आनंदाचा गुणाकार!

दवाखान्यातले ते दोन्ही म्हातारे रुग्ण बरेच आजारी होते. एकाचा पलंग आता आताच दिवसातून एक तास डोक्याच्या बाजूने वर उचलला जात होता. छातीत साठलेला कफ मोकळा व्हायला मदत व्हाही हा उद्देश होता. त्याच्या शेजारच्या पलंगावरच्या पेशंटला मात्र चोवीस तास पाठीवर पडून राहावे लागे. त्यामुऱ्ळे रोगापेक्षा ह्या उताणे पडण्यानेच वैतागून गेला होता.

ज्याला तासभर का होईना बसायची परवानगी होती त्याचा पलंग खिडकी पाशी होता. तो खिडकी बाहेर बघत ,”समोरच्या तलावात पाणी कापत पाण्यावर बदकं नक्षी कशी काढत कशी काय जातात समजत नाही; हिरवळीवर मुलं काय काय खेळतात. कुणी प्रियकर प्रेयसीच्या कमरेभोवती हात घालून तिला जवळ ओढत मुद्दाम हळू चालतोय, तिच्या तोंडापुढे तोंड नेऊन काही तरी बोलतोय, ती मुलगी मान झटकत हसतेय.; सिनेमाची जाहिरात बॅंड वाजवत चाललीय; अरेच्या ते तीन चार लोक भांडायला लागले की!”असे रोज काहीना काही सांगत असे. “अरे वा आज पोलिसांची परेड चाललेली दिसतेय. त्यांचा बॅंड वाजवणारे किती स्टाईलिश चाललेत !” दोन्ही बाजूला लोक उभे आहेत. काही टाळ्या वाजवताहेत! तिघे चौघे तर पोराला खांद्यावर बसवून ही मजा दाखवताहेत!”

रोज तासभर त्याची ही running commentary चालायची. पलंगावर पडून असलेला रोगी ते मन लावून ऐकायचा. तो म्हणायचा तू रोज बाहेरच्या गमती ऐकून त्या तासाभरामुळे माझा दिवस चांगला जातो.
पण एके दिवशी त्या ‘तासाच्या समालोचक’ रुग्णाचे निधन झाले. व्हायची ती सगळ्यांची सगळी धावपळ झाली.
एक दिवस उलटल्यावर विचारू का नको असे ठरवत तो सतत पडून असणारा पेशंट नर्सला म्हणाला, “सिस्टर, मला तो खिडकी जवळचा पलंग देता का?”

नर्स म्हणाली,” त्यात काय! बदलून देते तुमचा पलंग.”
थोड्या वेळाने तो पेशंट म्हणाला, ह्याच पलंगावर होता तो पेशंट; उठून बसायचा बघा एक तास रोज. मग खिडकीतून दिसणारा तलाव,ती हिरवळ,बाग,आणि जे काही तेव्हढ्या वेळात दिसेल ते उत्साहाने सांगत असे मला. तोच मला ‘पडीक’ माणसाला विरंगुळा होता.”

ते ऐकून नर्स त्याला म्हणाली,” अहो आजोबा तुम्ही सांगतातसे तो सांगत होता?” “हो! रोज! चार दिवसापूर्वी पोलिसांची परेड बॅंडच्या ताला ठेकाच काय सुरावटीसह सांगितली होती त्याने!”

नर्स शांत हळुवारपणे म्हणाली,” आजोबा खिडकी आहे पण तिच्या समोर उंच भिंत आहे. आणि… आणि.. ते आजोबा आंधळे होते हो!” इतके म्हणत ती नर्स डोळे पुसत वाॅर्डाबाहेर गेली.

त्या आंधळ्या आजोबांना माहित असावे की दु:ख वाटल्याने अर्धे होते पण आनंद दिल्याने तो दुप्पट होतो.. मिळालेले आयुष्य देणगी आहे हे खरे पण त्यातील ‘आज’चा दिवस ही सगळ्यात भारी भेट आहे.

कोण जाणे त्यांना इंग्रजीतील “Today is a Gift that’s why it’s Present” हा वाक्यसंप्रदाय माहित होता की काय , कुणास ठाऊक?

(Lessons taught by Lifeवरून)

पुरावा

पुणे जिल्ह्यात तळेगाव आणि त्याच्या परिसरात बटाट्याचे पीक घेतात. सर्वच शेतकऱ्यांची जमीन फार नसते. गरीबाची तर वाटण्या होत होत अर्धा पाऊण एकरापर्यंत आलेली असते.
शेतमजुराचा कसातरी शेतकरी झालेल्या म्हादबाचाही असाच तुकडा होता. तो आणि बायको ‘आवडीने भावे’
बटाटा लावत. नंतर मुलगा मोठा झाल्यावर तोही शेतीचा तुकडा नांगरायला मदत करत असे. म्हादबा आणि बायको विशेषत: त्याची बायको फार उत्साहाने बटाट्याची लागवड करीत असे. असे पोटापुरते बरे चालले होते.

म्हादबाची बायको गेली. म्हादबा आणि मुलगा दोघेच राहिले. पण नांगरणी पेरणी चालूच होती. म्हादबा म्हातारा झाला होता. कसेतरी बटाट्याचे काम रेटत होता. पण यंदा मात्र म्हादबाला काय करावे ते सुचेना.

बटाट्याचे डोळे पेरायची वेळ आली. पण म्हादबाच्या नांगरणीलाच पत्ता नव्हता. थकला होता. काय करावे ह्या विचारात पडला. आता पोरगा जवळ पाहिजे होता असे त्याला फार वाटू लागले. मुलाने मदत केली असती.पण ….

….पण म्हादबाच्या मुलाला तीन चार महिन्यापूर्वी गावच्या वरच्या वस्तीतल्या कुणीतरी खोटानाटा आळ घालून पोलिसात तक्रार करून तुरुंगात बसवले होते. गरीबाला न्याय म्हणून तारखावर तारखाच मिळतात. जामिनावर सोडवायला जामिनदार तर लागतोच शिवाय पैसा. म्हादबाने पैका नाही दातावर मारायला म्हणून वकील वगैरे काहीच दिला नाही.फौजदार हाच त्याचा न्यायाधीश. तोच त्यालामाहित होता.फौजदारापुढे गयावया करून दीनवाणेपणे हात जोडून “साहेब त्याने काय बी क्येलं न्हऊ; सोडा लेकाला”असं पहिल्या तीन चार हेलपाट्यात विनवण्या केल्या. प्रत्येक वेळी फौजदारसाहेब गुरगुरत,मुठीची छडी फिरवत, टेबलावर आपटत,” म्हाताऱ्या पुरावा सापडत नाही म्हणून ते बेनं इथच आहे. पुरावा मिळू दे मग आर्थर रोडलाच जाईल तो. बघच तू” असे बोलून म्हादबाला धुडकून लावायचा. म्हादबाने पुढे जिल्ह्याच्या ठाण्यातही जाणे सोडून दिले. पैसा आणि तब्येत दोन्ही खालावलेलीच होती.

म्हादबा सुन्न होऊन बसला.शेवटी शेजाऱ्याला हाक मारली. त्याने म्हादबाच्या खांद्यात हात घालून उठवले. म्हादबाने पत्र्याच्या डब्यातून एक दोन चुरगाळलेल्या नोटा, काही नाणी घेतली. शेजाऱ्याने हात धरून म्हादबाला हमरस्त्याच्या फाट्यावर सोडले. शेजारी थोडा वेळ थांबला. पण नंतर निघून गेला. वाट बघितल्यावर,बघितल्यावर सहा शीटाची रिक्षा चौदा पॅसिंजर घेऊन आली. म्हादबाला पाहिल्यावर थांबली. म्हादबाला रिक्षापर्यंत त्यातल्याच एकाने आणले.आता बसायचे कुठे ह्या पेक्षा कुठल्या सळईला धरून अर्धे ढुंगण कुठ्ल्या पत्र्याच्या कडेला की कुणाच्या गुढघ्याला टेकायचे हा विचार करायलाही वेळ न देता फक्त म्हादबा कसाबसा लटकला ते पाहून रिक्षा निघालीही होती!

म्हादबा जिल्ह्याच्या तुरुगांत गेला. बाहेरच्या दरवाजापासून जो दिसेल त्याला, पोराला भेटायचे कुठे, कसे भेटायचे विचारत होता. कोण ऐकतेय? पण अखेर कुणाला तरी ऐकू गेले. तास दीड तास झाल्यावर म्हादबाची व पोराची भेट झाली. पोराच्या जवळ दोन जेलचे पोलिस होते. म्हादबा पोरालाम्हणाला, “पोरा मी थकलो रे. तुझी आई बटाटे लई सुगतीने लावायची रे. पर अजून नांगरटच झाली नाही. मी असा. तू इथं जेलात. घरी असतास तर तूच नांगरलं असतस. बटाटेही तूच लावले असतेस.पण आता कुणाला तरी मदतीला बोलावून नांगरून घेईन. काय करणार?”

ते ऐकून पोरगा गप्प बसला. बोलेना. म्हादबा पाहात होता त्याच्याकडे. पोरगा ते ऐकून गांगरल्या सारखा झालाय. तोंडावरून हात फिरवित पोराने तोंड बाजूला फिरवले. ते पाहून पोलिस जरा जवळ आले. बाहेर म्हादबाच्या बाजूलाही ठाण्याचा पोलिस होता. पोराने म्हाताऱ्याला जवळ येण्यास खुणावले.म्हादबाला कळेना की शेताची नांगरणी करायची ऐकल्यावर पोरगा घाबरल्या सारखा का झाला !
मुलगा मग थोड्या हळू आवाजात बेड्याचे हात जोडून बापाला म्हणाला,” तात्या, तसलं कायी कराचं न्हाई.काही झालं तरी नांगरायचा नाही तुकडा. कुणालाही बोलवू नको.सांगून ठिवतो. अरं तात्या तू नांगरलंस तुकडा तर मी लपवलेले पाच सहा गावठी कट्टे सापडतील की रं माझ्या बाबा!”
म्हादबाचा विश्वासच बसेना. तोंड आ करून, डोळे फाडून हे आपलंच पोरगं बोलतेय का असं, पोराकडे बघत राहिला. कपाळावर हात मारून बाहेर पडला.

पुन्हा तशाच सहा आसनी रिक्षात ‘तिरपांगडे आसन’ करत फाट्यावर आला. हातापायातली सगळी शक्ती गेली होती. म्हादबाचा चेहरा वीज पडून काळाठिक्कर पडावा तसा झाला होता. घरी तो कसा आला, घरी कुणी आणून सोडले काही त्याला समजत नव्हते. रांजणातलं पाणी घटा घटा प्यायला. गिपचिप पडून राहिला.

दुसरे दिवशी पहाटेच पोलिसांची जाळ्या लावलेली मोठी निळी मोटार आली. भराभर तीन चार पोलिस व काही मजूर उतरले. म्हादबावर मोठ्याने ओरडून नंतर एक लाथ घालून त्याला उठवले. नांगर कुठाय असे काही विचारत नांगर कुदळी फावडी घेऊन म्हादबाच्या तुकड्याची चिरफाड सुरु झाली. गावातले लोक मजा पाह्यला आले. त्यापैकी काही जणावर डाफरत पोलिसांनी त्यांनाही नांगरायला खणायला जुंपले. गावात बातमी पसरलीच होती. तक्रार करणाराही चार जणांना घेऊन आला होता. सगळे जण”म्हादबा, त्याचे पोरगे किती साळसूद आहेत पण हे सगळं वरून कीर्तन आणि आतून तमाशाच आहे हे पटलं ना आता?” अशी चर्चा करत होते. म्हादबाला शिव्या शाप देणेही चालूच होते. पोलिस जाऊद्या. दांडकी हाणून थेरड्याला गावा बाहेर करू असे ठरवत होते. दिवस वर येऊनही बराच वेळ गेला होता. कट्टे काही सापडले नाहीत. तक्रार करणारा आणि त्याचे चार सहा डावे उजवे हात पोलिसांना अजून खणा,अजून खणा,नांगरा म्हणत होते. “अहो दादा काय बोलताय? इतकं खणून झालंआता. आणखी खणून काय पाझर तलाव करायचाय का इथं ? आं?“

गर्दी पांगू लागली. म्हादबा डोक्याला हात लावून मान गुडघ्यात घालून बसला होता. तोपर्यंत गावातल्या कुणीतरी पोलिसांना चहा आणि वडापाव आणला होता. मजूर इकडे तिकडे गेले.
पोलिसांनी “कट्टा वगैरे काही मिळाले नाही आणि इतर केलेल्या सगळ्या गोष्टीचा” पंचनामा केला. दोन तीन लोकांच्या सह्या घेतल्या. म्हादबाच्या बखोटीला धरून उभे केले. त्याच्या दोन खोल्यात जाऊन सगळी उलथा पालथ केली. काही मिळाले नाही. त्याचा राग येऊन पोलिसांनी म्हादबाला गालफडात एक जोरदार थप्पड आणि पुन्हा एक कंबरेत लाथ घातली. त्याला धरून मोटारीत ढकलले.बरोबर आणलेल्या मजुरांना घेऊन पोलिस जिल्हा ठाण्यावर आले. तिथे म्हादबाला सोडले. पोलिस गेले. म्हादबाची चौकशी केली.पुन्हा त्याला तुरुंगात घेऊन गेले. पोराची आणि म्हादबाची भेट झाली.पोलिस होतेच बाजूला. म्हादबा पोराला म्हणाला, “ल्येका आज लई लाथा बुक्क्या खाल्या तुझ्या पायी. आता किती दिस राहीन रं सांगता येत न्हाई.अरं घर उस्कटून टाकलं. पोरा आपल्या सगळ्या तुकड्याचा कोपरा नं कोपरा नांगरून खणून काढला रं ह्यांनी.”

म्हादबाचा मुलगा हसत हसत म्हणाला, “तात्या! तुरुंगातून मी तुला दुसरी काय मदत करणार? जमली तेव्हढी केली !”

सदाशिव पं. कामतकर

(एका अति अति लघुबोधकथेच्या मध्य कल्पनेच्याआधारे)



मला मोठी बिदागी मिळाली!

िलेल्या पत्त्यावर मी बरोबर पोहचलो. गाडी घरासमोर उभी केली आणि हाॅर्न दिला.दोन चार मिनिटे थांबलो. थोडा वेळ गेल्यावर वाटले जावे आता. ना फाटक उघडले कोणी ना दरवाजा. माझी ही अशी बेरात्रीची पाळी.स्मशानवेळेची. फार धंदा होत नाही. कुठे कोणी मिळेल म्हणत,निघावे म्हणून पट्टा आवळू लागलो. पण मलाच काय वाटले कुणास ठाउक. उतरलो आणि दरवाजावर ठक ठक केले. आतून काहीतरी ओढत कुणी येतेय वाटले.पाठोपाठ कापऱ्या क्षीण आवाजात “आले, आले हं” म्हणाल्याचे ऐकू आले. दरवाजा उघडला. नव्वदी पार केलेली असावी अशी एक म्हातारी उभी होती.

वेष नीटनेटका.फुलाफुलांचा झगा, डोक्यावर झग्याला साजेशी हॅट, हॅटच्या कडांवरून खाली आलेला,अर्धा चेहरा झाकेल न झाकेल असा आणि पोषाखाला उठाव देणारा अगदी झिरझिरीत पडदा, त्यातून सुरकुत्यांच्या पुसट लाटा असलेली हसऱ्या चेहऱ्याची बाई म्हणाली ,” माझी बॅग गाडीत ठेवायची आहे.ठेवणार ना?” मी आत बॅग आणायला गेलो.घरातल्या सगळ्या भिंती कोऱ्या होता. फोटो नव्हते. भिंतीवर घड्याळही नव्हते. भिंतीला थोडीफार शोभा आणणारे एखादे wall hanging ही नव्हते.खुर्च्या, मागेपुढे झुलणारी खुर्ची आणि जे काही असेल ते सर्व पांढऱ्या चादरींनी झाकलेले होते. बराच काळ कुणी इथे राहात नसावे असे वाटले. मी बॅग गाडीत ठेवली व बाईंच्या बरोबर असावे म्हणून परत आलो. बाई हळू हळू चालत होत्या. गाडीत बसल्या. कुठे जायचे विचारल्यावर “ हाॅस्पाईसमध्ये,” आजी म्हणाल्या . पत्ताही आजींनी सांगितला . गाडी निघाली. थोड्या वेळाने आजी म्हणाल्या, “गावातून घेणार का?” मी म्हणालो,” तो फार लांबचा रस्ता होईल.” “ हरकत नाही. पण गावातूनच जाऊ या.”

मी गाडी त्या रस्त्याने नेऊ लागलो; आणि खिडकीतून दिसणाऱ्या एकेका इमारतीकडे पाहता पाहता, मागच्या आरशातून मला आजींचा चेहरा उजळत,जास्त प्रसन्न होत चालल्याचे दिसले. “ह्या चर्चमध्ये माझे लग्न झाले. ती गर्दी,गडबड, माझ्या मैत्रिणी,बहिण, भाऊ, फुलांचे गुच्छ, सगळं दिसतय मला.” पुढच्या कोपऱ्यावर एक चौकोनी जुनी इमारत दिसली. तिथे कसले तरी गोडाऊन होते. “ हो,हाच डान्सिंग हाॅल. इथे मी माझ्या मैत्रिणी, आणि… आरशातून माझ्याकडे पाहात डोळे मिचकावत हसत … आणि मित्रही बरं का… डान्सला येत असू! ते गोडाऊन मागे मागे जाऊ लागले तरी चमकत्या डोळ्यांनी आजी वळून पाहात होत्या. मी मीटर कधी बंद केले आणि गाडी का हळु हळू चालवू लागलो ते मलाही सांगता येईना!

एक इमारत दिसली. लगेच आजी, “अरे ह्याच इमारतीत माझीपहिली नोकरी! पहिला पगार हिनेच दिला.मी इथे लिफ्ट चालवत होते. किती लोकांना खालीवर नेले असेन. काहींची हृदयेही तशीच खाली वर होत असलेली, माझ्या न कळत्या कटाक्षाने टिपली आहेत. बाई पुन्हा हसल्या. आजी हाॅस्पाईस मध्ये जाताहेत. डाॅक्टरांनी निदान केलेले अखेरचे दिवस -किती कुणास ठाऊक- कमीत कमी दु:खाचे,वेदनांचे जावेत म्हणून इथे दाखल होताहेत. हाॅस्पाईस लवकर येऊ नये म्हणून मी थोडे लांबचे वळण घेतले.पण मी अशी कितीही वळणे घेतली तरी ज्या वळणावर आजी आहेत ते मी थोडेच टाळू शकतो?

आजींना मी आरशातून बोलते करत होतो. त्याही काही सांगत होत्या. मध्ये उत्साहाने,क्वचित उदासपणे.
हाॅस्पाईस आले. मी जास्तच हळू हळू नेऊ लागलो गाडी. आजी हसून इतकेच म्हणाल्या, अरे! मुक्कामाचे ठिकाण येणारच रे.”

गाडी थांबली. हाॅस्पाईसची माणसे वाटच पहात होती. आजी उतरल्या. चाकाच्या खुर्चीत विराजमान झाल्या. त्या लोकांनी त्यांना सफाईने वरती व्हरांड्यात नेले. मी बॅग घेऊन आजींजवळ ठेवली. आजीबाईंनी पर्स उघडत विचारले,” किती झाले पैसे?” मी म्हणालो,”काही नाही!” त्या म्हणाल्या, “अरे तुझे ह्यावर तर पोट आहे.” मी म्हणालो, “आजी त्यासाठी दुसरे पुष्कळ लोक आहेत की. अजून रात्र बाकी आहेच.” त्या आजी तोंड भरून हासल्या. मला काय वाटले कुणास ठाऊक. खुर्चीत बसलेल्या आजीना मी हलकेच मिठी मारली. माझ्या पाठीवरआपला हाडकुळा हात थोपटत त्या म्हणाल्या,” अरे तू माझ्यासाठी आज खूप फिरलास आणि मलाही फिरवलेस! माझ्यासाठी खूप खूप केलेस!”त्यावर मी म्हणालो, “ह्यात काय विशेष केले मी? माझ्या आईसाठी मी हेच केले असते!” त्या शांतपणे हसल्या.

निरोप घेऊन निघालो. मी किंचित पुढे आलो. हाॅसपाईसचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकू आला. आणि एका आयुष्याचाही. “आता काहीच करू नये;पॅसेंजर नको; लांबचे नको जवळचे नको,”असे वाटले.मनच लागेना. विचार केला, पहिला हाॅर्न दिल्यावर निघालो असतो तर? थांबलो नसतो तर? गावातून गाडी न नेता थेट नेली असती तर? आजींशी बोललोच नसतो तर? ह्या विचारांत काय अर्थ आहे असे मनात म्हणत असतांना मी हाॅस्पाईस जवळ आल्यावर आजी जे सहज म्हणाल्या ते आठवले,” अरे मुक्कामाचे ठिकाण येणारच की!”

माझ्या ऐवजी दुसरा एखादा झोकलेला किंवा चिडका, रागीट ड्रायव्हर असता तर! आजच्या रात्री-अपरात्री मीच इथे असावे हे नियोजित असावे. ध्यानी मनी नसता मला मिळालेली ही मोठीच बढती होती. आयुष्यातील मोठी बिदागी पावली म्हणून मनोमन परमेश्वराची आठवण झाली.

अजूनही मी थोडा अस्वस्थच होतो.गाडी बाजूला नेऊन मी स्टिअरिंगवर डोके ठेवून स्वस्थ पडलो. पण विचार थांबेनात. अरे,नियोजन,नियुक्ति, मोठी बढती आणि बिदागी काय! किती शिड्या चढून गेलास एकदम. अरे !तुझ्याऐवजी दारूड्या का, रागीट का? तुझ्यापेक्षाही चांगला कशावरून मिळाला नसता?. ‘पेक्षा’ राहू दे. तुझ्यासारखे किती तरी अाहेत! गावातून गाडी हळू हळू चालवलीस. त्याने,आजी ज्या ज्या इमारतीकडे डोळे भरून पाहात होत्या तिथे तिथे गाडी थांबवली असती.शक्य असते तर आत घेऊन गेला असता. पहिल्या पगाराच्या इमारतीजवळ दोन मिनिटं जास्त थांबला असता! .आणि तू मारे माझ्या ऐवजी दुसरा कोणी……. नियुक्ति काय बढती काय आणि बक्षिस, काय काय! शक्य आहे, त्यातल्या त्यात तुला मिळालेली बिदागी बक्षिस तुला मिळालेही असेल. पण अशी बक्षिसे कोणी देत नसतो ना घेत असतो.ती केव्हा मिळाली ती समजतही नसतात. ती सुगंधासारखी असतात.

आपणच लावलेल्या हरभऱ्याच्या झाडावरून उतरल्याने मला शांत वाटत होते. गाडी पुन्हा रस्त्यावर घेतली.रात्र सरत आली होती. झुंजुमुंजु व्हायला सुरवात झाली होती. लवकर उठलेले दोन तीन पक्षी शांतपणे पण भरकन जात होते. आकाश गुलाबी तांबूस होऊ लागले. आजींचे हसणे,डान्स हाॅल जवळचे डोळे मिचकावून हसणे पाहू लागलो. त्यांच्याच प्रसन्नतेने सरळ घराकडे निघालो.

( युट्युबवरील एका अतिलघुतम इंग्रजी गोष्टींवरून सुचलेली महत्तम साधारण दीर्घकथा )

दसरा

शिलंगणाचे सोने लुटूनी…

आपल्याकडे बहुतेक सर्व सणावारांच्या प्रथा परंपरा वेगवेळ्या असतात. दसऱ्याचेच बघा ना. आपल्याकडे रामाचा दसऱ्याशी संबंध नाही.

महाराष्ट्रात बहुतेक गावांत गावाबाहेर असलेल्या शमीच्या झाडाला प्रदक्षणा घालतात.त्यावेळी बरेच जणांच्या हातात उजळलेले पोत असतात. लोक आsईराजाs उदे उदेचा गजर करत असतात. हे मर्यादित अर्थाने सीमोल्लंघन आहे. आमच्या दसऱ्याला सीमोल्लंघनाची परंपरा आहे.

आपल्या मराठी साम्राज्याच्या वाढीत ह्या सीमोल्लंघनाच्या प्रथेचाही मोठा भाग आहे. मराठे शत्रूला आपल्या मुलखात येऊ न देण्यासाठी त्याच्याच मुलखात जाऊन लढण्यासाठी मोहिमेवर निघत. बऱ्याच मोहिमा दसऱ्याचा मुहुर्त गाठून होत असत किंवा मोहिम फत्ते करून विजयाचे सोने आणून दसऱ्याच्या सुमारास परत येत. शिलंगणाचे सोने लुटण्याला लाक्षणिक अर्थाबरोबरच अशी प्रत्यक्षातील पराक्रमाची ऐतिहासिक परंपराही आहे. आपल्या राज्याचा दरारा वाढवून व शत्रूला जरब बसवून राज्याच्या सीमा वाढवणारे व संपत्तीत वाढ करणारे हे सीमोल्लंघन होते. शिलंगणाचे सोने लुटून दसरा साजरा होई. शिलंगण हे सीमोल्लंघनाचे मराठमोळी बोली रूप आहे.

गावात शमीचे झाड असेल तिथे दसरा “आई राजा उदे उदे”च्या गजरात होतो. शमीचे झाड का तर महाभारतात पांडवांनी, एक वर्ष अज्ञातवासात काढायचे होते म्हणून,आपली शस्त्रे शमीच्या झाडावर दडवून ठेवली होती. (बहुतेक) विराटाच्या बाजूने लढायचे होते. त्यासाठी त्यांनी ह्या दिवशी आपली शस्त्रे बाहेर काढली. त्याच दिवशी अज्ञातवासही संपला होता. त्याची आठवण म्हणून आपल्याकडे दसऱ्याला शमीच्या झाडाची पूजा करून दसरा साजरा होतो.त्यात शस्त्रपूजा आहे. आपले मराठी संस्थानिक आजही दसऱ्याला शस्त्रपूजा करतात.आपला दसरा रामायणाशी संबंधित नसून महाभारतील समरप्रसंगाशी आहे.

म्हैसुरचा दसरा मोठ्या थाटाचा! थाटामाटाने,दागदागिने, रेशमी भरजरी झुली,सोनेरी अंबाऱ्यांनी सजवलेले हत्ती व राजवैभवसंपन्न असतो हे ऐकत होतो. पण आमच्या गावचा दसरा लोकसंपन्न होता. आजही असेल. उन्हं उतरू लागली की हलगी ताशांच्या, जोश वाढवणाऱ्या,कडकडाटात,घामेघुम झालेल्या तगड्या,जाड,कांबीसारखे कडक लोकांनी आळीपाळीने पेललेली, अफाट गर्दीतून वाट काढत, झळ्ळम झळ्ळम करत उंचच्या उंच म्हणजे फारच उंच हब्बूची काठी येत असे. त्यावेळी मधून मधून मोठमोठ्या आवाजात आईराजा उदे उदेच्या गजराचे वाढत्या गर्दीत “आssई राssजा उधेssउधेssय” कधी झाले हे लक्षातही येत नसे. पण शुद्ध उदय उदय किंवा उदे उदे पेक्षा हा उssधेssउधेssय चा गजर जोरदार आणि जास्त परिणामकारक होत असे, हे खरे. आमच्या मध्यमवर्गीय मंद आवाजातले आई राजा उदे उदे चे मोठ्या आवाजातले उधेssउधेssय कधी झाले ते आम्हालाही समजत नसे. मग आबासाहेबांचे, अण्णांचे व बाबांचे( आजोबा) पुटपुटणेही थोडे मोठ्याने होई!

नवरात्रातल्या अष्टमीच्या दिवशी आमच्या घरी पोत उजळला जात असे. म्हणजे काय तर पत्रावळीवर तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवर पेला ठेवलेला असायचा. पत्रावळी भोवती आईने किंवा बहिणींनी साधी म्हणजे अगदी साधी रांगोळी काढलेली असे. मग आम्ही भाऊ कापसाच्या झाडाच्या बारिक फांद्या किंवा काटक्यांना कापड गुंडाळून व तेलात भिजवून आम्हीच लगोलग केलेले ते पोत घेऊन त्या पत्रावळी भोवती आई राजा उदे उदे म्हणत प्रदक्षणा घालत असू. प्रदक्षणा तरी किती लहान, स्वत:भोवती फेरी मारल्यासारखी! कारण मधल्या घरात तिथेच मोठा पलंग,एक गोदरेजचे कपाट आणि दुसरे लहान कपाट असायचे. पृथ्वी प्रदक्षणा करण्याइतकी जागा नसे. प्रदक्षणा झाली की ते लहान पोत बाजूलाच असलेल्या दुधाच्यी वाटीत विझवायचे. सगळ्यांनी मिळून ती पत्रावळ उंचावून ती कपाळाला लावून नमस्कार व्हायचा. ह्याला तळी उचलणे म्हणत. एखाद्याची तळी उचलणे ह्या वाक्प्रचाराचा हा प्रत्यक्ष कार्यानुभवच की! दसऱ्याला संध्याकाळी शिलंगणाला निघताना नवरात्रात मंडपीच्या बाजूलाच मोठ्या पेल्यात वाढवलेल्या धान्याचे पाते, लहानसे झाड टोपीत खोवून निघत असू.

निम्म्यापेक्षा जास्त गाव नविन कपडेघालून ,फेटे-रुमाल-टोप्यात आपल्या घरातील धान्याची तृणपाती खोवून पार्कच्या दिशेने निघालेच असे. सामान्यांच्या मुकुटांतील ते शिरपेच असत! हब्बूच्या काठीने केलेली शमीची पूजा आणि पार्कमधील,भोवती पार असलेल्या शमीच्या झाडाभोवतीची फेरी चालूच असे. त्याच वेळी लोकांचेही एकामागून एक येणारे लोंढे शमीच्या झाडाला प्रदक्षणा घालू लागत. काही जणांच्या हातातील पोत तो परिसर आपल्यापरीने उजळून टाकत.

आता इतकी प्रचंड गर्दी म्हटली तरी आसपास भेळेच्या , शेंगादाणे फुटाण्यांच्या रेवड्यांच्या गाड्या दिसत नसत. असतीलही कुठे पार्कच्या लोकांनी फुलून गेलेल्या मैदानात.पण त्या असल्या काय आणि नसल्या काय तिकडे लक्षही नसे.कारण दुपारीच दसऱ्याचे पक्वान्नाचे रेsट जेवण झालेलेआणि शेजारी पाजारी नातेवाईंकांकडे सोने द्यायला गेल्यावर प्रत्येक ठिकाणी तोंड पुन्हा पुन्हा गोड होणारच असते.आणि होतच असे. लोक एकमेकांना सोने देऊन काहीजण उराभेटी घेत मैदानात पसरलेल्या व बाहेर पडत असलेल्या लोकांबरोबर बाहेर चाललेले असत. ती पांढरी, पिवळसर,रंगीत सतत हलणारी गर्दीही पाहण्यासारखी असे.

मग रात्री घरीआमचे चुलत भाऊ मुकुंद आणि शशी आतेभाऊ अरूण मधू दुसरे अगदी जवळचे नातेवाईक दत्ता काकडे वगैरे आले की झकास गप्पाटप्पा होत; हसण्या खिदळण्यात वेळ जाई. पण उद्या शाळा ही आठवण झाली की दसरा- सणाचा मोठा आनंद लहान लहान होत जाई!

आमचा सिनेमाचा गाव

रेडवुड सिटी

डबड्यातले काम करनार, कपटी आणि चक्रम!

“ हंटरवाली’ डबड्यात आलाय बे! येतो का,चल” “तुफान मेल” ही येनार हाहे डबड्यात” डबड्यात
म्हणजे त्या थिएटरचे नेमके वर्णन करणारा शब्द. लोक एखाद्या गोष्टीचे बारसे बरोबर करतात. पूर्वाश्रमीचे मेकाॅनकी थिएटर. इथे नाटके होत असत. मराठी रंगभूमीवरील अनेक नामांकित कंपन्या आपली नाटके इथे करत असत. पण नाटकांचे दिवस संपले. एके काळचे वैभवशालीयुग संपले.


तिथे सिनेमा दाखवू लागले. मला माहित आहे तेव्हापासून त्याला डबडा थेटरच म्हणत असत. मेक्यॅनिकि, मेक्यान्कि, मेक्यॅनिक, इंग्रजी बोलतोय असे वाटावे म्हणून मेकाॅन्कि असे निरनिराळे पाठभेद होते. त्या चौकालाही हेच नाव होते. चौकाचा पत्ता सांगतानाही असेच वेगवेगळे नामभेदाचे पाठ वापरले जात. नंतर त्या टाॅकीजचे नाव छानसे दिलखुष झाले. पण सगळ्यांची पहिली पसंती ‘डबडा थेटर’ ‘डबड्यात’ ह्या नावालाच होती. बरं नावं काही लोक उगीच देत नाहीत. ह्या थेटरात पडद्यापासून ते सिनेमा दाखवण्याच्या मशिनीपर्यंत एकही खुर्ची राहू द्या पण बाकडे, स्टूल काहीही नव्हते. मोठ्या बंदिस्त मैदानातील जाहीर सभेला किंवा मैदानात फिरायला आल्यासारखे वाटायचे थेटरात आल्यावर.
वरच्या मजल्यासारखा वाटणारा उतार असो की खालची सपाट जागा, बहुतांश भाग पान तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला असे.त्यातून कोरडी जागा शोधणे हे सिनेमा पाहण्यापेक्षा महत्वाचे काम असे. बरे बाजूच्या भिंतीही काही उंचीपर्यंत अशाच रंगलेल्या!


बसण्याची जमीन सिमेंटच्या कोब्याची. कधी काळी ती तांबड्या रंगाची असावी. कुठे कुठे रंगाच्या खुणा दिसत. जागो जागी नसली तरी बऱ्याच ठिकाणी कोबा उखडलेला. सिमेंट वाळूचे खळगे पडलेले. ह्या खळग्यांमुळेच कोणीही सिनेमाला उशीरा येत नसे. जे नवखे चुकुन माकून उशीरा येत व तिथे बसले की आजूबाजूचे प्रेक्षक “बरबटला की बे बाब्या” म्हणत हसून पिंक टाकायचे. ते खळगे ह्या पिकदाण्या झालेल्या असत!


सिनेमाचे तिकीट सर्वांना परवडण्यासारखे. सर्वांसाठी एकच दर. प्रथम एक आणा दर होता असे बारोमास येणारे प्रेक्षक सांगत. नंतर तो दोन आणे झाला. प्रेक्षक शाळकरी वयाची हाॅटेलात फडके मारणारी, ‘अलिमिन’ च्या ग्लासात बोटे बुचकळून पाणी देणारी; ‘बारक्या’ ह्या एकाच नावाने ओळखली जाणारी मुले; कामगार, रोजंदारीचे मजूर असेच हातावर पोट भरणारे सगळे.


थिएटरमध्ये एकच मशीन त्यामुळे मध्यंतर दोन चार वेळा व्हायची. ही झाली अधिकृत मध्यंतरांची संख्या. पण फिल्म तुटणे,मध्येच ‘लाइटी’जाणे ह्यामुळे सोसावी लागणारी मध्यंतरे निराळी. ह्यांची संख्या रोज बदलायची. कारण आज फिल्म किती वेळा तुटेल कोण सांगू शकणार?आवाज गेला किंवा फिल्म तुटली की पहिल्यांदा “अबे आवाऽऽऽऽज” “अब्ये तोडला की बे साल्यानं पुना तिच्या … पुढे आ किवा मा आपापल्या आवडीप्रमाणे घालून… वाक्य फुलवायचे. “ कुठ्यं ग्येला तो बे… “ इथे दोन फुल्यांपासून पाच फुल्यांच्या शिव्यांची टाकसाळ सुरु व्हायची.फिल्म तुटल्यावर भऽक्कन एक दिवा पेटायचा. त्यामुळे कुठे थुंकायचे कुणीकडे पिचकारी मारायची ह्याचे लोकांना मार्गदर्शन होत असे. पण रंगकर्म्यांचे हे कलादर्शन चालू असता शिव्यांची वीणा दुसरे घेत. ही वीणा कधी खाली ठेवली जात नसे.आॅपरेटरला व डोअर कीपरनांही ह्याची सवय झाली होती. ते उलट जबऱ्या आवाजात वाक्याच्या सुरवातीला दोन ते तीन अक्षरी ‘फुलवाती’लावून किंवा अखेरीला चार किंवा पंचाक्षरी ‘फुलवाती’ हासडून , “काय तिकीटाला बंदा रुपया मोजला का रे ….? “ त्यांच्यातला सुसंस्कृत ओरडायचा,” काय झाले बे बोंबलायला? फिलमच तुटली ना? का तुझी विजारीची नाडी तुटली?का धोतर फिटलं? आं? उगं गप बसाकी बे!” पण ह्या शिवराळ आवाजी युद्धात बहुसंख्येमुळे आमच्या गावचे नंबरी सिनेरसिकच जिंकायचे. तेव्हढ्यात झाली इतकी करमणूक पुरे म्हणत ‘आपरेटर’ अंधार करून फिल्म पुन्हा चालू करायचा.

रोज नेमाने डबड्यात येणाऱ्यांना हे नाट्यमय प्रवेश माहित असायचे. त्यामुळे ते आजूबाजूची मोकळी जागा, भिंत एकाग्रतेने पिचकाऱ्या मारत किंवा झकास खाकरून थुंकत रंगवत असायचे. आमच्यासारखे नवशे काही म्हणू लागले तर,” शिनेमा पाह्यला आलताना मग पाहा ना बे! गिन्नी चवलीत काय साबूने धुतलेले, चार मिशिनीचे थेटर मिळनार का तुला, आं?” असे तत्वज्ञान ऐकवत.

आम्ही एकदाच गेलो असू. पण संपूर्ण सिनेमा कधीच पाहिला नाही. सतत आपले कपडे कुणी रंगवत नाही ना ह्याच काळजीत असायचो! त्या चिंतेतच हिराॅईन नादिया दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून ‘कपटी’ किंवा ‘डाकू’च्या अंगावर झेप घेऊन त्याला ठोसा मारून उडवायची! तर कधी आमचा ‘ काम करनार’ जाॅन कावस असाच टेकडी उतरून त्याच्या पांढऱ्या घोड्यावरून टकडक् टकड्क करत नादियाला ‘कपटीच्या’ तावडीतून सोडवायला यायला लागला की सगळे ‘ डबडा’ टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमायचे! किंवा ‘चक्रमने किंवा जोकरने’ कपटीला किंवा त्याच्या टोळीतल्या लोकांना काम करनारने पळवून लावले किंवा ठोसा ठोशी सुरु झाली की हा फक्त हवेत ठोसे मारल्याच्या अॅक्शन करत एखाद्या ‘कपटीला’ पाय घालून किंवा त्याच्या मागे ओणवे होऊन पाडले की प्रेक्षक हसायचे.त्यावेळचे म्युझिकही निरनिराळे आवाज काढत त्यात सामील व्हायचे.

हे ‘कपटी, डाकू’ आणि ‘काम करणार’, चक्रम किंवा जोकर काय प्रकरण आहे? तर डबड्याच्या अनुभवी समीक्षक-प्रेक्षकांच्या शब्दकोषांत व्हिलन व हिरो आणि विनोदी नट! कुणाला माहित खलनायक व नायक! काम करणार किंवा करनार हेच त्या कर्तबगार हिरोचे खरे वर्णन. कपटी आणि डाकू हे व्हिलनपेक्षाही त्याची वृत्ती व पेशा दाखवणारे सोपे यथार्थ शब्द होते. जुन्या गिरणीच्या चाळीतील किंवा हजरतखानच्या किंवा बाजूच्या मरीस्वामी चाळीतील आमच्या बरोबरीची,अगोदर सिनेमा पाहून आलेली,पोरे त्याची ष्टोरी मनापासून सांगताना कपटीच्या, काम करनारच्या सगळ्या अॅक्शन्स करीत “मग तिकडून काम करनार जाॅन कावस कसा दबकत दबत हळूच पाठीमागून येतंय आणि एकदम कपटीच्या टोळीतील एकाचे तोंड दाबून त्याला एका फाईटीत झोपवतो बे” ; कधी हंटरवाली नादियाची धाडसी कामेही करून दाखवत! पन कपटी सुद्धा बेरकी आहे त्यात.” हे सर्व प्रत्यक्ष अॅक्शनसह करून ष्टोरी सांगायचे. सर्व प्रेक्षक पोरे मोठ्या उत्सुकतेने भुवया उंच करत, कोणी तोंडाचा चंबू करत किती एकाग्रतेने ती गोष्ट ऐकत! त्या काळात आम्हा सर्वांसाठी ह्या बोध कथा संस्कारकथा व स्फूर्तीदायक गोष्टी होत्या. आम्ही डबड्यांत एकदाच जायची हिंमत दाखवली. ती सुद्धा तिथे अंग चोरून बसण्यातच जास्त दाखवली!


पुढे हेच दिलखुष डबडा टाॅकीज मीना टाॅकीज झाले!


अनेक वर्षे आपल्या स्टंटपटांनी व स्वत: केलेल्या धाडसी स्टंटसनी लोकांची करमणूक करणारी नादिया आणि जाॅन कावस ही लोकप्रिय जोडी मागे पडली. नंतरच्या काळात मा. भगवान व बाबुराव यांचे स्टंटपट आले. ह्यांचा बाज निराळाच होता.डबडा राहिले नव्हते तरी तिथले प्रेक्षक ह्यांच्यासाठीही होतेच. बरीच वर्षे ह्या ‘काम करनार’ जोडीने व चक्रमनेही त्यांची करमणूक केली.

सदाशिव पं. कामतकर

… गतिसी तुळणा नसे

रेडवुड सिटी

… गतिसी तुळणा नसे

स्त्रीचे कर्तृत्व आता क्षितिजापलीकडे गेले आहे. तिच्या कर्तृत्वाला सीमेचे बंधन नाही की लक्ष्मणरेखेचे बंघन नाही. ती स्वत:च जाणीवपूर्वक लक्ष्मण रेखा ओढते. कोणालाही ती ओलांडू देत नाही.हे खरे तिचे सामर्थ्य आहे.

शिक्षक,वकील, डाॅक्टर, इंजिनिअर प्राध्यापक, सिने-रंगभूमी ह्या पारंपारिक क्षेत्रांत दिसतेच पण पोलिस दल, आणि लष्काराच्या सर्व शाखांत, विज्ञान तंत्रज्ञान व कम्प्युटर क्षेत्रातही तिने आपला ठसा उमटवला आहे.कित्येक वर्षे मंगळागौरीच्या खेळात आणि फार तर लंगडी व खोखो सारख्या खेळापुरतीच दिसणारी स्त्री आता आॅलिंपिकमधील सर्वच खेळात दिसते. पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष ही पदेही तिने भूषविली आहेत! थोडक्यात पुरुषांच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही तिने प्रवेश केला आहे.

हे ‘नमनासाठी धडाभर तेल’कशासाठी? आणि कुणासाठी?

आमच्या गावात एक डबडा थेटर होते.पूर्वी मारामारीचे सिनेमे यायचे. त्यात प्रामुख्याने मा. ऱ्भगवान(अलबेला फेम) व बाबुराव ह्या जोडगोळीचे सिनेमा असत. त्याला स्टंटपट म्हणत. त्यावेळी हिंदी स्टंटसिनेमातील मारामारी हाताने केली जायची.मात्र अलिकडे स्टंटस्ची व्याख्या आणि स्वरूप पूर्ण निराळे आहे.त्यामध्ये डोंगरांच्या टोकांवरून,कड्यांवरून,गगनचुंबी इमारतीवरून, चालत्या आगगाडीवर उड्या मारणे. विमानाच्या उघड्या दारात उभे राहून बंदुकीने हल्ला करऱ्णे, हेलिकाॅप्टरमधून दोरीला लोंबकाळत मारामारी करणे,अति वेगवान जीवघेण्या शर्यतीच्या मोटारीतूनही बाहेर पडून घसरत जाणे. काय आणि किती प्रकार सांगायचे! जीवावर बेतणारे खेळ,कसरती करणारे अनेक धाडसी स्टंट्समनआहेत. इथे तर पुरुषच अनभिषिक्त सम्राट होते. पण ह्या क्षेत्रातही एक अजब, प्रचंड वेगाचेच आकर्षण असलेली महा धाडसी स्त्री अवतरली. तिचे नाव किटी ओ’नील !

डिसेंबर१९७६. अगदी कोरडा दिवस. ओरेगन मधील वाळवंटातल्या एका कोरड्या ठक्क पडलेल्या मोठ्या तलावात एका राॅकेट इंजिनावर चालणाऱ्या तीन चाकी SMI Motivator वाहनात किटी ओ’नील बसली. लहानशा दट्ट्यावर तिने दोनदा किंचित दाबल्या सारखे केले. इंजिन जागे झाले.समोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहू लागली. तो बोटानेच दहा, नऊ, आठ…., ३,२,१आणि एकदम त्याने हात खाली आणल्याबरोबर दट्ट्याचा लहानसा दांड्या लगेच मागे ओढला. निमिषार्धही नसेल पण ते धडाडणारे इंजिन कालचक्रात अडकून बसल्यासारखे गप्प झाले. पण पुढच्याच क्षणी ते मोटिव्हेटर कुठे गेले ते समजले नाही. त्याच्याच प्रचंड आवाजाच्या मार्गात तो ठिपका दिसेनासा झाला.क्षणार्धात ६१८मैलाची गति गाठणाऱ्या मोटिव्हेटरने दुसऱ्या एका मैलाच्या टप्प्यात ५१२.७ मैलाचा वेग कायम राखला.आणि तिने स्त्रीयांनी अशा वाहनातून गाठलेला विक्रम सुमारे २००मैल प्रति तासाने मोडला. किटी ओ’नीलचा विक्रम अजूनही कुणी मोडला नाही!

हे सर्व एखादा प्रचंड स्ऱ्फोट व्हावा अशा राॅकेट इंजिनच्या आवाजात घडत होते. पण किटी ओ’नीलला त्याचा काहीही पत्ता नव्हता. ती बहिरी होती!

तिचा विक्रम म्हणजे तिने केलेल्या अनेक जीवघेण्या साहसी खेळात केलेल्या वेगागाच्या विक्रमांतील तुरा होता. केटी स्काय डायव्हिंग water skiing, अशा अनेक क्रीडा प्रकारात प्रविण होती. त्यातही तिला भरमसाठ वेगाचे मोठे आकर्षण आणि प्रेम होते. त्या प्रेमावा तुलना नव्हती. उदारणच द्यायचे तर १९७८ मधील एक प्रसंग सांगायला हवा.

अशीच राॅकेट इंजिन असलेली प्रख्यात काॅर्व्हेट गाडी बनवली होती. कॅलिफोर्नियातील सॅन बर्नांडिनो जिल्ह्यतल्या मोहावो वाळवंटासारख्या वैराण प्रदेशात तिला ही गाडी चालवायची होती. कमीत कमी वेळात पाव मैल अंतर पार करण्याचा विक्रम करण्यासाठी तिने सुरवात केली. ३५० मैल वेगापेक्षाही जास्त वेगाने चालवायला सुरुवात केली. आणि गाडी उलटीपालटी होत हवेत उडाली. हवेत तिने सहाशे फूट लांबझेप घेतली . पण गाडीने हवेतून मग जो सूर मारला ती बरोबर तिच्या नाकाच्या शेंड्यावरच पडली! किटीच्या खांद्याला थोडी दुखापत झाली. पण गाडीतून बाहेर आली ती हसतच! “हवेतील ते उड्डाण फार थरारक होते!” असे म्हणाली. किटीला भीती हा शब्दच माहित नव्हता. त्यामुळेच तिने हाॅलिवुडच्या सृष्टीत “स्टंटवुमन” म्हणून प्रवेश केला. नवीन क्षेत्र. नवीन जीवावरचे पराक्रम चालू झाले. टीव्हीवरही ती अशीच साहसी कामे करू लागली. ह्याकामातूनच ती वर सांगितलेल्या राॅकेट इंजिनाच्या वाहनातून वेगाचे विक्रम प्रस्थापित करण्याच्या शर्यतीत भाग घेऊ लागली.

१९७९ मध्ये तिच्या जीवनावर आधारितच Silent Victory: Kitty O’Neil Storyएक उत्तम टीव्ही कार्यक्रम निर्माण झाला. किटी रेसमध्ये भाग घेत होती. Smokey and the Bandit II , The Blues Brothers सारख्या सिनेमातही स्टंटवुमन चे काम करत होती. १९८० मध्ये ती ह्यातून निवृत्त झाली.

लहानपणापासूनच,” मला भन्नाट वेगाने जावे असे वाटत असे” ती चार वर्षाची असताना वडिल हिरवळ कापायला यंत्रावर बसले की ही सुद्धा त्याच्या बाॅनेटवर बसून”आणखी जोरात आणखी जोरात न्या बाबा” असे हसत हसत ओरडायची. तिने काय धाडसी खेळ केले नाहीत? मोठ्या उंच इमारतींवरून उड्या मारल्या आहेत. अनेक खेळात भाग ऱ्घेतला आहे.आॅलिंपिक-पोहण्याच्या टीममध्ये सामील होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. पण दुर्दैवाने हात मोडला. थांबवावे लागले. त्यानंतर एकापाठोपाठ गोवर,कांजण्या देवी ,इतकेच काय मेनेंजायटीसच्या दुखण्यांतून पार पडावे लागले! मग आॅलिंपिकचे खेळ हे आपले काम नाही समजून ते सोडले.

बहिऱ्या केटीला बोलणे ऐकायला (समजायला) कुणी शिकवले? केटीच्या यशामागेही एक स्त्रीच आहे! केटीची आई. तिच्या आईने तिला बोलताना होणाऱ्या ओठांच्या हालचाली वरून बोलणे ऐकायला शिकवले! ओठांकडे ‘पाहून’ कसे ऐकावे ते शिकवले. खाणाखुणांची भाषा केटी शिकली नाही. ह्या अनुभवावरूनच केटीच्या आईने केटीसारख्या मुलांसाठी बहिरे मुके बोलके ऐकते करण्याची शाळा काढली!

ज्या स्त्रियांनी सर्वोच्च हिमालयाच्या डोक्यावर पाय रोवून उभे राहण्याचा पराक्रम केला आहे त्याच परंपरेतील केटी ओ’नीलचेही पराक्रम आहेत!

तिला वेगाची भाीति अजिबात नव्हती. त्यामुळेच तिच्यासाठीही काही राॅकेटइंजिन शक्तिवर चालणारी वाहने तयार करणारा तिचा जवळचा मित्र केय मायकलसन म्हणतो,” मी तिला घाबरल्यासारखे वाटते का हे कधीच विचारत नव्हतो. काण ती गाडी चालवू लागली की माझीच घाबरगुंडी उडायची;इतक्या बेफाम वेगाने ती गाडी चालवायची!”

अशी ही “सप्तअश्व गतिमान” केटी शुक्रवारी ता.९ आॅक्टोबर२०१८ रोजी, परवाच वारली. केटी उणीपुरी ७२ वर्षांची होती. इतक्या गतिमान केटीला परमेश्वर ‘’सदगति’च देणार ह्यात शंका नाही!

‘पेढे’ गावच्या आठवणी

WhatsApp वर जलदीने दूध नासवून केलेल्या धारवाडी पेढ्यांचे फोटो टाकले होते. पेढ्यांसाठी इतके चांगले आणि भरपूर दूध नासवणे आणि त्याचे पनीर किंवा पेढे करणे हे मला खटकते.

नासवून ते इतके देशस्थी रंगाचे पेढे करण्यापेक्षा दूध आटवून आटवून आटवून घट्ट करून खरपूस बदामी रंगावर आणले तरी ते धारवाडी इतकेच किंवा फार तर दावणगिरे मुंगळहट्टी सारखेच खमंग व चविष्ट होतील! बडोद्याचे दुलीचंदचे पेढे चवीला हुबेहुब धारवाडी मिश्राच्या पेढ्यासारखेच असतात. पण थोड्या उजळ रंगामुळे उजळमाथ्याने परातीत विराजमान असतात. दूध नासले तर मी कलाकंद करत असतो.शतावधानी असल्याने आठवड्यातून चार दिवस मला उत्तम कलाकंद खायला मिळायचा. उरलेले तीन दिवस दूध उतू जायचे; त्यामुळे मला रोज दिवसातून तीन चार वेळा दूध आणायला तीस पायऱ्या चढ-उतार करून जावे लागे. कुणी माझ्याकडे केव्हाही आले तरी दूध असेच. फक्त नासलेले किंवा उतू गेलेले! हा अगदी परवा परवा २३ जुलै१९१८ पर्यंतच्या भूतकाळातीलच इतिहास आहे. अखेर आपल्याकडे कुठल्याही इतिहासाची परंपरा गौरवशालीच असते तशी माझ्या कलाकंदाचीही आहे !

कालच भंडाऱ्याच्या शंभर वर्षाची परंपरा असलेला “राणी” पेढ्याचा व्हिडिओ पाहिला.त्यात पाककृती अशी नाही. इतकेच काय शब्दही एखादाच आहे.पण ते राणी पेढे कसे करतात तेव्हढे दिसले.

पेढ्यांचेही किती प्रकार ! औरंगाबादचे अप्पा हलवाईचे पेढे. हे गोळ्यांसारखे आता करत असतील पण पूर्वी ते द्रोणात मोठ्या चमच्याने लावून देत असत. चवीला बरेचसे सोलापूरच्या स्वस्तिकच्या कुंद्यासारखे खमंग. छानच. त्याच पद्धतीचे पण पेढ्याच्या रुपातले कुंथलगिरीचे पेढे. तेही तितकेच स्वादिष्ट,मस्त. अगदी five starबसेसही तिथे थांबतील मग आमच्या सर्वांसाठी असलेल्या सर्वमान्य तांबड्या येष्टी का नाही थांबणार ? कुंथलगिरी खवा व पेढ्यांचेच गाव आहे असे वाटण्या इतकी तिथे खव्या पेढ्यांची दुकाने व विक्रेते आहेत!

पूर्वी सोलापूरला बदामी पेढा मिळत असे. तो चांगला साधारण तळहाता एव्हढा मोठा असे. आकार बदामाचा, त्यात असली तर बदामाची एखादी पातळशी पाकळी. वयाचीच चव त्यात भरपूर असली तरी तो पिवळ्या रंगाचा पेढा चवीला उत्तम असे. पण तो लवकरच लुप्त झाला. बालपणासारख्या सर्व चांगल्या गोष्टी अल्पकाळच असतात. सध्या राजकोटी पेढा पुण्याला मिळतो. त्यालाच काका हलवाई जम्बो पेढा म्हणतात. मलई पेढा आहेच. सर्वांना मथुरा कंस किंवा कृष्णामुळे माहित नसते पण तिच्या पेढ्यांमुळेच जास्त ती जास्त माहित आहे. कुठे मथुरा आणि कुठे सोलापूर! पण सोलापुरचे सगळे पेरूवाले आपले पेरू “लै गोड! आल्ल्ये मथुरेचे प्येढ्ये” ऐेSय मथुर्रेच्चे पेढ्ये ” म्हणतच पिवळे जर्द पेरू विकत. लोकही ते मथुरेचे पेढे म्हणूनच खात!

मलई पेढ्यांची देशी आवृत्ती म्हणजे सध्या ज्याला दुधाचे पेढे म्हणतात ते.पण दुधाचे पेढे आमच्या जळगावचे भावे करीत. ते उत्तम असत. भावे,मी जिथे राहात असे त्याच्या तळमजल्यावर होते. दुधाचा व्यवसाय होता त्यांचा. सोलापूरला घरी जाताना मी बरेच वेळा ते नेत असे. त्यांचे नाव बाळ असले तरी आडनाव भावे असल्यामुळे आधी आॅर्डर नोंदवल्याशिवाय (तोंडी सांगितले तरी चालेल ही मोठी सवलत होती) मिळत नसत. सर्व काही आटोपशीर असल्यामुळे जास्तीत जास्त अर्धा किलोचीच आॅर्डर ते घेत. तीही फक्त एकाच गिऱ्हाईकाची! पण पेढे मात्र भरपूर खावेसे वाटण्या इतके उत्तम असत.

काही चांगल्या पेढ्यांत सोलापूरच्या दूध पंढरीचे आणि कऱ्हाडच्या सहकारी डेअरीच्या पेढ्यांचाही समावेश करावा लागेल.
कऱ्हाडवरून साताऱ्याच्या कंदी पेढ्यांची आठवण झाली. कंदी ही पेढे बनविण्याची पद्धत आहे की ते बनवणाऱ्या साताऱ्याच्या मूळ हलवायांचे नाव आहे हे सांगता येत नाही इतके कंदी नाव साताऱ्ऱ्याच्या पेढ्याशी निगडित आहे. त्याचा पोत स्वााद वेगळाच व अप्रतिम असतो. किंचित कडक वा टणक पण आतून मऊ, कळत न कळत लागणारी जर्राशी आंबूस चव. इंग्रजीत जसे hint of… म्हणतात तशी.कंदी साताऱ्याचे पण आमची आणि त्यांची ओळख आबासाहेबांनीलहानपणी करून दिली; ते एम. दिगंबरच्या (नव्यापेठेतील) स्टोअर्स मधून हे कंदी पेढे आणत. नेहमी मिळत नसत. बहुधा एम दिगंबर साताऱ्याला त्यांच्या नातेवाईकांकडे जात असतील तेव्हा परतताना, त्यांच्यासाठी दिलेलेच हे विकत असतील!!

कुंथलगिरी गावासारख्याच दोन लहान गावांचाही नावे त्यांच्या प्रसिद्ध पेढ्यांसाठी घेतली जात त्यांचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ती दोन्ही गावे लहान रेल्वे स्टेशनची आहेत. दोन्ही विरुद्ध दिशेला. एक म्हणजे जवळचे मोहोळ आणि दुसरे तडवळ. मोहोळ माहितच आहे. तडवळ हे पूर्वीच्या एमएसएमवरील म्हणजे सध्याच्या दक्षिण रेल्वेवरील लहानसे स्टेशन.सोलापूर विजापूर मार्गावर आहे. पण आम्हाला ते आमच्या आईच्या रामूमामांच्या मंगरूळ गावामुळे तडवळ स्टेशन माहित आहे. दोन्ही स्टेशनवर गाड्या थांबल्या,अर्थात पॅसेंजर गाड्याच, की बहुतेक प्रवासी,डब्याला आग लागलीय की काय वाटावे अशा तातडीने पटापट उतरून (बहुतेक अग्रवालचेच हे स्टाॅल असावेत) चहाच्या स्टाॅलकडे पेढ्यांसाठी पळत सुटत! अशी घाई नंतर पुढे कर्जत स्टेशन आले की लोक दिवाडकरांच्या बटाटे वड्यासाठी पळत सुटत तेव्हा पाहिली. दोन्ही स्टेशनचे पेढे चांगलेच असत. काही स्टेशनावर गाड्या इंजिनमध्ये पाणी घेण्यासाठी थांबायच्या तशा मोहोळ आणि तडवळला पेढ्यांसाठी थांबत. गाडी किती वेळ थांबते इथे असे कुणी विचारले तर सर्वांचे पेढे घेऊन होईपर्यंत हेच उत्तर गार्डकडूनही मिळे!

कंदी पेढ्यांशिवाय पेढे प्रकरण पूर्ण होत नाही तसेच नाशिकचे प्रख्यात हलवाई पांडे यांचे पेढे खाल्याशिवाय लेख पूर्ण होणे शक्य नाही.

खरे सांगायचे तर प्रत्येक गावात चांगले पेढे मिळत असतातच. व तिथे ते प्रसिद्धही असतात. येव्हढेच कशाला जत्रेतल्या कापडाच्या छपराखालचे किंवा आठवडी बाजारातले अॅल्युमिनियमच्या परातीत रचून ठेवलेले आणि धुळीची किंचित पावडर लागलेले पेढेही ,”बाबा पेढा घ्ये की” म्हणणाऱ्या लेकराकडे दुर्लक्ष करून तेलकट दोरी गळ्यात बांधलेल्याबाटलीत ‘अदपाव त्येल’ , लाल मिर्च्या आणि मोठ्या फडक्यात किलो दोन किलो ज्वारी बांधून झाल्यावर परतताना त्या कापडी टपरीपाशी थांबून पोरासाठी दोन प्येढ्ये आणि पै-पैशाची गुडीशेव बांधून घरी नेणाऱ्या वाडी वस्तीतल्या रोजगार हमीच्या कामगारांसाठी,तो धुळीचा हलकासा मेक अप केलेला पेढाही तितकाच प्रसिद्ध आणि गोड असतो!

चार दिवस गॅदरिंगचे – २

रेडवुड सिटी

आमच्या शाळेच्य गॅदरिंगच्या जेवणाचे व अल्पोपहाराचे वर्णन करताना गॅदरिंगचे आणखी एक वैशिष्ट्य ध्यानीं आले. गॅदरिंगला शाळा आम्हाला सिनेमा दाखवत असे. कुठे मैदानात किंवा शाळेच्या सभागृहात, त्या १६मिमि पडद्यावर नाही. चांगल्या सिनेमा-थेटरात दाखवत असे! भागवतमध्ये असला तर चित्र मंदिर,कलाआणि छाया ह्या त्यांच्या तिन्ही टाॅकीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी तो पहायला मिळे. (त्यांचे उमा चित्र मंदिर बांधून झाले नव्हते.) प्रभात मध्ये असला तर मात्र दोन खेळ करावे लागत. ही झाली रुक्ष आकडेवारीसारखी माहिती. खरी गंमत होती ती आमची गर्दी पाहण्याची आणि वाहत्या वाऱ्यासारख्या एकामागून एक ऐकू येणाऱ्या गप्पांच्या त्याबरोबरच्या हसण्याच्या अनेक तऱ्हांच्या,आरोळ्या,व एकमेकांना पाहिल्यावर मारलेल्या असली हाकांच्या लहरी कानांवर झेलण्याची ! पाखरांच्या शाळेतही एव्हढा उल्हास असणारी व आनंद देणारी कलकल निनादत नसेल.

भागवत थिएटरचे आवार त्यामानाने मोठे. ते तर फुलून जायचेच पण कला व चित्रमंदिराच्या मधल्या बागेजवळची बेताची मोकळी जागाही रिकामी राहात नसे. तीच गोष्ट प्रभातची. प्रभातची लाॅबी आणि समोरची आयताकार प्रशस्त मोकळी जागा मुलांनी तुडुंब भरून जाई. दाटीवाटी-खेटाखेटी,रेटारेटीचे कुणाला काही वाटत नसे. तरी गप्पात रंगलेल्याला धक्का लागला तर एखादाच कुणी,”अब्ये लई ताकद आली का बे?” ए सुकड्या,दिसत नाही का तुला?”त्यावर हा सुक्कड लगेच,” दिसायचं काय त्यात बे? तू कुणाला नाही दिसणार बे ढब्ब्या !” हा संवादऐकल्यावर भोवतालची सात आठ पोरं मोठ्यांदा हसली की इतरही काही कारण नसता मोठ्यांदा हसायची की लगेच सगळी गर्दी हसत सुटायची ! पण तोपर्यंत “सुक्कड हाॅकीस्टिक ”आणि “तो फुटबाॅल”हसत खेळायलाही लागलेले असत!

आत गेल्यावर मग जागा धरून ठेवलेली पोरे दोस्तांच्या नावाने हाकारा सुरू करत.सिनेमा सुरू झाला तरच शांतता होईल ह्या भरवशावर मास्तर सिनेमा सुरु कारायला सांगत. ही शांतता काही वेळ प्रस्थापित होत असे. पण गाजलेले गाणे सुरु झाले की कुठून तरी ,” अरे जाधव मस्त म्हणतो हे गाणं.” असा आवाज आला की जाधव आणखी आग्रहाची वाट न पाहता लगेच सुरु करायचा म्हणायला. लगेच दुसऱ्या वर्गांचा अभिमान उसळून यायचा की एकदम चार पाच जाधव ते गाणं म्हणू लागायचे . बाकीची आम्ही ‘वगैरे” पोरं ठेका धरायला होतोच की! तीन मिनटाचे गाणे सहा मिनिटांची LPव्हायची! गंभीर किंवा करूण ‘सीन’ आला की वरच्या मजल्यावरील एखादा प्रोजेक्टरच्या झोतात, हातांनी बोटांनी’पक्षी उडतोय, हरिण,किंवा मासासळसळसतोय’ ‘ हा खेळ सावल्यांचा’ करत असे.शिक्षकांनी पाठीत रट्टा घातला की हा खेळ बंद व्हायचा.

सिनेमा काही जणांनी अगोदर पाहिला असला तर पुढचे डायलाॅग अगोदरच ऐकायला लागायचे! गाणे आले की कुणी जाधव-देशपांडे-इनामदार असे बरेच सवाई रफी,फर्माईशीची वाट न पाहता गाणे म्हणायलाही लागत. तर “चूल आणि मूल” असला तर अगोदरच सर्वतोमुखी झालेले दामुअण्णा मालवणकरांचे “अगं माया आवर,आवर” आले की प्रोजेक्टरच्या प्रकाश-झोतात तेच वाक्य ‘माया’च्या जागी निरनिराळे पाठभेद घालून भिरभिरत विहरत असत!

एरव्ही चार मुलांसमोर, घाबरून धड नीट न बोलणारेही सिनेमाच्या अंधारात मात्र आपापले विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम साजरे करीत ! सिनेमा संपल्या नंतरही मजा पुढे चालूच असे.सिनेमातले संवाद म्हणताहेत, तर कुणी गाण्यांच्या ओळी गुणगुणताहेत;,बरेच जण हसत खिदळत गप्पाटप्पा करत घोळक्या टोळक्यांनी,कुणाच्या खांद्यावर हात टाकून, काही एकमेकांना ढकलत चालले आहेत; काही जवळच्या घरी ठेवलेल्या सायकली आणून टांग मारत “जातो बे” म्हणत निघालेही असतात! अशा तऱ्हेने रमत गमत सगळे घरी परतायचो आम्ही.

गॅदरिंगचा सिनेमा ही सर्वांनाच एका शुद्ध,निर्भेळआनंदाची आणि करमणुकीची मेजवानी असे.

गॅदरिंगच्या अल्पोपहारासारखा सिनेमाही अल्पकालीनच ठरला. फार तर दोन तीन वर्षेच टिकला. पण कधीच flop झाला नाही; तो hit च ठरला!

चार दिवस गॅदरिंगचे – १

रेडवुड सिटी

आमच्या ऱ्शाळेने काही अतिशय चांगल्या गोष्टी आमच्या आठवणींसाठी दिल्या; त्यात गॅदरिंगमध्ये होणारी विद्यार्थ्यांनी कामे केलेली व वा.शि.आपटे , आमचे पद्माकर देव व गो.रा. कामतकर यासारख्या उत्तम दिग्दर्शकांनी बसवलेली आजी आणि माजी विद्यार्थी विद्यर्थ्यांनीवेगवेगळी बसवलेली त्या काळची उत्तमोत्तम नाटके, संगीतिका ह्यांची मेजवानी दिली. संशयकल्लोळ. आचार्य अत्र्यांची साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी उद्याचा संसार, कवडी चुंबक तर मो.ग. रांगणेकरांचे कुलवधु व त्यांच्या तुझं नि माझं जमेना ह्या सारख्या तीन एकांकिका तर झुंझारराव सारखे शेक्सपिअरचे जबरदस्त पण देवलांनीही त्याच ताकदीने केलेले हे रुपांतर तितकेच प्रभावीपणे बसवून सादर करणारे आमचे शिक्षक-दिग्दर्शक व विद्यार्थी -नटांची नाटके पाहणे हा अवर्णनीय आनंद होता.

त्याच बरोबर पं.जगन्नाथबुवा पंढरपुरकर, मा. कृष्णराव, पं.नारायणराव व्यास, पं विनायकबुवा पटवर्धन यांच्यासारख्या नावाजलेल्या गवयांच्या मैफिली ऐकण्याचे भाग्य लाभत होते. तेही फक्त चार आण्यांच्या वर्गणीत! भाग्य भाग्य म्हणजे ह्यापेक्षा काय निराळे असते?!

मी हरिभाईमध्ये जाण्या अगोदर काही वर्षे शाळेच्या गॅदरिंगची सांगता अतिशय उत्कृष्ट जेवणाने होत असे. जेवणातील बेत, काही पदार्थांची वर्णने दोन चार दिवस ऐकायला मिळत असत. पण मी त्या प्रख्यात शाळेत गेलो त्यामागे गॅदरिंग व त्यातले हे जेवण मुख्य कारणे होती. पण काय ! आमची बॅच शाळेत आली ती दुसरे महायुद्ध संपत येण्याच्या काळात. कुठले जेवण असणार. खराच हिरमुसला झालो. तरीही पहिली एक दोन वर्षे तरी शाळेने अल्पोपहार नावाचा भरगच्च असा फराळ दिला. मस्त असायचे सगळे पदार्थ.

दीड-पाउणे दोन हजार विद्यार्थी पन्नास पंचावन्न शिक्षक गडी-शिपाईअशी भरपूर लोकसंख्या असे.
हा कार्यक्रम आमच्या शाळेच्या भव्य मैदानावर होत असे.विद्यार्थ्यांच्या दोन रांगा पीटी ला बसल्यासारख्या समोरासमोर तोंडे करून त्यांच्याच पाठीला पाठ लावून समोरासमोर बसलेल्या दोन रांगा. अशा पद्धतीने किती रांगा! काही वर्ग आणि शिक्षक वर्तुळाकारात बसलेले. काही विद्यार्थिनी व शिक्षक वाढायला असत. मुली वाढायला साव्यात असे सर्वच रांगांना वाटत असे. पण आमच्यासारख्या भिकार c-grade सिनेमाच्या टुकार हिरोंच्या वाट्याला गणिताचे, सायन्सचे आणि भूगोलाचे ‘सेकंड रन’ सिनेमाचे मास्तर येत. त्यामुळे पदार्थ कठिण आणि अवघड जाऊ लागले. पण त्यावर आमचा उपाय काढला. आम्ही पलीकडच्या मुली वाढणाऱ्या रांगांकडे पाहात प्रत्येक पदार्थ मग तो कसाही,अगदी गोड असला, तरी गोड मानून खात असू. पण दडपून खात असू!

अल्पोपहाराचे हे दृश्य खरोखर प्रेक्षणीय असे. कर्व मैदानात नाही पण एक दोन बाजू पतंगीच्या रंगीत त्रिकोणी कागदांच्या फडफडणाऱ्या पताकांच्या माळा, ठसठशीत अक्षरातील शब्दांच्या ओळी प्रमाणे बसलेले विद्यार्थी, त्यात मधूनच एक दोन गोलाकारात बसलेली विद्यार्थी, शिक्षक आणि त्या ओळीतून होत असणाऱ्या लगबगीच्या हालचाली हा पाहण्यासारखा देखावा असे. कॅमेरे फोटो ह्या देवदुर्लभ वाटणाऱ्या गोष्टी. मग हवाई चित्रिकरण कुठले! पण कुणी तसे ते टिपले असते तर आजही गुगलला किंवा गेट्टीला आपल्या मुकुटातले मानाचे शिरपेच वाटावे असे ते फोटो असते!

पण कितीही असले तरी सुखाचे दिवस थोडेच तसा हा अल्पोपहाराचा कार्यक्रमही दोन वर्षेच टिकला. गॅदरिंगचा अल्पोपहार बंद झाल्यावर ते भव्य मैदान आणखीच मोठे वाटू लागले!

एकापेक्षा एक! एकातून अनेक!

रेडवुड सिटी

यु-ट्युबवर बरेच वेळा मी स्वयंपाकाचे व्हिडिओ पाहात असतो. किती पदार्थ ! नव-नविन पदार्थ, माहित असलेल्या मिठाईचेही वेगवेगळे प्रकार, नेहमीचे पदार्थही किती वेगवेगळ्या रुपात येतात! थक्क होतो.
आपल्या घरीही आपण एका कणकेचीच(गव्हाच्या पिठाची) किती रूपे पाहतो, आणि किती विविध चवींचाआनंद घेतो! कोणतेही पिठ न मिसळता केलेली मुलभूत पोळी, पुऱ्या, त्या पुऱ्यांचेही पाकातल्या पुऱ्या, पाकातले चिरोटे ह्या गोड प्रकारांच्या बरोबरच आणखीही काही प्रकार जसे पाणी पुरी, तिखट-मिठाच्या पुऱ्या.बरं त्या तिखट मिठाच्या चवीला जर आणखी बढती द्यायची असली तर तिंबताना त्यात थोडे आंबट ताक घालायचे! बढतीच्या मजेबरोबर स्वादाचा बोनसही मिळतो. मेथीच्या, थोडे जिरे घालून केलेल्या पुऱ्यांचा झणकारा औरच. तशा नको असतील तर ताज्या मेथीच्या किंवा पालकाच्या पुऱ्याही मजा आणतात. ह्या पुऱ्यांना तसेच साध्या पुऱ्यांनाही वाळकाची कोशिंबीर किंवा नेहमीची कांदा-टोमॅटोच्या कोशिंबिरीची साथ असेल तर जवाब नाही.’टाॅप टेन’ गाणीही त्यापुढे बेसूर वाटतात. इतकेच काय साध्या पुऱ्यांबरोबर बटाट्याची भाजी नसेल तर त्यांना पुऱ्या म्हणत नाहीत! आणि त्यातच बरोबरीने श्रीखंड किंवा तुपाने थबथलेला,वेलदोडे खिसमिस तर असणारच, पण भरीला तुपात तळलेल्या पिकल्या केळ्यांच्या चकत्याही असलेला शिरा असेल तर मग ती जेवणाच्या वर्ल्ड कपची फायनलच! प्रत्येक घास त्या जल्लोषातच खाल्ला जातो!


पुरी-भाजी वरून आठवण झाली. बहुतेक सगळ्याच हाॅटेलात पुरीभाजी मिळत असे.पण शारदा स्टोअरवरून बक्षी ब्रदर्स कडे जाताना वाटेत टांगा स्टॅंडसमोरच तुषार हाॅटेल होते. रस्यावरच प्रवेशदार होते; त्यातून जरा आत जावे लागे. तिथे मिळणारी पुरीभाजी सालंकृत असे. मोठी प्लेट.फिकट गुलाबी- बदामी रंगाच्या फुगलेल्या पुऱ्या. बटाट्याची भाजी. भाजी बटाट्याची का,हा अडाणी प्रश्न विचारू नका. पुऱ्यांबरोबरची भाजी ही बटाट्याचीच असते हे समस्त बटाट्यांनाही माहित आहे. डाव्या बाजूला लालपिवळ्या तेलाचा किंचित ओघळ असलेले कैरीचे लालभडक लोणचे आणि वाळकाची कोशिंबिर.आणखी काय पाहिजे!


कणकेचा एक अवलिया अवतार म्हणजे आमटीतली फळं! तुपाची धार घालून ओरपून, मिटक्या मारून खाल्यानंतर पातेल्यात आमटी शिल्लक आहे की फळं हे शेरलाॅक होम्सच्या बापालाही न उलगडणारे रहस्य कायम राहते! “हेल्दि ”राहण्यासाठी फळं खा न खा पण ही फळं खाताना आणि खाल्ल्यावर साक्षात अमृताचे फळ जरी कुणी पुढे ठेवले तरी त्याकडे कुणी ढुंकुनही पाहणार नाही!

कणकेच्या पोळीचा आणखी एक प्रकार म्हणजे दुधात तिंबून केलेल्या दशम्या; बहुधा ही दशमी रात्री केली जाते.घरातील वडील वयस्कर मंडळी ह्या दशम्यांचे खास गिऱ्हाईक.खरे फॅन! पण आपणही जेव्हा त्या खातो त्यावेळी दशम्यांच्या सात्विक चवीमुळे होणाऱ्या आनंदात आदरही मिसळलेला असतो!
थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी झाऱ्यावरच्या पोपया किंवा गाखर, दामट्या खाल्या नाहीत तर आपण लहान होतो की नव्हतो अशी रास्त शंका येते. थेट शेगडीवरच्या निखाऱ्यांवरच त्या गाखर/पोपई-दामट्या ठेवलेल्या झाऱ्याकडे पाहात,”झाली? झाली? “ विचारत, चांगली भाजल्याची तीन चार गालबोटं लागलेली ती पोपयी झाऱा आपटून ताटलीत पडली की जीव भांड्यात पडायचा.भराभ्भर व्हायच्या की पटापट ताटलीत पडायच्या. तुपाचा ठिपका टाकून फिरवला की ती पोपयी खुसखुशीत लागायची. तूप नसले तरी लोणच्याच्या खाराचे गंधही तिला तितकेच चविष्ट करायचे!


रविवारची दुपारची किंवा एखाद्या रात्रीची आमची जेवणं संपत आलेलीअसतात. आणि एक चमत्कार घडतो. परातीतले,पोळ्यांना लावण्याचे उरलेले पीठ किंवा भाकरीचे पिठ आणि तिथेच थोडीफार राहिलेल्या कणकेची नक्षीही त्यात कधी मिसळली गेली आणि हिंग मीठ कधी पडले हे समजायच्या आत पातळ केलेले ते लच्छीदार पीठ तव्यावर ओतले गेलेही! हे फक्त मोठ्याने चर्रर्र आवाज यायचा तेव्हा समजायचे! मग आता कोण हात धुवायला उठतो हो? आता तो तवा लोखंडी-तवा राहिलेला नसतो तर त्या ओतलेल्या पीठाचे ‘धिरडे’ नावाचे सोने करणारा परिस झाला असतो! हे फक्त त्या आयत्या वेळच्या धिरड्याचा रुपाया येवढा का होईना ज्याने गरम गरम घास खाल्लाय त्यालाच माहित असते.
बरं गव्हाच्या पीठाचे हे प्रकरण इथेच थांबत नाही गव्हाचाच, पिठा ऐवजी रवा मैदा झाला की त्यांचीही किती रूपे चाखायला मिळतात. शिरा,गुळाचा सांजा, रव्याचे लाडू, वड्या,उपमा, उप्पीट हे झाले आपले नेहमीचे. त्यांच्या गोडाच्या आवृत्याही असंख्य! गोड पोळ्यांचेही, पुरणपोळी, गुळाची पोळी, गुळाच्या सांज्याची किंवाशिऱ्याची पोळी,उसाच्या रसाची पोळी! अबब किती ते प्रकार! शंकरपाळ्यांचे प्रकार सांगायचे राहिलेच. गव्हाची खीर(हुग्गी)आणि त्याच कणकेचे लाडू कोण विसरेल?

स्वल्पविरामासारख्या गव्हले/ गव्हल्या,सहाणेवर झर्रकन वळवून केलेल्या प्रश्नचिन्हासारख्या मालत्या,तर दोन डब्यांवर ठेवलेल्या आडव्या काठीवर वाळत घातलेला दीर्घायुषी शेवयांचा संभार,तसेच टिकली येव्हढ्या पोह्यासारख्या नकुल्या,हे कसबी कलाकार सणासुदीच्या पंगतीना रंगत तर आणतातच पण लग्ना-मुंजीत हे रुखवत सजवून ते करणाऱ्यांच्या कौतुकांतही भर घालतात.

एका गव्हाच्या पीठाच्या पदार्थांची ही यादी अर्धवटच आहे. ती पुरी करण्याला किती दिवस जातील हे कुणी सांगू शकत नाही.

हे झाले एका गव्हाचे रामायण. तेही पूर्ण नाहीच. त्या पिठाची मिठाईतील रूपांतरे राहिलीच आहेत अजून. गव्हासारखीच ज्वारी,बाजरी,नाचणी,तांदूळ,भगर राजगिरा अशी किती तरी धान्यं रांगेत वाट पहात उभी आहेत.बरं,हरभऱ्याची डाळ, तुर-मुग,उडीद-मसूर ह्या डाळी व कडधान्ये, शेंगादाणे ही मंडळीही ताटकळत थांबली आहेतच. इतकेच काय पापड,सांडगे,वडे थापड्या,कुरडया आणि काय आणि किती! पण नाइलाज आहे.ही कधीही पूर्ण न होणाऱ्या,अव्याहत ज्ञानकोषासारखी, न संपणारी गोष्ट आहे.पण कुठेतरी ती थांबवली पाहिजे.

अन्नपदार्थ अनंत आहेत.त्याच्या विश्वाचा पसारा त्याहून अमर्याद आहे. एका दाण्यातून जिथे शेकडो दाण्यांनी भरलेली असंख्य कणसे डोलत असतात, तिथे एकातून अनेक हे फक्त ‘एकोSहं बहुस्याम’ अशी इच्छा झालेल्या परब्रम्हालाच लागू नाही; तर आमच्या रोजच्या आयुष्यातील,जेवणातल्या अन्नपदार्थांना ते जास्त लागू आहे. म्हणूनच न दिसणाऱ्या परब्रम्हापेक्षा आम्हाला आमचे रोजचे आयुष्य प्रसन्न आणि रंगीबेरंगी करणारे स्वादिष्ट-चविष्ट, खमंग-चटकदार,गोड,मधुर आणि तृप्त करणारे ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’च पुरे आहे. ते आमचे आहे.