विसर न झाला

‘अंडरटेकरची मुलगी ‘ केट मेफिल्डने आपल्या पुस्तकात ज्यांचा ‘विसर न झाला’ अशा काही जणांविषयी स्मरणलेख लिहिले आहेत. त्यापैकी काही आपण वाचू या.

” एका पाठोपाठ एक त्या बायका आमच्या ‘त्या घराच्या’ चॅपेलमध्ये येत. त्या आल्या की लव्हेंडरचा सुगंध सगळीकडे पसरे. काळ्या हॅट घातलेल्या काळ्या मैना खुर्च्यांवर विराजमान होत. त्यांच्या पोषाखाच्या कडा, बाह्यांच्या कडा, कॉलर्स काळ्या फितींनी सजवलेले असत. काही जणींचे चेहरे सुरकुतलेले असले तरी पावडर लावलेले असत. फिकट का होईना बहुतेक जणींचे ओठ लिप्स्टिकने रंगलेले असत. विधवा झाल्या म्हणून काय,अखेर त्याही स्त्रियाच होत्या.
ह्या स्त्रियांपासून थोड्या अंतरावर मिसेस फॉक्सवुड उभी असते. त्या सर्वांना ती ओळखत असते. पण ती अजून त्यांच्यातली झाली नव्हती.

मी फॉक्सवुडबाईला चांगली ओळखत होते. का ओळखणार नाही? चांगले एक वर्षभर रविवारच्या शाळेत ती आम्हाला शिकवायला होती. माझ्या आयुष्यातले ते सर्वात मोठे लांबलचक वर्ष होते ते. आता मला वाटते, त्या वर्षात तीनशे पासष्ट महिने असावेत ! फॉक्सवुड देवाशी मोठ्या आवाजात बोलत असे. तिची प्रार्थना ऐकण्यापेक्षा पाहण्यासारखी असे ! ऐकण्याऱ्या कुणालाही ‘त्या सम तीच’ वाटणारी अशी असे.

प्रथम दोन्ही हात वर करून डोके थोडे मागे नेऊन ती आपले डोळे उघडायची. प्रार्थनेला सुरवात करायची तसे तिचे डोळे मोठे रुंदावत, इतके मोठे मोठे होत जायचे की जणू काही चर्चच्या छतातून फॉक्सवुडबाईला आरपार स्वर्ग दिसू लागलाय ! बाई मोठ्या आवाजात थँक्यू देवा थँक्यू प्रभो थँक्यू म्हणायला लागायची तशी बाईंची मान मागे मागे अकॉर्डियन वाद्याप्रमाणे लांब लांब होत जायची! कोणत्याही नाठाळ घोड्याला गुडघे टेकवायला लावेल अशी आमच्या बाईंची प्रेक्षणीय आणि ठणठणीत प्रार्थना असे!

रविवारच्या शाळेत वर्षभर दर रविवारी मला तिची ही प्रार्थना पहायला आणि ऐकायला मिळत असे.
फॉक्सवुड जोडपे काटकसरीने राहात असे. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांची कशाच्या बाबतीत कसलीही कुरकुर नसे की तक्रार नसे. दोघांचा साठ वर्षांचा संसार असाच चालू होता. मिसेस फॉक्सवुड रविवारच्या शाळेत तिच्या त्या नामांकित प्रार्थनेत नेहमी देवापाशी तिच्या नवऱ्याला, “अक्बर्टवर देवा तुझी कृपा असू दे” अशी विनवणी करीत असे. बाईंची लांबलचक्, न संपणारी प्रार्थना चालू असे आणि इकडे माझे देवापाशी इतकेच मागणे असे की “देवा मिसेस फॉक्सवुडची प्रार्थना कधी थांबेल? मला भूक लागली आहे, झोप येतेय रे, आणि जोराची शू ही लागलीय देवा!”
मिसेस फॉक्सवुड अशी ठणठ्णीत प्रार्थनेची तर मि. फॉक्सवुड शांत शांत गप्प. चेहरा सुरुकतलेला, आकसलेला. नेहमी अंग चोरून असल्यासारखा त्याचा बांधा होता. चेहऱ्याप्रमाणे कपडेही चुरगळलेले.

यथावकाश मि. अल्बर्ट फॉक्सवुड वारला. आणि त्याचा मृतदेह माझ्या वडिलांनी नीटनेटका करून दर्शनासाठी आमच्या चॅपेल मध्ये ठेवला. पण रीतीप्रमाणे इतर बाहेरचे लोक येण्या अगोदर बराच वेळ आधी घरच्या लोकांसाठी राखून ठेवलेला असतो.

मिसेस फॉक्सवुड आल्या. त्यांना घेऊन माझे वडील चॅपलमध्ये आले. थोडा वेळ बाईंच्या बाजूला उभे राहिले आणि लगेच बाहेर आले. त्यावेळी मी तिथेच जवळ कुठे होते वाटते. वर जाण्यासाठी मी निघाले तर किंचित उघड्या दरवाजातून मला बाई दिसल्या. त्यांची माझ्याकडे पाठ होती. आजपर्यंत चर्चमध्ये जातानाचे त्यांचे पोषाख मला माहित होते. पण आजचा पोषाख काळा होता. मला वाईत वाटले. साठ वर्षे ज्याच्या बरोबर काढली तो आज सोडून गेला. साठ वर्षांचा साथीदार आज आपल्या बरोबर नाही. किती दु:ख झाले असेल बाईंना. हेच विचार माझ्या मनात चालू होते. मी वरच्या मजल्यावर जायला निघाले. इतक्यात फॉक्सवुडबाईंनी आपले हात वर आकाशाकडे नेल्याचे पाहिले. बाईची प्रार्थना सुरू होणार हे माझ्या लक्षात आले. मला राहवेना. मी तिथेच थांबले. त्यांची ती खास प्रार्थना ऐकायला मिळणार म्हणून मी थांबले.

“हे परमप्रिय प्रभो ! देवा ! थँक्यू, देवा, थँक्यू प्रभो अखेर आज तू ह्या मरतुकड्याला जमिनीत गाडलेस !थँक्यू थँक्यू देवा !”

फॉक्सवुडबाईंची मी ऐकलेली ही सगळ्यात लहान प्रार्थना !

[Based on a story from the book: The Undertaker’s Daughter]

जोडी जमली

१९१९ साल असावे. माझ्या आजोबांचे शिक्षण नुकतेच संपले असावे किंवा संपण्याच्या बेतात असावे. अजून त्यांना कुठे काम मिळत नव्हते आणि त्यात लग्नही झालेले. त्यांच्या आईचे झेकोस्लोवाकियातील कोसाइव्ह गावात एक दुकान होते. आईच्याच दुकानात ते काही काम करत असत. पण आई तरी असा कितीसा पगार देऊ शकणार? दुकानावर दोन घरे पोट भरू शकत नव्हती. नाईलाजाने आईने,” तू आता काहीतरी स्वतंत्र काम बघ, बाबा ” असे सांगितले.

आजोबांनाही स्वत:च्या पायावर उभे राहावे असे वाटतच होते. आपल्यापाशी धडाडी आणि धंदा करण्याची आवडही आहे हे त्यांना माहित होते. त्या दृष्टीने कोणता व्यवसाय करायचा आणि सध्या कोणत्या धंद्यात वाव आहे याची त्यांनी चाचपणी सुरू केली.

पहिले महायुद्ध नुकतेच संपले होते. झेकोस्लोव्हाकियात अन्नधान्य आणि जवळपास सर्वच गोष्टींचा फार तुटवडा पडला होता. कातड्याच्या वस्तूंचे तर अतिशय दुर्भिक्ष्य होते. चांगले आणि टिकाऊ बूट मिळणे दुरापास्त होते. गरजेपोटी लोक जाड पुठ्ठ्याचे आणि जाड कागद भरलेले बूट वापरत होते. लोक तरी काय करणार? मिळेल ते वापरत होते.

माझ्या आजोबांच्या लक्षात आले, हीच वेळ आहे ह्या धंद्यात उतरण्याची. त्याकाळी फार मोठी रक्कम वाटावी असे ५००० क्रोनिनचे कर्ज त्यांनी काढले. ते एका मोठ्या शहरात गेले. तिथे बुटांच्या ठोक व्यापाऱ्यांकडे अनेक खेटे घातले. अखेर त्यांच्या मनासारखा व्यवहार झाला. त्यांना मिलिटरीचे दणकट आणि टिकाऊ बूट मिळाले होते. दगदग झाली खरी पण आपले काम फत्ते झाले ह्या समाधानात ते घरी परत आले. लोक बुटांवर आधाश्यासारखी झडप घालतील आणि आपला माल हातोहात खपेल याची त्यांना खात्री होती.

आजोबांचा चेहरा कसा झाला असेल? तो कल्पनेनेही माझ्या डोळ्यांसमोर येतो. मोठ्या उत्साहाने त्यांनी मोटारीतली खोकी उघडून सगळ्यांना दाखवायला सुरवात केली. आणि त्यांचा चेहरा इतका रडवेला झाला की ते आता केव्हाही मोठ्याने रडायला सुरवात करतील!

ते वर्णन करत होते त्या मिलिटरीच्या टिकाऊ आणि दणकट बुटांच्या पाचशे जोड्या ऐवजी तिथे फक्त एक हजार उजव्या पायाचेच बूट होते! काय झाले असेल आजोबांच्या मनात त्यावेळी! कर्ज काढून केलेल्या पहिल्याच व्यवहारात असा जबरदस्त फटका!

आजोबा, हृदयाला पीळ पडेल असे हुंदके देत देत खाली मान घालून तोंड दाबून रडत होते. उजव्या पायाच्या एक हजार बुटांची रांग त्यांच्याकडे छद्मीपणाने बघत हसत होती ! डाव्या पायाचा एकही बूट त्यात नव्हता. हे बूट कवडी किमतीचे नव्हते. मित्रांकडून, नातेवाईकांकडून शेजाऱ्यांकडून ओळखीच्या लोकांकडून काढलेले मोठे कर्ज आता कसे फेडायचे हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. आपल्या बायकोमुलाचे पोट कसे भरायचे, लोकांना तोंड दाखावायलाही आता जागा नाही असे विचार त्यांच्या मनात एकापाठोपाठ एक येऊ लागले.

” ताबडतोब शहरात जा. त्या व्यापाऱ्याला गाठ आणि त्याच्याकडून पैसे वसूल कर. सोडू नकोस त्याला आता,” असे सगळेजण त्यांना सांगू लागले.

माझे आजोबा पुन्हा त्या मोठ्या शहरात गेले. त्या व्यापाऱ्याला गाठायला गेले तर काय! त्याचा पत्ता नाही. इतर एकाही व्यापाऱ्याला त्याची काहीही माहिती नव्हती. माझे आजोबा सगळ्या शहरात भटक भटक भटकले पण त्या भामट्याचा त्यांना कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अगदी निराश, हताश होउन ते माघारी आले.
आजोबा काही दिवस उदास होउन खिन्न बसायचे. एके दिवशी आजी त्यांना म्हणाली, ” अहो असे बसून कसे चालेल? त्या सदगृहस्थाकडे तरी जाऊन या. सगळे त्यांचे नाव घेतात. सत्पुरुष आहे म्हणे. काहीतरी उपाय सांगेल. जा तरी एकदा त्यांच्याकडे.” त्यांनी आजीचे ऐकले. त्या सत्पुरुषाकडे गेले. तिथे गेल्यावर आजोबांना एकदम रडेच फुटले. थोडे शांत झाल्यावर त्यांनी आपली सगळी कर्मकहाणी सांगितली. प्रथम ते साधुपुरुष काही बोलले नाहीत. पण त्यांना आजोबांच्या सरळपणाची, धडपडीची जाणीव झाली असावी. ते त्यांना दयार्द्र बुद्धीने इतकेच म्हणाले,” हे बघ मुला, देवाची मनापासून करुणा भाक. अत्यंत तळमळीने त्याची प्रार्थना कर. सध्या तरी मला इतकेच सांगता येते.” त्या साधुपुरुषाच्या शब्दांतून दया ओसंडत होती असे आजोबांना वाटले.

आजोबा देवळात गेले आणि प्रार्थना करू लागले. त्यांना दुसरे काही सुचेनासे झाले. जवळपास त्यांनी स्वत:ला कोंडूनच घेतले. किती दिवस ते देवळात जात असतील सांगता येत नाही. जायचे, प्रार्थना करायला बसले की डोळ्यांतून अश्रू ओघळायचे. प्रार्थना चालूच असायची. आपल्या भोवती काय चालले आहे, कोण आले, गेले ते त्यांच्या ध्यानीही नसायचे. त्यांना पाहून इतर भाविकही अगदी आवाज न करता जात असत.

आपले झालेले नुकसान आणि सर्वनाश ह्या विचारातून ते बाहेर आले असतील का नाही ते माहित नाही. पण प्रार्थना करताना इतर कशाचेही भान नसायचे हे खरे; नाहीतर एक नवखा माणूस आला आणि एका कोपऱ्यात जाऊन हुंदके देतोय हे त्यांना ऐकू आले असते. पण बराच वेळ त्यांना काहीच ऐकू आले नाही. नंतर मात्र तो माणूस मोठ्यानी हुंदके देत रडू लागला तेव्हा त्यांनी त्याच्याकडे पाहिले. त्या माणसाला ते ओळखत नव्हते. पण त्याचे ते रडणे ऐकून मात्र त्यांना राहवेना. देवळात ते एकटेच होते. ते उठले आणि त्याच्या जवळ गेले. आपण काय मदत करू शकणार त्याला असेच त्यांना मनात वाटत होते. पण आजोबांनी त्याला शांत करत त्याची विचारपूस केली. त्याला काही मदत हवी का असे विचारले. त्यावर तो माणूस रडक्या आवाजातच म्हणाला,” मला कोणीही मदत करू शकणार नाही. अहो मी फार मोठे कर्ज काढून धंद्यात ओतले हो! पण माझे दुर्दैव असे की त्या चोर व्यापाऱ्याने मला साफ गंडवले. सपशेल बुडवले. मला वाटत होते की मी मिलिटरी बुटाचे पाचशे जोड विकत घेतले. पण पाहतो तो काय?

सगळ्या खोक्यांत फक्त डाव्या पायाचे एक हजार बूट निघाले !” इतके सांगून भकास नजरेने तो माझ्या आजोबांकडे पाहात राहिला. रडून रडून दोघांचेही डोळे लाल झाले होते. पण आजोबांच्या डोळ्यांत मात्र आनंदाचे अश्रू दिसू लागले. ते त्या माणसाला म्हणाले, ” माझ्या दोस्ता, तुझ्यासाठी एक आनंदाची खबर आहे .”

माझे आजोबा आणि नव्याने झालेल्या मित्राने भागीदारीत बुटांचा व्यवसाय सुरू केला. ते दोघे जोडीदार झाले. बुटांच्या जोडांसारखी त्यांचीही जोडी छान जमली.

पुढे माझे आजोबा, ॲरोन लेझर, हे नामांकित उद्योजक झाले. खूप श्रीमंतही झाले. झेकोस्लोव्हाकियाच्या आर्थिक जगातही त्यांनी मोठ्या मानाचे स्थान मिळवले!

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

शेवटचा दिस

मृत्यु, मरण , मृतदेह, प्रेत, मढे, हे शब्द आपल्या रोजच्या बोलण्यात कधीही नसतात. इतकेच काय त्याचे विचारही आपल्या मनात नसतात. ‘मेला, मेले’ हे शब्दही आपण वापरायचे कटाक्षाने टाळतो. ‘गेले’ असे त्याचे सौम्य रूप करून म्हणतो.
ज्यांचा ह्या गोष्टीशी आणि त्या संबधातील वस्तु, विधी, संस्कार करण्याशी रोज संबंध येत असेल त्यांच्या घरी कसे वातावरण असेल हा विचारही आपल्या मनात येत नाही. ज्यांची ती उपजीविकाच आहे त्यांचे रोजचे आयुष्य कसे असेल?

तर, परवाच मी ‘द अंडरटेकर्स डॉटर्’ हे केट मेफिल्डने लिहिलेले तिच्या आठवणींचे पुस्तक वाचले. विषय वरती दोन परिच्छेद लिहिले त्या संबंधीच आहे. अंत्यसंस्कार करणाऱ्या वडिलांची ही मुलगी. वडलांचे ‘मेफिल्ड & सन फ्युनरल होम’ हे व्यवसायाचे नाव.

त्यांचे घर दोन मजली. जिथे असला व्यवसाय असतो त्याच ठिकाणी घरचे लोक राहात नसतात. पण हे सगळे कुटुंब मात्र त्याच इमारतीत राहत असे. ज्युबिली नावाच्या लहानशा गावातील अंत्यसंस्कार करणाऱ्या(च्या) घरात जन्मलेली ही लेखिका. एक भाऊ आणि ह्या तीन बहिणी. आई कडक शिस्तीची. आईसमोर शांत गप्प गप्प असणारे वडील्, सुस्वभावी आणि खेळकर स्वभावाचे उमदे गृहस्थ. सर्वाना केव्हाही मदत करायला तत्पर असणारे. गावात एक प्रतिस्पर्धी असूनही आपल्या स्वभावाने त्यांनी सावकाशपणे चांगला जम बसवला होता. गाव फार मोठे नाही आणि फार लहानही नाही. त्यामुळे गावातील सगळेजण एकमेकांना ओळखत. गावातील प्रत्येक घराला हिच्या वडलांची केव्हा ना केव्हा मदत घ्यावी लागणारच असे; त्यामुळे तिथले सर्वजण अणि काही बडी धेंडे, सगळ्यांशी वडलांची ओळख होती ह्यात आश्चर्य नव्हते.

उपजीविकाच ती म्हटल्यावर , घरात मृत्यु, मृतदेह, त्याचे शोकग्रस्त नातेवाईक हे वातावरण सतत असायचे.
‘ वुइ’व गॉट अ बॉडी’, ‘प्रेत येणार आहे’ असे आई म्हणाली की आई वडिलांचे बोलणेही हळू आवाजात होई. सर्व मुलांची रवानगी वरच्या मजल्यावरील खोल्यात होई. लहान लेखिकेला तर त्या देहावरचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत किंवा कधी तो दफन होईपर्यंत खाली येण्यास बंदी असे.

घरात शाळेच्या, मित्रमैत्रिणींच्या गप्पा सोडल्या तर एरव्ही ‘ह्याचीच’ बोलणी. कोण केव्हा जाईल हे कधी सांगता येते का? लेखिकेच्या आई वडलांना गावात कोण किती गंभीर आजारी आहे, कोण किती अत्यवस्थ आहे, कोण किती दिवसांचा, तासांचा सोबती आहे ह्याची नेमकी माहिती असे. आणि त्यांच्या बोलण्यातही हेच असायचे. जेवतानाही मधून मधून हाच विषय असायचा. सर्वच माणसांचा शेवट मृत्युतच होणार. पण ती म्हणते,” आमच्या रोजच्या आयुष्यात जेवतानाही ‘मृत्यु’ मध्ये यायचाच. आई विचारायची,” मि. शूमेकर आपल्यालाच मिळणार होता. त्या अल्फ्रेड डेबो(ह्यांचा प्रतिस्पर्धी) कडे कसा काय नेल्ं त्याला ?” “हो ना! शूमेकरकडे इतकी माणसं येणार म्हणून आपण त्यांच्या घरी खुर्च्याही नेऊन दिल्या होत्या!” “जाऊ दे. दुसरा कुणीतरी येइलच की आपल्याकडे.”

ह्यांच्या घरात प्रत्येक खोलीत फोन होता. आई बाबा, खाली काम करणारे दोघे चौघे कोणीही कुठेही असले तरी फोन पटकन घेता यायचा. फोन उचलला नाही, उचलायला वेळ लागला म्हणून ‘बॉडी’ आपल्या कडून जायला नको !
फोन खणखणला की, सगळे घर एकदम गप्प व्हायचे. वडील अशा वेळी त्यांच्या ‘अंडरटेकरच्या’ आवाजात बोलायचे. आई बाबांच्या आवाजावरून आमचे तर्क बांधले जायचे. आई हळूच हलक्या स्वरात “इझ इट जेम्स्?” विचारायची. वडिलांच्या एका हो किंवा नाही या शब्दावरून, मान हलवण्यावरून घरातील पुढ्च्या गप्पाटप्पा, हसणे, आमची वादावादी हे सर्व अवलंबून असायचे.!

बाबा कधी कधी खोटेच गंभीर होत. ते लवकर काहीच सांगत नसत. काही वेळाने “तसे काही नाही” समजल्यावर आई चिडल्यासारखे दाखवायची. आम्ही भावंडे पुन्हा आमच्या गमती जमतीत रमायचो. अशा वातावरणात, घरात काही समारंभ, पार्टी करायची असली, इतकेच काय नेहमीचे सणवार करायचे असले तरी गावातल्या घराघरातील, दवाखान्यात असलेल्या “आजाऱ्यांचा” आणि ‘कोण? केव्हा?’ त्याचा अंदाज घेऊन कार्यक्रम ठरवावे लागत. दिवस किंवा वेळ केव्हा आणि कसा आनंदात घालवायचा ह्याचीही तारीख आणि मुहुर्त ठरवूनच घराला अणि भावंडांना आनंदित व्हावे लागायचे !

आईचा ब्रिजचा ग्रूप होता. त्या बायकांचे पोषाखापासून ते खाण्याचे पदार्थ त्यावेळी किती पटापट संपत, बशा पुन्हा पुन्हा भरून ठेवाव्या लागत, तसेच प्रत्येकीच्या स्वभावाचे बोलण्याचे बारकाईने खुसखुशीत वर्णन केले आहे. सगळीकडे होतात तशा ह्या बायकाही इतरांची म्हणजे हजर नसलेल्यांची उणी दुणी किती चतुराईने काढतात; इतक्याजणी येणार म्हटले की खाण्यापिण्याच्या तयारीची, स्वयंपाक घरातली गडबड लगबग, घरातला पसारा आवरण्याची तारांबळ, ‘तसला फोन’ येतो की काय ह्या धसक्याची टांगती तलवार, अशा कार्यक्रमावर (अगोदर कितीही खात्री करून घेतली असली तरी) सतत लटकलेली असायचीच.

पत्ते खेळणाऱ्यांपैकी एक बाई शाळा मास्तरीण होती. ती बाई कुणाच्याही एखाद्या साध्या वाक्यातून, शब्दावरून लगेच इतिहासातील घटना, भूगोलातल्या घडामोडी, शब्दाची व्युत्पत्ती असे काही मध्येच सांगत बसायची. असले काही तरी रूक्ष रटाळ सांगून, हलक्या फुलक्या मजेशीर गप्पांना ती बाई ‘सामान्य ज्ञानाची परीक्षा’ करून टाकायची. गप्पांचा खळखळता ओघ अडवला जायचाच पण तो खेळकरपणा परत यायलाही वेळ लागायचा.

लेखिकेच्या ‘त्या घरात’ अंत्यसंस्कारच्या वेळी पियानो वाजवायला टॉटी नावाची तरूण मुलगी यायची. ठरलेल्या वेळेपेक्षाही ही उशीरा यायची. तिची वाट बघत, मृतदेह, त्याची नातेवाईक मित्र मंडळी आणि आमचा स्टाफ ताटकळत बसलेला असे. पण टॉटी मात्र यायची ती हसत हसत आणि प्रत्येकाकडे हसून पाहात हाय हॅलो म्हणत पियानोवर बसायची!

एके दिवशी’ तसला विधीचा’ कार्यक्रम संपल्यावर पियानोवर मला एक माळ पडलेली दिसली. टॉटीला मी ती पाहू का म्हटले, नेहमीप्रमाणे हसून ,”हो, पाहा ना घे” म्हणत तिने ती मला दिली. माळेवर मी बोटे फिरवत मी तिला परत दिली. मला ती माळ आवडली होती. बस इतकेच. टॉटी गेल्यावर आई रागवून म्हणाली, “पुन्हा तिच्या माळेला हात तर लाव म्हणजे तुला मी दुसरा दिवस उजाडेपर्यंत बडवून काढीन.” मी घाबरले. तरी मी आईला विचारलेच, “माळ हातात घेऊन पाहिली तर त्यात एव्हढे काय झाले?” पण ते आईला कसे पटणार? नंतर माझ्या लक्षात आले. हां, त्या माळीला एक क्रॉस होता. पण असे लहान मोठे असंख्य क्रॉस ज्युबिलीत होते. अनेकांच्या गळ्यातही दिसत. पण नंतर समजले की आईचा राग ती माळ जपाची होती आणि त्याहूनही गंभीर अपराध म्हणजे टॉटी कॅथॉलिक होती. आमच्या सदर्नर गावात कुणी कॅथॉलिक असे नव्हतेच. अरे देवा! हे असे आहे होय! मला तिचा क्रॉस फक्त क्रॉस वाटला होता. माझे त्याकडे लक्षही नव्हते. मला कसे माहित असणार की क्रॉसही कॅथलिक, प्रॉटेस्टंट असतो ते!

प्रार्थनेसाठी आणि देहाच्या दर्शनासाठी घराच्या आवारात एक चॅपेल होते. ब्रदर व्हिन्सेन्ट प्रार्थनेसाठी यायचा. टॉटीने पियानोवर एक दोन भक्तिगीते म्हटली की हा बोलायला सुरुवात करायचा. समोरच्या शवपेटीत मृतदेह, आजुबाजूला दु:खित नातेवाईक्, आणि इतर लोक. हा ब्रदर व्हिन्सेन्ट पाद्री प्रार्थना म्हणायला सुरू करायचा. त्यात देवाचे आभार मानून झाले की देवाच्या आशिर्वादाला सुरुवात व्हायची. आशीर्वाद त्या मृताच्या गोठ्यातील गाईगुरांपासून किंवा तो दुकानदार असला तर दुकानातील वस्तूंना मग त्या माणसाच्या पाळीव प्राण्यांना आशीर्वाद देऊन व्हायचे. त्यानंतर घरातील सर्वांना असे करत करत ही आशीर्वादांची शेपटी सारखी लांबत त्याच्या ट्रॅक्टरलाही किंवा मोटारीलाही ही आशीर्वादाची खैरात मिळायची; देव दयाळू असतो, अखेर ब्रदर व्हिन्सेन्ट सर्वात शेवटी देवाची कृपा मृतव्यक्तीवर करायचा ! हे झाले की त्याचे प्रवचन सुरू व्हायचे. प्रवचनाचे पहिले वाक्य संपण्याच्या आतच टॉटी पियानोची पायपट्टी दाबून भैरवीचे हाइम्न म्हणायला सुरवात करायची ! जमलेली मंडळी टॉटीकडे हळूच हसून पाहात नजरेनेच तिचे आभार मानायचे. शक्य असते तर मृतदेहानेही तेच केले असते.

पुस्तकाचा निम्मा भाग मृतांच्या संदर्भातून सजीव झाला आहे. पण गाव, त्यातील काही व्यक्तींचे, आपले वडील, भाऊ, बहिणी शाळा अशा जीवनाशी संबंधित अनेक गोष्टीमुळे पुस्तक केवळ अंत्येष्टीचे राहात नाही. लेखिका हायस्कूलमध्ये गेल्यापासून फ्युनरल होम मधील फ्युनरल अस्तंगतच झाल्यासारखे आहे.
लेखिकेने आपल्या वडिलांविषयी आणि भावाविषयी उत्कटतेने लिहिले आहे. तिने आपल्या लहानपणीच्या डोळ्यांमधून पाहिलेल्या आठवणी खरोखर वाचनीय आहेत. शेवटपर्यंत तिच्या आठवणीत असलेल्या काहीजणांचे तिने लिहिलेले स्मरण लेख वाचनीय आहेत.

वाचक, पुस्तकाचे ‘अंडरटेकर्स डॉटर’ हे नाव वाचल्यावर किंवा ‘मेफिल्ड & सन फ्युनरल होम ‘ हे पहिल्याच पानावरील शब्द पहिल्यावर दबकत, पावलांचा आवाजही न करता ह्या घरात प्रवेश करतो. पण लेखिका आपल्याला इतके गंभीर होण्याचे काही कारण नाही हे तिच्या सरळ आणि खेळकर शैलीने पहिल्याच पानात सांगते .
पुस्तक, मन हेलावणाऱ्या, हृदयाला भिडणाऱ्या प्रसंगातून, शब्दांतून , एका निराळ्या आणि रोजच्या व्यवहारात ज्याचा उल्लेखही होत नाही असा व्यवसाय करणाऱ्या घराचे, त्यातल्या तुमच्या आमच्या सारख्या माणसांचे , त्यांच्या रोजच्या आयुष्याचे हृदयंगम वर्णन करणारे आहे. तरीही अर्ध्या पाऊण भागानंतर पुस्तक लांबले आहे असे वाटते. जोपर्यंत तिच्या बाळपणीच्या आठवणी आहेत तोपर्यंत ह्या ‘फ्युनरल होम मधून वाचक लवकर बाहेर येत नाही. आणि ज्युबिली गावातला मुक्कामही थोडा वाढवावा म्हणतो.

मृतदेहाबरोबर त्याच्यासाठी घरची माणसे घड्याळ अंगठी, गळ्यातल्या माळा अशा वस्तू ठेवत असतात. मृताबरोबर त्याही अखेर जमिनीत पुरल्याच जातात. पण ” मोस्टली, व्हॉट द डेड टेक विथ देम आर देअर सिक्रेट्स.” हे अंडरटेकरच्या मुलीशिवाय दुसरे कोण म्हणू शकेल?

उपसंहार

विलक्षण अनुभवाच्या ह्या गोष्टी आहेत यात शंका नाही. ह्या अनुभवांना योगायोग म्हणायचे की चमत्कार हा एका निराळ्या चर्चेचा विषय होईल. अनुभवांची विविधता आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांच्यातील विविधता,त्यामुळेही हे अनुभव वाचावेसे वाटतात. काही गोष्टी योगायोग वाटतात हे खरे. पण काही घटनांची उकल नेहमीच्या तर्क बुद्धीच्या आधारे करणे शक्य होत नाही.

पहिली भेट, पहिले प्रेम, ह्या गोष्टी विसरता येणे अशक्य आहे असे म्हटले जाते.निदान सत्तरीतला आयर्व्हिंग तरी विसरला नव्हता. आपल्या प्रिय हेन्रिएटाच्या ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ अशी तीव्र आस एकाकी आयर्व्हिंगला लागली होती.हेन्रिएटा त्याची पहिली प्रेयसी.त्याच्या पहिल्या प्रेमाची आणि आयर्व्हिंगची एका स्त्रीच्या तीव्र सदिच्छेमुळे, अखेर भेट होते.त्याचे उत्कट प्रेम सफळ होते. शेवट हृदयंगमरीत्या गोड होतो. योगायोग घडून येण्यासही इथे एका स्त्रीची तीव्र सदिच्छाच कारणीभूत ठरली.

‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही’ किंवा ‘चमत्कार तिथे नमस्कार’ असे आपण बरेच वेळा म्हणतो. पण रब्बाय शपिराच्या बाबतीत नमस्कारामुळेच चमत्कार घडला. रोजच्या अत्यंत मनापासून केलेल्या,”गुड मॉर्निंग्,हर्र म्युलर्” मुळेच त्याचे प्राण वाचले.

‘कुणाच्या खांद्यावर….” असे आपल्याला डेव्हिड ब्रॉडीविषयी वाटले तरी त्याच्या निरपेक्ष धडपडीमुळेच,”रावाचा रंक झालेल्या” निर्धन, आणि निराधार सॅम्युअल विंस्टाईनला, स्वाभिमानाने, प्रतिष्ठा राखून,आपल्या स्वत:च्या जागेत अखेरचा विसावा घेता आला!. ह्या घटनेला योगायोग म्हणायचा का चमत्कार?

‘अचानक धनलाभ’, ‘अकल्पित संपत्तीयोग’ असे आपण बरेच वेळा वर्तमानपत्रातील भविष्यात वाचतो. पण टॉम स्टोनहिलला त्या अपरात्री अंत्यविधीच्या शौचालयात जावे लागते आणि त्याच्या म्हशीचाही मावसभाऊ लागत नसलेल्या कुणा स्टॅन्ले मॅरोची सर्व संपत्ती टॉमला कायदेशीररीत्या मिळते. लॉटरी लागण्यासाठीसुद्धा एखादे तिकिट घ्यावे लागते! इथे एक पैसाही कुणाला खर्चावा लागला नाही! ही केवळ अचंबित,थक्क करणारी घटना असे म्हणायचे का? ती तशी आहे हे नक्की. पण हे असे कसे घडले? कसे घडते? खरेच झाले असेल का? असे प्रश्न आपल्याला पडतातच.

त्या मागचा कार्यकारणभाव उलगडत नाही. कादंबरीच्या हस्तलिखिताची प्रत चोराच्या हातून नेमकी लेखकाच्याच अंगणात पडावी ह्यामध्ये योगायोगाचा भाग आहे असे वाटते.पण हा योगायोग घडून आला ह्याचा आनंद लेखका इतकाच आपल्यालाही होतो.

एकमेकांची काहीही ओळखदेख नसताना, दोन आंधळ्या व्यक्ती कोणत्या शक्तीने सहज चौक ओलांडतात? तारुण्यसुलभ भावनांच्या मधुर आवेगानेच त्यांनी तो ओलांडला असावा! गमतीचा भाग असा की दोघांनाही आपला सखासोबती डोळस आहे असे वाटत असते! तारुण्याच्या भरतीची लाट अशी असते!

१८३८ साली लिहिलेल्या कादंबरीतील “टायटन” आणि १९१२ साली तयार केलेल्या तुलनेने आधुनिक “टायटॅनिक” बोटींचे त्यांच्या निर्मितीतीतील साम्य आणि दोन्ही बोटींचा तितकाच एक सारखा दुर्दैवी शेवट पाहून ह्याला काय म्ह्णायचे ते समजत नाही. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणायची का चमत्कार?

तयार कपड्यांच्या मोठ्या कारखानदाराची उधारी, एक सज्जन आणि सचोटीने व्यापार करणारा व्यापारी,त्याचा धंदा बुडाला, काही वर्षे उलटून गेली तरी जवळचा अखेरचा दागिना देऊन ती चुकती करतो. त्या सोन्याच्या कड्याची किंमत नेमकी ८७२४ डॉलर्स कारखानदाराला मिळते! व्यापारी आणि सचोटी ह्या दोन गोष्टी सहसा एकत्र आढळत नाहीत असा अनेकांचा अनुभव असतो. पण अपवाद हे असतातच. असे सचोटीचे व्यापारी असतात हे तितकेच खरे आहे. आपल्याही माहितीचे असे काही व्यापारी असतात.

ह्या गोष्टीवरून मला माझ्या धाकट्या भावाने फार पूर्वी संगितलेली, ह.भ.प.ल.रा. पांगारकरांच्या आयुष्यात घडलेली अशाच तर्‍हेची घटना आठवली. त्यांनी आपल्या “चरित्रचंद्र” ह्या आत्मचरित्रात ही लिहिली आहे.

ल.रा. पांगारकर आधुनिक शिक्षण घेतलेले आणि श्रद्धावान गृहस्थ. लेखक, आणि ‘मुमुक्षु’मासिकाचे संस्थापक आणि संपादक. व्यवहारात आर्थिक चढ उतार येतच असतात. काही काळ त्यांची ओढग्रस्त स्थिती झाली होती. घराचे भाडेही ते देऊ शकत नव्हते. घरमालक रोज तगादा लावायचा. एके दिवशी तर जागा सोडून जा असे म्हणाला होता. पांगारकरांसारख्या सज्जनाला आपण घरमालकाचे पैसे देऊ शकत नाही ह्याचे वाईट वाटत होते. कुठुनही पैसे येण्याची शक्यता नव्हती. असेच एका रणरणत्या दुपारी ते घरी बसले होते. दुपारची उन्हाची वेळ होती. काळजी चिंता तर पोखरतच होती. तिचा दाह तो निराळाच. तेव्हढ्यात एक गृहस्थ आला. पांगारकारांना नमस्कार करून म्हणाला,” आपल्या मासिकाची विक्री आणि काही वर्गणीदारांची बाकी आणली आहे ती मोजून घ्या” पांगारकरांना तसे काही आठवत नव्हते. पण वेळ भर उन्हाची म्हणून पांगारकर अगोदर त्या माणसासाठी पाणी आणण्यासाठी घरात गेले. पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आले तर तो माणूस पैसे व्यवस्थित ठेवून निघून गेला होता. पांगारकर बुचकळ्यात पडले. बाहेर येऊन पाहिले. पण तो माणूस दिसला नाही. काय कारू शकणार ते? त्यांनी पैसे मोजले. ते नेमके ३७ रुपये आणि काही आणे भरले. थकलेल्या घरभाड्याची नेमकी रक्कम!

ह्या गोष्टींना ‘योगायोगांच्या’, ‘बोला फुलांची गाठ’ ‘अच्ंबित करणाऱ्या अकल्पित घटना’ किंवा ‘विलक्षण अनुभव’ म्हणा, काहीही नाव द्या. त्या कशाही असोत पण एक खरे की मित्रमंडळीत गप्पाष्टके रंगवायला ह्या “अनुभवाच्या”गोष्टी, किस्से विविधता आणतील.गप्पांची खुमारी वाढवतील ह्यात शंका नाही. आपल्यालाही असे काही अनुभव आले असतात. तेही आठवतील.

काय म्हणावे हे कळत नाही अशा घटना आहेत ह्या. अखेर कार्ल युंग म्हणतो ते बरोबर आहे असे वाटते. ‘शक्याशक्यतेच्या पलीकडेही’ काहीतरी असलेल्या ह्या घटना आहेत एव्हढेच आपण म्हणू शकतो.
हे अनुभव ” स्मॉल मिरॅकल्स ” ह्या लहानशा पुस्तकातील आहेत. लेखक (किंवा लेखिका असतील) दोघेही ज्यू असल्यामुळे ज्यू लोकांचे अनुभव यामध्ये जास्त आहेत्.

ह्या विलक्षण, पण “सुरस, आणि चमत्कारिक” गोष्टी वाचून मला आनंद झाला तसा तुम्हालाही होवो असे म्हणून “उपसंहाराचे” चार शब्द , आपणा सर्वांची नेहमीची प्रतिक्रिया व्यक्त करून संपवतो:
“जगात काय, केव्हा, कुठे आणि कसे घडेल हे सांगता येत नाही.”

उपोदघात

आपल्या रोजच्या व्यवहारात, अगदी घरातल्या घरातही काही वेळेस अशा घटना घडतात, असे प्रसंग येतात की आपल्याला नवल वाटते. “अरेच्या! मी आताच तुम्हाला फोन करणार इतक्यात तुमचा आला!” ” या या , आम्ही तुमचीच आठवण काढत होतो बघा. हो ना गं? आणि तुम्ही आलात व्वा !” असे किरकोळ परचित्त ज्ञानाचे प्रसंग तर सगळ्यांच्या रोजच्या अनुभवाचे आहेत.

बरेच वेळा माणसाला, कसलीही कल्पना नसताना असे अनुभव येतात की त्यावर विचार करुनही त्याचा उलगडा होत नाही . त्याला आपण योगायोग म्हणून पुढे जातो. पण अशा घटना कधी इतक्या अदभुत आश्चर्यकारक, विश्वास न बसाव्या अशा असतात. त्याला कोणी चमत्कारही म्ह्णतात . पण सध्याच्या काळात ‘चमत्कार’, दैव, ‘भवितव्य घडविणारा’ ‘प्राक्तन’ अशा शब्दांना मागणी नाही. कर्तृत्वान, कर्तबगार माणसांना त्या शब्दांचा आधार घ्यावा लागत नव्हता आणि नाही हेही खरे वाटते.

बहुतेक प्रसंगी ‘योगायोग हा शब्द मात्र बरेच वेळा ऐकायला येतो. कारण त्यातही काही गोष्टी एकाच वेळी अवचितपणे घडून येतात. पण काही विस्मयकारक गोष्टी जेव्हा आकस्मिक, अचानक घडतात तेव्हा माणूस अवाक होतो.
त्यावेही हा केवळ योगायोग म्हणायचा की चमत्कार म्हणायचा? ज्याचे त्याने हे ठरवावयाचे. अशा घटना परमेश्वरच, नामानिराळा राहून घडवून आणतो असे मानणारेही बरेच आहेत. लेखिका डोरिस लेझिंगचेही हेच म्हणणे आहे.

कार्ल युंग हा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होउन गेला. फ्राईड आणि कार्ल युंग दोघे समकालीन. त्याच्याकडे बरीच वर्षे अनेकजण त्यांना आलेले अविश्वसनीय, योगायोग, विस्मयजनक ह्या सदरात मोडणारे अनुभव सांगत. त्यांच्यासाठी त्याने आपली बरीच वर्षे दिली. त्या अनुभवांचा शास्त्रीय अभ्यास केला, आणि अशा अनुभवांचे नामाभिधान त्याने सिंक्रोनिसिटी या शब्दात केले. याचा अर्थ “मीनिंगफुल कोइन्सिडन्सेस ऑफ टू ऑर मोअर इव्हेंट्स व्हेअर समथिंग आदर दॅन द प्रॉबेबॅलिटी ऑफ चान्स इज इन्व्हॉवल्ड्”

आपण योगायोग, नशीब,आणि इंग्रजीतील लक, चान्स्, कोइंसिडन्सेस अशा शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल अशा घटना, अनुभव वाचणार आहोत. ह्या घटनांना काय म्हणायचे ते आपण स्वत:च ठरवायचे आहे. हे अनुभव बऱ्याच ज्यू लोकांचे आहेत. तसेच इतरही काही विक्रेते, गृहिणी,सामान्याजनांचे, लेखक, कादंबरीचेही आहेत.

पण त्या अगोदर एका डॉक्टराचा अनुभव वाचू या आणि यथाक्रमे पुढचे नंतर वाचू:

डॉक्टर बर्नाइ साइगेल, एक बालरोगतज्ञ आणि शस्त्रक्रिया तज्ञ सांगतात,”माझ्या आयुष्यात एक घटना नेहमी कायमची होत असते. मी कुठेही गेलो तरी मला एक पेनी सापडतेच! रस्त्यावर्, दुकानात, उपहारगृहात इतकेच काय एखाद्या हॉटेलात नुकत्याच स्वcच केलेल्या खोलीत गेलो तरी तिथेही मला पेनी सापडणारच. मला ती केव्हाही हुडकावी लागत नाही; मी आणि पेनी इतके अविभाज्य घटक आहोत.

आमच्या मिरॅकलला मांजराला खेळगडी असावा असे आम्हाला वाटत होते. आमच्या शेजाऱ्याच्या मांजरीला काही पिल्ले झाली. त्यांच्याकडून आम्ही एक पिल्लू आणले. पण त्याचे आणि आमच्या मांजराचे काही पटले नाही. काही दिवसांनी आम्ही त्यांना ते परत करायला गेलो. दुसरे आहे का म्हणून विचारले. ते म्हणाले एकच आहे. बघितले. फारसे काही गोजिरे वगैरे नव्हते. पण कोणीतरी खेळायला मिळाले आमच्या मिरॅकलला हे समाधान होते. पिल्लू घेऊन जाताना त्यांनी त्याचे काही नाव ठेवले आहे का असे विचारले असता, ते म्हणाले,” हो, त्याचे नाव आम्ही ‘पेनी’ ठेवलेय!”

व्यापारी आणि सचोटी

कॅनडात माझा तयार कपड्यांचा कारखाना होता. त्या उद्योगात माझे नावही मोठे होते. मी ज्या सिनेगॉगमध्ये जात असे तिथेच माँट्रिएलचा तयार कपड्यांचा व्यापारीही येत असे. माझी आणि त्याची फारशी ओळख नव्हती. पण तो एक सज्जन आणि सचोटीने व्यापार करणारा म्हणून सर्वजण ओळखत. बाहेरही ह्या गुणांमुळे त्याला लोक मान देत.

त्याला मी एकदा ८७२४ डॉलरचा माल पाठवला. आमच्या दोघात झालेल्या कराराप्रमाणे माल मिळाल्यापासून साठ दिवसांनी त्याने माझे पैसे चुकते करायचे असे ठरले.

मुदत उलटून गेल्यावर माझ्या हिशेबनीसाने, माँट्रिएलच्या त्या दुकानदाराने अजूनही रक्कम पाठवली नाही असे माझ्या नजरेस आणले. प्रथम असे कसे झाले त्या व्यापाऱ्याकडून याचे आश्चर्य वाटले. पण माझा अपेक्षाभंग झाला हे खरे.

आम्ही त्याला, त्याच्याकडून ८७२४ डॉलर्सची रक्कम येणे बाकी आहे तरी ती त्वरित चुकती करावी अशी तीन पत्रे पाठवली. पण त्याचाही उपयोग झाला नाही. शेवटी मीच स्वत: त्या व्यापाऱ्याला फोन लावला. ” अहो हे काय चालंलय? ठरलेली मुदत संपूनही महिना होवून गेला. केव्हा देताय पैसे?” ” हे बघा, ” तो दुकानदार म्हणाला,” मलाच फार वाईट वाटतंय हो. पण काय करू? गेले काही महिने धंदाच नाही . तुमचाच नाही तर इतरांचा मालही पडून आहे.काही उठाव नाही. दुकान बंद करण्याची पाळी आलीय माझ्यावर. काय सांगू! माझ्याकडे एक पैसा नाहे सध्या . खरं सांगतो.” तो दुकानदार तळमळून बोलत होता.

मी तरी काय करणार? मनुष्य चांगला आहे, सचोटीचा आहे हे सगळे खरे. पण मालाही कच्च्या मालचे आणि इतर अनेकांचे पैसे द्यायचे असतात. अखेर मी अमच्या रब्बायला विचारले, “मी काय करू? कोर्टात जाऊ का त्याच्या विरुद्ध? काही म्हटले तरी ८७२४ डॉलर्स काही लहान रक्कम नाही. मलाही पैशाची निकड आहे. आणि दुसरीकडे त्याच्याबद्दल वाईटही वाटते. त्याच्या सांगण्यावरून त्याचे दिवस फिरल्यासारखे वाटतात. तुमचे काय मत आहे? मी काय करावे”?
रबायने ठाम असे काही सांगितले नाही. “तुझ्या मनाचा एकदा कौल घेआणि ठरव.”इतकेच ते म्हणाले. म्हणजे पुन्हा माझ्यावरच आले सर्व.

मी बरेच दिवस ह्यावर विचार केला. त्याच्यावर खटला भरावा असे काही वाटेना. तो व्यवहार विसरायचे ठरवले. माझ्या व्यवसायाच्या रोजच्या उलाढालीत मी गुंतून गेलो. काही दिवसांनी त्या गृहस्थाने दुकान, धंदा बंद केल्याचे कानांवर आले. माँट्रिअलच्या दुसऱ्या लांबच्या भागात तो गेल्याचे समजले. आमच्या सिनेगॉगमध्येही तो येईनासा झाला. त्याचा संबंधच तुटला.

ह्या गोष्टीला काही वर्षे होवून गेली. माझा व्यवसाय वाढत होता . जोरात चाला होता. अशातच एके सकाळी मला एका बाईचा फोन आला. ऑफिसमध्ये मला भेटायला येऊ का असे ती विचारत होती. मी तिच्या कामाची वगैरे चौकशी केली. तिनेही काहीतरी सांगितले न सांगितले. माझ्या काही ध्यानात येईना . पण तिला येण्यास सांगितले.
ती आत आल्यावर मात्र तिने आपली व्यवस्थित ओळख करून दिली. त्या दुकानदाराची मुलगी होती. ती सांगू लागली,”इतकी वर्षे झाली, माझ्या बाबांना तुमचे पैसे देता आले नाहीत ह्याची खंत वाटतेय. त्यांना अपराध्यासारखे वाटत होते. माझ्या बाबांचा धंदा व्यापार पार बुडाला. त्यातून ते पुन्हा कधीच वर आले नाहीत. त्यांच्याजवळ रोकड नाही की काही नाही. अखेर त्यांनी मला तुम्हाला हे द्यायला सांगितले,” असे म्हणत तिने आपल्या पर्समधून एक दागिना काढून टेबलावर ठेवला. ते सोन्याचे कडे होते. त्यावर हिरे जडवलेले होते!

“आता बाबांजवळ इतकेच आहे. ह्याचे किती पैसे येतील तेही त्यांना माहित नाही. तुम्हाला देणे असलेल्या रकमेची काही अंशी तरी फेड व्हावी असे त्यांना वाटते’, मुलगी मनापासून सांगत होती.

मी काही ते सोन्या हिऱ्याचे कडे घ्यायला तयार नव्हतो. पण त्या मुलीने ते मी घ्यावे, बाबांना बरे वाटेल असे फारच अजीजीने, पुन्हा पुन्हा सांगितल्यावर मी ती नाईलाजाने घेतले. दागिन्यातले मला काही कळत नव्हते. मुलगी गेल्यावर तो दागिना मी टेबलाच्या खणात टाकून दिला. आणि विसरूनही गेलो.

काही दिवसांनी मला तो दागिना आणि त्या मुलीने सांगितलेली हकिकत आठवली. तो दागिना मी माझ्या बाबांना दखवला. त्यांनाही त्याची किंमत करता येईना. पण एखाद्या सराफाला दाखवायला काय हरकत आहे असे तेम्हणाले. आम्ही दोघे त्यांच्या ओळखीच्या सराफाकाडे गेलो. त्याने ते कडे बराच वेळ निरखून पाहिले. निरनिराळ्या कसोट्या लावून पाहिल्या. एका कागदाच्या पट्टीवर काहीतरी लिहिले. ह्यात खूप वेळ गेला. मग तो आमच्याकडे पहात म्हणाला, “हा दागिना उत्तम आहे. शुद्ध आहे. सोने हिरे अस्सल आहेत. तुमच्या कल्पनेपेक्षा ह्याची किंमत जास्त आहे. खरे सांगू का? मीच तो विकत घ्यावा म्हणतोय. देता का बघा. मी तुम्हाला ह्याचे ८७२४ डॉलार्स देईन!

सज्जन सचोटीने व्यवहार करणारा दुकानदार माझे देणे लागत होता तितकीच, पै न पै तितकीच रक्कम त्या दागिन्याची होती !

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

किल्ली – 2

ज्युलिया डिक्सन दरवाजा उघडून बाहेर आली आणि मागोमाग घराचा दरवाजा फटकन बंद झाला! “अरे देवा! हे काय झालं?”असा तिचा चेहरा झाला. तिने स्वत:लाच बाहेर कोंडून घेतल्यागत झाले की! ती स्वत:वरच चिडली. आता काय करायचे ह्या विचाराने ती त्रासून गेली. एव्हढ्यात पोस्टमन आला. “काय झालं? काही तरी बिनसलेलं दिसतय.” डिक्सन बाईंकडे पहात काळजीच्या सुरात पोस्टमन विचारत होता.

गोंधळून गेलेल्या, ‘आता काय करायचे ‘ह्या विचारात असलेली ज्युलिया हात हवेत झटकत म्हणाली,”मी बाहेर आले आणि माझ्या मागे दरवाजा फ्टकन बंद झालाय.जास्तीची किल्ली शेजाऱ्यांकडे आहे. पण ते गावाला गेले आहेत. नवऱ्याकडे आहे पण तोही कामासाठी बाहेरगावी गेलाय.आता मी काय करणार? मी घरात तरी कशी जाणार,सांगा ना!” वैतागून ती बोलत होती.

पोस्टमन डिक्सनबाईंना धीर देत म्हणाला,”अहो किल्लीवाल्याला बोलवा की. तुमचे काम एका झटक्यात होईल. कशाला काळजी करता?” “हो दुसरा इलाजच नाही आता. पण खरं सांगू का? अहो हे कुलुपकिल्लीवाले अव्वाच्या सव्वा पैसे घेतात.आणि गेले एकदोन महिने आमच्याकडे पैशाची थोडी तंगी आहे. काय करणार मी?” काळजीच्या सुरात डिक्सनबाई बोलत होती.

पोस्टमन तिला शांत करण्याच्या प्रयणात म्हणाला,”पण तुम्ही दुसरे काय करू शकता? किल्लीवाल्याला बोलवा. किती गेईलते घेईल. पण दार तरी उघडेल? बरं, मी आता माझ्या कामाला लागतो.. हां ,आणि हो ही तुमची पत्रे”,पोस्टमन ज्युलियाच्या हातात टपाल देत म्हणाला. ज्युलियाला बरे वाटावे म्हणून तो हसत हसत म्हणाला,”कुणी सांगावे त्यात काहीतरी चांगली बातमीही असेल”, असे म्ह्णत पोस्टमन गेला.

चार पाच पाकिटांमधे तिला आपल्या भावाचे पत्र दिसले. “आताच येऊन गेला आणि इतक्यात पत्रही!” स्वत:शी बोलत ज्युलिया डिक्सनने पाकीट फोडले आणि….

तिच्या हातात एक किल्ली पडली!

पत्रात भावाने लिहिले होते,”प्रिय ज्युलिया, मागच्या आठवड्यात तुझ्याकडे आलो होतो. तू एकदा बाहेर बाजारात गेली होतीस. मीही बाहेर पडलो, इतक्यात घराचे दार बंद झाले. तुझ्या शेजाऱ्यांकडून तुझ्या घराची किल्ली घेतली. नंतर मी ती परत करायची विसरलो. म्हणून पोस्टाने पाठवली आहे.”

Editor

तो उत्तम अभिरुचीचा,वांगमयीन दृष्टी असलेला आणि लेखन गुण हेरणारा संपादक होता. एका प्रतिष्ठेच्या प्रकाशन संस्थेत तो काम करीत होता. अनेक प्रसिद्ध अप्रसिद्ध लेखक, लेखक मित्र, इतर मित्र बरेच वेळा त्याने न मागताही आपल्या लिखाणाचे बाड पाठवत. अर्थात आपले पुस्तक त्याने प्रकाशनासाठी घ्यावे हीच त्या मागची इच्छा.

रोज त्याला कुणाचे ना कुणाचे,”लिखाण वाचले का?” “प्रकाशित होईल ना?”, केव्हा करता? लवकर प्रसिद्ध झाले तर बरे वाटेल.” असे एक ना दोन बरेच फोन येत.काही जण भेटायला येत. कोणाच्या तरी हस्तलिखिताची शिफारस करत. संपादकाचा एक मित्र तर गेले काही महिने खनपटीला बसला होता. “अरे माझी कादंबरी एकदा वाचून तरी पहा. तुझ्याकडे ती तशीच पडून आहे. तीन वर्षे लागली मला ती लिहायला.एकदा वाच रे. प्रकाशनासाठी तू घ्यावीस असे मला फार वाटते,” असा सारखा धोशा लावला होता अखेर त्याने ती वाचण्याचे कबूल केले.

“प्रत्येकजण स्वत:ला मोठा लेखक समजतो’ असे म्ह्णत एका गठ्ठ्ह्यातून ते ४०० पानांचे बाड वाचायला घेतले. आश्चर्याचा एक सुखद धक्का बसला. लिखाण चांगले होते. घरी जाऊन निवांतपणे वाचावे म्ह्णून ज्या खोक्यातून आले होते त्यात ते ठेवले.खोक्याला रंगीत कागद लावून रिबिन बांधून भेट पेटीसारखे सुरेख सजवले होते.मोटारीत आपल्या शेजारीच ते खोके ठेवले. घरी जायच्या अगोदर थोडे खावे म्हणून एका हॉटेलपाशी त्याने मोटार थांबवली. आणि हॉटेलात गेला. पण जाताना तो आपल्या गाडीचे कुलूप लावायचे विसरला!

हॉटेलातून बाहेर आला. मोटारीचे दार उघडले तर गाडीतला रेडिओ, टेप रेकॉर्डर चोरीला गेल्याचे दिसले. पण त्याला खरा धक्का बसला तो, त्या मित्राची कादंबरी ज्या खोक्यात होती ते सुंदर खोकेही चोराने पळवले होते.रेडिओ वगैरे पुन्हा नविन बसवता आला असता. पण ती कादंबरी कशी आणायची? त्या मित्राने त्याला वारंवार सांगितले होते की त्याच्याजवळ फक्त ही मूळ प्रतच आहे. दुसरी एकही प्रत नाही. आणि तीच आज चोरीला गेली. संपादक एकदम गळाठूनच गेला. हे काय झाले. तीन वर्षे लागली होती ती लिहायला. तीही आज आपल्या हलगर्जीपणामुळे चोरीला गेली.त्याचे मन त्याला खाऊ लागले.

इथून बाहेरून सार्वजनिक फोनवरून फोन करून अशी बातमी मित्राला सांगणे त्याला प्रशस्त वाटेना. घरी जाऊन शांतपणे आपल्या फोनवरून सांगायचे त्याने ठरवले. घरी आल्यावर डोके गच्च धरून बसला. पाणी प्याला. सुस्कारा टाकून फोन करावा म्हणून उठला. तेव्हढ्यात फोन खणखणू लागला. त्या मित्राचाच फोन होता. तो चिडून बोलत होता. ‘ अरे मी तुलाच फोन करणार होतो.”

“हो ना; मला माहिती आहे का करणार आहेस ते. इतक्या तुच्छतेने तू ते…?”‘ संपादकाला समजेना मित्राला आपले हस्तलिखित चोरीला गेल्याचे इतक्यात समजलेही कसे? संपादक म्हणाला,’.तू काय म्ह्णतोयस?” “मी काय म्हणतोय? तुला सगळं माहित आहे. तुला माझी कादंबरी आवडली नाही तर ते तू मला तसे सरळ सांगायचे. इतक्या तुच्छतेने, बेपर्वाईने माझ्या चारशे पानांचे खोके तू सरळ माझ्या घराच्या मागे फेकून दिलेस?मातीत फेकून दिलेस?’ तो मित्र चिडून आणि पोटतिडिकीने बोलत होता.

तो चोर मोटारीतला रेडिओ आणि ते पुस्तकाचे खोके घेऊन पळत असता पोलिसांनी पाहिले. पळता पळता ओझे कमी करावे म्ह्णून ते खोके चोराने एका घराच्या मागच्या अंगणात फेकून दिले. आणि ते घर नेमके त्या लेखक मित्राचे होते!

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

आंधळी कोशिंबीर

त्या वर्षी न्यूयॉर्कमधील हिवाळा संपतच नव्हता.एप्रिल अखेरपर्यंत तो रेंगाळतच होता. मला फारसे दिसत नव्हते. ठार आंधळी नव्हते पण होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे आणि शिवाय थंडीही होती म्हणून मी घरातच असे. शेवटी एकदाची थंडी गेली आणि उन्हाळ्याचा पूर्वरंग दिसू लागला. हळू हळू अंगणातील झाडांवर पुन्हा पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. मला बाहेर जावेसे वाटू लागले.

एके दिवशी माझी पांढरी काठी घेऊन बाहेर पडले. उगीच परीक्षा कशाला पहायची म्हणून थंडीतला कोट
घातला. स्कार्फ टोपी हातमोजे वगैरे काही चढवले नाहीत.उत्साहात निघाले. घराजवळच्या पायवाटेने चालत चालत
राहिले. वाटेत शेजारी ‘काय कसं काय?’,’थंडी गेली उन्हाळा येतोच आहे’, ‘बरोबर येऊ का?’, ‘मी तिकडेच निघालोय सोडू का?’ असे आपुलकीने विचारत होते. मी,”नको इतके दिवस घरातच होते. आज थोडे चालणार आहे,” असे म्हणत पुढे जात होते.

मजेत चालत चालत आले. कोपऱ्यापाशी नेहमीप्रमाणे थांबले. रहदारीचा दिवा हिरवा झाला की हमखास कोणीतरी मला हाताशी धरून चौक ओलांडून देईल म्हणून थांबले होते.बराच वेळ झाला तरी आज कोणी आले नाही. मोटारींचे आवाज येतच होते. दोन तीन वेळा दिवा हिरवा होईन गेला असणार. वाट पहातच होते. उभी असताना, शाळेत पाठ झालेले वसंत ऋ्तुचे गाणे गुणगुणत होते.

अचानक एक कमावलेला वाटावा असा तरूण पुरुषी आवाज आला. “तुम्ही अतिशय आनंदात दिसताय. तुमचा आवाज छान आहे हो. चांगले म्हणत होता गाणे.” असे तो कोणी म्हणाला. लगेच पुढे, “तुमच्या बरोबर रस्ता ओलांडायला मी आलो तर चालेल ना?” मी त्याचे बोलणे ऐकतच होते. मला ते किती गोड, सुखद वाटत होते! मला आज एकदम खूपच सगळे गोड वाटायला लागले. आतून मी नव्याच सुखाने बहरले होते म्हणा ना. मी कसे बसे,”हो चला” इतकेच हळू म्ह्णाले.

त्याने अगदी बेताने माझ्या दंडाला धरले. चालता चालता हवेविषयी, आजचा दिवस किती प्रसन्न आहे असे ठराविक औपचारिक बोलत होता. आमच्या दोघांची पावले नकळत इतक्या जोडीने पडत होती की कोण कुणाला सोबतीने नेत आहे हे इतरांना सांगता आले नसते!

आम्ही रस्ता पूर्ण ओलांडण्या अगोदर काही क्षण मोटारी धावू लागल्या होत्या. आम्ही पटपट पावले उचलून पलीकडच्या पादचारी मार्गावर आलो. त्याचे आभार मानावेत म्हणून मान वळवून मी तसे म्हणणार त्या आतच,”तुम्हाला कल्पना नसेल. माझ्यासारख्या आंधळ्याला तुमच्यासारख्या प्रफुल्लीत मुलीची सोबत मिळाली हे माझे भाग्यच. माझा आजचा संपूर्ण दिवसच सुंदर जाणार!”

तो मोहरलेला दिवस मी सुद्धा कशी विसरेन?

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

Good Morning

हा कथानुभव साधारणत: १९३०;३५च्या काळातील आहे. पोलंड मधील प्रॉश्निक खेडेगावातील रब्बाय सॅम्युअल शपीरा ह्याला लोक फार मान देत असत. तो लहान गावाचा असला तरी आजूबाजूच्या अनेक गावातील लोक त्याला आदराने ओळखत. त्याच्या विषयी आदर होता तो धर्मगुरू म्हणूनच नव्हे तर तो एक दयाळू आणि सर्वांविषयी आपुलकी असलेला माणूस म्हणून होता.

रब्बय शपिरा बाहेर पडला की समोरून येणाऱ्या, आजूबाजूने जाणाऱ्या म्हणजे सर्वांना, मग तो ज्यू असो की नसो, जो भेटेल त्याला ‘राम राम’ करायचा. शापिराच्या वाटेवर हर्र म्युलर नावाचा मोठा शेतकरी होता. फिरायला जाताना रोज त्याला म्युलर आपल्या शेतात उभा असलेला दिसायचा.सॅम्युअल शपिरा मोठ्या उत्साहाने आपल्या खणखणीत आवाजात ‘गुड मॉर्निंग हर्र म्युलर’ म्ह्णायचा.

सुरवातीला रब्बायची भेट झाली तेव्हा हर्र म्युलर शपिराच्या उत्साही नमस्काराला अगदी थंडपणे,कसलाही प्रतिसासाद न देता मरव्खपणे उभा असे. कारण त्या गावच्या लोकांचे व ज्यू लोकांचे संबंध फारसे चांगले नव्हते. कोणाशी मैत्री असेल तर अगदी तुरळक. पण ह्याचे रब्बायला काही वाटत नसे. तो आपल रोज आनंदाने सर्वांनाच नमस्कार करीत पुढे जात असे.

काही दिवसांनी रब्बायची सवय केवळ औपचारिक, वरवरची नाही. तो सर्वांना मनापासून नमस्कार करतो अशी खात्री पटल्यावर तो मोठा शेतकरी हर्र म्युलर रब्बायच्या नमस्काराला, न बोलता का होईना, फक्त हॅटच्या कडेला स्पर्श करून किंचित हसल्यासारखा करायचा.

हा नित्योपचार काही वर्षे चालू होता. नंतर पुढे रोज सकाळी शपिरा ओरडून, “गुड मॉर्निंग्,हर्र म्युलर” म्ह्णायचा तेव्हा म्युलरही मोठ्याने ,”गुड मॉर्निंग्, रब्बायनर!” म्हणतसे. असे बरीच वर्षे चालू होते. पण जर्मन नाझी सैनिक पोलंडमधे घुसले आणि परिस्थिती पालटली.

रब्बाय सॅम्युअल शपिरा त्याचे सर्व कुटुंब आणि गावातल्या सर्व ज्यूंना पकडले. ह्या छावणीतून त्या छावणीत रवानगी होत होत शपिरा अखेर ऑश्टविट्झमध्ये पोचला. आगगाडीतून उतरवले तसे त्याला एका रांगेत उभे करण्याचा हुकूम झाला. रांगेत तो पाठीमागे होता. तिथून त्याला कमांडंट आपला दंडुका डावीकडे उजवीकडे हलवतो आहे दिसले. रबायला महित होते दंडुका डावीकडे वळला की मृत्युच्या रांगेत, मरणाची वाट पहात उभे राहायचे. उजवीकडे वळला की आणखी काही काळतरी जिवंत राहाण्याची संधी असते.

रांग पुढे सरकत होती. कमांडंट आपला दंडुका बरेच वेळा डावीकडे हलवत होता. मध्येच केव्हा उजवीकडे! रब्बाय सॅम्युअल आपल्या दैवाचा विचार करत होता. बॅटन कुठे फिरेल? ह्या कमांडंटचे सामर्थ्य केव्हढे आहे. हजारो लोकांना मृत्युच्या दाढेत ढकलण्याचे किंवा जिवंत ठेवण्याचे केवळ त्याच्या इच्छेवर होते!

शपिराच्या पुढे एकच राहिला होता. त्याला धाकधुक होती. शपिराची पाळी आल्यावर रब्बाय थेट त्या कमांडंटकडे पाहून हळू आवाजात म्हणाला ,”गुड मॉर्निंग, हर्र म्युलर”. कमांडंट हर्र म्युलरचे डोळे स्थिर आणि त्याचा ठाव लागू न देणारे होते. पण त्या कोरड्या ठक्क डोळ्यांत क्षणभर, अगदी निमिषार्ध तरी चमक दिसली. “गुड मॉर्निंग, रब्बायनर”, म्युलर शांतपणे म्हणाला. आपला दंडुका त्याने पुढे नेला आणि…. मोठ्याने “र्राइट्ट्”म्हणत बॅटन उजवीकडे वळवला!

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]