Category Archives: Real Life Stories

तत्वज्ञान जगणारा नाटककार

माझ्या थोरल्या भावाने संशय कल्लोळ नाटकात फाल्गुनरावाचे आणि चुलत भावाने भादव्याचे काम केले होते. दोघांनीही आपल्या भूमिका उत्कृष्ठ वठवल्या होत्या. कवडी चुंबक नाटकाचा एक प्रयोग एकदम आगळ्या वेगळ्या कलावंतांनी केला होता . कवडी चुंबकाच्या त्या प्रयोगात प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकारांनी भूमिका केल्या होत्या. त्यात आचार्य अत्रे ह्यांनी मुख्य भूमिका केली होती! खुद्द कवडी चुंबक चिक्कू शेठजीचे पात्र अत्र्यांनी रंगवले होते. प्रयोग अर्थातच खूप गाजला.

मोलीयेविषयी वाचत असताना हे दोन्ही प्रयोग डोळ्यांसमोर आले .

“हस्तलिखिते जळून नष्ट होत नसतात ” असे मिखाइल बुल्गाकोव्ह ने त्याचे ‘द मास्टर and मार्गारिटा” ह्या पुस्तकात म्हटले आहे. पण तो ज्याचा चाहता होता, ज्याचे त्याने “The Life of Monsieur de Moliere” हे चरित्र लिहिले त्या मोलीयेची अनेक पत्रे, काही अप्रसिद्ध लिखाण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले !इतकेच नव्हे मोलीयेचे अतिशय उत्कृष्ट गणले गेलेले अखेरचे पुस्तक L’Homme du Courही जळून भस्मसात झाले.

मोलिये हा फ्रेंच नाटककार, लेखक होता . तो इ.स. १६२२ साली जन्मला. आणि वयाच्या ५१ व्या वर्षी इ.स. १६७३ साली मरण पावला . त्याचे खरे नाव Jean-Baptiste Poquelin पण तो मोलिये या त्याच्या साहित्यिक नावानेच अजरामर आहे. जसे मार्क ट्वेन ओ हेन्री हे त्यांच्या टोपण नावानेच ओळखले जातात!

मोलिये हा अत्यंत यशस्वी नाटककार होता. त्याची नाटके सामाजिक दंभावर व्यक्तींच्या विक्षिप्तपणावर, लोभ-लालसा यावर हसत खेळत विनोदात टीका करणारी आहेत. विनोदी संवाद आणि उपरोधातून त्यातील विसंगती, हलकेच खेळकर शैलीत उलगडून दाखवणारी असल्यामुळे त्याची नाटके लोकप्रिय झाली. त्यातील प्रासंगिक नाट्यमय घटना आणि त्यातून निर्माण झालेले विनोदी प्रसंग यांनी ती नटलेली असत.

अनेकांप्रमाणे मोलीयेलाही आपण नट व्हावेसे वाटत होते . तो रंगमंचावरही आला . पण एक अडचण होती. मोलिये तोतरा होता प्रेक्षकांनी त्याची हुर्यो केली. त्याला शहाणपण सुचले. तो आपल्या ताकदीच्या, खऱ्या प्रांताकडे वळला. मोलिये लेखक झाला. नुसता साधारण नाही तर यशस्वी , लोकप्रिय प्रसिद्ध नाटककार म्हणून गाजला.

मोलीयेने स्वतची नाटक कंपनी काढली. त्याने ती चांगली चालविली.पण काही काळात अशी परिस्थिती आली कीं त्याची नाटक कंपनी बुडाली. मोलिये रस्त्यावर आला. पण त्यातूनही तो बाहेर येऊन चिकाटीने पुन्हा उभा राहिला. यश त्याच्याकडे पुन्हा आपसुख आले. मोलीयेला समृद्धी आली. मोलीयेवर प्रेक्षकच नव्हे तर राजघराण्यातील मंडळीही खूष होती.

असा हा मोलिये मोठा नशीबवान म्हणायला हवा. एकदा त्याच्या काही विधानांनी त्याला लोकक्षोभाला तोंड द्यावे लागले. पण त्यातूनही तो आपल्या बुद्धिबळावर बाहेर आला. अनुकूल -प्रतिकूल परिस्थितीचे हेलकावे खात असतानाही त्याच्या यशाचा झोका उंचच जात होता. पण यामागे केवळ त्याच्या नशिबाचा भाग नव्हता . त्याचे स्वभाव वैशिष्ठ्य म्हणजे अडचणींना संकटांना फजितीला तोंड द्यावे लागले तेव्हा त्यावर तो आपल्या विनोद-बुद्धीच्या जोरावर मात करू शकला. अडचणी-संकटाचे त्याने हसतमुखाने आणि बुद्धीच्या जोरावर संधी मध्ये रुपांतर केले. टीकेचे घावही त्याच्यासाठी फुलांचे हार होत असत.

ह्यामागे होता तो त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन; हेच त्याच्या आनंददायी विनोद-प्रचुर लिखाणाचेही मुख्य गमक होते. माणसांच्या दुर्गुणा कडेही तो त्यांच्या चुका, गफलती असे समजून पाहत असे . गंभीर परिणाम होऊ शकणाऱ्या घटनाही हास्यकल्लोळात बुडवून त्या एकदम हलक्या फुलक्या करणाऱ्या विनोदी माणसाने-लेखकाने चिमटे काढले तरी कोणी फारसे ओरडत नाही . ओरडले तरी त्यातून ते नकळत काही तरी शिकतात, धडे घेतात .

मोलीयेच्या या स्वभावविशेषा मागे त्याच्यावर असणाऱ्या ऱोमन तत्वज्ञानी ल्युक्रेशसचा मोठा प्रभाव ! त्याकाळच्या विद्यार्थ्यांना तत्वज्ञानी ल्युक्रेशस वाचावा लागे. ल्युक्रेशसच्या मते,” देव ही संकल्पना अनावश्यक आहे. माणसाचे दोष, त्याच्या चुका घोडचुका हीच त्याला मोठी शिक्षा आहे. परिस्थिती विरुद्ध तक्रारी न करता, कुरकुरत न बसता आपण पुढे जावे. दुख: टाळावे. त्यावर अति कुढत बसू नये. आनंद आपणहून आपल्याकडे येतो ” असे त्याचे तत्वज्ञान थोडक्यात सांगता येईलस्वर्गाचे अस्तित्व न मानणाऱ्या ल्युक्रेशसच्या जीवन दृष्टीने स्वर्ग नसतानाही इथेच आनंद, सुख मिळवता येते.

मोलीयेवर ल्युक्रेशसचा मोठा प्रभाव होता यात शंका नाही. मोलिये ह्या तत्वज्ञानानुसार जगला.

मोलीयेने ल्युक्रेशसच्या लाटिन ग्रंथाचे फ्रेंचमध्ये भाषांतर केले होते . १८६१ साली ते पसिद्ध करू असे तो म्हणत होता पण ते काही प्रसिद्ध झाले नाही !ख्रि.पू. ९८ साली जन्मलेल्या ल्युक्रेशसचे On Nature of the Universe/things हे एक दीर्घ काव्य आहे. त्याने आपल्या मृत्युच्या आधी हे लिहिले तो त्याकाळी देव-धर्माविषयी अश्रद्ध,समजला जात होता. तो ख्रि.पू. ५५ साली वारला.
मोठ्या दु:खाची आणि विचित्र गोष्ट अशी की तत्वज्ञानी ल्युक्रेशसला आपल्या विचारांमुळे एखादे संकट येणार याची खात्री होती. त्यासंबंधात त्याला माहितीही झाली असावी. पण त्या येणाऱ्या संकटातून वाचण्यासाठी, त्याचे परिणाम टाळण्यासाठी, या तत्वज्ञानी ल्युक्रेशसने आत्महत्या केली !

मोलिये मात्र कुणीही आपल्या आयुष्याचा असा शेवट करण्याच्या ठाम विरोधी होता. मोलीयेचे आयुष्य हे,बऱ्याच अंशी, ल्युक्रेशसच्या तत्वज्ञानाचा वस्तुपाठच होता. तो संकटाने डगमगला नाही .दु:खात कुढत बसला नाही.

मोलीयेने लिहीलेल्या नाटकांपैकी रंगभूमीवर यशस्वी ठरलेली काही नाटके The Miser, The School for Lovers, Le Misanthrope ही होत. मराठी वाचक-प्रेक्षकांना मोलिये जवळचा वाटतो कारण त्याची दोन नाटके, मोलिये इतक्याच प्रतिभावंत अशा दोन मातब्बर मराठी नाटककारांनी मराठीत आणली. ती सुद्धा मराठी रंगभूमीवर गाजली. ह्या दोन्ही नाटकानी मराठी प्रेक्षकांना मनमुराद हसवले. गो. ब. देवल यांचे संशय कल्लोळ आणि आचार्य अत्र्यांचे कवडी चुंबक. ही नाटके पहाताना वाचताना ती रुपांतरीत आहेत असे क्षणभरही जाणवत नाही. इतकी ती स्वतंत्र मराठी नाटके वाटतात. संशय कल्लोळचे एक लहानसे वैशिष्ठ्य आहे. यातील मुख्य पुरुष पात्रांची नावे मराठी महिन्यांची आहेत.फाल्गुनराव, वैशाखशेठ आणि भादव्या. स्त्री पात्रांची नावे रेवती कृत्तिका अशा नक्षत्रांची आहेत.

देवलांनी तर त्या काळच्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन संशय कल्लोळ संगीत नाटक केले.त्यातली “कर हा करी धरिला शुभांगी” ह्या सारखी गाणी अजूनही कार्यक्रमात म्हटली जातात अत्र्यांच्या कवडी चुन्बकात नायक-नायिकेच्या नावांभोवती एक सुगंधी परिमल दरवळतो! कारण त्यांची नावे! केशर आणि कस्तुरी ! आचार्य अत्र्यांचे कवडी चुंबक आताही रंगभूमीवर आले तर आजही संपूर्ण नाट्यगृह सतत हसत राहील !

शब्दब्रम्हाचा किमयागार

मला डॉल्बी म्हणजे काय हे बरेच दिवस माहित नव्हते. चार पाच शब्ब्दांची पहिली अक्षरे घेऊन हा शब्द झाला असावा असे वाटे .नंतर डॉल्बी साउण्ड, डॉल्बी Surround, Dolby Atoms हेही फक्त ऐकून, वाचून माहित झाले. पण म्हणजे नेमके काय ते लक्षात येत नव्हते.

मागच्या महिन्यात गुरुवारी १३ सप्टेंबरला रे डॉल्बी यांचे निधन झाले.तेव्हा डॉल्बी म्हणजे Dolby Sound System आहे आणि रे डॉल्बी हा तिचा जनक हे मला समजले.

गेल्या काही दशकापासून चित्रपटातच नव्हे तर सर्व ध्वनि साधनांत Dolby ध्वनि तंत्रच वापरले जाते. डॉल्बीच्या यशाला सीमा नाहीत. डॉल्बी तंत्र आज ७ . ४ बिलियन्स (अब्ज) इलेक्ट्रिक साधनांत वापरले जात आहे !

जे ऐकून, वाचून माहित होते ते थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिल्यावर डॉल्बी ही काय चीज आहे ते जाणवले. डॉल्बी म्हणजे आवाज स्पष्टापेक्षाही सुस्पष्ट करणारी, आवाज निर्भेळ स्वरूपात ऐकायला देणारी डॉल्बी सिस्टिम. म्हणजे ध्वनि-पद्धती. पण हे भाषांतर झाले. चित्रपट पहाताना आवाजातून उमटणाऱ्या भाव-भावना आणि अभिनयही जाणवू लागल्यावर डॉल्बी साउण्ड सिस्टीम ही केवळ ध्वनि -पद्धत नसून शरीरातील मज्जा-संस्था, श्वसन-संस्थेसारखीच ती आपल्या देहातील ध्वनि संस्थाच झालेली असते ! परवाच Gravity हा चित्रपट पाहिला तेव्हा आवाजाच्या सामर्थ्याचा पुन:-प्रत्यय आला .

डॉल्बीने आवाजातील धिस्स, हिस्स , खर्र खर्र वगैरे गोंगाट (chaos, static sound) असतात ते पूर्णतया काढून टाकले. एवढेच नव्हे तर ध्वनीच्या सर्व लहान मोठया, परमाणु इतक्या सूक्ष्म पैलूंचा विचार करून ध्वनीला नियमित, नियंत्रित करता येणे त्याने आपल्या तंत्राने शक्य केले. डॉल्बी तंत्रामुळे आवाजाचा हवा तो नेमका परिणाम साधता येतो. एका अर्थाने डॉल्बी तंत्राने ध्वनीला सगुण मूर्त रूप दिले! विश्वास बसणार नाही पण गेल्या २५-३० वर्षांपासून डॉल्बी तंत्राने आणलेल्या नित्य नव्या शोधांनी आपण ऐकावे कसे हे ठरवून दिले! सिनेमा नाटकाचे प्रेक्षकच नाही तर इतर अनेक गोष्टींचे श्रोते ऐकणाऱ्या विषयाशी केवळ आवाजामुळे समरस होतात. म्हणूनच Star Warsचा जनक जॉर्ज ल्युकास डॉल्बी पद्धतीचा आणि तिचा निर्माता रे डॉल्बीचा गौरव करताना म्हणतो, “Star Warsशी प्रेक्षक इतके तन्मय होतात त्याचे रहस्य डॉल्बीच्या आवाजाच्या शक्तीत आहे ! रे डॉल्बी आवाजाशीच पूर्णपणे मिसळून जातो इतकी त्याला ध्वनी या विषयाची तीव्र आवड आहे. नुसती आवडच नव्हे तर ध्वनी विज्ञानचा एकूणच तो एकदम ‘दादा’ आहे; ‘बापमाणूस’ आहे हो तो!’

रे डॉल्बी रेडवूड सिटी मधील सिकोइया हायस्कूलमध्ये शिकला. ८-९वीत असल्यापासून त्याने संगीताच्या चुंबकीय फितीवर होणाऱ्या ध्वनि मुद्रणात सुधारणा करण्यास सुरुवात केली .हायस्कूलमध्ये असतानाच रेडवूड सिटी इथल्याच Ampex कंपनीत तो तंत्रज्ञ म्हणून काम करत होत. मग त्याने स्टन्फ़र्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला . त्या काळात तो Ampex कंपनीत Chief Designing Engineer या पदावर पोचला होता.! १९५७ साली तो Stanford University तून इले. इंजिनिअर होऊन बाहेर पडला . पण त्याआधीच १९५६ साली बाजारात आलेल्या Video audio Recorderमधील सर्व इलेक्ट्रोनिक भागांची आखणी आणि रचना रे डॉल्बीनेच केली होती. त्यानंतर त्याने इंग्लंडच्या केम्ब्रिजमधून क्ष-किरणांच्या दीर्घ लहरींचे सूक्ष्म विश्लेषण यावर डॉक्टरेट मिळवली. १९६३ ते १९६५ तो हिंदुस्थानात सरकारचा तंत्रज्ञान विज्ञानाचा सल्लागार होता.

डॉल्बीने आपली कंपनी स्थापन केली. Dolby, In Dolby, Dolby Surround , किंवा अगदी अलीकडे Dolby Atoms अशी अक्षरे दिसली की प्रेक्षकांना आपल्याला आज जबरदस्त ऐकायला मिळणार याची खात्री असते. “आज सिलिकॉन व्हली नाव सर्वतोमुखी आहे. पण त्या अगोदर कितीतरी वर्षे सर्व जगाला Digitalचा अनुभव, आनंद डॉल्बी देत होता” असे ज्याच्या Right Stuff या चित्रपटाला चार ऑस्कर मिळाली तो, १३ चित्रपटांचा दिग्दर्शक फिलिप कॉफमन म्हणतो ते निर्विवाद सत्य आहे. रे डॉल्बीचे मोठेपण यात आहे.

Invasion of the Body Snatchers चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तर “डॉल्बी आवाज” हाच एका दृश्याचा प्राण कल्पून; “आवाज” हेच मुख्य पात्र कल्पून त्या संपूर्ण दृश्याचे चित्रण केले.

ब्रॉडवेच्या बोगद्यातून मोटार-सायकली आणि मोटारी जात आहेत असे ते दृश्य होते प्रेक्षकांना ते ‘ दृश्य’ ऐकून’ आपण बोगद्यातच आहोत; आपल्या पुढून, मागून ,आजूबाजूने मोटारी, मोटार-सायकली रोंरावत,घोंघावत भरधाव वेगाने जात आहेत असे वाटत होते.

‘डॉल्बी’च्या चित्रपटात प्रेक्षक ‘प्रेक्षक’ न राहता श्रवणकुमारच होतत. डॉल्बीने आपण पूर्ण वेढलेले असतो. व्याप्त झालेले असतो. डॉल्बी आवाज कानापुरातच मर्यादित नसतो. सर्वांगाला व्यापून टाकतो. हृदयाचे ठोके चुकतात. छाती धडधडते. थिएटरभर डॉल्बीची हुकमत असते.’ डॉल्बी’ कानातच नसतो. शरीरात संचारत असतो. इतर आवाज श्रुती तर ‘डॉल्बी’ अनुभूती असते!

ह्याच फिलिप कॉफमनने डॉल्बी धडाक्याचा एक गंमतीदार किस्सा सांगितला.” Right Stuffचा खेळ सुरु होण्यापूर्वी मी ऑपरेटरला जाऊन सांगितले आज माझ्या शेजारी हेन्री किसिंजर (हे अमेरिकेचे गाजलेले परराष्ट्र मंत्री) आहेत. रॉकेट सोडण्याचे दृश्य पहाताना किसिंजरना घाम फुटला पहिजे. चेहरा हनुवटीसकट थरथरला पाहिजे”. आणि ऑपरेटरनेही त्याच धडाक्याने रॉकेटस सोडली!

रे डॉल्बी केवळ बुद्धिवान संशोधक, यशस्वी उद्योजक नव्हता. मोठा हौशी होता . त्याने जगण्याचा चौफेर आनंद घेतला.

डॉल्बीला मोटर आणि मोटार सायकलीची फार आवड होती. इंग्लंडमध्ये असताना त्याने मोटरसायकलीवरून बरेच वेळा युरोप पालथा घातला होता. हिंदुस्तानातील आपला कार्यकाळ आटोपल्यावर तो इंग्लंडमध्ये आला. तेव्हा बायकोला बरोबर घेऊन त्याने मोटारीतून युरोपची सफर केली. मोटरच काय डॉल्बी विमानही चालवायचा. त्याचे स्वत:चे सेसना-सायटेशन १२ विमान होते. हा बहाद्दर अमेरिकेतल्या पन्नास राज्यात आणि तीस देशात हे विमान स्वत: चालवून गेला अहे. सतरा वेळा स्वत: विमान चालवत अटलन्टिक महासागर ओलांडला आहे!

Rock Bandची बस असते तशी रंगीबेरंगी चाळीस फुटी बस त्याने करवून घेतली. ह्या बसमधून बायको मुले नातवंडांसह सहली-प्रवासाचा आनंद उपभोगला.

डॉल्बी इंग्लंडमध्ये असताना तिथेच भेटलेली विद्यार्थिनी Dagmarशी त्याचे लग्न झले.त्या दिवसांपासून ही दोघे सदैव जोडीनेच राहिली. कुठल्याही सभा-संमेलनाला, सिनेमा-नाटकाला किंवा पार्ट्या-उत्सवाला दोघेही एकत्रच असायचे. त्यांना लोकांनी कधी एकेकटे असे पाहिलेच नाही. दोघे असूनही त्यांची एकच सावली पडायची!

प्रत्येकाला आपले आयुष्य जसे असावे, लाभावे असे वाटते तसे आयुष्य रे डॉल्बी यांना लाभले.

१९९७ साली रे डॉल्बी यांना त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हस्ते National Medal of Technology and Innovation हे मानाचे पदक मिळाले. त्यावेळी डॉल्बी यांनी अत्यंत साध्या शब्दांत जे सांगितले ते लाख मोलाचे आहे. त्यांत त्यांची शालीनातही दिसून येते. ते म्हणतात , “आयुष्याचा पहिला भाग शिक्षणाचा, शिकण्याचा असतो. दुसरा भाग कष्ट आणि मेहनतीचा असतो. आणि मग मग तुम्ही लोकांसमोर येता. आणि लोक तुम्हाला मान-सन्मानाची पदके देऊ लागतात.”

चित्रपटाचे प्रेक्षक संगीतासाठी, कधी आपल्या हृदयाची धडकन असणाऱ्या नटीसाठी, आवडत्या नायकासाठी चित्रपट पहायला गर्दी करतात. पण ‘जिवंत’ आवाजाने घाबरण्यासाठी, चित्त थरारण्यासाठी, हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या भरधाव वाहनांच्या आवाजासाठी, पानांची सळसळ ऐकताना कावरेबावरे होण्यासाठी, चालताना पाचोळ्याचा आवाज ऐकताच एकदम मागे वळून पाहण्यासाठी, मध्येच पक्षी चित्कारत गेला की… पुढे काय… अशा उत्कन्ठ्तेने प्राण कंठात आणणाऱ्या अनुभवासाठी लोकांना चित्रपटाला खेचून आणणाऱ्या ‘डॉल्बी आवाजाला’ तेव्हढ्याच ताकदीचा ‘प्रमुख कलाकार’ बनविणाऱ्या रे डॉल्बीने आवाजाच्या प्रदेशात क्रांती केली यात शंका नाही.

संस्कृतात ‘शब्द’ म्हणजे ध्वनि, आवाज असा अर्थ आहे. डॉल्बी पद्धतीमुळे सर्व सामान्य माणसांना या शब्दब्रम्हाचा साक्षात्कार होऊ शकतो याचे श्रेय रे डॉल्बी या ‘शब्दब्रम्हाच्या किमयागाराला ‘ आहे.

आयुष्यात सर्व राजयोग लाभलेल्या रे डॉल्बी नावाच्या एका बुद्धिमान कुटुंबवत्सल यशस्वी उद्योजकाच्या आयुष्याची कहाणी गुरुवार ता. १३ सप्टेंबर रोजी साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली.

हेमिंग्वे

हेमिंग्वेची बायको स्वित्झर्लंडहून परत आली ती फक्त हातातल्या एका लहानशा बेगेनिशी ! हेमिंग्वेने काही विचारण्या अगोदरच तिने इतर सर्व बेगा सामान-सुमान चोरीला गेल्याचे सांगितले. हेमिंग्वेच्या तोंडून एक शब्द फुटेना.

१९२२ साली हेमिंग्वेची बायको Hadley आपल्या भल्या मोठ्या बगासह स्वित्झर्लंडला चालली होती. एका बेगेत हेमिंग्वेने लिहिलेले सर्व लिखाण होते. इतर सामानाबरोबर ती ट्रंकही चोरीला गेली ! उमेदीच्या वर्षांत केलेले सगळे लेखन गेले. ही घटना त्याच्या मनात कायमचे घर करून राहिली .

Ezra Pound आणि Gertrude Stein ह्या सारख्या त्याच्या मित्र-मैत्रिणीने त्यावेळी हेमिंग्वेला धीर दिला. “जे काही लिहिले होतेस ते विसरून जा. पुन्हा नव्याने लिहायला सुरुवात कर.” असा मोलाचा सल्लाही दिला.

आपले सर्व लिखाण चोरीला गेल्याचे बायकोकडून समजल्यावर हेमिंग्वेला राहवेना. तो लगेच पुन्हा स्वित्झर्लंडच्या प्रवासाला निघाला. त्याने वाटेत ठिकठिकाणी कसून चौकशी केली. तपास केला. पण त्याच्या हाती काही लागले नाही. आपण लिहिलेला कागदाचा कपटा न कपटानाहीसा झाला याची पुरती खात्री पटल्यावर तो परत आला.

“घरी परत आल्यावर मी काय केले ते मला चांगले आठवते ” असे हेमिंग्वे म्हणतो पण त्याने काय केले ते मात्र कुठेही लिहिले नाही. तो संतापाने चिडला, चडफडला की त्याने राग दुसऱ्यांवर काढला; का निराश होऊन तो सुन्न बसून राहिला; मनाला बसलेला धक्का, दु:ख त्याने दारूच्या पेल्यामागून पेल्यांत बुडवले किंवा दु:खाने रडला, आक्रोश केला ते कुणालाच समजणार नाही.

खूप वर्षानंतर ह्याविषयी तो म्हणाला,”मेंदूची शस्त्रक्रिया करून ती आठवण नष्ट करता येणार असती तर तशी शस्त्रक्रियाही मी करून घेतली असती.”
वाचकांचे दैव बलवत्तर म्हणून हेमिंग्वेने आपल्या हितचिंतक मित्रांनी दिलेला सल्ला ऐकला . नव्या हुरुपाने त्याने पुन्हा लिहायला सुरवात केली.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. तसे लेखकाच्या प्रतिभेच्या पाऊलखुणा शाळेच्या नियतकालिकात दिसत असाव्यात . हेमिंग्वे हायस्कूलमध्ये असताना शाळेच्या नियतकालिकाचा आणि वार्तापत्राचा तो लेखक आणि संपादकही होता. शाळेतून बाहेर पडल्यावर त्याने काही दिवस वार्ताहराचेही काम केले .
पहिल्या महायुद्धात तो लष्करात भरती झाला. तिथे तो रुग्णवाहिका चालक होता. त्याला इटलीच्या आघाडीवर पाठवले. तिथे लढाईत त्याला गोळी लागली. हेमिंग्वे गंभीर जखमी झाला होता. पण तशाही अवस्थेत, खंदकात पडलेल्या जखमी सैनिकाला खांदयावर घेऊन त्याने त्याला इस्पितळात आणले. ह्या धाडसी कृत्याबद्दल इटलीने हेमिन्ग्वेला शौर्यपदक दिले. युद्ध आघाडीवरून जखमी होऊन परतलेल्या हेमिंग्वेला कही महिने रुग्णालयात काढावे लागले .

युद्धाच्या अनुभवावर त्याने आपली गाजलेली फेअरवेल टू आर्मस Farewell To Arms ही कादंबरी लिहिली. त्यानंतर तो काही काळ पत्रकार म्हणून काम करत होता. या बाबतीत हेमिंग्वेचे मार्क ट्वेन याच्याशी साम्य आढळते. मार्क ट्वेन प्रमाणेच कादंबरीकार म्हणून प्रसिद्धीला येण्यापूर्वी हेमिंग्वेही वार्ताहर होता.

१९३७ मध्ये हेमिंग्वे स्पेनच्या युद्धात परदेशी वार्ताहर म्हणून आघाडीवर गेला .ह्या युद्धाच्या अनुभवाची परिणितीही एका प्रख्यात कादंबरीत झाली. १९४० साली हेमिन्ग्वेची सर्वांना माहित असलेली फॉर हूम द बेल् टोल्स ही कादंबरी प्रकाशात आली. ह्यावर निघालेला सिनेमाही लोकप्रिय झाला होता.
दुसऱ्या महायुद्धातही तो वार्ताहर म्हणून गेला. नॉर्मंडीच्या महाप्रचंड मोहिमेत तो होता . फ्रान्समधील प्रतिसरकारच्या एका अत्यंत लहानशा तुकडीचे पुढारीपण करत इतर विजयी सैनिकांबरोबर त्याने पारीसमध्ये प्रवेश केला .

हेमिंग्वेचे वडील डॉक्टर होते. वाङ्ग्मय , इतिहास हेही त्यांचे आवडीचे विषय होते . त्याशिवाय ते शिकारीलाही जात. मासेमारीचाही छन्द जोपासत होते. उघड्या वातावरणातील जगण्याच्या ह्या आवडी निवडी हेमिंग्वेमध्येही उतरल्या होत्या.

हेमिंग्वेची आई फार कजाग होती. आपल्या नवऱ्याला ती वाटेल तसे टाकून बोलायची. सारखे त्याला टोचून बोलायची. हैराण करायची. हेमिंग्वेचे वडील तिचे असले हे भांडकुदळ स्वभावाचे वागणे बोलणे, तिचा संताप, चिडचिड सहन करायचे. पण अखेर असह्य होऊन त्यांनी आत्महत्या केली.

हेमिंग्वे आपले गाव, घराभोवातीचा परिसर ह्याविषयी लिहिताना म्हणतो, “Lawns were wide and minds were narrow.” “घरे मोठी पण मने कोती.” हे लिहिताना हेमिंग्वेच्या डोळ्यांसमोर त्याची आईच असावी!

हेमिन्ग्वेला डोंगर- दऱ्यातून, रानावनातून भटकणे , शिकारीला जाणे , समुद्र , मासेमारीची आवड मुष्टियुद्ध करणे ह्या गोष्टी फार आवडत असत. आपल्या वडलांकडून त्याला साहित्याची आवड मिळाली तसेच त्यांच्याकडून राकट आयष्य जगण्याचा गुणही प्राप्त झाला असावा. अशा अनुभवातूनच त्याची Old Man and the Sea ही नोबेल पारितोषिक विजेती कादंबरी निर्माण झाली असणार.

हेमिंग्वेच्या वडलांप्रमाणेच हेमिंग्वेच्या बहिणीने आत्मत्या केली. स्वत: हेमिन्ग्वेनेही आत्महत्या केली. त्याहून दु:खाची गोष्ट अशी की हेमिंग्वेच्या नातीनेही आत्मघातच केला! हेमिंग्वेच्या बहुतेक सर्व कादंबऱ्या नावाजल्या गेल्या . त्यावर निघालेले चित्रपटही तितकेच यशस्वी झाले. त्यामुळे हेमिंग्वेचे नाव सर्वसामान्यालाही माहित झाले . साहित्याचे जगातील सर्वोच्च पारितोषिक मिळून मोठा गौरव झाला . यश लाभले, कीर्तिहि मिळाली.

हेमिंग्वेचे एक वचन इथे सांगण्याचा मोह आवरत नाही. इतर काही न लिहिता असे एखादे वचन लिहूनही तो मोठा ठरला असता. “All things truly wicked start from innocence.” आपण ह्यावर जितका विचार करू तसे आपल्याला हे केवळ वाक्य अथवा वचन न वाटता ते गहन गूढ गभीर अर्थाचे एक सूक्त आहे असे वाटू लागेल. हेमिंग्वेचे मानवी स्वभाव, विचार, कार्यकारणभाव यांचे किती सखोल चिंतन असेल याची आपण कल्पना करू शकतो.

हेमिंग्वे प्रत्येक गोष्टीत स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन आयुष्यात रस घेत जगला. प्रतिभावंत, मुक्तपणे स्वच्छंदात जगणारा, मानमरातब, नावलौकिक लाभलेल्या हेमिंग्वेचा असा दुर्दैवी शेवट व्हावा हे समजल्यावर आपण वाचक हळहळण्या शिवाय काय करू शकतो !

झाले मेरु -मंदार धाकुटे!

तारखा, वार , दिवस रोजच येतात आणि जातात . पण एखादीच तारीख , तो वार , तो दिवस कायमचा लक्षात राह्तो. दुपारचे दोनही रोजच वाजतात . पण २३ जुलै २०१३ आणि त्या दिवशीचे दुपारचे दोन ह्यांना अनन्य महत्व आहे . हा दिवस आपल्या सर्वांच्याच लक्षात राहणार आहे . कौतुक आपल्या डोळ्यांतून ओसंडेल आणि ऊर अभिमानाने भरून येईल . आपल्या कल्याणीचे किती कौतूक करावे असे होईल . कारण याच दिवशी–२३ जुलै २०१३ दुपारी २. ०० वाजता कल्याणीने हिमालयाचे २२०००फूट उंचीवरचे छामसेर(समशेर) कांगडा शिखर सर केले , जिंकले!

हिमालय, २२००० फूट, छामसेर शिखर, प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्यक्ष पराक्रमालाच आव्हान आहे. कल्याणीने ते शांतपणे स्वीकारले. चिकाटी, दृढ निश्चय, मनाचा शांतपणा आणि अंगभूत उत्साहाच्या जोरावर तिने हिमालय चढून ती छामसेर (समशेर) कांगडा शिखरावर गेली. कल्याणी ”समशेर’ बहाद्दर झाली .

कल्याणीच्या या धाडसी, साहसी मोहिमेचे थोडक्यात वर्णन आपण तिच्याच शब्दांत . ऐकू या…।

“पुण्याहून आम्ही अकराजण दिल्ली-मनाली-लेहला जाण्यासाठी निघालो. दिल्लीला पोचलो . दिल्लीहून मनालीला आम्ही बसने आलो . मनालीहून लेहला जाण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले. कारण वाटेत एक रात्र मुक्काम केला होता ”

“लेहला आल्यापासून श्वासोश्वास घेणे अवघड होऊ लागले . कारण तिथली उंची! तिथून २४०किमीचा प्रवास करून कारझोकला आलो . इथे आमच्यापैकी एकाला श्वासोश्वास घेणे फारच अवघड, जड होऊ लागले. त्याला आम्ही लगेच लेहला माघारी पाठवले . तिथे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले . तो बरा झाला . पण मोहिमेत काही परत येऊ शकला नाही ”

“कारझोकला तिथल्या वातावरणाची, विरळ हवेशी जुळवून घेण्याची सवय होण्यासाठी आम्ही रोज दोन-तीन तास चढ-उतर करत असू . हे झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या बाजूने हिमालय चढून जाणार होतो त्या वाटेकडे निघालो. ते १५ किमीचे अंतर चालून जायला आम्हाला ७ तास लागले !”

” तिथेच त्या क्युरूच या ठिकाणी आमचा दुसरा तळ आम्ही ठोकला . इथेही आम्ही तिथल्या हवेची सवय होण्यासाठी तीन-चार तास चढ-उतार केली .”

“पर्वतावर इतरत्र बर्फ होता पण आम्ही ज्या बाजूने चढून जाणार होतो तिकडे बर्फ नव्हता . ठिसूळ, खडकाळ घसरडी अशी ती बाजू होती .बर्फ असता तर बरे झाले असते . कारण बर्फातून चढून जाण्यासाठी बूट असतात त्यांच्या spikesमुळे पायाची पकड तरी घट्ट होते. आमच्या बाजूच्या पर्वताचा भाग ठिसूळ,खडकाळ आणि घसरडा . त्यामुळे घसरतच पुन्हा चढायचे . दोन फुट वर गेले की एक फुट खाली . गणितातल्या त्या पालीसारखे!”

“चढण वाढत जाऊ लागली तसे श्वास घेणेही अवघड होऊ लागले . तो घेणेही एक ‘चढण’च वाटायचे . तरीही २१ जुलैला आम्ही दहाजण १८,००० फूटावर जाऊन पोहचलो . इथे आम्ही आमचा Base-Camp तळ ठोकला . त्या दिवशी हवा फार ढगाळ झाली होती . सगळीकडे अगदी ढगाळ झाले होते .. उद्या शेवटची चढाई करायची असे ठरले होते. पण हवा अशीच राहिली तर काय करायचे अशी सगळ्याना काळजी लागली . कारण मग पाऊस पडणार . पुन्हा जास्तच निसरडे होणार . बर्फही पडण्याची शक्यता . अशा विचारात आम्ही सगळे होतो . पण सुदैवाने हवा निवळली . आम्ही२३ जुलैला पहाटे ३.३० वाजता शिखरावर चढायला सुरुवात केली . पंधरा पावले चढून गेल्यावर थांबावे लागत असे . इतका दम लागत होता . त्यामुळे आमच्यातील पाचजण पहिल्या काही १५-२० पावलातच परत मागे तळावर गेले.”

“आता आम्ही पाचजणच चढत होतो . दम लागायचाच . थांबल्यावर थोडे बरे वाटायचे . पुन्हा चढायला सुरुवात करायची . चढ होताच . अगदी काटकोनी नव्हता पण ७०-७५ अंशाचा तरी होताच. अखेर चढत-थांबत आम्ही पाचजण दुपारी दोन वाजता छामसेर शिखरावर पोहचलो . शिखर गाठले! उभे राहिलो . फोटो काढले . तिथे आम्ही फार तर अर्धा तास होतो . Base-Campसोडल्यापासून १०तासांनी आम्ही शिखरावर पोहचलो होतो.”

“आता उतरायचे वेध लगले. उतरताना घसरायची भिती तशी जास्तच . आम्ही आमच्या Base-campला रात्री ८. ३० वाजता पोह्चलो. . Summitवरून Base-Campपर्यंत यायला आम्हाला ७ तास लागले . म्हणजे एकूण १७ तास झाले . मी फक्त कॅडबरी खाल्ली असेल तेव्हढीच . पण Base-Campला येईपर्यंत खाण्याची जेवण्याची आठवणही झाली नाही . पाणीही जास्त जात नव्हते .”

“शेवटपर्यंत, शिखरावर आम्ही फक्त पाचजणच होतो. त्यापैकी मी एकटीच मुलगी . आणि आमच्या अकराजणात सर्वात लहान मीच . एकोणीस वर्षांची . आमचे ग्रुप-लीडर माझ्या बाबांच्या वयाचे, पन्नाशीचे .दुसरी एक मुलगी ती चोवीस वर्षांची; एक आजोबा ते ६०-६५ वर्षांचे . बाकीचे तिशीतले . वर आम्ही जे पाचजण शिखरावर पोचलो त्यात आमचे Group-leader, मी , आणि बाकीचे तिशीतले असावेत .”

आपल्यापैकी हिमालयात एखाद्या शिखरावर चढून जाणारी , अशा साहसी मोहिमेत भाग घेणारी कल्याणी हि पहिलीच . माझे भाग्य असे की , आकाशात स्वत: विमन-उड्डाण करून आकाशी झेप घेणारी कल्याणीची थोरली बहिण मृण्मयी आणि हिमालयातील २२,००० फूट उंचीवरचे शिखर जिंकणारी ही कल्याणी या दोघींचेही पराक्रम मला प्रत्यक्ष पहायला, ऐकायला मिळाले . मलाही बरोबर घेऊन मृण्मयीने आकाशात झेप घेतली आणि विमानातून सृष्टी दाखवली . कुणी सांगावे! कल्याणीही तिच्याबरोबर मलाही एव्हरेस्टवर घेऊन जाईल! ह्या परते माझे दुसरे भाग्य ते काय?

कल्याणीच्या यशात तिच्या आई – बाबांचा, त्यानी तिला दिलेल्या उत्तेजनाचा, पाठिंब्याचा फार फार मोठा वाटा आहे हे विसरता येणार नाही .

मुक्काम पोस्ट शर्यतीचे बॉस्टन

  • हाता तोंडाशी आलेला घास कोणीतरी काढून घ्यावा
  • पंगुं लंघयते गिरीम….
  • गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेलव्ज
  • अ स्टॉर्म बिटवीन कप ऍन्ड लिप्स
  • प्रत्येकाचे दु:ख निराळे…

म्हणी, वाकप्रचार, सुभाषितांची ही जंत्री पाहून एखादा संग्रहच आता वाचायला लागणार की काय अशी भिती वाटण्याची शक्यता आहे. पण ह्या अशा आणि आणखी काही वचनांची प्रचिती, ज्युली विन्डसरचा पराक्रम, तिची गोष्ट ऐकल्यावर यॆईल.

ज्युलीने ८-९ वीत असताना क्रॉस-कंट्री शर्यतीत भाग घेतल्यापासून तिला पळण्याची आवड निर्माण झाली. तेव्हापासून तिने धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला सुरवात केली. कॉलेजच्या पहिल्या वर्षापर्यंत ती भाग घेऊन धावत असे. हायस्कूलमध्ये असतानाच तिने निश्चय केला होता.”मी बॉस्टनच्या मॅरथॉनमध्ये भाग घेणार.”
पण हे सोपे नव्हते. बॉस्टनच्या शर्यतीत कुणालाही असा थेट भाग घेता येत नाही. विशिष्ठ वेळेत तेव्हढे अंतर पार करण्याची पात्रता गाठावी लागते.

ज्युलीने त्यासाठी अशा तऱ्हेच्या लांब पल्ल्याच्या शर्यतीत धावायला सुरुवात केली. २०१० मध्ये तिने एक मॅरथॉन चार तासात पूर्ण केली. त्या नंतर २०१२ मध्येही न्युमोनिया सारख्या आजारातून नुकतीच उठली असतानाही तिने एक मॅरथॉन पूर्ण केली. आणि आपल्या गटात ती बॉस्टनच्या शर्यतीसाठी ती पात्र ठरली!

यंदा तिला खात्री होती कि आपल्या गटात ती पहिली येणारच. तसे तिने आधीच ठरवले होते. त्यासाठी तिने जानेवारीपासूनच १६ आठवड्यांच्या खडतर सरावाची सुरवात केली. आठवड्यातले दोन दिवस ती मोठ्या वेगाने पळत असे. नंतरचे दोन दिवस ती १०, १३ मैल पळायची. शनिवारी ती मग कधी सतरा तर कधी अठरा मैल धावायची. हे सर्व करत असताना ती रोज एका मोठ्या रुग्णालयात आणि महाविद्यालयात जाऊन वैद्यकीय सहाय्यक या शिक्षणक्रमाचा अभ्यासही करत असे.

बॉस्टनच्या मॅरथॉनच्या दिवशी ज्युली विन्डसर मोठ्या उसाहात होती. ती म्हणाली,” प्रत्यक्ष शर्यतीच्या दिवशी मनावर कसलेच दडपण नसते. ताण तणाव नसतो. शर्यतीच्या पूर्वीचे ते सरावाचे दिवसच फार कष्टाचे असतात. आज काय नुसते धावायचे-पळत रहायचे.”

तिला उत्तेजन देण्यासाठी, तिचा उत्साह कायम ठेवण्यासाठी ज्युलीबरोबर तिचा नवरा, सासूबाई आणि तिची आई आली होती. त्यांच्यापेक्षाही शर्यतीच्या मार्गावर दुतर्फा जमलेले लोकच ज्युलीचे प्रत्येक टप्प्यावर टाळ्या वाजवून, हात उंचावून “गो ज्युली गो”, रन ज्युली,हाय ज्युली” असे ओरडत होते. वर्तमानपत्रांनी आदल्या दिवसापासून ज्युलीला मोठी प्रसिध्दी दिली होती. त्यामुळे अनेकांना ती माहित झाली होती.

शर्यतीला सुरुवात झाली. आठव्या मैलावर ज्युलीची पाठ अतिशय दुखायला लागली. असह्य कळा वेदना सुरु झाल्या. असे तिला बरेच वेळा बाराव्या मैलावर व्हायचे. पण नेमके आज तिला इतक्या लवकर त्रास व्हायला लागला. जवळच्या लोकांनी तिला मलम लावले. तिने आपल्या गोळ्या घेतल्या. आणि ज्युली पुन्हा धावायला लागली. ज्युली पळतच राहिली. ९-१० मिनिटात एक मैल या वेगाने ती धावत होती. इतर स्पर्धकांच्या बरोबरीने धावत मैला मागे मैल मागे टाकत होती. २५ व्या मैलापाशी आले की वेग वाढवायचा. पायात गोळे आले होते. ठणकत होते. वेदना फार होत होत्या. मागे फिरावे, इथेच थांबावे असे वाटत होते. तरीही ज्युली निश्चयाने पळत राहिली. २५.७ मैलाच्या टप्प्यापाशी आली. आणि आता तर फक्त अर्धा मैलच राहिलाय की! आता जोरात मुसंडी मारून पुढे जायचे. बरे झाले! आपण नवऱ्याला आईला सांगून ठेवले, ” तुम्हाला माहित आहे ना? शर्यतीत मी नेहमी मार्गाच्या उजव्या बाजूनेच धावते. तुम्ही उजव्या बाजूलाच, शेवटच्या रेषेजवळपास थांबा.” आता ज्युली आणि इतर स्पर्धकही जोरात पुढे जाणार तोच, ” थांबा! थांबा! मागे व्हा! पळा ! मागे फिरा! शर्यत थांबवलीय! पुढे बॉम्बस्फोट
झालाय!” असे म्हणत पोलिसांनी संपूर्ण रस्ता आडवून धरला होता.

एका क्षणापूर्वी “आपण आता शर्यत जिंकलीच!” “आपल्या गटात मी पहिली!” “बॉस्टन मॅरथॉनमध्ये मी पहिली!” असे छाती धडधडत असतानाही आनंदाने म्हणणारी ज्युली आता घाबरून, धसक्याने छाती धडधडत इतरांबरोबर मागे पळत, धडपडत फिरली!

पुढे बॉम्बस्फोट झालाय म्हणजे .. म्हणजे नवरा, सासूबाई आपली आई सर्व कुठे असतील? कसे असतील? कुठे भेटतील? भेटतील का? अशा विचारांच्या गर्दीत ज्युली मागे मागे जात होती.
बरे झाले! ज्युलीचा नवरा, आई, आणि सासू अगोदर बरेच पुढे थांबले होते. पण ज्युली नीट दिसावी, लवकर दिसावी म्हणून थोड्या वेळापूर्वीच ते तिघेजण बरेच जवळ येऊन थांबले होते.. पहिल्या ठिकाणीच थांबले असते तर? त्याच ठिकाणी समोरच बॉम्बस्फोट झाला होता! बघा, देव तारी त्यांना कोण मारी!
ज्युलीला आपले पदक हुकले याचे वाईट वाटले असणारच.

कालपासून ज्युलीला प्रसिध्दी मिळाली होती. वाटेवरचे लोक टाळ्या वाजवून तिचे स्वागत, कौतुक करीत होते. तिचा उत्साह वाढवत होते. ह्या सर्वाच्या पाठीमागे कारण होते. कारण २६ वर्षाची ज्युली विन्डसर फक्त, फक्त तीन फूट नऊ इंच उंच होती! (बॉस्टनच्या मोबिलिटी-इंपेअर्ड डिविजन या गटात तिची गणना आहे. तसेच ती मेडिकली डायग्नोज्ड फॉर्म ऑफ ड्वार्फिझमनुसार ती ड्वार्फ आहे.)

शाळेपासून ही बुटकी ठेंगणी गिड्डी ज्युली इतर धडधाकट सर्वसाधारण (नॉर्मल) स्पर्धकांबरोबर धावते. आजही १५ एप्रिल २०१३ च्या प्रख्यात बॉस्टन मॅरथॉन शर्यतीत लहान, सुंदर ठेंगणी ठुसकी ज्युली इतर सर्वसाधारण धडधाकट स्पर्धकांबरोबर धावत होती. यथावकाश ज्युलीची आणि तिच्या कुटुंबाची भेट झाली.

बॉस्टनच्या शर्यतीमुळे ठेंगणी ज्युली विन्डसर एका दिवसात फार, फार, खूप उंच झाली! आता आपल्याला तिच्याकडे खाली वाकून नाही तर तिच्यापुढे आपली मान झुकवून पहावे लागते!

बॉस्टन-मॅरथॉनच्या आयोजकांचेही कौतुक करायला हवे. ज्यांनी २५.७ मैलाचा टप्पा गाठला त्या सर्वांना त्यांनी पदक दिले. अर्थातच ज्युली विन्डसरलाही पदक मिळालेच!

डोरोथीचे फिरते वाचनालय

शनिवारी रविवारी किंवा सुटीच्या दिवशी दुपारी आमच्या घरी, आबासाहेबांच्या घरी एक ’दूत’ येत असत. सायकल वरून यायचे. धोतर पिंडऱ्यांपर्यंत वर ओढलेले आणि सायकल्च्या क्लिपा लावून घटट पकडीत ठेवलेले. सायकलच्या त्रिकोणात तेवढ्यीच मोठी, पाकिटासारखी बक्कल वगैरे लावलेली पिशवी. त्या पिशवीत साप्ताहिके, मासिके, पुस्तके भरलेली. मागच्या कॅरिअरवरही पुस्तकांनी भरलेली एखादी पिशवी. डोक्यावर काळी टोपी. डोळ्यांवरचा काडीचा चष्मा कधी कपाळावर नेलेला.रंग उगीच सावळा म्हणायचा, पण खरा काळाच.सायकल ठेवून, घाम पुसत, पुस्तकांची पिशवी, काही मासिके हातात घेऊन ते आत आले की गप्पा आणि चहा-पाणी व्हायचे. दूतांची जीभ तशी तिखटच. त्यामुळे ते बोलत असताना बराच खाटही उडायचा. ऐकणाऱ्याला ठसका लागायचा.अधून मधून हसतानाही ठसका लागायचा.’दूत’ म्हणजे “दूताचे फिरते वाचनालयाअ”चे मालक, सर्व काही तेच. हे आपल्या वर्गणीदारांच्या घरी जाऊन मासिके, पुस्तके द्यायचे. हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय होता.मला वाटते की ते लिहितही असावेत कधी काळी, किंवा त्यांचे दूत नावाचे अगदी लहानसे स्थानिक वर्तमानपत्र तरी असेल.पण दूत हे नाव छान होते.लोक मात्र गमतीने त्याला ’भूताचे फिरते वाचनालय’ म्हणत!

घरोघरी,व्यवसाय म्हणून का होईना, पुस्तके नेऊन लोकांना वाचनानंद देण्याचा व्यवसाय त्याकाळी तरी नाविन्यपूर्ण होता. एका द्रुष्टीने न्यानार्जनाचाही. दूतांची म्हणजेच टिकेकरांची,त्यांच्या पुस्तकफेरीची, फिरत्या वाचनालयाची आठवण होण्याचे कारण नुकतेच लहान मुलांसाठी लिहिलेले एक पुस्तक मी वाचले. ते डोरोथी थॉमस ह्या एका अगदी मनापासून पुस्तकप्रेमीअसलेल्या बाईविषयी होते.

डोरोथीला लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती. पुस्तकांचे वेडच होते म्हणा ना तिला. तिला पुस्तकांइतकीच माणसेही आवडत. लोकांविषयी खरे प्रेम अस्ल्यामुळे सगळ्यांशी तिची पटकन मैत्री व्हायची. लोकप्रेमी असल्यामुळे ती लोकप्रियही झाली. वाचनाच्या आवडीमुळे आपल्या मोठ्या गावातल्या मोठ्या, सुंदर इमारत असलेल्या लायब्ररीत-वाचनालयात- ती नेहमी जाऊन पुस्तके आणत असे. लहानपणी प्रत्येकाला आपण कोणी तरी– इन्जिन ड्रायव्हर, पोलिस, मास्तर, जादूगार व्हावे, सर्कशीत जावे, डॉक्टर व्हावे असे वाटते. डोरोथीला गावातल्या त्या भल्या मोठ्या सुंदर ग्रंथालयात जाता येता आपण अशा एखाद्या मोठ्या वाचनालयात मुख्य, ग्रंथपाल व्हावे असे वाटे. तिचे हे स्वप्न होते.

डोरोथी रॅडक्लिफ कॉलेजात गेली. कॉलेजमध्ये असताना तिथल्या वाचनालयातली सगळी पुस्तके तिने वाचून काढली! त्यानंतर तिने ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याची पदवीधरही झाली. ग्रंथपाल म्हणून काम करण्यास ती आता पूर्ण सिद्ध झाली. पण डोरोथी प्रेमात पडली. तिचे लग्न झाले. तिच्या नवऱ्याला शेतीची आवड होती. मॅसॅच्युसेट्समधील आपले मोठे गाव सोडून नवऱ्याबरोबर ती एका लहानशा गावात आली. आतापर्यंत पुस्तकातच वाचलेल्या, पाहिलेल्या अशा लहानशा गावात डोरोथीचा संसार सुरू झाला.

नॉर्थ कॅरोलिनामधले ते गाव निसर्गरम्य होते. निळ्या जांभळ्या डोंगरांच्या रांगा, हिरव्या झाडांनी भरलेल्या लहान मोठ्या दऱ्या-खोरे, डोंगरांच्या कड्यांवरून ओसंडत येणारे लहान लहान धबधबे, तांबड्या पिवळ्या, निळ्या फुलांनी बहरलेल्या वेली, फुलझाडे अशा माऊंट मिशेलच्या पायथ्याशी वसलेल्या गावात डोरोथी आली. गावकरी भले होते. थोड्या दिवसातच तिने बरोबर आणलेली सगळी पुस्तके वाचून झाली.मग शेजाऱ्या-पाजाऱ्याशी पुस्तकांची देवाण घेवाण सुरू झाली. त्यातून अनेक जणांशी ओळखी वाढल्या. डोरोथीला आपल्या गावातल्या त्या भल्या मोठ्या सुंदर वाचनालयाची वरंवार आठवण येत असे. या खेडेगावात ग्रंथालयच नव्हते तर ती आता ग्रंथपाल कुठून होणार. तिचे लायब्ररियन होण्याचे स्वप्न तसेच राहिले.

तिने आपल्या शेजाऱ्यांची, गावातल्या लोकांची आपल्या घरी एक सभा घेतली. आपल्या गावासाठी एक चांगले वाचनालय पाहिजे असे डोरोथीने सांगितले. तिथल्या तिथे थोडे फार पैसे जमले. गावकऱ्यांनी ठरविले की आपली “लायब्ररियन” डोरोथीच! काही दिवसांनी मोटारीची फिरती लायब्ररी सुरू झाली. दोन्ही बाजूंचे द्रवाजे झडपांसारखे वर उघडले. आत नीटनेटकी रचून ठेवलेली पुस्तके पाहिल्यावर गावाला आनंद झाला. डोरोथीच्या घरी लोक पुस्तके आणून देत. त्यांची भली मोठी चवड घेऊन ती रोज आपल्या तळघरात-बेसमेंट्मध्ये- नेऊन ठेवायची पुन्हा तिथून रोज लागतील तशी वर आणून आपल्या फिरत्या वाचनालयात ठेवायची. असे दिवसातून दोन तीन वेळा तरी करावे लागत असे. ग्रंथालय शास्त्राची पदवीधर असल्यामुळे ती सर्व काही अगदी ’शास्त्रोक्त’ करत असे. विशिष्ट पद्धतीने विषयवार. लेखकानुसार वगैरे ठेवायची. मोटारीत-चुकलो- वाचनालयात पुस्तके रचून झाली की डोरोथीबाईंची भ्रमणगाथा सुरू!

टेकड्या चढून, डोंगर उतारावरून, कच्च्या रस्त्यावरूब,’फिरते वाचनालय फिरत निघाले की वाटेत ठिकठिकाणी थांबायचे. शाळेच्या मैदानात, प्रत्येक शेतकऱ्याच्या घराजवळ, गावा गावातल्या– हो, ती तीन काऊन्टीमधल्या गावात पुस्तके द्यायला जात असे- एखाद्या विविध वस्तू भांडारासमोर, पोष्टा जवळ लोक डोरोथीची, ’फिरत्या वाचनालयाची वाट पहात उभी असत.

लोक उत्साहाने पुस्तके आणतात, नेतात आणि वाचतात हे रोज पहात असली तरी डोरोथीला कालच्यापेक्षा आज आनंद जास्त व्हायचा. तिची फिरती अविरत चालू असे. उन असो की पाऊस, थंडी असो की बर्फ पडत असो डोरोथीचे वाचनालय फिरत असे. एकदा जोराचा पाऊस झाला. नॉर्थ टो नदीला पाणी आले. आजूबाजूला काठावर आणि पात्रातही चिखलच च्खल झाला होता. डोरोथीबाई आपली लायब्ररी चालवत एक वळण घेत होत्या. वाचनालय घसरले आणि डोरोथीबाईसह नदीत पडले.डोरोथी वाचनालयाच्या खिडकीतून कशीबशी बाहेर आली आणि मोटारीच्या कडांना धरून मोटारीबरोबर हळू हळू वाहात चालली. सुदैवाने फिरती लायब्ररी/ते फिरते वाचनालय एका लहानशा बेटासारख्या ऊंचवट्यावर येऊन थांबले. “मला वाटलं होतं मोठ्या गावातल्या एखाद्य सुंदर इमारत असलेल्या मोठ्या वाचनालयाची मी ग्रंथपाल होईन, आणि आता पहा माझा हा अवतार!”चिखलाने बरबटलेले आपले कपडे झटकत पुसत डोरोथी स्वत:शीच बोलत होती. इतक्यात वरच्या रस्त्याने ट्रॅक्टर चालवत जाणाऱ्या शेतकऱ्याने डोरोथीचे फिरते वाचनालय पाहिले. त्याने लगेच, “मिझ डोरोथी, कवितेचे एखादे छान पुस्तक मला पाहिजे आहे, देता का?” डोरोथीनेही तितक्याच तत्परतेने उत्तर दिले,” तू मला इथून वर बाहेर काढलेस की लगेच!” ट्रॅक्टरने ते फिरते वाचनालय रस्त्यावर आणले. डोरोथीने दोन्ही दारे वर उचलली आणि म्हणाली,”आता लायब्ररी उघडली.” तिने लगेच त्या शेतकरी वाचकाला आवडेल असे पुस्तक काढून दिले.

रिव्हरसाईडचे विद्यार्थी तर डोरोथीबाईची आणि फिरत्या वाचनालयाची आतुरतेने वाट पहात उभे असत. त्यांना ही एक मोठी पर्वणीच असे. सग्तळ्यात जास्त आनंद व्हायचा तो बेनला. डोरोथीच्या फिरत्या वाचनालयातूनाच त्याने विमानावरची सर्व पुस्तके आणि पराक्र्मी साहसीवीरांची बहुतेक सगळी पुस्तके त्याने वाचली होती. ग्लोरिया ह्युस्टन तर स्वत:ला दुप्पट भाग्यवान समजत असे. कारण शाळेत आणि तिच्या वडिलांच्या दुकानापाशीही डोरोथीचे वाचनालय यायचे त्यामुळे तिला दर आठवड्याला नवनवीन पुस्तके वाचायला मिळायची. बेन डोरोथीला म्हणायचा,”मोठा झाल्यावर ह्या पुस्तकांतील सगळे जग मी पाहाणार आहे.” आणि बेन पुढे अमेरिकन विमानदळात वैमानिक झाला!

डोरोथीचे फिरते वाचनालय शेजारच्या दोन तीन तालुक्यातल्या गावातही जात असे. जिथे जाईल तिथल्या लोकांशी तिची मैत्री व्हायची. ज्यांना मोटारीपाशी येता येत नसे त्यांच्यासाठी ती स्वत: पुस्तकांचे गठ्ठे घेऊन त्यांच्या घरी जायची. मिसेस मॉम थकल्या होत्या. त्यांचे घर उंच टेकडीवर होते. पुस्तकं वाचून झाली की बाहेर कपडे वाळत घालायच्या दोरीवर आपल्या नवऱ्याचा मोठा लाल डगला अडकवून ठेवायच्या. तो लाल डगला फडफडताना दिसला की डोरोथी पुस्तकांचा भारा घेऊन टेकडी चढून जायची. मॉमना पुस्तके द्यायची. थंडी वाऱ्यात, बर्फातही सुद्धा यात कधी खंड पडला नाही.

डोरोथीची आणखी एक दुसरी लहान मैत्रीण होती. बार्बरा डेव्हनपोर्ट. तिला शाळेत, बाहेर कुठे जाता येत नसे. कारण तिचा सर्व काळ चाकाच्या खुर्चीतच जायचा. तिच्या वाचनाची भूक डोरोथी स्वत: हवी ती पुस्तके नेऊन देऊन भागवत असे. भरपूर पुस्तके देताना डोरोथी बार्बराला नेहमी म्हणायची,” किती भराभर वाचून संपवतेस गं तू पुस्तकं! मी जितकी लवकर लवकर येते पुस्तकं घेऊन त्याच्या आत वाचूनही झाली असतात की तुझी पुस्तकं!” पण असे म्हणताना लोकप्रेमी ’ग्रंथपाल डोरोथी”च्या डोळ्यांतील आनंद लपत नसे.आपली पुस्तके कोणी तितक्याच आवडीने वाचताहेत याचा आनंद फार मोठा असतो.डोरोथी नेहमी ह्या आनंदात बुडालेली असे.

दिवस चालले होते. गावातल्या एका पुस्तकवेड्या वाचकाने आपले घर वाचनालयासाठी गावाला दिले.मग काय विचारता! गावतील प्रत्येकजण ही ना ती लागेल ती मदत करू लागला. घर स्वच्छ होऊ लागले. काही बदल केले. रंगरंगोटी झाली. शाळेतील मुला मुलींनी शेल्फमध्ये पुस्तके लावून ठेवली. मिसेस मॉमनी एक सुंदर टेबलक्लॉथ दिला. गावातल्या आयांनी उदघाटनाच्या दिवशी केक, कुकीज वगैरे नाना पदार्थ करून आणले. उदघाटनाचा सोहळा-पार्टी जोरदार झाली. गंमत म्हणजे लायब्ररीचा झेंडा म्हणून मिसेस मॉमनी तो लाल डगला दिला! आणि तो उंच खांबावर डौलात फडकत होता.

दिवस थांबत नाहीत. डोरोथीच्या वाचनालयाच्या भिंती तिला मिळालेल्या मान-सन्मानांनी, मानपत्रांनी आणि गौरव चिन्हांनी सजल्या. ठिकठिकाणचे, दूर दूरचे लोक डोरोथीची लायब्ररी पाहण्यासाठी, मुलाखती घेण्यासाठी, लेख लिहिण्यासाठी, निळ्या जांभळ्या डोंगरांच्या रांगा, हिरव्यागार झाडा-व्रुक्षांनी नटलेल्या दऱ्या-खोऱ्या, डोंगरकड्यांवरून ओसंडत येणारे लहान लहान धबदबे, तांबड्या,पिवळ्या निळ्या फुलांनी बहरलेल्या वेली फुलझाडे अशा माऊंट मिशेल्च्या पायथ्याशी वसलेल्या त्या लहान गावात येऊ लागले!
दोरोथीबाईना आपल्या मोठ्या गावातील सुंदर लाल विटांची मोठ्या लायब्ररीची आठवण येत असे; फारशी नाही, क्वचित एखाद्या वेळी यायची. आपल्या लहान गावातील वाचनालयातच ती इतकी बुडून गेली होती. कारण गाव आता पुस्तकप्रेमी,वाचनवेड्या लोकांचे झाले होते. गावाला पुस्तकांविषयी आणि डोरोथी विषयी प्रेम होते.

डोरोथीला रोज पत्रे येत, जवळपास्च्या गावातून आणि दुर्वरच्या गावातूनही. त्यात बेन हार्डिंग्जचे, जेम्स बायर्डचे आणि बार्बरा डेव्हनपोर्टचीही पत्रे असत. बेन ,बार्बरा, जेम्स यांच्या यशात डोरोथीचा फार मोठा वाटा आहे. डोरोथीमुळेच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. पुस्तकांमुळेच त्यांना फार मोठे जग अनुभवता आले. प्रत्येक पुस्तक त्यांच्यासाठी एक नवीन जगच असे. लेखिका ग्लोरिया ह्युस्टन प्रख्यात शिक्षिका, जागतिक कीर्तीची शिक्षण्तज्न.तिलाही शाळेपासून डोरोथी,तिचे फिरते वाचनालय आणि पुस्तके ह्यांचा सहवास लाभला आणि ह्याचा तिच्यावर फार मोठा प्रभाव पडला.

आज डोरोथी थॉमस नाही. तिला ओळखणारेही त्या पिढीतील गावात आज कोणी नाही. गावातल्या लोकांना डोरोथीचे दफन नेमके कुठे झाले ती दफनभूमीही माहित नाही. त्यामुळे तिचे तसे स्मारक, शिळा वगैरे त्या गावात काही नाही.पण अनेकांच्या मनात वाचनाचे बीज रुजवले, वाचनाची आवड जोपासली, वाढवली, पुस्तकांविषयी प्रेम आणि वाचन-संस्क्रुती निर्माण केली हेच तिचे खरे स्मारक.

परि जयांच्या दफनभूमिवर । नाही चिरा, नाही पणती॥…..अशा डोरोथी थॉमस पुढे…तेथे कर माझेजुळती॥

अधिक ते देखणे…..निरंतर पाहणे

१९०२ सालच्या डिसेंबरात “न्यूयॉर्क हेरल्ड” मध्ये एक वृत्तांत आला होता—“बारा वर्षाच्या राल्फ टीटरने पेट्रोलवर चालणारी मोटर बनवली आहे. मूळ आराखडा, रूप वगैरे सर्व काही ह्या बारा वर्षाच्या मुलानेच केले आहे. ह्या शिवाय त्याने वीज निर्माण करणारे जनित्रही तयार केले आहे. राल्फचे हे जनित्र शेजाऱ्यांच्या घरांना आणि त्याच्या स्वत:च्या घरालाही वीज पुरवठा करत आहे.” सर्व तपशीलासह ही माहिती त्या वृत्तकथेत दिली होती.

बारा वर्षाच्या मुलाने स्वत: मोटारगाडी बनवणे, वीज पुरवठा करणारे जनित्र तयार करणे ह्या गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत याच्त शंकाच नाही. तरीपण “न्यूयॉर्क हेरल्ड” मधील त्या वृत्तकथेमध्ये त्याहूनही विशेष नवलाची, थक्क करणाऱ्या एका लहानशा गोष्टीचा उल्लेख नव्हता. बारा वर्षाचा राल्फ टीटर आंधळा होता!

वार्ताहाराच्या तीक्ष्ण नजरेतून नेमकी हीच गोष्ट सुटली होती. चाणाक्ष बातमीदाराच्या लक्षातही आले नसेल की राल्फ आंधळा आहे! पण राल्फ टीटरला जे ओळखत होते त्यांना ह्या “नजर”चुकीचे आश्चर्य वाटले नव्हते. कारण राल्फ इतक्या सहजपणे आणि डोळस माणसांसारखा सराईतपणे वावरत असे की तो आंधळा आहे हे कुणाच्याही लक्षात येत नसे. बरं कुणाच्या लक्षात आले तरी राल्फच्या सहज सफाईदार हालचाली आणि इकडे तिकडे हिंडता फिरताना त्याचे बोलणेही चालूच असे. या वरून तो आंधळा आहे ह्यावर कुणाचा विश्वासही बसत नसे. मग “न्यूयॉर्क हेरल्ड”च्या बातमीदाराला ह्या तपशीलाच्या अनुल्लेखाबद्दल कोण दोष दॆईल?

हल्लीच्या पिढीतील अनेकांना राल्फ आर. टीटरची फारशी माहिती नाही. पण इंजिनीअरिंगच्या क्षेत्रातील तज्ञांना,अभ्यासकांना मात्र त्याची योग्यता व थोरवी माहित आहे. राल्फ टीटर हा विसाव्या शतकातील ऑटोमोटिव्ह- स्वयंचलित गति तंत्रज्ञानातील- मोजक्या आद्य, प्रतिभाशाली नामवंतांमध्ये श्रेष्ठ; ह्या क्षेत्रातील नवीन शोध लावणारा, एका कंपनीचा प्रमुख आणि स्वयंचलित यंत्रोद्योगाचा अग्रगण्य नेता आहे याची यांत्रिकी व्यवसायातील सर्वांना जाणीव आहे. म्हणूनच त्यांना राल्फ आर. टीटर विषयी मोठा आदर आहे.
राल्फ टीटर्चा प्रख्यात शोध म्हणजे स्पीडोस्टॅट. सध्या जगातील सर्व मोटारीत ते क्रूझ कंट्रोल म्हणून वापरले जाते. हे त्याचे पहिले स्वयंचलित यंत्र. ह्याशिवायही त्याने अनेक शोध लावले. सर्वप्रथम स्वयंचलित गिअर शिफ्ट तयार करून त्याचे पेटंटही त्याने घेतले. नवीन सुधारित, गवत कापण्याचे -लॉन मोवर-यंत्रही त्याने बनविले. इतकेच काय पण प्रवासासाठी एक सोयिस्कर सूटकेसही त्याने बनवली!प्रवासात कपडे चुरगळतात, घड्या मोडतात त्यासाठी त्याने एक विशेष फोल्डिंग सूटकेस तयार केली!

हे इतके त्याने केले. पण ह्या पेक्षाही त्याचे विलक्षण स्पर्शज्ञान आणि यंत्रांचे ज्ञान पराकोटीचे म्हणावे लागेल. त्याने यंत्रावर नुसता हात फिरवला की त्याला जणू संपूर्ण यंत्र स्पष्ट ’दिसत’ असे. यंत्रात नेमका कुठे बिघाड झाला आहे ,एखादा सुटा भाग हाताळून त्यामधे कसली दुरुस्ती करायला हवी हे तो अचूक सांगायचा.यंत्राच्या निरनिराळ्या भागांत मेळ साधला जात नसेल तर त्याचे कारण कुठे आहे, काही अगदी घट्ट किवा ढगळ झाले आहे वगैरे सर्व बारकावे तो नेमके सांगायचा.

आंधळा असूनही राल्फने कधी काठी वापरली नाही. साधी नाही की ’पांढरी’ही नाही. काठी वापरलीच नाही.गावत तो सगळीकडे एकट्यानेच फिरायचा. आपण कुठे आहोत, एखाद्या कोपऱ्यावर वळताना आपल्या पावलांचा आवाज बदलतो, हे सर्व त्याच्या लक्षात असे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडा-झुडपांना आपला हात सहज लागल्यासारखे दाखवत तो बरोबर जायचा.

अनेक अंध व्यक्तींप्रमाणे राल्फही संगीताचा भोक्ता होता. संगीताबरोबर त्याला नाटकांचीही आवड होती. मोटारींच्या, बोटींच्या शर्यतींनाही तो आवडीने जात असे. त्याच्या मित्रमंडळीत मोटार उद्योगातील नामवंत फ्रेड ड्युझेन्बर्ग आणि जनरल मोटर्सचा प्रमुख चार्ल्स केटरिंग हेही होते.

राल्फ सगळीकडे पायी एकटा जात असे तरी मोटर मात्र स्वत: चालवत नसे. कुणाला तरी सोबत घेऊनच त्याला जावे लागे. मोटार चालवण्याची प्रत्येकाची शैली निराळी, अनेकांच्या अनेक तऱ्हा. काही सफाईदारपणे तर कुणी धुसमुसळेपणाने चालवत. बरेच वेळा त्याचा वकील-मित्र, हॅरी लिंड्से हा गाडी चालवायचा. लिंड्से असला की गाडी वेगाने भरधाव, कशीही धडम धाड करीत जायची.

हॅरी लिंड्सेच्या अशा ड्रायव्हिंगचा सतत अनुभव घेतल्यामुळे राल्फ गमतीने म्हणायचा, “हॅरीच्या ड्रायव्हिंगमुळेच मला क्रूझ कंट्रोलची कल्पना सुचली. हॅरी ड्रायव्हिंग करत नसता तर क्रूझ कंट्रोलचा शोध लागला नसता!” जगातील मोटर चालकांना राल्फ्ने क्रूझ कंट्रोल्चे मोठे वरदानच दिले आहे. आपल्या घराच्या तळघरात दहा वर्षे राबून राल्फ टीटरने स्पीडोस्टॅट तयार केले व १९४५ साली त्याचे पेटंट घेतले. तरीही प्रत्यक्ष मोटार गाड्यांत त्याचा वापर होण्यासाठी १९५८ साल उजाडावे लागले.१९५८ साली ख्राईस्लर कंपनीने आपल्या मोटारींत त्याचा वापर सुरू केला.

१८९५ साली अमेरिकेतील इंडियाना राज्यातील हगर्सटाऊन येथे राल्फचे काका, भाऊ व त्यांच्या मित्रांनी मिळून एक पिस्ट्न रिंग्स बनविण्याची कंपनी सुरू केली. कंपनीची नावे एक दोनदा बदलून १९२६ मध्ये तिचे पर्फेक्ट सर्कल असे नामांतर झाले. ह्या कंपनीचा तो प्रेसिडेंट होता. ४४ वर्षे तिथे काम करून १९७० साली राल्फ टीटर निवृत्त झाला.

राल्फला प्रवासाचीही खूप आवड . राल्फ आपल्या पत्निसह एकदा युरोपच्या सफरीवर निघाला.बोटीतील प्रवाशात “रॉकी माऊंटन्स” ह्या वर्तमान्पत्राचा वार्ताहरही होता. आपल्या युरोपच्या सफरीचा वृत्तांत तो पाठवित असे. राल्फविषयी लिहिताना तो म्हणतो, “इतर अनेक पर्यटकांपेक्षा राल्फने अधिक पाहिले ह्यात शंका नाही. म्युझियम्स, कॅथड्रल्स, राजवाडे आणि इतर अनेक गोष्टी त्याला दिसल्या नसतील ह्यावर माझा विश्वास बसणार नाही. आम्हा सर्वांपेक्षा राल्फने अधिकच पाहिले. मला सारल्हे वाटायचे, आणि आजही वाटते, डोळे नसलेल्या राल्फ्ने जितके आणि जसे पाहिले तसे डोळे असल्यामुळे डोळस म्हणवणाऱ्या मला पाहता यावे एव्हढीच माझी इच्छा आहे.”

९२ वर्षाच्या दीर्घायुषी राल्फ आर. टीटरची प्राणज्योत १९९२ साली मालवली. केवळ डोळ्यांनी दिसते, डोळ्यांनी पाहता येते हे सर्वार्थ सत्य नाही हेच दिव्य दृष्टीच्या राल्फ टीटरने यथार्थ दाखवून दिले!

भय इथले वाटत नाही!

कोलंबस डे.
मॅरिएटा.

कितीही मोठ्याने आक्रोश केला, जीवाच्या आकांताने किंकाळे फोडली, जोर जोराने हात पाय हलविले तरी कोणालाही ऐकू जाणार नाही. कुणाला दिसणारही नाही.चिटपाखरू मदतीला येणार नाही. अशा भयानक परिस्थितीत ६७ वर्षाचा रे क्लेमबॅक सापडला होता.

हवाई बेटावरून सकाळी आपल्या लहानशा सेसना–१८२ या एक-इंजिनी विमानातून ऑस्ट्रेलियाकडे आपल्या घरी जाण्यासाठी रे क्लेमबॅकने उड्डाण केले.हा पंधरा तासांचा हवाई प्रवास. तोही पॅसिफिक महासागरावरून. विमानात एकटा. ६०० मैल पार केले. आणि विमान गिरक्या घेऊ लागले. रे क्लेमबॅकने कसे बसे जीव रक्षक जाकिट घातले. गिरक्या घेत विमान खाली अथांग पसरलेल्या महासागरात कोसळले. विमानाचे तुकडे झाले!

सभोवार अथांग पसरलेला पॅसिफिक महासागर. कोठेही पाहिले तरी फक्त पाणी, पाणी आणि पाणी. आणि पाण्याला टेकलेले आकाश. आकाशात सूर्य आणि पाण्यावर त्याचा चमचमणारा प्रकाश. वर आभाळ आणि सभोवताली समुद्र. दुसरे कुणीही नाही. नाही म्हणायला आजूबाजूनी धडकी भरवणारे शार्क मासे मात्र सळसळत्त जात होते. जीवाचा थरकाप उडवणारा त्यांचा पहारा जीव मुठीत धरून पहायचा. पण तेही पुतळ्यासारखे स्तब्ध राहून.

आरडा ओरडा करून फायदा नाही. उलट शार्क मासे कुणी लहान प्राणी समजून लचके तोडतील. आणि केला आरडा ओरडा; हालवले हात पाय जोरजोरात, तरी कुणाला दिसणार! समुद्रात पडलेला माणूस म्हणजे केवळ एक लहान ठिपका. क्षुद्र, क्षुल्लक ठिपका.

वरती आकाश. भोवती पाणी. बाकी काही नाही. क्षितिजाकडे पहायचे. लाट आली की नम्र व्हायचे किंवा तिच्यावर स्वार व्हायचे. शांत रहायचे. अगदी शांत. कसलाही आकांत नको की हळवेपणा नको.मदत यॆईल. मदत येणारच. इतक्यात कोणीतरी यॆईलच. शांत. शांत. सारे काही शांत.

ओरडायचे? आरोळी मारायची का किंकाळी फोडायचे? कोण ऐकणार? फक्त शार्क. ते येतील. गट्टम करतील चहा बरोबरच्या बिस्किटासारखे.

हे सर्व अनुभवी रे क्लेमबॅकला माहित होते. त्याने एकट्याने गेली तीस बत्तीस वर्षे ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटे हा हवाई प्रवास २२० वेळा केलाय! विमानातून खालचा पॅसिफिक महासागर १५-१५ तास पाहिला आहे. शांत. सारे कसे शांत. पाणी आणि आकाश. अथांग पसरलेले पाणी. अगदी एकटे. आपणही तसेच एकटे. एकटेपणा. निर्जन एकांत. हे सर्व त्याने अनुभवले आहे. क्षितिजापर्यंत पसरलेल्या पाण्याची शांतता प्रचंड दडपण आणते. १९९९ साली असेच एकदा विमान कोसळून पाण्यात पडण्याचा अनुभवही गाठीशी होता. पण त्यावेळेस बरोबर एक सोबती तरी होता. आज ४-५ ऑक्टोबर २००४ रोजी मात्र रे क्लेमबॅक एकटा होता.

विमान कोसळून रे खाली पडला तेव्हा एका लाटेवर आदळून आपण खाली गेलो इतकेच त्याला आता आठवत होते. चार चार फुटांच्या लाटांमधून तर कधी लाटांवर तरंगत तो खंबीरपणे पाण्यात होता. लाटांशी खेळत झुंजत डोके शांत ठेवून तो वाट पहात होता. हवाईहून निघताना त्याच्या जोडीनेच दुसरे एक सेसना-१८२ विमान निघाले होते.त्या विमानाने क्लेमबॅकचे विमान कोसळल्याचे पाहिले होते. तीन साडे तीन तास त्या विमानाने घिरट्या घालत ह्या अपघाताचा ठाव ठिकाणा सांगत संदेश पाठवले होते.

मदत यॆईलच असे स्वत:ला बजावत पॅसिफिक महासागरातला रे क्लेमबॅक नावाचा तो लहानसा ठिपका तग धरत होता. मदत यॆईपर्यंत जिवंत राहणे भाग होते….. लाटा येतच होत्या…जातही होत्या.

नावाने प्रशांत असला तरी पाण्याची जीवघेणी भेदकता, आपल्या पाण्याचे पाश आवळण्याची प्रचंड शक्ती ह्या महासागरात आहे. त्याची घन गंभीरता, एकाकी शांतताच जीवघेणी आहे. ही भयाण शांतताच पसरत पसरत लाटांत मिसळून पाश आवळत होती. पाण्यात पडून किती वेळ झाला त्याचे ह्या मानवी ठिपक्याला भानही नव्हते. मदत येणार, यॆईलच, कोणीतरी वाचवेल ह्याचा जप मनात चाला होता.

क्लेमबॅकचा तांबूस चेहरा, निळसर हॊऊ लागला. उन्हाच्या तडाख्याने कातडी भाजून अलवार झाली.जाकीट मानेशी घासून घासून मान चांगलीच खरवडून निघाली होती. साडेसात तास झाले होते.अमेरिकेच्या सागरी रक्षक दलाला बातमी मिळाली. त्यांनी लगेच एक विमान पाठवले. पहिल्या प्रथम त्या विमानाला पाण्यात काहीच दिसेना. काही वेळाने पाण्याशी झगडत असलेला रे क्लेमबॅक हा लहान ठिपका दिसला. विमानातून एक लहा तराफा टाकला. लॉस एंजल्सहून निघालेल्या पी ऍंड ओ कंपनीच्या बोटीला त्यांनी संदेश पाठवला. आणि ते विमान निघून गेले. रे आता त्या लहानशा तराफ्याला धरून वाट पहात बसला.

साडे दहा तासानी ते जीवदायिनी जहाज आले. दमल्या भागल्या रे ला त्यांनी, “कसा आहेस? फार जखमी झालायस का” असे विचारले. “जखमा नाहीत. खूप थकलोय.” रे नी सांगितले. जहाजावरच्या लोकांनी त्याला अलगद बोटीवर उचलून घेतले.

साडे सतरा तास निर्जन समुद्रात एकाकी धडपडणारा रे क्लेमबॅक बोटीवर आल्या आल्या खाली कोसळला

साडे सतरा तासांच्या जलदिव्यातून सुखरूप सुटका झाल्याचा आनंद त्याला झालाच पण ३०-३२ वर्षे सेसना सारख्या लहान विमानातून २२० वेळा एकट्याने प्रवास करणाऱ्या धाडसी रे क्लेमबॅक्ने “हा एकट्याने पॅसिफिक महासागरावरचा प्रवास अखेरचाच” असे जाहीर केले.

आपल्या मनाविरुद्ध, नाईलाजानेच त्याने हा निर्णय घेतला असणार. गेल्या तीस बत्तीस वर्षांच्या ह्या हवाई उड्डाणाचा प्रत्येक वेळेचा अनुभव अद्भुत, आणि अपूर्व आनंदाचाच होता.

पॅसिफिक महासागराची अद्भुत गूढरम्यता, तिथली अफाट पसरलेली एकाकी शांतता, गूढरम्य वातावरण, त्या सगळ्यांचे मानसिक दडपण हे सर्व धाडसी आणि साहसी मनाला खेचून घेणारे मोहमयी आकर्षण आहे. परवाच्या प्रचंड मानसिक थकवा आणणाऱ्या अनुभवानेच रे क्लेमबॅकने हा निर्णय घेतला असावा.

खंबीर मन, शांत, स्थिरबुद्धी आणि बळकट शरीराचा रे क्लेमबॅक खरा पराक्रमी पवनपुत्र!

*******************************************

गेबी केनार्ड ह्या ६० वर्षाच्या धाडसी ऑस्ट्रेलियन महिलेनेही अशाच विमानातून एकटीने जगाला प्रदक्षणा घालण्याचा पराक्रम केला आहे. असा विक्रमी प्रवास करणारी गेबी ही पहिली ऑस्ट्रेलियन स्त्री आहे.

बेन फ्लिन ह्या ऑस्ट्रेलियन वैमानिकानेही २००२ साली असा विक्रम केला आहे.

पॅसिफिक महासागराच्या विलक्षण गूढरम्य वातावरणाचा अनुभव ह्या सर्वांनी घेतला आहे.त्याचा प्रभावही तितकाच अद्भुत आहे. तिथल्या इतका एकाकीपणा कुठेच वाटत नाही असे त्या सर्वांचे म्हणणे आहे. पण त्या हवाई प्रवासाचे आव्हान आणि आकर्षणही तितकेच आहे ह्या विषयी कुणाचेही दुमत नाही.

परवाच्या ४-५ ऑक्टोबरला रे क्लेमबॅकच्या सुदैवाने त्याला दोन गोष्टी अनुकूल होत्या. एक म्हणजे शार्क माशांचे त्याच्याकडे अजिबात ल्क्ष गेले नाही. त्या दिवशी वारा पडलेला होता. ताशी ११ मैल वेगाने वारा वाहात होता. असे जरी असले तरी रिचर्ड हच ह्या तज्ञ अभ्यासकाच्या मते रे क्लेमबॅकचे निश्चयी मन, दृढ विश्वास , बळकट शरीर आणि त्याची स्थितप्रज्ञता ह्याचेच सर्वाधिक महत्व आहे.

काही असो, ६७ वर्षांच्या साहसी रे क्लेमबॅकचा परवाचा अनुभव, त्याने दाखवलेले अश्क्यप्राय धैर्य, त्याने सतत ३०-३२ वर्षे एकट्याने लहान विमानातून पॅसिफिक महासागरावरून २२० वेळा केलेल्या हवाई भ्रमणगाथे इतकेच अभूतपूर्व आहे!

{[एक गोष्ट जाणवली का? मलाही पहिल्यांदा ती लक्षात आली नव्हती. धाडसी दर्यावर्दी कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला त्याच तारखेला-त्याच कोलंबस दिनाच्या दिवशी-११ ऑक्टोबरला- साहसी पराक्रमी रे क्लेमबॅकची ही धैर्यगाथा माझ्या हातून लिहून पूर्ण झाली! सहजासहजी हे घडून आले.]}
__________________________________________________________________________________________________________