंदाने आरोळ्या ठोकून शिट्या टाळ्या वाजवून मुलाचे कौतुक केले. मुलाची मान ताठ झाली. स्वत:च्या पराक्रमाने त्याची छाती फुगली.आजोबा शांत होते. त्यांनी नातवाच्या डोक्यावरून हात फिरवून कौतुक केले.

दुसरी शर्यत जाहीर झाली. ह्या खेपेला दोन नव्या दमाची ताजीतवानी मुले नातवाबरोबर शर्यत खेळायला उतरली. नातू पहिल्या विजयाने अधिकच जोमात आला होता. शर्यत सुरू झाली. दोन्ही नवे धावपटू जोशात होते. त्यांनी नातवाला मागे टाकायला सुरुवात केली. आजोबा पाहात होते. नातू आता इरेला पेटला. सगळे कौशल्य शक्ति पणाला लावून धावू लागला. तिघे जातिवंत धावपटू एकाच रेषेत बरोबरीने पळू लागले. अंतिम रेषा जवळ येऊ लागली. नातवाने मान खाली घालत जोरदार मुसंडी मारून अंतिम रेषा लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात ओलांडली. किती वेळ टाळ्या शिट्या वाजत राहिल्या होत्या! नातू धापा टाकत होता. जग जिंकल्याच्या ताठ्यात उभा होता. आजोबांच्या जवळ येऊन उभा राहिला. आजोबांनी शाबासकी दिल्यासारखा त्याच्या पाठीवर हात थापटला.

नातू ‘इजा बिजा आणि आता तिजा’ जिंकण्याच्या इर्षेने,“पुन्हा एक शर्यत होऊ द्या !” म्हणून ओरडू लागला. आजोबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवित त्याला शांत करीत ते पुढे गेले. ह्या खेपेला आजोबांनी पुढाकार घेऊन एक अशक्त, दुबळी म्हातारी व एका आंधळ्याला शर्यतीत उतरवले. नातू थोड्या घुश्शातच म्हणाला,”आजोबा! ह्यांच्याशी मी, मी,ह्यांच्याशी शर्यत खेळू?” आजोबांनी एकाच शब्दात त्याला सांगितले,” खे-ळ.”

शर्यत सुरू झाली. मुलगा जरा घुश्शातच होता. त्याच्या वेगाने धावत सुटला. अंतिम रेषा पार केली. शर्यत जिंकली. दोन्ही हात वर करून ओरडत नाचू लागला.लोक गप्प होते. ना टाळ्या ना शिट्या ऐकू येत होत्या. मैदान शांत होते. अशक्त दुबळी म्हातारी मोजून एक दोन पावलेच पुढे आली होती. आंधळा जागीच उभा होता. नातवाचा चेहरा पडला होता.आजोबाजवळ आला. ,” मी शर्यत जिंकली पण लोक आनंदाने ओरडले नाहीत की टाळ्या वाजवून कौतुक केले नाही!” आजोबा शांत होते. ते नातवाला घेऊन पुन्हा शर्यतीच्या प्रारंभ रेषेकडे गेले. त्यांनी नातवाला त्या दोघा स्पर्धकाकडे तोंड करून उभे केले. काहीही न बोलता आजोबा हळू हळू आपल्या जागी गेले. नातू सुरुवातीच्या रेघेवर उभा राहिला.

शर्यत सुरु झाल्याचा इशारा झाला.सुरुवातीला सवयीने नातू पळणारच होता. एक दोन पावले त्याने तशी जोरात पुढे टाकलीही. पण लगेच तो दुबळ्या म्हातारीच्या व आंधळ्या माणसाच्या मध्ये जाऊन उभा राहिला.त्याने त्या दोघांचे हात धरले. तो त्यांच्या बरोबरीने चालू लागला. तिघेही चालू लागले. हलकेच एक दोन टाळ्या वाजल्या. मग तिघांच्या पावलांच्या ठेक्यावर त्या वाजू लागल्या. तिघांनीही हात धरून अंतिम रेषा ओलांडल्यावर कौतुकाच्या टाळ्यांचा पाऊस पडू लागला. लोक आनंदाने नाचू लागले.

“आजोबा,कुणासाठी टाळ्या वाजवताहेत लोक? कुणी जिंकली शर्यत? “ नातू विचारत होता. “ बाळा, लोक शर्यतीला टाळ्या वाजवताहेत.” आजोबा शांपणे म्हणाले. “बाळ तू जोरदार धावतोस. शर्यती जिंकतोस. पण फक्त शर्यत जिंकण्यालाच महत्व नाही. शर्यत कशी पळतोस ते महत्वाचे आहे. आयुष्यात शर्यत जिंकणे हेच एक सर्वस्व नाही. ह्या शर्यतीत दीन दुबळ्यांना आधार देत पळणे हीच जिंकण्याहून मोलाची गोष्ट आहे.”

(इंटरनेट वरील एका लहानशा इंग्रजी बोधकथेवरून ही विस्तारित कथा केली.)

एक रूपयाचा देव

चिन्नू मुठीत एक रुपयाचे नाणे धट्ट धरून जात होता. एक दुकान दिसल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील चिंतेची छटा कमी झाली. मोठ्या अधीरतेने त्याने दुकानदाराला विचारले, “ काका, तुमच्याकडे देव मिळतो का हो? मी विकत घेईन. मला एक देव पाहिजे.असला तर लवकर द्या हो.” दुकानदाराने चिन्नूकडे कोण चक्रम आहे हा अशा मुद्रेने पाहात हातानेच नाहीय्ये जा म्हणून धुडकावले. चिन्नू निराश होऊन दुसऱ्या दुकानात जाऊन,” दादा, मला एक देव पाहिजे. आहे का तुमच्या दुकानात? मी पैसे देईन त्याचे.” असे तळमळून विचारले. “ ए पोरा काय येडबीड लागलंय का तुला? जा देव बिव काही नाही मिळत इथं, पळ!” चिन्नू हिरमुसला झाला. एव्हढेसे तोंड करून पुढच्या चौकातल्या दुकानात गेला. तिथेही हाच प्रकार! तीच चौकशी, तेच उत्तर, व हडत हुडत करून घालवून देणे हेच घडले. होता होता एकूण चाळीस दुकाने फिरून झाली पण चिन्नूला देव तर मिळाला नाहीच पण टिंगल, हेटाळणी व उडवा उडवीची उत्तरेच ऐकायला मिळाली. चिन्नू रडकुंडीला येऊन एका खांबाखाली तोंड झाकून हुंदके देत बसला.

थोड्या वेळाने उठून तो पुन्हा कुठे देव मिळतो का पाहात एका दुकानात शिरला. इतका वेळ रुपया मुठीत धरल्यामुळे तळहात घामाने ओला झाला होता. तळवाही तांबडा झाला होता.ओला रुपया खिशात ठेवला. हातही खिशाच्या आतच पुसला.

दुकानात गेला. तिथे कोणी दिसले नाही. “ कुणी आहे का?” चिन्नूने दबकतच विचारले. एका शोकेस मागून एक हसतमुख म्हातारा आला.”काय पाहिजे बाळ तुला?” असे नेहमीच्याच आवाजात त्याने चिन्नूकडे पाहात विचारले. “बाबा! मला देव विकत घ्यायचाय हो.” चिन्नू मोठ्या आशेने दुकानदाराकडे पाहात म्हणाला. “ अरे वा! देव मिळेल पण पैसे आणले आहेस का ?” चिन्नूला आश्चर्य वाटले. इतकी पायपीट करीत किती दुकाने हिंडलो असेन. ह्या बाबाने निदान थोडी चौकशी तरी केली. “ आणले आहेत ! आणले आहेत! एक रूपया आहे माझ्या जवळ!” हे सांगताना चिन्नूने छाती फुगवायची तेव्हढी राहिली होती. “छान! नेमकी इतकीच किंमत आहे देवाची. पण तुला देव कशासाठी हवा?” चिन्नूचा चेहरा उतरला. तो खिन्न होऊन म्हणाला,” माझे काका हाॅस्पिटलमध्ये आहेत. मला ते एकटेच जवळचे आहेत.” “ आई बाबा कुठे आहेत?” “ माझे आई बाबा मी अगदी लहान असतानाच वारले. ह्या काकांनीच माझा सांभाळ केला. काका बांधकामावर जातात. काल ते उंच फरांच्यावरून खाली पडले. दवाखान्यातले डाॅक्टर म्हणाले. आता फक्त देवच काय करील ते खरं!” म्हणून मी एक रुपया घेऊन देव आणायला आलो.” चिन्नूने सांगितले ते ऐकल्यावर दुकानदार बाबा म्हणाले,” अरे देवाची किंमतही नेमकी एकच रुपया आहे.” असे म्हणत त्यांनी एक टाॅनिकची बाटली काढून चिन्नूला दिली.

देव मिळाल्याच्या आनंदात चिन्नू धावत पळत दवाखान्याकडे निघाला. काकाला,डाॅक्टरांना देव केव्हा दाखवेन असे त्याला झाले होते. रात्र झाली होती. चिन्नू धापा टाकत काकाजवळ आला. बाटली काकाजवळ ठेवत म्हणाला, “काका काका,मी देव आणलाय. आता तुला भीती नाही. देव मिळाला मला.!” सांगता सांगता दमल्या भागल्या चिन्नूला केव्हा झोप लागली ते समजले नाही.

दुसरे दिवशी सकाळी चिन्नू उठला. पण पलंगावर काका दिसला नाही. तेव्हा तो घाबरून काका कुठे आहे असे नर्सला विचारू लागला. “मोठ्या शहरातले पाच सहा डाक्टर्स आले आहेत. ते तुझ्या काकाला तपासताहेत.” नर्सने सांगितल्यावर चिन्नू मुकाटपणे काकाच्या पलंगापाशी येऊन बसला.

मोठ मोठ्या तज्ञ डाॅक्टरांनी सर्व तपासण्या केल्या. एक आॅपरेशन केले. यथावकाश चिन्नूचा काका बरा झाला.बिल आले. ते पाहून काकाला आपण हार्टफेलने मरणार असे वाटू लागले. तो बिलाकडे पाहात मनात म्हणत होता,” चिन्नू एक रुपयात देव मिळत नसतो रे!” काकाचे डोळे पांढरे होण्याच्या आत नर्स आली. ती म्हणाली,”ते बिल आहे ; बिलाचे सर्व पैसे मिळाले आहेत.त्याची ही पावती!”

काकाने सुटकेचा निश्वास टाकला.काका आणि चिन्नू बाहेर पडतांना बिलाच्या खिडकीपाशी आले. “साहेब, माझ्या बिलाचे एव्हढे पैसे कुणी भरले ते सांगता का? त्याच्या पाया तरी पडतो.” बिलाचे काम पाहणाऱ्याने कागदपत्रे वर खाली करीत तपासून पाहिली. तो म्हणाला,” एका श्रीमंत माणसाने तुमचे पैसे भरले आहेत. औषधाचे मोठे दुकान आहे त्यांचे. येव्हढे मला माहित आहे.” इतके सांगून त्याने दुसरा कागद पाहून, चिन्नूच्या काकाला त्या मालकाचे नावही सांगितले.

चिन्नूने “औषधाचे मोठे दुकान आहे” हे ऐकले होते. चिन्नू आपल्या हातातला देव दाखवत काकाला म्हणाला,” काका ज्यांनी मला हा देव दिला त्या बाबांचेच दुकान असेल.मला माहित आहे,चला.”
काका आणि चिन्नू त्या देवमाणसाला भेटायला निघाले. चिन्नूच्या हातातला एक रुपयाचा देव काकाने घेतला. त्या देवाकडे पाहात ते दुकानदार बाबाला शोधत त्या दुकानात आले.तिथे दुकानदार बाबा नव्हते. नोकर म्हणाला, “मालक सुट्टी घेऊन प्रवासाला गेले आहेत. पंधरा वीस दिवसांनी येतील. पण त्यांनी हे पत्र तुमच्यासाठी दिले आहे.”

काका पत्र वाचू लागला. जसे वाचू लागला तसे त्याचे डोळे भरून येऊ लागले. “ मला माहित आहे तुम्ही माझे आभार मानायला आला आहात. पायही धरू लागाल माझे. पण तसे काही करण्याची गरज नाही. तुमच्या, एक रुपयाच्या देवाचे,चिन्नूचे आभार माना.”

( युट्युबवर सहज समोर आलेल्या लहानशा गोष्टीच्या आधारे.)

एका लग्नाची अदभुत इव्हेन्ट!

शीव/ चुनाभट्टी

नरसी मेहता नेहमी आपल्याच नादात असायचा भजन कीर्तन लेखन ह्यात तो हरवलेला असे. ध्यानातच कष्णाचे गुण आवडीने गात असे. हिसाबकिताबात त्याचे मन लागत नसे. नरसी मेहत्याच्या घरी कोण मुलगी देणार! पण मुलगा लग्नावाचून राहात नाही आणि मुलीचे लग्न झाल्याशिवाय राहात नाही ह्या सत्याप्रमाणे नरसी मेहत्याच्या मुलाचे स्थळही कुणाच्या तरी नजरेस आले.

हा असा तसा कुणी सोमाजी गोमाजी कापसे नव्हता. जुनागडजवळच श्यामापुर नावाच्या गावात त्रिपुरांतक -देवाचेच विशेषण शोभावे – अशा भारदस्त नावाचा धनाढ्य सावकार होता. त्याची मुलगीही लग्नायोग्य झाली. मुलीचा बाप कितीही मोठा, सावकार असला तरी अखेर मुलीचाच बाप. त्यानेही आपल्या पुरोहिताला म्हणजे कुळाच्या उपाध्यायाला स्थळ शोधायला सांगितले.

कृष्णंभट आपल्या यजमनाच्या मुलीसाठी स्थळं पाहू लागले. ते जुनागडला आले असता गावात चौकशी करू लागले. एक दोघांनी बिचकत अडखळत नरसी मेहत्याचा मुलगा लग्नाचा असल्याचे सांगितले. पण नरसी मेहत्याच्या घरची दामाजीचीही अवस्था सांगितली.

कृष्णंभट स्वत:शी म्हणाला,”मी नरसी मेहत्याला कसा काय विसरलो?“ तो नरसी मेहत्याच्या घरी आला. नरसी त्याच्या जीवीचा विश्राम अशा कृष्णाचे गुणगान करत होता.”तूच माझा विसावा। तूच माझा सखा। कष्णा, तूच मजला एक एकला। तुझ्यासारिखा अन्य कोण मज।। असे भजन करीत होता.

नरसीला घरी येणारा प्रत्येकजण साधु सज्जन वाटायचा. कष्णंभटाला गूळपाणी झाले. सुपारीही कातरून दिली. कृष्णंभटही काही काळ नरसी भगतच्या सहवासात स्वत:ला व सभोवताल विसरून गेला होता. सावध झाल्यासरसा त्याने नरसी भगतचा मुलगा सावकाराच्या मुलीसाठी निश्चित केला.खरा वैष्णव पाहिल्यावर नरसी मेहत्याच्या घरी धनसंपदा किती, शेती आहे का नाही हा विचार न आणता नरसी खरा वैष्णव आहे हीच त्याची थोरवी आहे, हे जाणून तुमचा मुलगा पसंत आहे हे नरसी मेहत्याला सांगितले. पण ही मुलगी कुणाची हे त्याने विचारल्यावर कृष्णंभटाने उत्तरा दाखल, “मुलगी त्रिपुरांतक सावकाराची आहे” सांगितल्यावर,दीनआणि राव, राजा आणि भिकारी,शत्रु आणि मित्र समान मानणाऱा नरसी भगत हरखून गेला नाही की चिंतेतही पडला नाही. त्याने हसतमुखाने कृष्णंभटाला निरोपाचा विडा दिला.

कृष्णंभट समाधानाने श्यामापुराला आला. आपण मुलगा निश्चित केल्याचे वर्तमान त्याने त्रिपुरांतक सावकराला सांगितले. सावकाराला आनंद झाला. सोयरे कोण चौकशी केली. नरसी मेहत्याचा मुलगा हे ऐकल्यावर मात्र सावकराचा चेहरा खर्रकन उतरला. आपल्या तोलामोलाचे घर, नातेवाईक नाहीत समजल्यावर आतून संतापला पण आता काही करणे अशक्य आहे हे तो जाणून होता. कारण त्या काळी पुरोहिताने निश्चित केलेले लग्न मोडता येत नसे.

पण सावकार धूर्त होता. त्याने कृष्णंभटाला सांगितले,” उपाध्याय ! लगोलग जा आणि व्याह्यांना सांगा मुहुर्त उद्याचा दिवस सोडून परवाचा आहे. वऱ्हाड हत्ती घोडे छत्र चामरे उंची वस्त्रे, वाजंत्र्यांसह या म्हणावे.” हे ऐकून नरसी मेहता लग्न मोडेल अशी त्याची धारणा होती

कृष्णंभट लगेच निघाला. त्याने नरसी मेहताला, लग्न परवाच करायचे ठरले आहे तर सर्व तयारीनिशी, शोभेशा इतमामाने या.” येव्हढाच मोघम निरोप दिला. हे ऐकून नरसी भगतच्या घरांत गोंधळ सुरु झाला. एका दिवसात कुठे लग्नाची तयारी होते का? वऱ्हाडाची मंडळी तरी कशी जमणार? वगैरे कलकलाट सुरु झाला. पण नरसी मेहता मात्र शांतपणे “हरिके गुन गाऊ मैं” म्हणत “हे नाथ वासुदेव हरे मुरारे; गोविंद नारायण मधु कैटभहारे ” म्हणत आपल्या भजनात पुन्हा गुंग झाला.नंतर कृष्णंभटाला जेवायला घालून सावकराला होकार कळवायला सांगितले.

कृष्णंभटाने धोरणीपणाने नरसीच्या प्रेमापोटी आपल्या मालकाच्या अटी मात्र नरसीला सांगितल्या नव्हत्या. काय होत्या त्या अटी?

“लग्न लगेच परवाच करायचे. वऱ्हाडाने हत्ती घोडे मेणे छत्र चामरे, वाजंत्र्या चौघड्यासहित थाटामाटात यावे. आमचीही प्रतिष्ठा राखली पाहिजे की नाही?“ कृष्णंभटाने यजमानाला नरसी मेहत्याचा होकार कळवला. सावकार खट्टू झाला. पण करणार काय!

नरसी मेहत्याला परिस्थितीचे आचके लागत नव्हते. पण तिकडे द्वारकेत कृष्णाला मात्र उचकी लागली. त्याच्या लक्षात आले. त्याने रुक्मिणी सत्यभामेला बोलावून नरसीच्या मुलाच्या लग्नाच्या तयारी करण्यास सांगितले. तसेच त्याने आपल्या नामांकित भक्तांना पाचारण करण्यास सुरुवात केली. उद्धव अक्रूर तुंबर। शुक वाल्मिकी प्रल्हाद थोर।भीष्म बिभीषण आणि विदुर ।मारुति सत्वर पाचारिला।। इतकेच काय आपला मित्र सुदामा आणि लहानपणीचा सवंगडी पेंद्यालाही बोलावले. स्वत: पुन्हा आत जाऊन सत्यभामा रुक्मिणीला वऱ्डाड मंडळी जमली आहेत. नरसी मेहता श्यामापुराच्या सीमेत पोचण्यापूर्वीच आपण सर्वांनी पोचले पाहिजे असे बजावले.

नरसी मेहत्याच्या मुलाचे वऱ्हाड द्वारकेतून, स्वर्गलोकींच्या पाहुण्यासह निघाले. त्वरित श्यामापुराच्या सीमेपाशी आले. सर्वांनी अर्थातच आपली रूपे बदलली होती. पण तेज आणि सौदर्याची, ज्ञानाची आणि सौहार्दाची झळाळी कशी लपवता येणार.

विश्वकर्म्याने मंडप बांधण्यास घेतला. त्याची सजावटही वैभवशाली केली. ऋतुपर्ण राजाने सुगंधी वनस्पती, हिरवी पाने व सुगंधी फुलांची आरास झटक्यात केली. सजवलेले हत्ती घोडे मेणे पालख्यांची गणना नव्हती! सर्व वऱ्हाड्यांची वस्त्रे अलंकार भूषणे डोळे दिपवणारी होती. सीमंत पूजनाचा हा थाट पाहून गावकरी सावकाराला हे अदभुत सांगू लागले. इकडे नरसी मेहता आपल्या वैष्णव भक्तांसह हरिगुण संकीर्तन करत आला.नरसी मेहत्याची बायको मेण्यातून आली.ती दागिन्यांनी मढली होती.

त्रिपुरांतक सावकार आपला थाट दाखवत येऊ लागला. आपले दोन वाजंत्र्याचे जोड, आपल्यापरीने उंची वस्त्रे ल्यालेली दागदागिने घातलेली मुलीकडच्या मंडळीसह तो आला. पण नरसीचे वैभव पाहून लाजल्याहून लाजल्यासारखे झाला. स्वत: कृष्णाने सर्वांचे स्वागत केले. त्याची सारखी धावपळ चालू होती. समारंभ आटोपल्यावर रंभा उर्वशी तिलोत्तमा ह्यांचे नृत्य गायन झाले.

दुसरा दिवस तर प्रत्यक्ष लग्नाचा! कवि वाल्मिकीने केलेली मंगलाष्टके यक्ष गंधर्व गाऊ लागले. त्यांना संगीताची साथ स्वत: नारद आणि तुंबर करत होते. लग्नातील स्वैपाकासाठी स्वत: अन्नपूर्णा हजर होती.द्रव्याच्या, वस्त्रांच्या आहेरावर देखरेख कुबेर करत होता. तर सवाष्णींना खणा नारळाच्या ओट्या रुक्मिणी जांबवती सत्यभामा, मित्रविंदा,याज्ञजिती, लक्ष्मणा,भद्रावती ह्या कृष्णाच्या अंत:पुरांतील स्त्रिया भरत होत्या! आणि ह्या सगळ्यांत सुसुत्रता, कुणाला काय हवे नको ते स्वत: ‘नारायण’ करत होता. अखेर झाल धरण्याच्या वेळी त्रिपुरांतक सावकाराने त्याची ओळख विचारली तेव्हा “ मी नरसी मेहत्याच्या पेढीचा, द्वारकेचा गुमास्ता, सावळाराम .” असे तो जगज्जेठी म्हणाला.

नरसीच्या मुलाचा लग्नसोहळा पाहायलाच नव्हे तर वऱ्हाडी म्हणून आलेली स्वर्गलोकीची सर्व मंडळी जुनागडला आली. आणि नरसीच्या गुमास्त्याचा निरोप घेऊन अंतर्धान पावली. कृष्ण परत निघताना नरसीला येव्हढेच म्हणाला,” नरसी काहीही अडचण आली तर माझी आठवण कर. मी तुला विसरत नाहीस. आणि तुही मला! “
नरसी ह्यावर काय बोलणार? हे अदभुत अघटित पाहून डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू वाहात असता तो इतकेच म्हणाला असेल,” हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।।

सदाशिव पं. कामतकर

भगवंताने भक्तासाठी किती करावे!

शीव/चुनाभट्टी

हरिकृष्णाने आपल्या सगळ्याच भक्तांना मदत केली. नरसी मेहतासाठी मात्र तो वेळोवेळी धावून गेला आहे. ठळक आख्यायिका आणि कथांवरून तो दोन तीनदा तरी धावून गेला असे दिसते. खरे तर भक्ताला तो सतत आपल्य पाठीशी आहे ह्याची खात्री असते .पण लोकांना मात्र त्याचा परिणाम दिसल्यावाचून खात्री पटत नाही. श्रीहरीने नरसी मेहत्याची पत राखली. प्रतिष्ठाही वाढवली.


नरसी मेहत्याचा जन्म जुनागडला नागर ब्राम्हणाच्या पोटी झाला. नरसी मेहताची रीतीप्रमाणे मुंज झाली. पण त्याच्या नशिबी आई वडीलांचे सुख नव्हते. मुंज झाल्यानंतर त्याच्या चुलत भावाने त्याचा सांभाळ केला.


बालसुलभ स्वभावाप्रमाणे नरसीचे लक्ष गल्लीतल्या मुलांबरोबर खेळण्या हुंदण्यात जास्त होते. तो आणि त्याचे सवंगडी कोणते खेळ खेळत ते आपण संतकवि महिपतीबुवांच्या ओव्यांतूनच ऐकू या. आज यातले अनेक खेळ लुप्त झाले आहेत. लगोरी लपंडाव विटीदांडू आपण आता आतपर्यंत खेळत होतो. भोवराही फिरवत असू. पण महिपतीबुवांनी वर्णिलेले खेळ १८व्या शतकातील आहेत. किती विविध तऱ्हेचे आहेत!

“गावची मुले खेळती सकळ।। इटीदांडू लगोरिया। चुंबाचुंबी (!) लपंडाया। हमामा हुंबरी घालोनिया।पाणबुडियां खेळती।।वाघोडी आणि आट्यापाट्या।झिज्या बोकट अगलगाट्या। भोवरे चक्रे फेरवाट्या ।देती काट्या सत्वर।।”

असे रोज निरनिराळे खेळ खेळून हुंदडून पाण्यात पोहून डुंबून तो एकदा खूप दमला.तहान लागली.घरी आला. वहिनीला पाणी मागितले. तिने पाणी दिले पण,” नुसते दिवसभर गावात गप्पा मारत टवाळ्या करायच्या. खेळायचे हुंदडायचे आणि घरी येऊन फुकटचे हादडायचे! काम नको, कमवायला नको. भावाच्या जीवावर बसून आयते खायचे!” हे सुद्धा ऐकवले.किती बोलावे तिने! काय काय ऐकवले तिने नरसीला!

नरसी मेहता आवंढ्यांबरोबर पाणी प्याला खरे पण तो रडवेला होऊन तिरिमरीत घरातून निघाला तो थेट गावाबाहेर दूर चारपार मैलावर असलेल्या अरण्यात गेला. एक जुनाट महादेवाचे देऊळ दिदसले. पिंडीला मिठी मारून तो ढसढसा रडू लागला. आणि पिंडीवरच डोके टेकून झोपी गेला. अन्नपाण्यावाचून तो सात दिवस तसाच पडून राहिला.

शंकराला दया आली. त्यांनी नरसीच्या खांद्याला धरून हलवले. उठवले. “बाळ काय पाहिजे तुला? हवे ते माग!“ नरसी खराच लहान म्हणायचा. तो म्हणाला, शंभोमहादेवा, मी लहान आहे. काय मागायचे ते मला समजत नाही.” “ अरे पण तुला काही तरी हवे असे वाटत असेल की!” शंकर असे म्हणाल्यावर नरसी म्हणाला,” शंकरदेवा मी काय मागायचे ते मला खरच समजत नाही. नाही तर असे कर ना? तुला प्राणाहूनही प्रिय असेल ते मला दे !” नरसीचे हे मागणे ऐकल्यावर शंकराला त्याच्या चतुराईचे कौतुक वाटले. भोलेनाथ आनंदाने म्हणाले,” मला कृष्ण फार प्रिय आहे. तोच तुला मी देतो. चल.” इतके बोलून शंकराने नरसीला गोपीचा वेष दिला. चांगले नटवले. त्याचा हात धरला व क्षणार्धात त्याला घेऊन गोकुळातल्या कालिंदी काठी आले.


तिथल्या सुंदर उपवनात श्रीकृष्ण गोपींबरोबर रास लीला करत होते. (त्या रासक्रीडेचे बरेच स्पष्ट वर्णन महिपतीबुवांनी केले आहे.) प्रत्येक गोपीच्या मनात कृष्ण आपला व्हावा ही इच्छा झाली की कृष्ण तिला आलिंगन देऊन तिथे रमायचा. गोपी मथुरेहून आल्या. वृंदावनातून आल्या. गोकुळच्याही होत्या नव्हत्या सर्व येऊ लागल्या. तस तसे श्रीकृष्णही तितकेच होऊ लागले. प्रत्येकीचा श्रीकृष्ण रासक्रीडा करू लागला.रासक्रीडा रंगात आली होती. शंकराने हळूच गोपी-नरसीलाही त्यांच्यामध्ये सोडले.

स्वत: कृष्ण ह्या नव्या गोपीजवळ आले. निरखत पाहात म्हणाले,” तू गोपी काही इथली दिसत नाहीस.तू तर मला नरसी दिसतोस जुनागडचा. भगवान शंकर कुठे आहेत ?” असे म्हणतच कृष्ण नरसीगोपीला घेऊन शंकराजवळ आले. शंकर म्हणाले ,”कृष्णा हा माझा भक्त नरसी आता तुझा झाला.” हे ऐकताच नरसीने कृष्णाच्या पायावर डोके ठेवले. कृष्णाने त्याला वर उठवले.त्याला मिठी मारून त्याला आपला केले. ते नरसीला म्हणाले, नरसी आता तू निश्चिंतपणे जा. मी आता तुला माझा म्हटले आहे. आता तू माझा आणि मी तुझा.” आणि हो,नरसी, इथले रासमंडळ, रासलीला तू स्वत: पाहिली आहेस. हे सर्व तू कवितेत लिहून काढ.” गुजराती ऱ्भाषेत नरसी मेहत्यांनी कुंजवनात पाहिलेला रासमंडळ कवितेत लिहून काढले.त्याचे “रासमंडळ” काव्यग्रंथ आजही गुजराथमध्ये आवडीने वाचला जातो.

नरसी मेहताला शंकराने पुन्हा जुनागड जवळच्या जंगलातील जुन्या शंकराच्या देवळात आणून सोडले व ते गुप्त झाले.

शंकराचा हा वैष्णव भक्त तिथे हरिनाम घेत हरीचे कीर्तन करू लागला. सगळीकडे इथे एक वैष्णव हरीकृष्णाचे फार मधुर कीर्तन करतो ही बातमी पसरली. नरसी मेहत्याचा भाऊही तिथे आला. त्याने आपल्या नरसीला लगेच ओळखले. मोठ्या प्रेमाकौतुकाने घरी नेले.


नरसी मेहता,महान नरसी भगत म्हणून ओळखला जाऊ लागला. घरचा व्यवसाय अंगावर पडला तरी त्याने तो आपल्याला चिकटू दिला नाही. यथावकाश नरसी मेहत्याचे गावातल्याच एका वैष्णवाच्या मुलीशी लग्न झाले. संसार रोजच सुखाचा होऊ लागला. नरसी मेहत्याला एक मुलगा आणि मुलगीही झाली. संसार फळाला आला.


दिवस वर्षे भराभर जात होती.नरसी मेत्याचा मुलगाही लग्नाचा झाला. नरसी मेहत्याच्या मुलाच्या लग्नाचा सोहळा पाहावा ऐकावा तितका अदभुत आहे. तोही आपण पाहू या.

सदाशिव पं. कामतकर

नरसी मेहत्याची हुंडी

शीव/चुनाभट्टी

श्यामापुरात नरसी मेहत्याच्या मुलाचे लग्न थाटामटात पार पडले.नव्या लक्ष्मीसूनबाईला घेऊन सर्वजण आपल्या जुनागडच्या घरी आले.आपला भक्त नरसी मेहत्याचे लोकांत कमीअधिक दिसू नये ह्यासाठी भगवान त्याचा व्यवहारिक योगक्षेमही चालवत होते.

एकदा द्वारकेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा जथा जुनागडात रात्री मुक्कामासाठी उतरला. धर्मशाळेत,देवळांमध्ये आपापली व्यवस्था लावून यात्रेकरू झोपले.सकाळी
सर्वजण उठले. कामाला लागले. एका यात्रेकरूजवळ मोठी रक्कम होती. प्रवासात रोकड नेणे सुरक्षित नाही म्हणून तो गावात सावकाराची पेढी शोधू लागला.काही लोकांनी नरसी मेहत्याचे नाव बद्दू करण्यासाठी यात्रेकरूला नरसी भगतचे नाव सुचवले. नरसी मेहत्याचे ते गुणवर्णनही करू लागले. ते यात्रेकरूला सांगू लागले ”अहो नरसी मेहता सावकार हा प्रेमळ भक्त आहे. सधन,नामवंत आहे.त्याचे वैभव विचारू नका.त्याच्याकडे जा; तुमचे काम झालेच समजा!” नरसी मेहत्याविषयी इतके चांगले ऐकल्यावर त्याने नरसीची पेढी घर कुठे आहे ते विचारले. त्यावर सगळे एकमुखाने सांगू लागले,
“पताका आणि वृंदावन। गरूडटके हरिकीर्तन। नरसी मेहत्याचे सदन। तेचि तू जाण।।”

यात्रेकरू नरसी मेहत्याच्या घराजवळ जसा आला तसे त्याला हरिनाम संकीर्तनाचे गोड सूर कनावर आले.यात्रेकरू खुणेबरहुकुम नेमका नरसी मेहत्याच्या घरी आला. सांगितलेले वैभव काही दिसेना पण वातावरण कुणाचेही मन प्रसन्न करणारे होते. वृंदावन मोठे होते. वैजय्ंतीही बहरली होती. समोरच विष्णुभक्त नरसी हरिकृष्णाला “तूच आमचा आनंदघन दयाळा, भक्त भूषण पांडुरंगा, सकळ देवांत तूच वरिष्ठ, भक्त वत्सला पांडुरंगा! हरेकृष्णा मायबापा! म्हणत त्याने दंडवत घातले. उठून पाहतो तर समोर यात्रेकरू उभा! यात्रेकरूने नमस्कार करण्या आतच नरसीने त्याला लवून नमस्कार केला. “ काय काम काढले माझ्यासाठी?” असे नरसीने विचारल्यावर लोकांनी नरसी मेहता किती मोठा सावकार आहे;त्याचे वैभव अमाप आहे; तुम्ही त्याच्याकडेच जा काम होईल असे सांगितल्यावरून मी तुमच्याकडे आलो आहे असे यात्रेकरू म्हणाला. लोकांनी आपली फजिती करण्यासाठीच ह्याला आपल्याकडे पाठवून दिले हे नरसी मेहत्याच्या लक्षात आले. मुलाला गूळ पाणी आणायला सांगितले. ते यात्रेकरूला दिले. मग यात्रेकरूने सातशे रुपये घेऊन त्याची हुंडी करून द्यायला सांगितले. आली का पंचाईत! पण द्वारकाधीशावर भरोसा ठेवून त्याने यात्रेकरूला सातशे रुपये वृंदावनाजवळ ठेवायला सांगितले. हुंडी लिहून दिली.

यात्रेकरूने नरसीचे”वैभव” पाहिले होते. मोठा सावकार पण त्याच्या ओसरीवर गाद्या लोड तक्के नव्हते हेही लक्षात आले. इतक्यात नरसीने यात्रेकरूला इतर यात्रेकरूंनाही घेऊन यायला सांगितले. मुलाला बोलावून गावातल्या लोकांना आणायला सांगितले.
गावकरी आले. इतर सर्व यात्रेकरूही आले.मुला जवळ सातशे रुपये देऊन यात्रेकरूंसाठी धोतर,लुगडी,पांघरुणे आणायला पिटाळले.तर सर्वांसाठी प्रसादही करायला सांगितला. त्या यात्रेकरू समोरच नरसी मेहत्याने सातशे रुपये खर्च करून संपवलेही होते.

यात्रेकरूने नरसीच्या हुंडीकडे पाहात विचारले.” सावकार , “तुमचा द्वारकेचा गुमास्ता आहे त्याचे नाव काय?” नरसी म्हणाला,” त्याचे नाव सावळसा सावता! गुमास्ता असला तरी त्याच्या पेढ्या पुष्कळ आहेत. मुख्य पेढी द्वारकेला. इतर दुकाने गोकुळ वृंदावन मथुरा इथेही आहेत. त्याची आणखी एक मोठी पेढी पंढरपुरला आहे. आणि नंतर हळूच म्हणाला मूळ पेढी क्षीरसागर येथे आहे!”
यात्रेकरू निघाला. पण विचार नरसीने दिलेल्या हुंडीचाच करत होता. “ हा नरसी मेहता तर सावकार वाटत नाही. नाही दिसण्या वागण्यात ना व्यवहारातही. कुणी चिटपाखरू आले नाही तिथे दिवसभरात! आणि मूळ पेढी क्षीरसागरला काय आणि गोकुळ मथुरेलाही गुमास्त्याच्या पेढ्या आहेत म्हणतो. कमाल म्हणजे पंढरपुरलाही मोठी पेढी आहे म्हणे. इकडचा कोण यात्रेकरू दूरच्या पंढरपूरला जातो! हुंडी तरी खरी आहेका? माझे पैसे बुडालेच म्हणायचे. बरे परतताना सातशे रुपये परत घ्यावे म्हटले तर ह्याने ते आपल्या समोरच खर्चून टाकले. समुद्रात एकदा विरघळलेले मीठ परत येते का? एकदा नदी समुद्राला मिळाली की ती समुद्राचीच झाली! तसे माझे पैसेही गेले ते गेलेच!बुडाले!”

यात्रेकरू द्वारकेत आला. द्वारकाधीशाचे डोळे भरून दर्शन घेतले. दर्शन झाल्यावर तिथल्या दोन पुजाऱ्यांना त्याने “इथे सावळसा सावता नावाचा गुमास्ता कुठे असतो?” विचारल्यावर असा कुणी गुमास्ता इथे नाही असे पुजाऱ्यांनी सांगितले. मग गावात एक दोन व्यापाऱ्यांना विचारले की सावळसा सावता गुमास्त्याची पेढी कुठे आहे? तर ते हसू लागले. “अरे कोण कुठला सावता? इथे असा कुणीही गुमास्ता नाही!” हे ऐकल्यावर तो रडायचाच बाकी राहिला होता. व्यापाऱ्यांनी,”अशी हुंडी कुणी दिली?” विचारल्यावर त्याने नरसी मेहत्याने दिली सांगितल्यावर तर ते खो खो हसू लागले! “तुला दुसरा कुणी भेटलाच नाही का तिकडे? पैसे बुडाले तुझे.” हे पूर्ण ऐकायलाही तो यात्रेकरू थांबला नाही. तो एका जुनाट वाड्याच्या ओट्यावर डोक्याला हात लावून बसला. त्याला खाणे सुचेना, पिणे रुचेना. हुंडीकडे वेड्यासारखा पाहात होता.

इतक्यात एक दिमाखदार चार घोड्यांचा रथ येताना दिसला. वाड्यावरून पुढे गेला. पण लगेच मागे फिरला. यात्रेकरूजवळ येऊन थांबला. त्या चकाकणाऱ्या रथाकडे व शुभ्र घोड्यांकडे तो पाहू लागला. रथातून एक मोठी सावकारी पगडी घातलेला, रेशमी धोतर व रेशमी लांब कोट त्यावर सोन्याच्या दोन साखळ्या व छातीवर कौस्तुभमण्याचा कंठा घातलेला, कानात पाणीदार मोत्यांची भिकबाळी, हातात चांदीची मुठ असलेली चंदनाची काठी घेतलेला,खरा श्रीमंत दिसणारा सावकार उतरला. त्याने यात्रेकरूला इथे ओसाड जागी का बसलास? येव्हढा खिन्न का? असे विचारल्यावर नरसी मेहत्याने सावळसा सावता गुमास्त्याच्या नावे दिलेल्या हुंडीची हकाकत सांगितली. आणि “नरसी मेहत्याने सावळसा सावत्याच्या नावावर मला फसवले. तो सावळसा सावता शोधून सापडत नाही ही सर्व हकीकत एका दमात सांगितली”. त्यावर त्या सावकाराने हसत हसत ,” अरे मीच तो सावळसा सावता. माझ्या नरसी मेहत्याचा गुमास्ता!”

हे ऐकल्यावर सातशे रुपयात अडकलेल्या त्याच्या जीवात जीव आला. हुंडी त्याने सावता गुमास्त्याला दिली.सारथ्याला रथातून थैली आणायला सांगितली . प्रथम गुमास्त्याने नरसी मेहताने दिलेली हुंडी डोळे मिटून कपाळाला लावली. मग थैलीतून सातशे कलदार नाणी काढून यात्रेकरूला दिली.
नाणी पाहून यात्रेकरुला आनंद झाला. आश्चर्य वाटत होते ते त्याने मोकळेपणाने उघड केले. यात्रेकरूने विचारले, “तुम्ही नरसीचे गुमास्ते आहात पण तुम्हीच घरंदाज गर्भश्रीमंत सावकार दिसता. आणि नरसी बघा! हे कसे?” त्यावर सावकार प्रसन्न हसत म्हणाला, का ह्यात काय विशेष ?

अहो कृष्ण कसा आणि त्याचा शाळासोबती सुदामा कुठे! गोकुळात कालिंदी काठी खेळणाऱ्या बाळकृष्णाची सर कुणाला येईल का? आणि त्याचा खेळगडी बोबडा लंगडा पेंद्या कुठे? पण गवताच्या काडीसारखा सुदामा आणि बोबडा पेंद्या कृष्णाचे जिवलग सखे नव्हते का? मग मी असा आणि नरसी भगत कसा म्हणण्यात काय अर्थ?” असे म्हणून परतताना तुझी भेट झाली तर नरसी मेहताला माझा नमस्कार सांग म्हणत गुमास्ता सावळसा सावता वैभवशाली रथात बसून केव्हा गेला ते मागे उडालेल्या धुळीच्या लोटात कुणालाही दिसले नाही.
यात्रेकरू कलदार नाणी मोजत होता. मोजून मोजून हात दुखू लागले. बसून बसून पायाला मुंग्या आल्या पण मोजायची नाणी संपतच नव्हती!

सदाशिव पं. कामतकर

हे असे हृदय फक्त आईचेच….

स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता. म. गांधींनी उभारलेला चंपारण्यातील हिंदुस्थानातील शेतकऱ्यांचा पहिला लढा सुरू होता. त्यानंतर मीठाच्या सत्याग्रह सारा देश अहिंसेच्या मार्गाने लढत होता. खेड्यापाड्यातील जनता निर्भय झाली होती. तशी ब्रिटिशांची दडपशाही सुद्धा वाढतच होती. त्याच काळातील एका गावातील तरुणाची आणि त्याच्या आईची ही कहाणी आहे.

आत्माराम गावातील आणि आजुबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला आपल्या लेखणीने तोंड फोडत होता.त्यामुळे त्याला त्याच्या गावचे आणि दुसऱ्या गावातील गावकऱीही चांगले ओळखत होते. त्याचे सगळेच लेख,पत्रे छापून येत नव्हती. पण जी येत त्यामुळे सरकार अस्वस्थ होत असे.त्यामुळे ब्रिटिश त्याच्यावर नजर ठेवून होते.

आत्माराम आणि त्याची आई असे दोघेच एका लहानशा मातीच्या घरांत राहात होते. सारवलेल्या अंगणातील एका झाडाखाली तो लिहिण्यात गर्क होता. आई चुलीपुढून बाहेर आली. पदराला हात पुसत डोक्यावरील पदर सारखा करत “ अरे मेरे लला जेवायला चल. किती वेळ झाला अजून लिहितोच आहेस. जेवून घे आणि पुन्हा लिहायला बस.चल.” आत्मारामला काही ऐकू गेले नाही. तो लिहिण्यातच गर्क होता. ओवरीतच बसत आई आपल्या एकुलत्या एक लेकाकडे मायेने आणि अभिमानाने पाहात होती. तो ओठात लेखणी ठेवून विचार करत पाहू लागला. आईला पाहिल्यावर तो म्हणाला,” आई तू जेवून घे ना. मला आज हा लेख पूर्ण केलाच पाहिजे.संपतच आलाय. तू जेवून घे.” “ अरे लल्लू अगोदर तू जेवल्याशिवाय मी कधी जेवले का?” इतक्यात गावातला धन्नोराम शेतमजूर खांद्यावरील फावडे खाली घेत आला. फावडे ठेवून आत्माराम समोर बैठक मारत मोठ्या उत्साहात त्याला आणि आईला सांगू लागला,” दादा, तुझा लेख पत्रात छापून आलाय. सगळीकडे लोक वाचताहेत. आणि तू आहेस म्हणून आम्हाला आधार आहे म्हणतात.” पण..पण.. सांभाळून हां. पोलीसही तुझ्या पाठीमागे लागलेत.जरा जपून लिही.” हे ऐकून आत्मारामच्या आईला आपल्या मुलाचा अभिमान आणि त्याच बरोबर त्याची काळजीही वाटू लागली.आई पुन्हा आत्मारामला जेवायला चल म्हणू लागली. पण लिहिता लिहिताच तो म्हणाला आई हा धन्नोराम आलाय. त्यालाही जेवायला वाढ आणि तूही जेव.” दोन मिनिटांनी आत्मारामचे लिखाण संपले तशी आई उठली आणि,” चला तुम्ही दोघेही जेवून घ्या.” आई आत गेली. दोन ताटे वाढून घेतली आणि बाहेर आली. आत्माराम आणि गरीब धन्नोराम जेवायला बसणार इतक्यात लोक,पोलीस आले!पोलिस आले! म्हणत आपापल्या घरात जाऊ लागले.

आत्माराम शांत होता. पण आई गोंधळून गेली. धन्नोरामही घाबरला. तो आत्मारामला,” आता काय करायचे?” असे विचारू लागला. त्यावर आत्माराम शांतपणे म्हणाला,” अरे मी काहीच केले नाही. खरे तेच लिहिले.” तो इतके म्हणे पर्यंत पोलिसांच्या पावलांचे व “कहाॅं रहेता वो बदमाश?” असे आवाज येऊ लागले.हे ऐकल्यावर धन्नोराम आत्मारामला,” तू कुठेतरी निघून जा! पळ!” असे सांगू लागल्यावर आत्माराम शांतपणे म्हणत होता,” का पळायचे मी? मी काही चोरी डाका घातला नाही. कर नाही त्याची डर कशाला?” तरीही धन्नो आईकडे हात जोडून पाहात आत्मारामला तू पळून जा हे पोलिस फार हाल करतात म्हणत राहिला.” आणि आत्माराम फक्त मान हलवत नाही नाही म्हणू लागला. आईला तर धसकाच बसला होता. दोघांसमोरची ताटे तशीच भरलेली होती. आणि पोलिस लाठी आपटत आले!

आत्माराम आणि धन्नोरामकडे डोळे वटारून मोठ्या जरबेने ,” तुमच्यातील आत्माराम कोण आहे?” असे फौजदार विचारू लागला. आत्मारामन पुढे येत मीच आत्माराम, साहेब” असे म्हणाला. “ बॅंकेवर दरोडा तूच घातलास; काय रे? हो का नाही?“ असे त्याच्या छातीवर दंडुका ठेवत विचारले. आत्माराम हा आरोप ऐकून चकितच झाला. त्याच्या आईला आपण हे काय ऐकतोय ह्यावर विश्वासच बसेना. ती फौजदारासमोर येऊन म्हणाली,” साहेब अहो हे काय म्हणताय तुम्ही? हा कसलाआरोप करताय माझ्या मुलावर? चोरी करणे दरोडा घालणे असले वाईट विचार माझ्या मुलाच्या मनांतही कधी येणार नाहीत!” तिला बाजूला ढकलून देत अधिकारी पोलिसांना म्हणाला, “घ्या रे ह्याच्या घराची झडती.”

धन्नोराम फौजदाराला विनवणी करत म्हणाला,” साहेब आमचा आत्माराम सज्जन आहे हो. तो असले काही कधीच करणार नाही!” “ अरे देखो! ये आया बादशाह सर्टिफिकेट द्यायला.काय बे तुलाही आत टाकू का?” हे ऐकल्यावर धन्नोराम जोडलेल्या हातांनीच मागे मागे सरकू लागला. त्या मातीच्या घरात डोके वाकवून तिघे पोलीस आत गेले.आणि थोड्या वेळाने एक एक एक पोलिस बाहेर आला. एकाच्या हातात अगदी लहान पिशवी सारखे काहीतरी होते. फौजदाराकडे ती देत,” ये मिल गयी साब.” म्हणाला.,फौजदाराचे डोळे लकाकले. मिळाला पुरावाअसे म्हणत त्याने पोलिसांना आत्मारामला ताब्यात घ्यायला सांगितले. पोलिस आणि फौजदार आत्मारमला घेऊन चालले. आत्मारामची आई रडत रडत धावत त्यांच्या मागे जात,” हे सगळं कुभांड आहे. माझ्या मुलाला सोडा, सोडा असे ओरडत, रडत भेकत त्यांच्या मागे जाऊ लागली. पण तिला कोण दाद देणार! आपल्या पोराला भरल्या ताटावरून उठवून नेले ह्याचे तिला राहून राहून दु:ख होत होते.धन्नोरामही डोक्याला हात लावून रस्त्यातच बसला.

कोर्टाने आत्मारामाला दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. हाच अधिकारी तुरुंगातही त्याचा अतोनात छळ करू लागला.त्यातच आत्मारामचा मृत्यु झाला.नंदरामची आई एकटी पडली. तिच्या काळजाचा तुकडाच जुलमी राजवटीने, त्या क्रुरकर्मा फौजदाराने हिरावून नेला होता. ती दैवाला दोष देत नव्हती. आत्मारामला पकडल्याचे शिक्षा झाल्याचेही दु:ख नव्हते. पण स्वातंत्र्यासाठी, लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून सरकारविरुद्ध लिहून लोकांत जागृती करणाऱ्या आपल्या मुलाला चोर दरोडेखोर ठरवून त्याच्या नावाला बट्टा लावला ह्याची तिच्या मनात आग धुमसत होती.

वर्षे उलटत होती. नवरा गेल्यावर तिचा मुलगा आत्माराम हेच तिच्या जगण्याचे एकमेव कारण होते. तोच त्या पोलिस अधिकाऱ्याने कपटीपणा करून तिच्यापासून हिसकावून नेला होता.

त्या अधिकाऱ्याला मोठी बढती मिळाली. त्यासाठी त्याने मोठ्या लोकांना मेजवानीसाठी बोलावले होते.आत्मारामच्या आईला हे समजले. कपडे चादर पांघरूणाचे एक बोचके घेऊन ती त्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंगल्याकडे जीवाच्या कराराने निघाली. आपला ओठ दाबून राग आतल्या आत दाबत निघाली. तिच्या मनात काय होते ते तिलाच ठाऊक!

बंगल्यावर पोचली. येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या लोकांची खूप वर्दळ होती. डोक्यावरचा पदर बराच पुढे घेऊन ती पायरीजवळ उभी होती. त्या वरिष्ठाचे तिच्याकडे लक्ष गेले. अधिकाऱ्याच्या तोऱ्यात त्याने ती इथे का आली वगैरे विचारले. मध्ये इतकी वर्षे गेली होती. तो तिला ही नंदरामची आई म्हणून कसा ओळखणार? तिने भुकेली आहे, काही खायला मिळेल तर बरे होईल”, म्हटल्यावर, “पीछे बाजू जाव. भांडी कुंडी घास. जेवायला जरूर मिळेल” असे तो म्हणाला.

समारंभ संपत आला. सगळे पाहुणे गेले होते.एखादा जवळचा कोणी थांबला असेल.आत्मारामची आई पुन्हा तिथेच डोकीवर पदर ओढून मान बाजूला करून उभी असलेली पाहिली. इन्स्पेक्टरने तिला पाहिले.आता काय पाहिजे असे जरा चिडूनच त्याने विचारल्यावर आईने तिला काम हवे असे उत्तर दिले. ते ऐकून तिथेच असलेल्या त्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या बायकोने मुलाला सांभाळायला राहतेस का असे विचारल्यावर आत्मारामची आई नम्रपणे मान हलवित, हां जी म्हणाली. त्या रात्रीपासून ती त्या बंगल्यात तान्ह्या मुलाला सांभाळण्यासाठी राहिली.

एके दिवशी ती मालकीणबाईच्या खोलीत चोर पावलाने गेली.बाळ आई शेजारच्या पाळण्यात झोपले होते. दबकत दबकत जाताना कशाला तरी तिचा पाय लागला. आवाज झाल्याने आई जागी झाली. नुकतीच कामाला लागलेल्या दाईला पाहिल्यावर बाळाच्या आईने, “बरे झाले तू आलीस ते! तुझ्याशिवाय त्याला करमत नाही. इतक्या थोड्या दिवसांत त्याला तुझा लळा लागला बघ!” आत्मारामाची आई किंचित हसत म्हणाली,” लहान बाळ ते! नेहमी समोर दिसणाऱ्याचे ते पटकन होते.” असे बोलणे चालू असताना मालकीणबाईला खालून साहेबांनी बोलावले. बाळाला दूध दे सांगून त्या खाली गेल्या. आत्मारामच्या आईला आपण कशासाठी ह्या घरात आलो आणि आता हीच संधी आहे ह्याची जाणीव झाली. ती बाळाच्या पाळण्याकडे गेली. वाकून बाळाकडे पाहू लागली. “ लवकर! लवकर! चल आटप! हीच संधी आहे तुला.लाव बाळाच्या नरडीला नख. पुन्हा ही संधी येणार नाही. दाब त्याचा गळा.?डोळे मिट आणि झटक्यात उरक हे!” आत्मारामची आई स्वत:ला सांगत होती. ती ह्या पोलिस अधिकाऱ्याच्या घरात आत्मारामच्या तुरुंगातील छळकपटाने झालेल्या मृत्यचा सूड उगवण्यासाठी आली होती.पाळण्यावर वाकली. निष्पाप बाळ तिच्याकडे तितक्याच निष्पापतेने,त्याच्या निर्मळ दृष्टीने पाहात होते. आत्मारामची आई आणखी ओणवी झाली.

काही करणार इतक्यात तिला आपल्या आत्मारामाचे,” आई आई ! तू जेवून घे आई!” हे नेहमीचे सांगणे इतक्या मोठ्यांदा कानात ऐकू आले की ती झटकन मागे सरली. तिने पुन्हा जवळ जाऊन बाळाला उचलून छातीशी घेतले. डोळे मिटून त्याला हळुवारपणे थोपटू लागली. दिवस चालले होते. आत्मारामची आई आतून प्रक्षुब्ध असायची पण त्या लहान बाळाला सांभाळत असता ती हळू हळू पुन्हा आत्मारामची आई होऊ लागली असावी का?बाळाला ती खाली ठेवत नसे. पण एक दिवस तिने आता घरी परतायचे ठरवले.

बाहेर पावसात भिजून आलेल्या बाळाच्या दाईला पाहिल्यावर मालकीणबाई व तो पोलिस अधिकारी दोघेही “बरे झाले तू आलीस. बाळाला घेऊन नोकर बाहेर घेऊन गेले होते. बाळ थोडे शिंकत होते,” वगैरे सांगू लागले. तिलाही कपडे बदलून यायला त्यांनी सांगितले.

आत्मारामची आई मालकिणबाईच्या खोलीत गेली. बाळाला अलगद घेऊन “ओ ल्ले ले ल्ले ! अले अले लब्बाडा म्हणत त्याला घेऊन फिरु लागली. मध्येच तिने बाळाच्या कपाळावरून गालावरून हात फिरवला. आणि ती जवळ जवळ ओरडलीच! “ मालकिन. मालकीन! मुन्ने को कितना बुखार है!” बघा बघा हात लावून पाहा बाईसाहेब. चटका बसतोय!” हे ऐकून त्या बाईसुद्धा घाबरल्या. साहेबाला बोलावू लागली. साहेबही घाबरले. आत्मारामची आई म्हणाली ,”मी बाळाला पाण्याने पुसून घेते.पण त्याची छाती भरलीय वाटते. साहेब काही करा. डाॅक्टरला पटकन बोलवा.” सगळ्यांची धावपळ सुरु झाली. आत्मारामच्या आईने पोटीस केले. बाळाच्या छातीला लावले. हळू हळू त्याला थापटत बसली. बाळाच्या आईच्या डोळ्यांतील पाणी खळत नव्हते. आत्मारामची आईसुद्धा चिंतेच्या घोरात पडली.

डाॅक्टर आले. त्यांनी बाळाला बराच वेळ तपासले. डाॅक्टरांनी अधिकाऱ्याला बाहेर बोलावले. त्याने घाबरत ,” माझा मुलगा बरा होईल ना?” इतकेच विचारले. डाॅक्टर म्हणाले,” त्याला न्युमोनिया होण्याची शक्यता आहे. मी इंजेक्शन दिलेय. पण त्याला शेकत राहिले पाहिजे. मधून पोटिसही लावले पाहिजे. ग्लुकोज घालून गरम पाणीही पाजवा.” इतके सांगून डाॅक्टर गेले.

आत्मारामची आई तीन दिवस रात्र बाळापाशी होती. क्षणभरही झोपली नव्हती. त्याचे औषधपाणी सगळे काही वेळच्या वेळी करीत होती. मनातला सूड संताप चीड आग कुठे गेली, केव्हा विझली तिलाही समजले नाही. ती पुन्हा आई झाली. त्या बाळाची जणू दुसरी आईच झाली होती.
बाळाच्या तब्येतीत उतार पडला. सगळ्यांचे चेहरे उजळले.

दोन तीन दिवस गेल्यावर आत्मारामची आई, मालकिणबाईंचा निरोप घ्यायला त्यांच्या खोलीत गेली.
“मालकीन, मुझे ईझाझत दो. मी निघते” असे ती म्हणाल्यावर बाई म्हणाल्या, “दाईमां, मला पाच मुले झाली. पण ती वाचली नाहीत. हे बाळ तेव्हढे वाचले. तेही तुझ्यामुळे. का जातेस? राहा इथेच. बाळालाही तू हवी आहेस.” तो दुष्ट अधिकारीही तेच म्हणाला. त्याही पुढे तो पश्चात्तापाने पोळलेल्या गहिवरल्या आवाजात सांगू लागला,” माझ्या नोकरीत मला नको नको त्या खोट्या नाट्या गोष्टी कराव्या लागल्या. छळ कपट करावे लागले. त्याचे बक्षिसही आमची पाच मुले न जगण्यात मिळाले असेल! तू राहा दाईमाॅं!”

आत्मारामाची आई काहीच बोलली नाही. बाळाला एकदा खेळवावे म्हणून तिने त्याला आपल्या हाताच्या झोक्यात घेतले. आणि ओ लाला! कैसे हो तुम ?! अरे बोल बेटा; हसो तो सही असे बाळाकडे व त्याच्या आईकडे पाहात ती म्हणू लागली.आणि अचानक बाळाकडे पाहात,” अरे काय झाले तुला? उठ. जागा हो.पाहा माझ्याकडे. अरे बाळा रे! पाहा पाहा!” म्हणत ती कावरी बावरी, घाबरी झाली. आणि, “ हे देवा हे काय झाले!हे काय झाले! म्हणत ती रडू लागली!”

बाळाच्या आई-बापाने तर हंबरडाच फोडला. आत्मारामची आई दगडासारखी स्तब्ध होऊन शून्यात बघत होती. मनात स्फुंदत स्फुंदत विचारत होती,” भगवंता!अरे हे तू काय केलेस? ! असं का केलेस? मी काय पाप केले म्हणून तू मला पुन्हा ही शिक्षा दिलीस? तू कसला दयाळू! अरे मला न्यायचे सोडून तू ह्या निष्पाप बाळाला नेलेस! अरे त्याने काय केले होते तुझे? कोणती आई तुला क्षमा करेल रे?!”

ती फक्त आत्मारामची आई आता फक्त आई होती! ती आई निर्जीव पुतळ्यासारखी पावले टाकीत जात राहिली.

(ही कथा हिंदी उर्दुतील प्रख्यात कथाकार प्रेमचंद मुन्शी ह्यांच्या ‘माता का हृदय’ ह्या कथेचे भाषांतर आहे)

सदाशिव पं. कामतकर