पाण्यावरच्या रेघा

रेडवुड सिटी

आपल्याकडे लग्नाचे काही प्रकार मानलेले आहेत किंवा होते म्हणा. वैदिक किंवा पारंपारिक, गांधर्व विवाह,   राक्षस विवाह इत्यादि. त्याची ढोबळपणे अलीकडची रुपे सांगायची तर आई-वडिलांनी पसंत केलेली, प्रेम विवाह, यातहीकाही उपप्रकार म्हणजे पळून जाऊन केलेले, तर राक्षस विवाह सांगायचे तर सिनेमाकडे गेले पाहिजे. प्राण, प्रेम चोप्रा, जीवन, अजित हे नायिकेला पळवून आणून भटजीला किंवा देवळातल्या पुजाऱ्याला पिस्तुल दाखवून लग्न भरभर लावायला सांगत. सप्तपदी पळत पळत पूर्ण करून लग्ने लावत. त्या लग्नाला राक्षस विवाह म्हणता येतील. लग्ने पैशासाठी होतात, ‘खानदान की इज्जत के लिये’ होतात तर काही चक्क फसवूनही केली जातात.

पण चीनने या सर्वांवर ताण केली आहे! कडी केली आहे!

बेजिंग आणि शांघाय मध्ये इतक्या असंख्य मोटारी झाल्या की रहदारी तुंबायला लागली, भांडणे वाढू लागली.  रहदारी वारंवार ठप्प होऊ लागली. प्रदुषण तर वाढलेच. सरकारने फतवा काढला; मोटर लायसन्स म्हणजे नंबर प्लेट लाॅटरीतूनच मिळतील. वर्षातून तीन चार वेळा लाॅटरी निघते.यंदा जूनच्या लाॅटरीत २८लाख चिन्यांनी नावे नोंदवली होती! त्यापैकी दर ८४३ लोकांमधून  एकाला नंबर प्लेट मिळाली. सरकार चिनी आणि लोकही चिनीच! एक नियम असाही आहे की नवरा बायको आपल्या प्लेटस एकमेकांना देऊ शकतात.  लोकांनी डोके लढवले. सुरुझाली लग्ने! त्यात chat boxes आणि इतर सोशल मिडियांची भर. कोण्या एखाद्या पुरुषाला/बाईला नंबर प्लेट हवी असेल तर दुसऱे नवरे / बायका तयार असतात आपल्या प्लेटस विकायला.

प्लेटींच्या किंमती वाढतावाढता वाढू लागल्या. सध्याचा बाजार भाव १३५०० डाॅलर्स आहे. मोटारींच्या किमतीपेक्षाही जास्त!  त्यातही एकच आकडा तीन वेळा असलेली नंबर प्लेट पाहिजे असेल तर आणखी पैसे मोजायला लागतात. चीनमध्ये ८८८ / 888 ला फार मागणी असते. कारण चिनी भाषेतील “भाग्य” या शब्दाचा उच्चार ८/8 च्या उच्चारासारखा आहे म्हणून! अशा प्लेटची किंमत ९३००० डाॅलर्स आहे.इतके पैसे मोजणारेही आहेत. कारण नविन उदयाला आलेल्या मध्यमवर्गीयांकडे ती ऐपत आहे.

नंबर प्लेटसाठी गरजू तरुण/तरूणी बरोबर लग्न लावायचे. नंबर प्लेट रीतसर नावावर झाली कीपुन्हा घटस्फोट घ्यायचे. आणि पुन्हा पहिल्या नवऱ्याबरोबर किंवा बायकोशी लग्न लावायचे! ह्यासाठी मध्स्थांच्याही जाहिराती असतात.

असाच आणखीही एक सामाजिक प्रकार होत असतो. गेली बरीच दशके लोकसंख्येला आळा घालण्यासाठी चीनच्या सरकारने ‘एकच मुल’ धोरण सक्तीने अंमलातआणले. कोणत्याही सक्तीचा काहीतरी दुष्परिणाम होतोच. स्त्रीगर्भाची भ्रुणहत्या सुरु झाली. मुलांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली. ह्यातून काही गुंतागुंती वाढल्या.

चीनमध्ये असाही नियम आहे की बेजिंग शांधायमध्ये रहिवासी असलेल्यानाच तिथे घर विकत घेता येते.तसेच विवाहिताला घराच्या रोख हप्त्यात मोठी सवलत असते. मुलींची संख्या कमी. मुले जास्त. त्यमुळे घर असलेल्या तरुणाला लग्नाच्या बाजारात मानाने प्रवेशही  मिळतो. अगोदर घर मग बायको मिळण्याची शक्यता जास्त. बघा कसा पेच आहे!  खऱ्या बायकोसाठी घर हवे आणि घरासाठी अाधी खोटी बायको लागणार!

अरे संसार संसार। घर मोटार नंबर। लगीन झालं आता पान्यावरची रेघ!

एका नव्या युगाची सम्राज्ञी

रेडवुड सिटी

१९८४ साली तिच्या पुस्तकाचा विक्रमी खप झाला. तिने आपली स्वत:ची प्रकाशन संस्था सुरु केली. त्यातूनच तिने पुढे आपले साम्राज्यच उभे केले!

प्रेरक विचारांतून प्रेरणा देणारी; माणसाला पुन्हा उभी करणारी,काहींच्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी पुस्तके तिने लिहिली.

तिचे मुख्यआणि आवडते प्रमेय असे की तुमच्या रोग-व्याधींचा संबंध तुमच्या विचारांशी आहे. आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना प्रसंगांमागेही तुमचे विचारचमुख्यत्वे कारणीभूत असतात. वाचकांना तिचे आवर्जून सांगणे असे की सकारात्मक भावाने तुमचे विचार, वाईट किंवा प्रतिकूल घटनाही परतवून लावू शकतात.  तिच्या लिखाणात अध्यात्माचा स्पर्श होता. तिचा विशेष हा की आपण जे सांगतो ते तिने केलेले असे. आचरणात आणलेले असे. “बोले तैसा चाले” अशी उंचीतिने गाठली होती.

“You Can Heal Your Life” , “The Power Is Within You ” , “Meditations to Heal Your Life ”

ही तिची काही गाजलेली पुस्तके. तिने इतर चांगल्या लेखकांची पुस्तकेही प्रसिद्ध केली. चांगल्या लेखक वक्त्यांचा  ताफा तिच्या संस्थेच्या पटावर होता. केवळप्रकाशन करूनच ती थांबली नाही तर आयुष्य घडवणाऱ्या निरनिराळ्या बाबींसाठी ती शिबिरे कार्यशाळा. व्याख्याने आयोजित करत असे. त्याकामी तिला तिच्यासंस्थेशी निगडीत असणारे व इतरही लेखक वक्ते उपयोगी पडत. ह्या विषयांचे online अभ्यासवर्गही चालू केले. मग त्याबरोबर CDs, DVDs सगळेच आले!

एकच एक, एकट्या स्त्रीचे हे कर्तृत्व आहे. त्या कर्तबगार बाईचे नाव ल्युझी हे आणि कोट्यावधी डाॅलर्सची उलाढाल असणाऱी तिची कंपनी, ” हे हाऊस “. मगNew York Times Magazine ने २००८ साली तिच्यावर  ” नव्या युगाची राणी” हा गौरवपर लेख लिहिला यात नवल ते काय !  तिचे कर्तृत्व आजचे नाही. पाचसहा दशकांचे कष्ट त्यापाठीमागे आहेत. १९८०साली आपल्या घरातील एका खोलीत सुरु केलेल्या Hay House चा वेलु गगनावरी गेलाय!

ल्युझी हेच्या आयुष्याचे वर्णन कसे करायचे? बाळपण तिला नव्हतेच असे म्हणावे लागेल. पाच वर्षाची असतानाच ल्युझीवर तिच्या सावत्र बापाने अत्याचार केले. त्यानंतर पुढे शेजाऱ्याने. वयात आली नाही तोच शाळा सोडावी लागली, कारण ती गरोदर झाली. एक मुलगी झाली. हेच तिचे एकटे अपत्य. पण तिने आपलीमुलगी एका दत्तक देणाऱ्या संस्थेला दिली.

अशा स्थितीत शिकागोलाच काही काळ काढल्यावर ती न्युयाॅर्कला आली . तिथे ती fashion model म्हणून काम करू लागली. एकोणीसशे पन्न्शीच्या मध्यासब्रिटिश व्यावसायिक ॲंड्र्यू हेशी तिचे लग्न झाले. चौदा वर्षाचा संसार झाल्यावर घटस्फोट झाला.

पुन्हा हलाखीचे दिवसआले. निराश अवस्थेत असताना एके दिवशी ती मॅनहॅटन मधील एका चर्चमध्ये गेली. तिथल्या प्रवचनातले एक वाक्य काही तिला पटेना; प्रवचनकार सांगत होता, ” तुम्ही तुमचे विचार बदललेत तर तुमचे आयुष्यही बदलेल.” ” खरं?” ती स्वत:लाच विचारत राहिली. काही काळानंतर ती कॅलिफोर्नियातआली.

तिने त्या तत्वज्ञानाचा अभ्यास सुरु केला. प्रमेयांवरची गणिते स्वत: सोडवली म्हणजे त्याप्रमाणे वागू लागली. तिचे आचरण तसेच होऊ लागले. पण तिच्याकसोटीचा खरा काळ १९७७ साली आला. तिला कॅन्सर झाला ! ती विचार करू लागली. हळू हळू तिच्या लक्षात आले की आपल्याला जो कॅन्सर झाला त्याचेमूळ पूर्वी झालेल्या अत्याचाराची चीड,घृणा जी अजूनही आपल्या मनात आहे. त्यात आहे. खोलवर दडलेला असेल पण तो नकळत वर येत असतो.

तिने पहिल्या प्रथम निश्चय केला. कॅन्सरवर उपचार करायचे नाहीत. चांगला आहार घ्यायला सुरवात केली. उदार क्षमाशील वृत्तीने ती वागू लागली. हे मनापासूनकरू लागली. आयुष्यात ज्यांच्यामुळे जे काही भोगावे लागले असेल-नसेल त्यांना ती पूर्णपणे विसरून गेली. सर्व काही मनातून काढून टाकले. चांगला परिणाम, बदलहेी होऊ लागला. हे चालू असताना तिने एक छोटेखानी पुस्तक लिहिले- “Heal Your Body “.  ह्याचाच पुढे विस्तार करत आपल्या स्वानुभवातूनजाणवलेल्या विचारांवर आधारित “You Can Heal Your Life” हे पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकाच्या ५० लाख प्रति खपल्या आहेत!

त्यानंतर एडसची लागण झाली. त्या लोकांसाठीही तिने काम केले. त्या बैठकांची सुरवातही पहिल्यांदा तिच्या घरातच झाली. पण नंतर मोठी सभागृहे घ्यावीलागली. ती म्हणते तिथे जास्त करून धीटपणे आयाच पुढे येत. एकही एडसग्रस्त बाप उभा राहात नसे, मग मंचावर येणे दूरच!

तिची एक दोन उत्कृष्ट वचने पाहूयात. “Every thought we think is creating our future. My happy thoughts create my healthy body.”

” Only good can come to me .”

I always work with and for wonderful people. I love my job.”

वरील वाक्य वाचल्यावर मी पूर्वी वाचलेले, एका काळ्या गृहस्थाने-बहुधा तो गायक असावा- म्हटलेले वाक्य आठवले. तो म्हणतो,” मला आजपर्यंत एकही वाईटमाणूस भेटला नाही.”

तिचे टीकाकार  म्हणतात की तिच्या सांगण्यातला अतिशय सोपेपणा आणि साधेपणा हा चांगला भाग असेल पण लोकांच्या हातात नसलेल्या अनेक गोष्टीआहेत. त्यावर त्यांचे नियंत्रण नसते. अशा वेळी ते स्वत:लाच जबाबदार धरतील. आपल्या विचारांमुळेच असे झाले मानू लागतील. रोगांवर औषधोपचारही घेणारनाहीत. त्यांच्या म्हणण्यात व्यावहारिक सत्य आहे. अशाच तऱ्हेचा प्रश्न ल्युझी हे ला Time मासिकाने मुलाखतीत विचारला होता.

” तुमच्या म्हणण्याप्रमाणे लोकांचे विचारच त्यांच्या स्थितीला कारणीभूत असतात; तर दुसऱ्या महायुद्धात जो वांशिक संहार झाला त्यात ते लोकच त्यांच्यामृत्युला जबाबदार होते असे म्हणायचे का?”

त्यावर ती म्हणाली,” मी त्यांना तसे म्हणणार नाही. लोकांना तुम्ही वाईट आहात असे मी सांगत नाही. त्यावर माझा कधीच भर नसतो. तो माझा कधी उद्देशहीनसतो.”

हे हाऊस संस्थेचा एक लेखक आणि ल्युझी हेच्या काही पुस्तकांचा सह लेखक डेव्हिड केसलरने ” You can Heal Your Heart ” च्या प्रस्तावनेत, आठ वर्षांपूर्वील्युझीशी झालेला संवाद लिहिला आहे. ल्युझी हे म्हणते, ” मी विचार करत होते. आणि  ठरवलंय की माझ्या अखेरच्या क्षणी तू तिथे असावेस.”

” काही होतंय का? बरं आहे ना? ” केसलरने विचारले.  ” नाही, तसं काही नाही. मी ८० वर्षाची आहे. चांगली ठणठणीत आहे. समाधानात, आनंदाने जगते आहे. माझं मरणही तितक्याच आनंदाने जगत व्हावे असं वाटतं . जगणे जसे परिपूर्ण तसं मरणही जगावं असं वाटतं.” ल्युझी हे ने सांगितले.

ही कर्तबगार, जे आपण केले तेच दुसऱ्यांना सांगणारी आणि जे इतरांना सांगितले तेच करणारी ल्युझी हे, सॅन डियॅगो येथे वयाच्या ९०व्या वर्षी नुकतीच परवासमाधानाने सर्वांचा निरोप घेऊन गेली.

माणसांच्या गोष्टी – प्रास्तविक

रेडवुड सिटी

चार चौघांसारखीच ही माणसे आहेत. त्यांच्या गोष्टीही तशाच असणार. ह्या गोष्टी वाचल्यावर, माणसाचे विचार, अनुभव, घटना, मते, मुलाबाळांचे हित, समाजाची प्रकृती-विकृती सगळीकडे सारखी आहे असे वाटते. साध्या माणसांच्या या साध्या गोष्टीत ‘आशय मोठा कितीआढळे’ असे वाटते की, ह्या अगदी साध्या सरधोपट आहेत अशा निष्कर्षाकडे आपण येतो हे प्रत्येक वाचकाच्या मतानुसारच असणार हे तर स्पष्ट आहे. अनेक कथा कविता लेख पुस्तके यानांही हा नियम लागू असतो.

ब्रॅंडन स्टॅटनला ही माणसे न्यूयाॅर्कमध्ये भेटली म्हणण्यापेक्षा त्याला ती सहज तिथे दिसली. तो त्यांच्याशी बोलला. त्याने त्यांना कॅमेऱ्यावर टिपूनही ठेवले. त्याचे त्याने त्या फोटोंसह पुस्तक केले. पुस्तकात त्याने विचारलेले एक दोन प्रश्न असतील. काही फोटोंची तळटीप, शीर्षकीय वाक्य त्याचे असेल. बाकी सर्व ह्या माणसांचे.

ही सर्व मते, विचार, अनुभव यांना कथा म्हणता येतील का हीसुद्धा एक शंका आहेच. पण पुस्तक कर्त्याने यांना कथा म्हटल्यामुळे मीही गोष्टी म्हटले.  ंछायाचित्रवृत्तकथांमध्ये हा प्रकार येईल असे मला वाटते.

शब्दार्थानेही ह्या खऱ्या लघुकथा आहेत. काही तर अति लघुकथा आहेत.

ब्रॅंडन स्टॅंटन हा जाॅर्जिया विद्यापीठाचा (UGA) पदवीधर आहे. मॅरिएटामध्ये याचा जन्म झाला आहे. त्याचा एक photo journalistic blogआहे. त्याचे १७ लाख ८००००followersआहेत! प्रख्यात Time मासिकाच्या 30 under 30 अशा व्यक्ति ज्यांच्यामुळे जगात बदल होईल त्यांत त्याची निवड झाली आहे. त्याचे Humans of NewYork  हे पुस्तक तडाखेबंद विक्रीच्या १० पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे. त्याच पुस्तकासंबंधी मी लिहितो आहे.

ब्रॅंडन स्टॅटन हा आपल्या मॅरिएटाचा आहे  म्हटल्यावर मला जास्त जवळचा वाटला. लायब्ररीत पुस्तक दिसले. त्यातून हे सर्व लेखन घडले.

ही माझी प्रस्तावना झाली.  १३ आॅक्टोबर २०१६ साली मी लिहिलेल्या, साध्या माणसांच्या या काही साध्या गोष्टी आपण आता, वाचू या.

माणसांच्या गोष्टी – १

माणसांच्या गोष्टी – २

माणसांच्या गोष्टी -३

दे दान सुटे गिरान!

Redwood City, CA

चार पाच दिवसापासून मी ग्रहणाच्या वातावरणात आहे. सुरवात टेड-टाॅक्सवर डेव्हिड बेराॅननेसांगितलेला, खग्रास ग्रहणा संबंधातील त्याचा अद्वितीय अनुभव ऐकत होतो. त्याने अखेरीस सगळ्यांनाच कळकळीने सांगितले की खग्रास ग्रहण पाहण्याची संधी चुकवू नका. आयुष्यात एकदा तरी पाहाच.

योगोयोग असा की ह्या २१ तारखेलाच इथे सूर्याचे खग्रास ग्रहण मोठ्या टापूच्या प्रदेशात दिसणार वअसल्याचे
जाहीर झाले होते.  पण येथील  बे-एरियात मात्र खग्रास दिसणार नाही हे आधीच जाहीर झाले होते.तरीही लहान थोर, सर्व लोकांमध्ये उत्साह संचारला होता. ग्रहण पाहण्याचे चष्मेही कधी संपले ते अनेकांना कळले नाही. तरीही आम्ही डगमगलो नाही. पाहायचे. म्हणजे पाहायचे.संन्याशाच्या लग्नाची शेंडीपासून तयारी सुरु झाली. अर्थात काचा काळ्या करण्यापासून! नेहमीप्रमाणे मी एक काच चांगली पाहून धुरकट करताना फोडली! असो. काचा काळ्या झाल्या.

मी,सोनिया, अनुजा आणि तेजश्रीने घरातून,  त्यांच्या खोलीतून, मागच्या अंगणातून, ग्रहण पाहिले. पूर्वी बनवत होतो तसेच घरी धुराने काळ्या केलेल्या काचांतून ग्रहण पाहिले.

खंडग्रासच दिसणार होते. माझ्या ढोबळ गणिती दृष्टीतून चांगले ७५/. टक्के होते!  छान स्पष्ट दिसले.

मी घरातून, बाहेर जाऊनही पाहिले. बाहेर थांबलोही. एकही पक्षी दिसत नव्हता. ग्रहणाच्या काळात आणि नंतरही काही क्षण, एकही म्हणजे एकही पान हलत नव्हते. संध्याकाळचा भास होता. पण अंधारून आलेले वाटत नव्हते. पण जेव्हढे काही किंचित ऊन पडले होते, तेही अगदी मलूल होऊन पडले होते! सगळा भाग पिवळसर काळसर गाॅगलमधून दिसावा तसा दिसत होता. मी डोळे चोळून पुन्हा पुन्हा पाहिले तरी तसेच दिसत होते.

लहानपणी सोलापूरला काहीग्रहणे, अशा काचेतून पाहिली. औरंगाबादलाही ग्रहण पाहिले. ग्रहण दिसले दिसले असे फक्त म्हणत होतो, इतकेच. बरेच वेळा तर दिसणार नाही हे माहितही असायचे. पण त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे ग्रहणाच्या आधी, पर्वकाळात,काहीही करायचे नाही हा नियम सगळे पाळत. जुन्या पठडींच्या घरात मोठी माणसे जप वगैरे करत.आमच्याघरी तो प्रकार फारसा नव्हता. ग्रहणाच्याआधी आणि ग्रहण सुटल्यानंतर आंघोळी करीत. आम्ही मुले मात्र ग्रहण सुटल्यावरच  करत असू. काय ती गडबड ! ग्रहण काळातले घरातील सर्व म्हणजे सर्व पाणी ओतून द्यायचे! ‘मुन्शिपालटी’ लगेच ताजे पाणी सोडायची! आम्हाला आश्चर्य वाटायचे. येव्हढा अवाढव्य हिप्परग्याचा सर्व तलाव ह्यांनी कधी रिकामा केला ? त्याहीपेक्षा तो प्रचंड तलाव लगेच कोणत्या ताज्या पाण्यांनी भरलाही! अजूनही हे कोडे सुटत नाही.

पाणी ओतून देण्याची जेव्हढी गडबड त्यापेक्षा आंघोळी आटपून ताजे पाणी भरण्याची त्याहून मोठी धडपड!
ग्रहण सुटल्याबरोबर “द्यें दाSSन य्यैं सुट्ये/सुट्ट्यैं गिराSSsन ” अशा निरनिराळ्या आवाजातील आणि निरनिराळ्या घराण्याच्या सुरातील आवाजांचा एकच गदारोळ सुरू व्हायचा! ती गरीब माणसे एकामागून एक अशी घरोघरी यायची. त्यांना कपडे, जुने पत्र्याचे डबे,लोखंडी खिळे,मोडलेले लोखंडी चिमटे, कुठे हिरवी काळी पडलेली, चेपलेली तांब्याच्या लहान सहान वस्तु , धान्य, पैसे देण्याची सगळ्या गल्लीत लगबग सुरू व्हायची.पण जास्त करून कपडे, धान्य पैसे दिले जायचे. पण हे सर्व घेत असतानाही त्यांचे य्यैं द्यैं दाSSन चालूच असायचे. पण खूष व्हायची मंडळी!

हे होईतो चहाचे आधणही शेगड्या स्टोव्ह वर ठेवायची प्रत्येक घरांत धांदल उडायची! ती एक आवडती गडबड असे सगळ्या घरांत.

शाळा आहे की नाही हे आम्ही पोरंच नव्हे तर घरांतले आई-वडीलही विसरले असायचे! ती सगळ्यात मोठी मजा असायची आम्हाला ग्रहणाची! त्यातही ‘दिसणारे’ ग्रहण असले तर जास्तच विसरणे व्हायचे!
मोठे झालो आणि आमच्या ह्या आनंदाला मात्र ग्रहण लागले! खग्रास!

आजचे ग्रहण पाहिले. फार समाधान वाटले. ७५/. टक्के म्हणजे जवळ जवळ खग्रासच पाहिले !

पण लहानपणच्या ग्रहणाची गोष्टच निराळी. ग्रहणाला महत्व कमी.न कळत शाळेला सुट्टी मिळायची हा ग्रहणाचा महत्वाचा भाग होता आमच्या साठी!

ते लागण्यापूर्वीची आदल्या दिवसापासूनची ‘हे नाही ते नाही करायचे’ ची यादी गेली ते बरे झाले. ग्रहण म्हणजे काजळीने रंगवलेल्या काचा हीच खरी ओळख-ती गंमतही नाही; घराघरातील सगळ्यांची आपणही ‘सुटल्याच्या’समाधानाची ती धांदल,गडबड,नाही. ते हंडे, पातेली,बादल्यांचे आवाजही गेले. त्यातच लगोलग देS दाSन सुटे गिराSSन  असे मोठमोठ्याने ओरडत गल्ली बोळातून हातातील कपडे, कापडाची चिरगुटी सावरत, खाकेतली गाठोडी संभाळत जोरात धावत सुटणारी माणसे गेली;  त्या खणखणीत आरोळ्या ऐकल्या की का कुणास ठाऊक पण कुठून तरी, “गोंद्या आलाSरेSs”या गणेश खिंडीतल्या क्रांतिकारी आरोळीची आठवण क्षणापुरती तरी जागी व्हायची. ग्रहण म्हटले की त्याचा हा सगळा धमामाच डोळ्यासमोर येतो. ऐकूही येतो!

अशी सफर पुन्हा न होणे कधीही…

रेडवुड सिटी

अशी सफर पुन्हा न होणे कधीही….

आताच मी Ted Talkवर David Baronने खग्रास ग्रहणाचा त्याचा एक अलौकिक – त्याने हाच out of this world हा शब्दप्रयोग केला – अनुभव सांगितला, तोऐकत होतो. चंद्र, सूर्याला काही क्षणात पूर्णपणे झाकणार त्या आधीच्या थोड्याच क्षणांत वातावरण कसे एकदम बदलते, सावल्याही वेगळ्या विचित्र दिसूलागतात, क्षणात अंधारुन दिवसाची रात्र कशी होते ते सांगत असताना, त्याच्यासारखाच विज्ञान वार्ताहर असलेल्या David (अरेच्या! दोघांच्या नावातही साम्य! ) Perlman ने १९६० साली सूर्य ग्रहणाच्या वृत्तांतकथेत व आताच त्याने लिहलेल्या परवाच्या लेखातील काही ओळी डोळ्यांसमोर आल्या.

David Perlman काय म्हणतो त्या अगोदर तो कोण, काय करतो,  कुठे असतो हे सांगायला हवे. डेव्ह (David Perlman)हा नुकताच ११आॅगस्टलाSanFrancisco Chronicleमधून निवृत्त झाला. तिथे तो विज्ञान-विभागाचा संपादक होता. पण तो स्वत:लाआजही साधा विज्ञान-वार्ताहरच म्हणवून घेतो!

तसे पाहिले तर अनेक लहान मोठ्या,  नामांकित, जागतिक दर्जाच्या ते महानगरीतल्या, मोठ्या शहरातल्या वर्तमानपत्रांत निरनिराळ्या विभागाचे, जसे, वृत्तसंपादक, रविवार आवृत्तीचे, तसेच उपसंपादकही असतात.मग डेव्हिड पर्लमनचे असे वैशिष्ठ्य काय?….

….डेव्ह हा तिथे सुमारे  ८० वर्षे काम करतोय! काॅपी-बाॅय ह्या सर्वात खालच्या जागेपासून त्याची कारकीर्द सुरू झाली ! आणि त्या नंतर मात्र आपल्या अंगच्यागुणांवर चढत चढत संपादक या मानाच्या पदावरून निवृत्त होत आहे. वयाच्या ९८व्या वर्षी! आज अमेरिकेतील तो एकमेव, सर्वात ज्येष्ठ, पूर्णवेळ काम करणारा, पत्रकार आहे. अमेरिकेतील या ज्येष्ठ पत्रकाराला निरोप देण्यासाठी त्याचे सध्याचे सहकारी आणि त्याच्याबरोबर पूर्वी काम केलेले अनेकजण, कंपनीचे सर्ववरिष्ठ जमले होतेच पण सॅनफ्रॅन्सिस्कोचे महापौर, खासदार, आमदार,प्रतिष्ठित सगळे हजर होते.

या निरोप समारंभात महापौरांनी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये अाजचा दिवस हा David Perlman Day  म्हणून ओळखला जाईल असे जाहीर करून पर्लमनचा मोठाचगौरव केला! ते पुढे म्हणाले,” ह्या शहरात पहिल्या महायु्द्धानंतर होत असलेल्या प्रत्येक घडामोडीचे, शहराच्या अंतर्बाह्य होणाऱ्या सर्व स्थित्यंतराचे साक्षीदारअसलेले पर्लमन आपल्या बरोबरीने आपल्या शहरात आहेत हीच एक आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे!” बोलण्याच्या ओघात ते पुढे म्हणाले, “इतक्या वर्षांच्यावृत्तपत्रीय अनुभवाने पर्लमन यांना कोणती बातमी बनावट, खोटी आहे ते सहज ओळखता येते.” ह्यावर हजरजबाबी पर्लमन ताबडतोब म्हणाला, ” येवढेच नाही, मीतशी बातमी लिहूही शकतो!” लोक जोरात हसले हे सांगायला नको.  त्याच्या सहकाऱ्यांनी लिहिलेल्या गाण्यावर ९८वर्षाचा हा उत्साही, भीष्माचार्य पत्रकारथोडावेळ नाचलाही!

पर्लमनने, माणूस चंद्रावर उतरला, तो चालला तेही पाहिले, त्यांचे वृत्तांत लिहिले. त्यामागच्या विज्ञानावर लिहिले; अंतराळवीरांच्या मुलाखती घेतल्या; लहान-मोठी, खंड, खग्रास ग्रहणांविषयी लिहिले, ती पाहिली, पाहात असतानाचे अनुभव लिहिलेच, त्यांचा इतिहास आणि शास्त्रही लिहिले. किती तरी अशी चंद्र-सूर्यग्रहणे पाहिली. भुकंपाचे धक्के सोसले, त्यानंतर काय घडले त्याचीही कथा लिहिली. पुढे काय काळजी  घ्यावी त्याचेही शास्त्रीय विवेचन लिहिले. डायनोसारआणि  त्यांच्या अंड्यासाठी, सांगाड्यांसाठी प्रदेश पालथे घालणाऱ्या संशोधकांना त्यांच्या कामाच्याठिकाणी युटाहला जाऊन मुलाखती घेतल्या. उत्क्रांतीचेसंशोधन चालूच आहे. Galápagos Islands इथे जाऊन त्या संशोधकांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. अगदी परवाच्या खग्रास सूर्य ग्रहणाविषयीलिहिलेला त्याचा अखेरचा लेखही छापून आला आहे.

” खग्रास ग्रहण दिसणाऱ्या सगळ्या टापूत संशोधक त्या अतिदुर्लभ अशा २-३ मिनिटाच्या काळात घडणार असलेल्या स्थित्यंतरातून, निसर्गाच्या अत्यंत वेगळ्यादर्शनातून, किती वैज्ञानिक माहिती गोळा करता येईल ह्याच ध्यासात असतात.” हे १९६५ साली त्याने लिहिले होते. “दिवस मध्यरात्रीत बदलून जाईल… दिवसाचीरात्र कधी होईल ते कळणारही नाही. उन्हाळ्यातील झळा  क्षणभरात थंडीचा गार बोचरा वारा होऊन वाहू लागेल… अचानकझालेल्या अंधाऱ्या रात्रीमुळे पक्षीबावचळून विचित्र कलकल करू लागतीलआणि आकाशात तारे प्रकट झालेले दिसतील! ” … हे त्याने २१ तारखेला होणाऱ्या सूर्य ग्रहणाविषयी लिहिलेल्यापरवाच्या लेखात म्हटले आहे

Ted-Talk वरील David Baron संबंधी वर लिहिताना मी ह्याच ओळीं आठवल्या म्हणालो होतो .

इतकी वर्षे एका ठिकाणी काम केले त्याविषयी डेव्ह पर्लमन म्हणाला, ” काय सांगावे? काय सांगणार! तुमच्या आणि माझ्या, लहान सहान सहली बऱ्याच झाल्याअसतील. पण अशी७८-८० वर्षांच्या सफरीसारखी दुसरी सफर होणार नाही! ”

कंपनीने पर्लमनला आणि सगळ्यांना खूष करणारी खबर देऊन आपल्या मनाचा मोठेपणाही दाखवला. डेव्ह पर्लमन आपल्या वर्तमानपत्राचा पहिलाच, सन्माननीय(Emeritus) विज्ञानाचा संपादक राहील असे जाहीर केले. तो आता केव्हाही येऊन एखादा वृत्तांत, वृत्तकथा किंवा पुस्तकही लिहू शकतो. त्याची खुर्ची आणि टेबलत्याच्यासाठी असेच राहिल. हे ऐकल्यावर ९८ वर्षाचा पर्लमन पटकन म्हणाला  “एक वृत्तकथा माझ्या खिशात आता तयारही आहे!”

 

‘रुचिरा’ आणि ज्युडिथ जोन्स

‘रुचिरा’ पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून अनेक घरातील स्वयंपाक जास्त चांगले होऊ लागले. निदान नवविवाहितांच्या घरात तरी. तसेच दुपारच्या खाण्याच्या वेळी नवनविन पदार्थ होऊ लागले. हे तिशी-पस्तीशीच्या गृहिणींच्या घरीही घडू लागले. दिवाळीत आपल्या घरातले फराळाचे पदार्थही पुरुषमंडळी कसलाही विनोद न करता खाऊ लागले. चकल्या कुरकुरीत होऊ लागल्या, अनारशांची दामटी न होता तेही खुसखुशीत झाले. कोणताही लाडू फोडायला हातोडी किंवा बत्त्याची गरज पडेनाशी झालीं.

‘रुचिरा’मुळे घरातली वाटी हे ‘प्रमाण’ झाले. किती घेऊ या प्रश्नाला, ” घ्या मुठभर किंवा थोडे कमी” किंवा,”अहो थोडीशी चिमूटभर” याऐवजी ” २वाट्या कणिक आणि एक वाटी डाळीचे पीठ असे प्रमाणबद्ध उत्तर मिळू लागले. रुचिराचा खपही प्रचंड होऊ लागला. त्यामुळे अशा प्रकारची अनेक पुस्तके बाजारात आली. आजही येतच आहेत. अशा पुस्तकांची प्रचंड बाजारपेठ आहे. ती ओळखण्याचे श्रेय रुचिराचे पहिले प्रकाशक किर्लोस्करांना जाते!


रुचिराची अशी अचानक आठवण कशी झाली? ज्युडिथ जोन्स या पुस्तकांच्या संपादिकेवरून ही आठवण झाली. जुडिथ जोन्स ही प्रख्यात संपादक होती. होती असेच म्हटले पाहिजे. परवाच तिचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले.

प्रख्यात प्रकाशक Alfred Knopf या प्रकाशन संथेत थोडी थोडकी नाही चांगली ५० वर्षे संपादक म्हणून काम करून ती निवृत्त झाली. सुरवातीला ती Dobuldayह्या तितक्याच तोलामोलाच्या प्रकाशनात काम करत होती. तिच्या कारकिर्दीतील पहिला मानाचा तुरा म्हणजे The Diary of Anne Frank चे प्रकाशन. अनेक नाकारल्या गेलेल्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात पडलेले हे पुस्तक तिने वाचले;आणि आपल्या कंपनीला ते प्रसिद्ध करण्यास भाग पाडले. पुढचा इतिहास आणि ह्या पुस्तकांच्या आवृत्त्त्या निघाल्या, निघताहेत हे सर्वांना माहित आहे . ज्युडिथ जोन्समुळे हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळाले!


पुस्तकांचे संपादक म्हणजे पडद्यामागील कलाकार. सिनेमातील नट नटी माहित असतात. फार तर दिग्दर्शक. पण तेही बिमल राॅय. व्ही शांताराम, राज कपूर, हृषिकेश मुखर्जी, भालजी पेंढारकर, अनंत माने,राजा परांजपे असे नामवंत माहित असतात. पण सिनेमाचे संपादक/ संकलक? फारसे माहित नसतात.


व्ही. एन. मयेकर, वामन भोसले, अरविंद कोकाटे, माधव शिंदे महेश मांजरेकर आणि वर उल्लेख केलेले सर्व दिग्दर्शक हे नामवंत Editor आहेत. तसेच काही मासिके वर्तमानपत्रांचे संपादक. केवळ त्यांच्या नावांनी मासिके आणि वर्तमानपत्रे चालत! अशी यादी लांबत जाईल. ह्यांच्यावर स्वतंत्र लेख लिहिण्याच्या ते योग्यतेचे होते व तसे काही आजही आहेत. मराठी पु्स्तक प्रकाशकांकडे संपादक असतात की नाही मला कल्पना नाही. पण इंग्रजी व इतर पाश्चात्य देशात प्रकाशन संस्थांत संपादक असतातच. प्रख्यात लेखक प्रस्तावनेत आपल्या संपादकांचा मोठ्या गौरवाने उल्लेख करतात.


ज्युडिथ जोन्सने अनेक नामवंत लेखकांबरोबर सातत्याने काम केले आहे. John Updike, Anne Taylor ही त्यापैकी काही नावे.


बरं मग ह्यात ‘रुचिरा’ कुठे बसते? ज्युडिथ जोन्समुळे. कोण कुठली, कुणाला माहित नसलेल्या Julia Child चे पाककलेवरचे पुस्तक प्रसिद्ध झाले ते Judith Jonesमुळे! प्रचंड खप झाला. आणि ती प्रसिद्धिच्या झोतात आली! त्यानंतर अनेकांची अशी पुस्तके आली. प्रख्यात Chef बल्लवाचार्यही लिहू लागले. TV वर खाद्यपदार्थ आणि त्तत्सम गोष्टींचे कार्यक्रमच नाही तर स्वतंत्र वाहिन्या सुरु झाल्या! प्रचंड आर्थिक उलाढाल या क्षेत्रात होऊ लागली. ह्याला अप्रत्यक्षरीत्या ज्युडिथ जोन्स ही कारणीभूत झाली असे म्हणावे लागेल. ती स्वत: पाककलेत प्रविण होती.तिनेही अशी काही प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत.


६०च्या दशकात ज्युलिया चाईल्ड आणि ज्युडिथ जोन्स यांच्यावर सिनेमा निघाला. ज्युलियाच्या पुस्तकाचा खप पुन्हा वाढला. लोकांना ज्युडिथही माहित झाली.

संपादकाला साहित्यिक अभिरुचि, चोखंदळ दृष्टी आणि उत्तम काय आहे हे ओळखण्याची नजर हवी. थोडक्यात तो रत्नपारखी हवा. ज्युडिथ तशी होती.

असे म्हणतात की अध्यात्मात खरा गुरु भेटणे अवघड आहे. तसेच मी म्हणेन की लेखकाला रत्नपारखी संपादक- प्रकाशक मिळणेही तितकेच अवघड आहे.

माझेच उदाहरण बघा ना!

पाणी

आम्ही बसमधून उतरलो. स्टॅंडमध्ये बाजूला जाऊन बसलो. त्या दोघी आणि थोडे अंतर ठेवून तेही बसले. तिघेही गप्पच होते तसे. त्या एकमेकींशी मधून बोलत असाव्यात. हळू आवाजात. मीच म्हणाले, ” मी आपली परतीची तिकीटे काढून येते.” कोणी काही म्हणाले नाही. 

तिकीट घेऊन आले; आणि त्यांना म्हणाले, “दुपारी ४ची काढली बरं का? आज दुपारी निघायचंयआपल्याला.” “काय? आज दुपारीच? लगेच? मग आलो तरी कशाला इथं आपण ? “  ” पण निघतानाच हे ठरलं होतं आपलं.” मी म्हणाले. ” मला कुणी विचारलं नाही, की सांगितलंही नाही!” ते रागानेच म्हणाले. “ह्या दोघींनी मला सांगितलं तसं मी केलं. मला वाटले तुम्हाला माहित आहे सगळे.” ” अगं, त्या बोलतात का माझ्याशी कधी? तुला माहितेय हे सगळं.”ते चिडूनच बोलत होते. आणि रागारागाने दूर जाऊन बसले. हे असे बऱ्याच वेळा होते. घरातही रागवारागवी झाली की ते कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसतात. मी म्हणाले,” मी आले तिकीटं परत करून. उद्या सकाळी काय ते ठरवू.” म्हणत मी निघाले. त्या दोघी काहीही बोलल्या नाहीत. मी परत आले. त्या दोघींजवळ बसत म्हणाले,” तुम्ही त्यांना काहीही सांगितले नाहीत, बोलला नाहीत? आताही काही म्हणाला नाहीत दोघीजणी तुम्ही!” ” अगं, काय बोलायचं त्याच्याशी? आणि का बोलायचं? तुला माहित नाही तो आमच्याशी कसा वागत होता ते.”  ” मी कधी तुम्हाला विचारले नाही म्हणा. पण तुम्हीही मला  आपणहून कधी काही सांगितलं नाही.  बरं जाऊ दे ते. चला निघूया.” असे म्हणत, मी त्यांच्याकडे गेले.  बसता बसताम्हणाले, आता घरी जायचे, चला, म्हणत मी उठले. “जायचं ठरले वाटते” असे पुटपुटत तेही उठले. आम्ही

घरी आलो. संध्याकळी मी मैत्रीणींकडे गेले. रात्री आले. दोघींशी आणि मग त्यांच्याशीही बोलत बसले.

दोन तीन दिवस मैत्रिणींबरोबर मजेत गेले.सिनेमा,पार्कमध्ये, भेळ भत्ता, हाॅटेलात जाणे, सगळ्यात मजा येत होती. पण गप्पांइतकी चव कशात नव्हती. आमच्या घरीही मैत्रिणी यायच्या. दोघींशीआणि त्यांच्याशीही त्या बोलत बसत. ते तिघेही हसत, मैत्रिणींची माझी गंमत करत बोलायचे. दोन तीन दिवस छान गेले. मग तेच म्हणाले आता आपण निघूया. त्या दोघींचीही तीच इच्छा दिसली. मी म्हणाले, “माझे उद्या थोडं काम आहे. ते झालं की दुपारी निघूयात.” 

परत आम्ही इकडे आलो. इकडे आल्यावर इथले झालो. दुपारी बोलत बसलो होतो. त्या दोघी त्यांच्या जागी. ते त्यांच्या सोफ्याच्या खुर्चीत. मी माझ्या ठरलेल्या खिडकीपाशी.काही वेळ त्या दोघींच्या जवळ तर थोडा वेळ त्यांच्या बाजूला. मध्येच माझे चहा पाणी आणणे चालू होते . बोलता बोलता त्या दोघी म्हणाल्या,”दोन दिवस किती छान गेले तिकडे.” तेही पुस्तकातून वर पाहात म्हणत होते, “मलाही फार बरे वाटत होते तिथे. असे नेहमीच होते.” मी म्हणाले, “अहो तुम्ही तिघेही तर निघायचे म्हणलात की.” त्या म्हणाल्या, “अगं,तिकडे गेल्यावर इकडची आठवण येते,” त्या आणखी काही म्हणायच्या आत ते हळू आवाजात म्हणाले, “इथे आलो की तिथल्या घराची आठवण येते.” मीही थोडे थांबत थांबत म्हणत होते, “मलाही त्या घराची फाSर आठवण येते.” दोघी म्हणत होत्या,”अगं,आमचं सगळं आयुष्य त्या गावात, घरात गेले.” तेही तेच सांगत होते. तिघांचे आवाज बदलले होते. मी सांगू लागले,” अहो, मीही तिकडे येत असे. आम्ही सगळे येत असू सुट्टया लागल्या की दरवर्षी! “  ‘सगळे’ शब्द एकदम बाहेर पडत नव्हता. माझ्या एकेका हुंदक्यातून एकेक अक्षर कसे तरी येत होते. पुन्हा ‘आम्ही सगळे’म्हणू लागल्यावर मात्र माझा बांध फुटला!  डोळ्यांतले पाणी वाढू लागले. पाण्याच्या डोळ्यांनीच पाहू लागले, तिघांचेही डोळे पाण्यांनी वाहात होते. 

इतके दिवस त्या पाण्यानेच आम्हाला जवळ आणले होते! 

पंडितराज जगन्नाथ

मॅरिएटा

संस्कृत वाड.मयात, कालिदास आपल्या ‘शाकुंतल’  व ‘मेघदूत’ या काव्याने, भवभुति ‘उत्तररामचरित’या नाटकामुळे लोकप्रिय आहेत. राजा शूद्रक त्याच्या ‘मृच्छकटिक’नाटकाने सर्वमान्य झाला. जगन्नाथ पंडिताच्या वाट्याला त्यांच्या इतकी लोकप्रियता आली नसेल; पण अनेक विद्वानांच्या मते तो संस्कृत कवींचा मुकुटमणि आहे.

एका नावासारखी अनेक नावे असतात. हेच पाहा ना , जगन्नाथ पंडिताच्या काळाच्या सुमारासच दहा-बारा जगन्नाथ पंडित होऊन गेले. त्यातील एखाद दोन कविही होते.एका जगन्नाथाने महाभारतातील राजकारणावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. एक जगन्नाथ पंडित तर राजा होता. पण आपण आज ज्याची गोष्ट ऐकणार आहोत ती ‘गंगालहरी’ या अप्रतिम काव्याचा कर्ता पंडितराज जगन्नाथ याची.

इ.स १५५० साली आंध्र प्रदेशातील वेंगिनाड गावात जगन्नाथ पंडिताचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव पेरमभट्ट आणि आईचे नाव लक्ष्मी होते. जगन्नाथ पंडिताचेवडील पेरमभट्ट मोठे विद्वान होते. आपल्या वडिलांपाशीच जगन्नाथ पंडिताचे शिक्षण झाले. अत्यंत बुद्धिमान असलेला जगन्नाथ पंडित सर्व शास्त्रात पारंगत झाला. खऱ्याअर्थाने पंडित झाला. त्याला आपल्या वडिलांचा खूप अभिमान होता तितकाच त्यांच्याविषयी आदरही होता.’ रसगंगाधर ‘ या वाड.मयशास्त्रावरील प्रख्यात ग्रंथाच्याप्रस्तावनेतील एका श्लोकात त्याने आपल्या वडिलांना महागुरू म्हटले आहे.

जगन्नाथ पंडिताचे लग्न झाले. त्याच्या बायकोचे नाव भामिनी. ही भामिनी रसिक होती. मोठी विदुषीही होती. लग्नानंतरचा थोडा काळ काव्यशास्त्रविनोदात मोठ्याआनंदात गेला. थोडा काळ म्हणण्याचे कारण असे की भामिनी लवकर वारली. जगन्नाथ पंडिताने भामिनीविलास हे काव्य तिच्या स्मरणार्थ लिहिले आहे.

जगन्नाथ पंडिताची आई अगोदरच वारली होती. आणि आता भामिनीही गेली. वडीलही थोड्याच काळात वारले. संसार, कुटुंब या अर्थाने जगन्नाथ पंडित एकटा, एकाकीपडला. आपले नशीब उघडण्यासाठी, किंवा या एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी किंवा आपल्या ज्ञानाची,विद्वत्ततेची इथे अथवा जवळच्या कर्नाटक, महाराष्ट्रात कदर होतनाही, दखल घेतली जात नाही या भावनेतूनही असेल, पण जगन्नाथ पंडित उत्तरेकडे निघाला.

जयपुरचा राजा भगवानदास याने त्याला आश्रय दिला. जगन्नाथ पंडिताने पाठशाळा काढली. त्याच्या हाताखाली शिकून तयार झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्यागुरुची कीर्ति सर्वदूर पसरवली. त्या काळी विद्वान शास्त्री पंडितांच्या वादसभा, चर्चा होत असत. त्यात पंडित जगन्नाथ अनेक वेळा विजयी झाला.

जगन्नाथ पंडित नुसताच व्युत्पन्न शास्त्री पंडित नव्हता. तो मोठा रंगेल वृत्तीचा रसिक कविही होता. त्याला आपल्या विद्वत्तेचा, काव्यप्रतिभेचा अभिमानआणि आत्मविश्वासहोता. जिथे विद्वत्ता प्रतिभा अभिमान आत्मविश्वास असतो त्याबरोबर अहंकारही येतो. तसा त्याच्या आत्मविश्वाला अहंकाराचा सुगंधही होता. अहंकाराला सुगंधम्हणायचे? जगन्नाथ पंडिताच्या बाबतीत तसे म्हणायला हरकत नाही. कारण तो कवि हृदयाचा होता.हा अहंकार त्याच्या काव्यप्रतिभेपुरता मर्यादित होता.

पंडित जगन्नाथाच्या आत्मविश्वासाचे उदगार त्याच्या ‘रसगंगाधर’ ग्रंथात पाहायला मिळतात. तो एके ठिकाणी म्हणतो,” प्रसाद या गुणाचे उत्तम उदाहरण म्हणजे माझीबहुतेक सर्व काव्ये”. रसगंगाधरमध्ये विविध रसांची उदाहरणे देतानाही हा बहुतेक स्वत:ची काव्येच देतो! त्याबद्दल तो म्हणतो की,” मी इतरांच्या कविता कशाला घेऊ?आपल्यातच कस्तुरी असणारा मृग दुसऱ्या फुलांचा वास कशाला घेईल?” गंगालहरीतही एके ठिकाणी जगन्नाथ या नामाचा उपयोग त्याने स्वत:चे नाव आणि ‘मी जगाचानाथ’ असे दोन्ही अर्थ होतील अशा तऱ्हेने करून आपला रुबाब दाखवला आहे!

ह्या बरोबरच त्त्याची गुलाबी रंगेल वृत्तीही एक मोठा विशेष आहे. गंगालहरीसारख्या आर्तमधुर भक्तीपर काव्यातही ‘नृपतिरमणींनां कुचतटी’, ‘ सुरस्त्री वक्षोज’ अशा गोष्टीआढळतात. पण तरीही त्यातील भक्तिरसाची गोडी, भक्ताची आर्तता यत्किंचितही कमी होत नाही.

जगन्नाथ पंडिताच्या काळात अकबर बादशहा हिंदुस्थानचा सम्राट होता. तो सुसंस्कृत होता. रत्नपारखी होता. म्हणूनच त्याच्या दरबारातील मंत्री,सल्लागारांना नवरत्नेम्हणत. त्याचा दरबार नवरत्न दरबार म्हणूनच ओळखला जात होता.

अकबराने सर्व धर्मातील पंथातील चांगल्या आणि सर्वमान्य अशा तत्वांच्या आधारे एक नविन धर्म, ‘ दिने-इलाही’ स्थापन करण्याचा प्रयत्न केला. एकदा एक विद्वानमौलवी अकबराला म्हणाला की तो एखाद्या विद्वान हिंदु पंडिताशी कुराणाच्या आधारे धर्म चर्चा करायला तयार आहे. अकबराने अशा हिंदु पंडिताचा शोध घ्यायलासांगितले. सगळ्यांकडून अकबराला जगन्नाथ पंडिताचेच नाव ऐकायला येऊ लागले.

अकबराने जयपुरच्या नरेशाला जगन्नाथ पंडिताला दिल्लीला पाठवण्याचा सांगावा धाडला. दिल्लीच्या बादशहाचा निरोप म्हणजे हुकुमच की! शिवाय जयपुरच्याराजाची बहिण अकबराची एक राणी होती. अकबराला तिच्यापासून एक मुलगी झाली होती. ती बुद्धीमान आणि सुंदर होती. अकबराने लाडाने तिचे नाव लवंगी ठेवलेहोते. कुनिष्का असे तिचे दुसरेही एक नाव होते असे म्हणतात.

दिल्लीला जाण्याअगोदर जगन्नाथ पंडिताने कुराणाचा अभ्यास केला. दिल्ली दरबारी पोचल्यावर जगन्नाथ पंडिताची आणि त्या मौलवीची बरीच चर्चा होत असे. चर्चेतूनकाय निष्पन्न झाले त्याची कुठेही नोंद नाही.

दमलो होतो थकलो होतो …

मला पंढरपुरची पायी वारी करण्याची बरेच वर्षापासून इच्छा होती. पण तसा योग येत नव्हता. मी तसा ज्ञानेश्वरांच्या पालखीबरोबर सासवडपर्यंत बरेच वेळा जात असे. त्यातहीमोठा आनंद होता.मला स्वत:ला मात्र दुधाची तहान ताकावर भागवली असे वाटायचे. अखेर ती संधी चालून आली. माझी पंढरपुरची पायी वारी सफळ झाली!

ही हकीकत २००७ सालची. त्यानंतरहा मी जेव्हा संधी मिळेल तेव्हा माऊलीबरोबर सासवडपर्यंत जाउन येत असे. असाच २०१४ साली निघलो. पण हडपसरच्या पुलापाशीआल्यावर फार दमलो होतो. एक पाऊल टाकवत नव्हते. दम खाण्यासाठी पुलाखाली बसलो होतो.समोर वारी दिसत होती…..

 

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो

समोरुन वारी वाहात होती
वारकऱ्यांची पावले पळत होती
विठोबाला पाहाण्यासाठी.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो.।।

किती पावले चालत होती
गणती करता येत नव्हती!
चपला होत्या सॅंडल्स होत्या
फ्लोटर्स होते वहाणाही होत्या.
हवाई होत्या स्लीपर्स होते
बूट होते शूज होते
वाॅकर्स होते रनर्स होते
पण हे सगळे थोडे होते.
चपलाच सगळ्यात जास्त होत्या.
कोल्हापुरी होत्या कानपुरी होत्या
बऱ्याच काही अनवाणी होत्या!

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो. ।।

सलवार होती कुडते होते
टाॅप होते खमिजही होते
पॅंट होत्या जिन्स होत्या
पण सगळ्या अगदी मोजक्या होत्या
शर्ट होते टिशर्ट होते
पण सदरे पायजमे सर्वत्र होते
ओढणी होती सलवार होती
पण साड्या लुगडी भरपूर होती.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो. ।।

पटका होता मुंडासे होती
कॅप कुठे दिसत नव्हती
फेटा कुठे क्वचितच होता
गांधी टोपीचा सागर होता.
डोक्यावर तुळस होती
एखादीच्या कळशी होती.
ओझी होती बोचकी होती
पावले झपझप पडत होती।।
पोरे होती लेकरं होती
आजे होते आजी होती
काठी टेकत चालली होती
मी मात्र …

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो.।।

आवाज होता घोष होते
गजर होता गोंधळ नव्हता.
नाद होता ताल होता
टाळ मृदुंग वाजत होता
वारी अभंग म्हणत होती
दिंड्या पताका नाचत होत्या.
ज्ञानोब्बा माऊली तुकाराम तुकाराम
हा एकच मंत्र चालला होता.
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरी
ज्ञानेश्वर माऊली तुकराम
हेच परवलीचे शब्द होते
सगळे वेद ह्यातच होते.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो.।।

घेणारे हात हजार होते
देणारेही तितकेच होते
विठ्ठल- प्रसाद वारीचा
आनंदाने खात होते.
सर्वच काही हसत नव्हते
पण सगळे आनंदाSत होते.
समोर वारी वाहात होती
सद्भाव वाटत चालली होती.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसून होतो.।।

वारी कधी नाचायची
मधीच थोडी थांबायची
टाळ मृदुंग दणदणायची!
लगबग होती धावपळ होती
विठोबाला भेटण्यासाठी
सागर नदीला मिळण्यासाठी
वेगात वारी चालली होती.
काठावर मी बसलो होतो
तरीही मी भिजलो होतो
आता मी उठलो होतो
चार पावले टाकीत मी
वारी बरोबर जात होतो …।।

माझी गुड माॅर्निंग!

मॅरिएटा

रात्रभर झोपलो नव्हतो. हो, संपूर्ण रात्र. जेवणे झाल्यावर थोड्या गप्पागोष्टी झाल्या. मग वाचत बसलो, ते रात्री दीड वाजेपर्यंत. नंतर झोप आलीच नाही.नेहमी असे होत नाही. कितीही जागलो तरी पहाटे ३-४ च्या सुमारास तरी झोप लागते. त्यामुळे मग रोज उशीरा उठणे. सकाळी उशीरा, उशीरा म्हणजे किती! ९:३० पासून ११:३०-१२:००वाजेपर्यंत केव्हाही! मी उशीरा उठतो अशी ख्याती मीच करून ठेवलेली.

रात्रभर झोपलोच नव्हतो; त्यामुळे जागा झालो म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. भली पहाटही नाही आणि सकाळ तर नाहीच अशा प्रात:काळी उठलो. खिडकीतून बाहेर पाहिले. फार फार छान वाटले. खाली येऊन पट्कन चहा केला. प्यालो आणि बाहेर आलो. शांततेच्या स्वर्गात आलो.वाराही अजून उठला नव्हता त्यमुळे झाडेही जागी झाली नव्हती. गाढ स्तब्ध होती. रात्री पाऊस पडून गेल्यामुळे विमल होती. एक म्हणजे एकही पान हलत नव्हते. सगळी झाडे स्तब्ध होती.स्तब्धचा अर्थ झाडे होता. मी कागदावर आता ‘वल्ली’ लिहिले असते तरी तेव्हा वेली थरारल्या असत्या. सगळीकडे इतके शांत शांत होते. पातळ असे धुकेही मध्ये मध्ये उभे होते. त्यानेही शांततेला गांभीर्य दिले होते.

रात्रीच्या पावसाचे मोती पानावर फुलांच्या पाकळ्यांवर थबकून होते. केव्हा निघायचे विचार करत घरंगळत पाना पाकळ्यांच्या टोकाशी थांबले होते. सूर्य येईल आणि नकळत अलगद घेऊन जाईल! पहाट म्हणावी का प्रभात अशा वेळी पक्षी कसे नसतील? होते. वडील गंभीर होऊन गप्प गप्प आहेत म्हटल्यावर मुलेही हळू दबक्या आवाजात आपापसात बोलतात तसे पक्षी बोलत होते. जे बसले होते ते झाडाचे कसे एक पानही हलू न देता बसले होते. एखाद दुसरे उडणारेही आपले पंख न फडफडवताच जात होते.

काहींचे आवाज जुन्या टाईपरायटरचे एकच बटन दाबत दाबत रेघ ओढताना आवाज येई तशा आवाजात तर काही जुन्या तारायंत्राच्या कट्ट कडकट्ट अशा शब्दात बोलत होते. एक दोघे लांSब शिट्टी वाजवत खुणेच्या भाषेत बोलत चालले होते. एक दोघे एकएकटे होते ते नटासारखे स्वगत म्हणत होते.काही संवाद विसरलेल्या नटासारखे भांबावून प्राॅम्पटर कुठे दिसतोय का पहात होते.पण पाखरांचे कौतुक बघा, त्यांच्या आवाजाने शांततेला क्षणभरही तडा गेला नाही. मौनात मग्न असलेल्या शांततेला पक्ष्यांचे स्वर सुगंधित करत होते.

‘काय म्हणावे या स्थितीला’ असा विचारत त्या ‘ सर्वार्थ मौनातील ‘ थोडेसे मौन घेऊन आत आलो.